झोंबिवली: तरुणाईशी जुळवून घेणारा मराठी सिनेसृष्टीचा नवा प्रयोग

०१ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


मराठी सिनेमे एकाच साच्यात बनवले जातात, त्यात प्रयोगशीलतेचा कसलाही लवलेश नसतो, हॉलीवूड किंवा इतर भाषेतल्या सिनेमाची सर मराठीला कधी येणारच नाही अश्या टीकांना जबरदस्त उत्तर देणारा ‘झोंबिवली’ नुकताच रिलीज झालाय. मराठीतला हा पहिलाच झाँबीपट तरुण प्रेक्षकवर्गाला भावतोय.

कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर थिएटर पुन्हा प्रेक्षकांसाठी पन्नास टक्के क्षमतेने सुरु होतायत. गेल्या डिसेंबरमधे आलेल्या ‘स्पायडरमॅन नो वे होम’ या इंग्रजी आणि ‘पुष्पा’या तेलुगू सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. महाराष्ट्रात या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद व्यावसायिकदृष्ट्या मराठी सिनेसृष्टीसाठी चिंतेची गोष्ट ठरलीय. खरं तर, दोन इतर भाषिक सिनेमांमुळे मराठी सिनेसृष्टी अडचणीत येईल इतकी वाईट परिस्थिती अजूनही आलेली नाही.

‘पांडू’ आणि ‘झिम्मा’लाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. पण हक्काचा प्रेक्षकवर्ग जर इतर भाषेतल्या सिनेमांना जास्त गर्दी करत असेल तर मराठी सिनेसृष्टीने आतातरी कात टाकायला हवी. एका ठराविक वयोगटाच्या प्रेक्षकाला नजरेसमोर ठेवून सिनेमे बनवण्याची जुनाट पायवाट सोडायला हवी. नुकताच रिलीज झालेला दिग्दर्शक आदित्य सरपोतदारांचा ‘झोंबिवली’ ही पायवाट मोडू पाहतोय.

पहिला मराठी झाँबीपट

झाँबीपटांचा जागतिक इतिहास तसा बराच जुनाय. पहिला झाँबीपट होता तो अगदी १९३२चा ‘व्हाईट झाँबी’! पण आत्तासाठी ठळकपणे सांगायचं झालं तर एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला आलेल्या ‘रेसिडेंट एविल’ आणि ‘द हाऊस ऑफ द डेड’ या वीडियो गेमवर आधारित असलेल्या सिनेमांना झाँबीपटांची खरी सुरवात म्हणता येईल. गेल्या वीसेक वर्षांत झाँबीपटांनीही अनेक चढउतार अनुभवले आहेत.

फक्त सुरेंद्र कुमार झाँबीसारखा पेहराव करून घाबरवतो यासाठी रामसे बंधूंच्या ‘दो गज जमीन के नीचे’ला पहिला भारतीय झाँबीपट म्हणणं हा ‘गो गोवा गॉन’वर अन्याय आहे. २०१३ला आलेला राज आणि डीके या दिग्दर्शक जोडगोळीचा ‘गो गोवा गॉन’ हा भारतातला पहिला झाँबी-कॉमेडी म्हणजेच झॉमकॉम सिनेमा होता. नंतर आलेल्या ‘झाँबी’ या तमिळ आणि ‘झाँबी रेड्डी’ या तेलुगू सिनेमाचं नाव या यादीत घेता येईल. ‘बेताल’ ही नेटफ्लिक्सची वेबसिरीज भारताची पहिली झाँबी सिरीज ठरली.

आता मराठी सिनेसृष्टीनेही या वाहत्या गंगेत हात धुवून घेत आपला पहिला झाँबीपट ‘झोंबिवली’ रिलीज केलाय. ‘उलाढाल’, ‘नारबाची वाडी’, ‘क्लासमेट्स’, ‘फास्टर फेणे’ आणि ‘माऊली’सारख्या सुपरहिट मराठी सिनेमांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हा नवा सिनेमा. डोंबिवली शहरात घुसलेल्या झाँबींभोवती या सिनेमाची कथा फिरते.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

‘झोंबिवली’चं डोंबिवली कनेक्शन

मराठीतल्या पहिल्या झाँबीपटाचं नाव ‘झोंबिवली’ आहे हे जाहीर झाल्यापासूनच उत्सुकता वाढली होती. नावावरून हा झाँबीपट डोंबिवलीच्या पार्श्वभूमीवर घडणार हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. पण एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात फक्त डोंबिवलीच का आणि दुसरं कोणतं शहर किंवा गाव का नाही या प्रश्नाने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं होतं. दुर्दैवाने, हा सिनेमा या प्रश्नाचं उत्तर देत नाही.

हे शहर निवडण्यापूर्वी डोंबिवलीच्या इतिहासाचा विचार केला असता तर मूळ कथेला अजून वजन प्राप्त झालं असतं. जुन्या काळात एखाद्या भागाला तिथल्या स्थानिकांच्या जातीवरून नाव दिलं जायचं. डोंबिवलीला हे नाव तिथल्या डोंब लोकांच्या वस्तीमुळं मिळालं होतं. डोंब म्हणजे स्मशानात प्रेत जाळणारा व्यक्ती. ना धड जिवंत ना धड मृत अवस्थेत असलेल्या झाँबींचा डोंबिवली शहराशी अशा प्रकारे संबंध जोडला गेला असता तर प्रेक्षकांनाही एक अनोखा ‘कनेक्ट’ अनुभवता आला असता.

दुसरी गोष्ट म्हणजे कथेचा वेग प्रचंड आहे आणि त्यातच वेगवेगळ्या उपकथानकांमधून सामाजिक विषयांनाही हात घालायचं धाडस दिग्दर्शकाने केलेलं आहे. या सगळ्या धावपळीत डोंबिवली फारशी कुठं दिसतच नाही. मराठी सिनेमात असा प्रयोग पहिल्यांदाच करताना लाईट, साऊंड, कॅमेरा आणि अॅक्शनच्या सगळ्या तांत्रिक बाजू उत्तम जमून आलेल्या आहेत. पण ज्या शहराचं नाव आहे, त्याचा आत्माच हरवल्याचं राहून राहून वाटतं.

मराठी सिनेसृष्टीतली तरुणाईची ‘न्यू वेव’

तरुणाईला आपल्याकडे खेचणारा मनोरंजक घटक मराठी सिनेमाकडे नाही अशी बोंब सर्रास उठवली जाते. कारण मराठी सिनेमा म्हटलं की प्रामुख्याने पस्तीशी पार केलेला, कच्च्याबच्च्यांना सांभाळत तिकीटबारीवर गर्दी करणारा एक टिपिकल प्रेक्षकवर्ग आपल्या नजरेसमोर येतो. यात तरुणाईचा टक्का नावालाच दिसतो. पण सध्या हे चित्र हळूहळू बदलतंय. कॉलेजात रमणाऱ्या तरुणाईला मराठी सिनेमाच्या तिकीटबारीवर यायला भाग पाडणारे बरेच विषय आता येत आहेत.

गेल्या दशकभराचा विचार करता, तरुणाईला भावतील असे सिनेमे बनवणाऱ्या मराठी दिग्दर्शकांमधे आदित्य सरपोतदार यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. दिग्पाल लांजेकरांनी मार्वल, डीसीसारखी ‘छत्रपती युनिवर्स’ पडद्यावर साकारायचा घेतलेला ध्यास असो किंवा मनोरंजनासोबतच वास्तवाचं भान जागवणारे नागराज मंजुळेंचे सिनेमे असो, हिंदी-मल्याळम सिनेमांच्या रिमेकच्या पलीकडे जाऊन मराठी सिनेमा पुन्हा नवं रूप धारण करतोय हे चित्र नक्कीच सुखावह आहे.

ह्यालागाड आणि त्यालागाडच्या ‘जत्रे’नंतर मराठी सिनेमाकडे पाठ फिरवणाऱ्या तरुणाईला मराठी सिनेमाची ‘दुनियादारी’ आता भावतेय. गिरणी कामगारांच्या ‘लालबाग परळ’मधला ‘वरनभात लोन्चा’ही इथलाच आणि शेतकऱ्यांच्या पोरांचा ‘मुळशी पॅटर्न’ही इथलाच आहे. ‘किल्ला’ असो किंवा ‘देऊळ’, मराठी सिनेसृष्टीकडे पाहण्याची ‘दिठी’ आता बदलतेय. कुणी ‘फँड्री’ म्हणून हिणवलं तर द्वेषाने ‘सैराट’ होऊन भरकटणाऱ्या पिढीला महापुरुषांच्या वैचारिक ‘जयंती’ची शिकवण हा मराठी सिनेमा आता देतोय.

हेही वाचा:

ऑस्करच्या आयचा घो!

‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप