कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

०८ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकशाहीत कोणतीही गोष्ट हाताबाहेर नसते. आपले राजकारणी आपल्या वतीने निर्णय घेत असले तरी त्यांच्यावर आपला दबाव असतो. या संकटाच्या काळात देशोदेशीची सरकारं काय निर्णय घेतात यावर मानवजातीचं भवितव्य अवलंबून आहे. त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे, असं जगप्रसिद्ध इतिहासकार, तत्त्वचिंतक युवाल नोवा हरारी यांना वाटतं.

कोणत्याही संकटातून बाहेर जाण्यासाठी तत्त्वचिंतक आपल्याला मार्ग दाखवत असतात. आजच्या २१ व्या शतकात तत्त्वचिंतक म्हणून एका माणसाच्या बोलण्याकडे साऱ्या जगाचं लक्ष असतं, तो माणूस म्हणजे इस्राईलमधले प्रसिद्ध इतिहासकार युवाल नोवा हरारी. त्यांची सेपियन्स, होमो ड्युअस आणि २१ व्या शतकासाठी २१ धडे ही तीन पुस्तकं जगभर गाजलीत.

अमेरिकेकडून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशनला दिला जाणारा निधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केल्यानंतर ‘सेपियनशीप’ या हरारी यांच्या संस्थेनं डब्लूएचओला १ मिलियन डॉलरची मदत केली. फक्त आर्थिक मदत नाही तर या कोरोनाच्या संकटात सुरवातीपासूनच हरारी यांनी संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन केलंय. सरकारनं कोणती भूमिका घ्यायला हवी इथंपासून ते नागरिकांची कर्तव्य काय आहेत इथंपर्यंत सगळ्या गोष्टी हरारी यांनी वेळोवेळी आपल्या लक्षात आणून दिल्यात.

डीडब्लू न्यूज या जर्मन न्यूज एजन्सीनं हरारी यांची सध्याच्या कोविड१९ संकटावर सविस्तर मुलाखत घेतलीय. या मुलाखतीतही हरारी यांनी आपली तत्त्वचिंतकाची भुमिका बजावलीय. या मुलाखतीत हरारी यांनी सांगितलेले सहा महत्त्वाचे मुद्दे इथं देत आहोत.

हेही वाचा : कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

१) राजकारण्यांवर नागरिकांचा दबाव पाहिजे

लोकशाहीत कधीही गोष्टी पूर्णपणे आपल्या हाताबाहेर नसतात. योजना बनवणाऱ्या राजकीय पक्षांना आणि राजकारण्यांना आपणच तर मत देत असतो. त्यामुळे राजकीय व्यवस्थेवर आपलं नियंत्रण असतंच. आत्ता कदाचित निवडणुका नसतील. तरीही राजकारण्यांवर तुमचा सार्वजनिक दबाव असतोच.

साथरोगामुळे नागरिक घाबरले आणि एखाद्या खमक्या नेत्याने सूत्रं हातात घ्यावीत, अशी मागणी करू लागले तर एखाद्या हुकूमशहासाठी ते सगळ्यात जास्त सोपं होऊन जातं. पण दुसरीकडे नेता फारच पुढे जाऊ लागला तर लोकांनी प्रतिकार केल्याने भयानक गोष्टी होण्यापासून थांबवलं जाऊ शकतं.

२) वायरस हा खरा धोका नाही

मला वाटतं आत्ताच्या काळात कोरोना वायरस हा धोका नाहीय. या वायरसशी दोन हात करण्यासाठी माणसाकडे पुरेसं वैज्ञानिक ज्ञान आणि तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचा, आपल्या आतल्या राक्षसाचा. आपल्या द्वेषाचा, लोभाचा आणि अज्ञानाचा. या संकटाच्या काळात लोकांना वैश्विक एकजुट करायला हवी. पण याउलट या परिस्थितीनं लोकांच्या मनात द्वेष पेरलाय. देश एकमेकांकडे बोट दाखवून त्या वंशाच्या किंवा देशातल्या धार्मिक अल्पसंख्यांकांना दोष देताहेत.

पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण सगळे एकमेकांना साथ देत द्वेषाने नाही तर एकजुटीने या संकटाशी सामना करूत, अशी आशा मला वाटते. यामुळे गरजूंना मदत करण्याएवढी उदारता आपण विकसित करू शकू.

षडयंत्राच्या बाता करणाऱ्या गोष्टींवर सहज विश्वास न ठेऊ नका. त्याऐवजी सत्य पडताळण्याची ताकद आपण आपल्यात विकसित करायला हवी. असं झालं तर आपण सहजपणे या संकटावर मात करू शकू याबद्दल मला काहीही शंका नाही.

३) आपल्याला वैज्ञानिकांना ऐकावं लागेल

गेल्या काही वर्षांपासून अनेक राजकीय नेते वैज्ञानिकांना खोटं ठरवण्याच्या मागे लागलेत. वैज्ञानिकांना अस्सल आयुष्यातलं काहीही माहीत नसतं, ते सांगतायत ते क्लायमेट चेंज वगैरे सारं थोतांड आहे. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवता कामा नये, असं काहीबाही या राजकारणी मंडळीकडून सांगितलं जायचं. पण या संकटाच्या काळात लोकांना सगळ्यात जास्त विश्वास वैज्ञानिकांबद्दलच वाटतो.

याची आठवण आपण संकट संपल्यावरही ठेवू अशी अपेक्षा मला आहे. शाळेत मुलांना वायरसबद्दलचं योग्य विज्ञान चांगल्या प्रकारे शिकवण्याचा आपण प्रयत्न करू. त्यांना उत्क्रांतीचा सिद्धांतही शिकवू. त्यामुळे आपले सायन्टिस्ट वायरसऐवजी क्लायमॅट चेंजसारख्या गोष्टींबाबत आपल्याला धोक्याची सूचना देत असतील तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकायचं असतं हे आपल्याला समजेल.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

ग्लोव घातल्याने कोरोना वायरसपासून संपूर्ण संरक्षण होतं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

४) जीवशास्त्रातल्या पीएचडीची गरज नाही

आपल्याला भूतकाळातल्या घटनांची मदत घ्यायला हवी. तुमचा नेता तुमच्याशी सातत्याने खोटं बोलत आला असेल तर या संकटाच्या काळात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुमच्याकडे काही कारणच उरत नाही. तुम्हाला जे सिद्धांत सांगितले जातात, त्यावर प्रश्न विचारत राहणं हे तुमचं काम आहे.

वायरसची निर्मिती आणि प्रसाराबाबतीत अनेक उलट्यासुलट्या गोष्टी बोलल्या जातायत. त्याचं समर्थन करणाऱ्या प्रत्येकाला हा वायरस कसा तयार झाला आणि त्यामुळे माणूस कसा आजारी पडतो असे काही मुलभूत प्रश्न विचारायला हवेत. या प्रश्नांची उत्तरं तो माणूस देऊ शकला नाही तर त्याला वायरसबाबत काहीही माहीत नाहीय. मग त्याच्या कुठल्याही सिद्धांतावर विश्वास कशाला ठेवायचा? एखाद्याकडे जीवशास्त्रातली पीएचडी असायची गरज नाहीय. पण मुलभूत वैज्ञानिक समज तुमच्याकडे असायला हवी.

हेही वाचा : कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी

५) सत्तेचं विकेंद्रीकरण आवश्यक

नागरिकांवरची पाळत वाढवण्याची वेळ येईल तेव्हा आपण सरकारवरचीही पाळत वाढवायला हवी. या संकटामधे सरकार पाण्यासारखा पैसा खर्च करतंय. अमेरिकेमधे २ ट्रिलियन डॉलर तर जर्मनीत शेकडो, लाखो युरोंचा खर्च केलाय. एक नागरिक म्हणून हे निर्णय कोण घेतंय आणि हा पैसा कुठे जातोय हे मला कळालं पाहिजे. प्रशासनाच्या चुकीच्या निर्णायामुळे धंदा मंदावलेल्या मोठ्या कंपन्यांवर हा पैसा खर्च केला जातोय की छोट्या उद्योगांना, हॉटेल्स आणि दुकांनासाठी दिला जातोय, हे पहायला हवं.

शासन पाळत ठेवण्याचा आग्रह करत असेल तर ही पाळत दोन्हींकडून ठेवली जावी. हे गुंतागुंतीचं आहे. आम्ही सगळे आर्थिक व्यवहार असे उघडे करू शकत नाही, असं सरकार म्हणू लागलं तर तुम्ही म्हणा, ‘नाही. हे गुंतागुंतीचं नाहीय. मी रोज कुठे जातो यावर पाळत ठेवणं तुम्हाला सोपं पडतं तसंच तुम्ही आमच्या कराचं काय करता यावर पाळत ठेवण्याची सोपी व्यवस्था निर्माण करणं शक्य आहे.’

सत्तेचं विकेंद्रीकरण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एका माणसाच्या किंवा मुठभर अधिकाऱ्यांच्या हातात सत्ता एकवटणं योग्य नाही. समजा, कोरोना वायरसचे पेशंट आपल्या आसपास आहेत की नाही याची माहिती लोकांना द्यायची आहे तर त्यासाठीही दोन मार्ग उपलब्ध आहेत. एखाद्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडे सगळी माहिती साठवणं आणि त्यानंतर कोरोना वायरसची लागण झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्यांना त्याची माहिती देणं, हा एक मार्ग.

तर कोरोना वायरस असलेल्या व्यक्तीच्या जवळून मी गेलो तर त्याचा किंवा तिचा फोन आणि माझा फोन यांच्यात माहितीची देवाणघेवाण होऊन मला सूचना मिळेल, हा दुसरा मार्ग. या दुसऱ्या मार्गात सगळी माहिती एकाच माणसाकडे जमा करणं गरजेचं नाही.

६) आपल्या निर्णयावर जगाचं भवितव्य ठरणार

आर्थिक आणीबाणीमुळे निरोपयोगी माणसं वाढण्याचं संकट आता नाट्यमय पद्धतीने वाढणार आहे. लोक घरात लॉकडाऊन आहेत. लोक बाहेर पडले तर त्यांना वायरसची लागण होऊ शकते. पण रोबोटला अशी लागण होत नाही. त्यामुळेच रोबोट आणि कम्प्यूटर लोकांच्या रोजगारावर आक्रमण करतील. आता ऑटोमेशन म्हणजे स्वयंचलनाला कंपन्या प्राध्यान्य देतील.

एकीकडे स्वयंचलन तर दुसरीकडे अ-जागतिकीकरण म्हणजे डीग्लोबलाईझेशन या दोन्हींमुळे स्वस्त कामगारांवर आधारलेल्या बहुतांश विकसनशील देशांकडे अचानक निरोपयोगी लोकांचा एक वर्ग निर्माण होईल. या निरोपयोगी लोकांचे रोजगार एकतर मशीनकडे गेलेले असतील नाहीतर त्यांच्या कंपन्या आपल्या मायदेशी परत गेल्या असतील. या वायरसमुळे नोकऱ्यांचं स्वरूप कायमचं बदलून जाणार आहे. लोक घरातून काम करतायत, ऑनलाईन काम करतायत. यानं संघटीत कामगारांचा वर्ग पूर्णपणे कोसळेल.

पण हे असंच होईल असं काही नाही. हे सगळं राजकीय निर्णयांवर अवलंबून आहे. देशातल्या कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवणारे निर्णय घेणं शक्य आहे. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी सरकार उद्योगधंद्यांना आणि कंपनीला आर्थिक मदत करतंय. अशावेळी कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवण्याची अट सरकार घालू शकतं. थोडक्यात काय, तर यापुढची मानवजात कशी असेल हे आपण कोणते निर्णय घेतो त्यावर अवलंबून आहे.

हेही वाचा : 

‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच

तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

भविष्यात डेटा डिक्टेटरशिपचा धोकाः युवाल नोआ हरारी

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

कोरोनावरचा उपाय म्हणून वायरल होणाऱ्या ५ गोष्टींमागचं अर्धसत्य

सरकारनं आपल्या मदतीला पाठवलेला 'आरोग्य सेतू' स्वतः सुरक्षित आहे का?

लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी

(अनुवादः रेणुका कल्पना)