बाबासाहेब आमचेही आयकॉन म्हणणारी फेसबुकवरची तरुणाई

०६ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ८ मिनिटं


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर. शोषित, वंचित समूहाला आत्मभान देणारा महामानव. सर्वसमावेशक संविधान देऊन इथली हजारो वर्षांची गुलामी बाबासाहेबांनी मोडीत काढली. स्पृश्या-अस्पृश्यांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटवली. शिक्षणामुळे या गावकुसाबाहेरच्या समूहाला गुलामीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला. त्यामुळेच हा मार्ग दाखवणारे बाबासाहेब या शोषित, वंचित समूहाच्या गळ्यातला ताईत बनले.

आता बाबासाहेब केवळ दलित समूहापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आजची तरुण पिढी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करतेय. अशा सगळ्याच जातीधर्मातल्या तरुणाईला बाबासाहेब आपला आयकॉन वाटतात. थेट भूमिका घेतानाही ही पिढी मागेपुढे पाहत नाही. त्यामुळेच सोशल मीडियातून व्यक्त होत असताना या पिढीला बाबासाहेबांचे दाखले देणं आता गरजेचं वाटू लागलंय.

अगदी जेएनयू ते मुंबई, पुणे विद्यापीठातल्या आंदोलनांमधे 'जय भीम'चा नारा बुलंद करणारी ही तरुणाई चाचपडत बाबासाहेबांपर्यंत पोचतेय.
ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी लाखो पोरं आता बोलू लागलीयत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा त्यांना मोठा आधार वाटतोय. त्यामुळेच ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशा तरुणाईपर्यंत बाबासाहेब कसे पोचले, त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतला ते समजून घ्यायला हवं.

हेही वाचा: मुक्काम चैत्यभूमीः ‘जय भीम’ जागवणारी रात्र

बौद्धवाडीत भेटलेले बाबासाहेब

- शुभम सुतार

माझं मूळ गाव सिंधुदूर्गच्या मालवण तालुक्यातलं असगणी. मी लहान होतो तेव्हाच माझे वडील वारले. ते सुतारकाम करायचे. पुढं आईच्या आईनं म्हणजेच आजीनं आम्हा तीन भावंडांना सांभाळलं. गावात काही उपजीविकेचं साधन नव्हतं म्हणून आई तालुक्याच्या ठिकाणी घेऊन आली. इथंच शाळा, कॉलेजचं शिक्षण झालं.

इथं शहरात आल्यावर नाकारलं जाणं काय असतं हे माझ्या आईनं अनुभवलं होतं. वडील गेल्यामुळे आई आणि आम्हा तीन भावंडांना मुख्य बाजारपेठेत कुठंच रूम मिळाली नाही. मी तेव्हा फार लहान होतो. पण आजूबाजूला जे घडतंय ते समजत होतं. बाजारपेठेपासून अगदी जवळच बौद्धवाडी होती. तिथंच एकेठिकाणी आम्हाला रूम मिळाली. सुरवातीला तिथंही आईकडे शंकेनं बघितलं गेलं. आमची जात काहीतरी वेगळी आहे हेही तिथं जाणवायचं.

खूप वर्ष आम्ही बौद्धवाडीत भाड्याने राहिलो. प्राथमिक आणि माध्यमिक शाळाही जवळ होती. त्यामुळे बौद्धवाडीतले काही मित्र वर्गात होते. हे मित्र घरी यायचे. मीही त्यांच्या घरी जायचो. पण ते घरी आले की, आई आम्हाला बाहेरच खेळा असं म्हणायची. कधी शेजारच्या काकू घरी यायच्या. पण आई त्यांच्याशी तेव्हा चांगलं बोलायची हे आठवतंय. संध्याकाळ झाली की, तिथल्या एका वाचनालयात वर्ग भरायचे. मी या मित्रांसोबत तिथं जायचो. तिथं असलेल्या दादा-ताई आम्हाला वर्ग झाले की गाणी शिकवायचे. ही गाणी मला तोंडपाठ झाली होती. ती घरी येऊन म्हटलं की माझी आई खूप ओरडायची.

माध्यमिक शाळाही जवळ होती. त्यामुळे बौद्धवाडीतले मित्रही तिथंच होते. पुढे कॉलेजमधेही हेच मित्र सोबत होते. बौद्धवाडीतल्या वाचनालयात रविवार-शनिवार खूप कार्यक्रम व्हायचे. मी तिथं जायचो. इथं गाणी म्हटली जायची. वेगवेगळी भाषणं असायची. त्याला जायला आई नको म्हणायची. पण या गाण्यांचा अर्थ हळूहळू कळत गेला. वाचन वाढलं. इथंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले. इथंच सावित्री फुले, महात्मा फुले भेटले.

मी सायन्समधे ८७.२६ टक्के मिळवले. पुढचं शिक्षण पुण्याच्या गरवारे कॉलेजमधून पूर्ण केलं. काही काळ जॉब केला. गावचे मित्र आजही माझ्या कॉन्टॅक्टमधे आहेत. माझ्या प्रश्नांमुळे आई कायमच बौद्धवाडीतल्या मित्रांपासून लांब रहा असं आजही सांगते. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारत असल्यामुळे तिला वाटतं की मी बिघडलोय. त्याला बौद्धवाडीतले मित्र, माझं जास्त पुस्तक वाचणं जबाबदार आहे असं तिला वाटायचं. पण तसं काही नाही. उलट हे वाचन, शिक्षण मला डॉ. आंबेडकर, सावित्री आणि महात्मा फुलेंपर्यंत घेऊन आलं.

समतेची वाट दाखवली

- ऋचा दिनकर

मी शाळेत असताना जी मिळतील ती पुस्तकं वाचून काढली, मराठीतले वेगवेगळे साहित्यप्रकार वाचून काढले पण खरं सांगायचं तर दलित साहित्याला मी फारसा हात लावला नाही. दलित साहित्य वाचल्यावर समाजातल्या सत्य परिस्थितीची जी जाणीव व्हायची, ती पचवायची ताकद माझ्यात नव्हती. समाजाने दलितांना दिलेला त्रास आणि अन्यायी वागणूक पाहून मी अस्वस्थ व्हायचे त्यामुळे कधीच ते पुस्तक पूर्ण वाचून व्हायचं नाही.

दलित साहित्यातली अशी अनेक पुस्तकं मी अर्धवट वाचून बंद केली होती पण वयाच्या एका टप्प्यावर मला समजलं मी जे टाळतेय ते टाळून काहीच होणार नाहीये. जे वाचतानाही मला त्रास होतो ते समाजातल्या एका भागाने प्रत्यक्षात अनुभवलंय, भोगलंय. अजूनही समाजात कुठे ना कुठे ते घडतंय. जेव्हा मी दलित साहित्य वाचलं तेव्हा मला डॉ. आंबेडकरांच्या कामाची व्याप्ती आणि महत्त्व समजलं.

आजमितीला आपल्यातले काही लोक बाबासाहेबांना आणि इतरही महापुरुषांना ठराविक जातीत वाटून घेतात, त्यांना ठराविक जाती-समुदायापर्यंत मर्यादित ठेवतात पण आंबेडकरांचं काम हे आपल्या सर्वांसाठी होतं, प्रत्येक भारतीय नागरिकासाठी होतं हे विसरून चालणार नाही.

आज बाबासाहेबांना जाऊन ६६ वर्ष झाली पण समाजातला एक भाग अजूनही समाजाच्या मूळ प्रवाहापासून दूर आहे, अनेक सुखसोयींपासून वंचित आहे, सुखसोयी कशाला.. अगदी बेसिक सुविधांपासूनही तो वंचित आहे. त्याला मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि आपला समाज त्यांच्याकरता चांगला बनवण्यासाठी आज आपल्याला बाबासाहेबांनी दाखवलेल्या समतेच्या वाटेवर चालणं गरजेचं आहे.

हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

बाबासाहेबांमुळे साहित्याचा प्रवासी

- धनराज कदम

माझ्या घरात शिक्षणाच्या नावाने बोंबाबोंब होती. जास्त शिकलेला मी पहिलाच. घरची परिस्थिती होती पण शिकण्याची मानसिकता नसावी त्यामुळे हे घडलं असावं कदाचित. मला आठवतंय मी सहावी, सातवीत होतो. सोबत कुणाल नावाचा एक मित्र होता. त्याला एकांकिका आणि नाटकाचा भारी शौक. त्यांच्या बोलण्यात कायमच सर्वधर्मसमभावाचं सूत्र असायचं. अर्थात तेव्हा त्याचा फार अर्थ कळायचा नाही. पण सर्वधर्मसमभाव म्हणजे नेमकं काय हे सांगण्याचा तो नेहमी प्रयत्न करायचा. आमची मित्रांची ऐकण्याची मानसिकताच नसायची. त्यामुळे हा विषय कधी डोक्यात आलाच नाही.

साहित्यातला कविता हा माझा आवडता प्रकार होता. बाकी इतर साहित्य मला आवडायचं नाही. पण मित्र कुणाल कायमच संविधान समजून सांगायचा. काही कळत नव्हतं पण कुठेतरी ऐकल्यानंतर असं वाटायचं की, हे ज्या व्यक्तीने लिहिलंय त्यांनी खूप चुकीचं लिहिलंय. हिंदूंवर त्यांनी खूप अन्याय केलाय. सगळं जे काही केलंय ते फक्त दलितांसाठीच आमच्यासाठी काय?

जिथं सगळं काही हिंदू-हिंदू केलं जातं किंवा जातीय रंग दिला जातो अशा मराठा कुटुंबात मी वाढतो होतो. त्यामुळेच माझी जात सर्वश्रेष्ठ असं मला नेहमीच वाटायचं. जे मिळतंय ते आम्हाला म्हणजे फक्त हिंदूंना मिळायला हवं असंच मला कायम वाटायचं. इतर जातीच्या लोकांबद्दल खूप राग यायचा. चिड यायची. हेच लोक आपल्यातला अडथळा आहेत असंही वाटायचं.

कॉलेजमधे आलो. साहित्याचा व्यासंग हळूहळू वाढत होता. ग्रंथालय खूप जवळचं वाटायला लागलं होतं. हळूहळू एक गोष्ट कळली की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी व्यक्ती पुस्तकांसाठी एखाद्या पावाच्या तुकड्यावर दिवस काढू शकते. त्यामुळेच काहीतरी अचाट आहे या माणसांमधे असं वाटू लागलं. त्यांच्याविषयी वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे असंही वाटायचं. इथूनच प्रवास सुरु झाला बाबासाहेब समजून घेण्याचा.

हळूहळू ज्या माणसाचा मी द्वेष करायचो त्याच्या प्रेमात पडलो. समानतेचा अधिकार देणारे बाबासाहेब आता कुठं कळू लागलेत. सगळ्यांना सगळं काही मिळालं पाहिजे आणि माणसाने एका जातीच्या चष्म्यातून न बघता एक माणूस म्हणून माणसाकडे बघण्याची जी दृष्टी आता खऱ्या अर्थाने विकसित झाली ती बाबासाहेबांमुळे. त्यामुळे हळूहळू संविधानाचा अभ्यासही वाढत गेला.

पत्रकारितेचं शिक्षण घेताना चौकसपणे विचार करता आला. त्यामुळेच बाबासाहेबांबद्दल आदर वाटू लागला आणि हळूहळू हा माणूस एक आदर्शवाद होत गेला. माझ्या गावात अजूनही माझ्याबद्दल बोललं जातं की, हा नेहमी बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान-संविधान याच गोष्टी करत असतो. पण ज्या दिवशी गावच्या मंडळींना संविधान समजेल त्या दिवशी शिक्षणाला खूप सन्मान आणि महत्त्व प्राप्त होईल. थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही होतात म्हणून मी साहित्याचा प्रवासी झालो.

‘सुंबरान’ची कल्ली होण्याचं भाग्य

- श्रुती वाघमोडे

मी सोलापुरात घेत आलेल्या बारावीपर्यंतच्या शिक्षणामधे बाबासाहेबांची ओळख ही फक्त संविधान निर्माता, मानवाधिकाराची जाण देणारे अशीच थोडीथोडकी होती. कॉलेजला तर बाबासाहेबांचा उल्लेख ऐकल्याचं मला आठवतही नाही. अगदीच घरचंही सांगायचं झालं तर, जेव्हा १४ एप्रिलला आपणही पुरणपोळीचा बेत करू असं मी म्हणलं तेव्हा माझ्या आईची प्रतिक्रिया नकारात्मक भावनेची होती.

बाबासाहेबांची खरी ओळख मला माझ्या मास्टर्सच्या वेळी झाली. ‘स्त्री आणि लिंगभाव अभ्यास’ विभागात मास्टर्स करताना प्रत्येक अभ्यासक्रमात बाबासाहेब भेटत गेले. बाबासाहेबांनी स्त्री उद्धारक असा ‘हिंदू कोड बिल’ दिला, ज्याने स्वतंत्र भारतातल्या स्त्री-पुरुष समानतेचा पाया रचला. चळवळीतल्या उच्चजातीय स्त्रियांच्या नेतृत्वाला फाटा देऊन दलित स्त्रियांचा चळवळीमधला सहभाग वाढवला. त्यांनी आमच्या भटक्या विमुक्त जमातीची गुन्हेगारी ओळख दूर करुन माणूस म्हणून जगण्याचा अवकाश दिला.

माझ्या वाचन आणि अभ्यासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच फुले दाम्पत्य, मार्क्स, शाहू असे कित्येक क्रांतीकारी व्यक्तिमत्वं येत गेली. माझ्या विचारांमधे नव्याने भर पडत गेली. माझी मानवतावादी बनण्याची वाटचाल इथूनच सुरु होते. होणाऱ्या अन्यायाविरुद्ध माझा उठणारा आवाज किंवा आवाज उठवू न शकल्यास मनातून होणारी घुसमट बाबासाहेबांनी मला दिलेल्या विचारांना आणखी धार लावते.

मी पहिल्यांदा आंदोलनात गेले आणि ‘जय भीम’चा नारा ऐकला, तेव्हा माझ्या अंगावर जो शहारा आला तो माझ्या वैचारिक बांधिलकीला जिवंत ठेवणारा आहे. त्यानंतर आजही माझ्या समविचारी माणसांना ‘नमस्कार’ऐवजी मी ‘जय भीम’ म्हणते. मेंढरांच्या कळपातून सुटून ‘सुंबरान’ची कल्ली होण्याचं भाग्य मला बाबासाहेबांनी दिलं. मी त्यांची ऋणी आहे.

हेही वाचा: रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

परदेशी शिक्षणाचा वेध लावणारा बाप

- कल्पेश यमनेरे

समाजाचा भाग म्हणून मरीआई, मुंजोबा आणि कालिका देवी पूजा करणाऱ्या माझ्या आईवडलांना ४ वर्ष लेकरूच झालं नाही. त्यांनी कालिका मातेला नवस केला आणि मी झालो. माझं बालपण मुक्ताईनगर तालुक्यातल्या माळेगावमधे गेलं. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी मला तालुक्याच्या गावी जायचं होतं. घरची परिस्थिती हलाखीची होती पण वडलांना मात्र मी क्लास वन ऑफिसर व्हावं असं वाटायचं.

आठवीनंतर गावात अभ्यास होत नसल्यामुळे मी मुक्ताईनगरला आलो. तिथं मी ‘शूद्र पूर्वी कोण होते’ हे पुस्तक वाचलं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली होती. मला तेव्हा पहिल्यांदा कळलं की बाबासाहेब नेमके कोण आहेत. मी बाबासाहेबांकडे बघून माझा लढा सुरु केला आणि मुक्ताईनगर समाज कल्याण वसतिगृहात प्रवेश घेतला.

तिथं शिकताना गावकरी म्हणायचे, हा नापास होईल; पण मी पुढे ५६ टक्क्यांनी दहावी आणि ६३ टक्क्यांनी बारावी पास झालो. उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं म्हणल्यावर वडलांनी खर्चाचा प्रश्न वर काढला पण माझ्या डोळ्यासमोर बाबासाहेब होते आणि मी तयार होतो. जळगावला जाऊन पदवी घेतली. पुढे मुंबईला जाऊन एम. ए. पॉलिटिक्सला प्रवेश घेतला.

लोक म्हणतात, बाबासाहेब गेले. पण त्यांचा विचार माझ्यात जिवंत आहे आणि राहील. जर बाबासाहेब नसते आमचा समाज आज कुठेच नसता. मीही नसतो. आजवर बाबासाहेब सतत माझ्या पाठीशी उभे आहेत असं वाटत आलंय. मी जाईल तिथल्या प्रत्येक चौकात माझे बाबा कोट घालून आजही उभे आहेत. माझं पुढचं शिक्षण परदेशात जिथं माझे बाबा शिकले तिथं जाऊन पूर्ण करायचाय. हा ध्यास आहे. आणि हीच खरी बाबासाहेबांसाठी आदरांजली ठरेल.

उशिराने सापडलेली परिवर्तनाची वाट

- ऍना फर्नांडिस

माझं लहानपण इथंच दादरमधे गेलं. आम्ही राहत असलेला पारशी कॉलनीशेजारचा भाग शांत होता पण मम्मीला दादर नकोसं वाटायचं. इथल्या गर्दीचा, विशेषतः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उसळणाऱ्या गर्दीचा तिला विशेष तिटकारा होता. ‘ते’ लोक येते अन् सगळा घान करुन जाते, असं म्हणत नाक मुरडणारी काही वर्षांपूर्वीची मम्मी अजूनही आठवते.

पप्पा आणि मी तिला कितीदा समजावलं होतं पण ती आंबेडकर समजून घ्यायला तयारच नव्हती. २०१५मधे गुगलने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक डूडल केलं होतं. ते बघून मम्मीने सहज यूट्यूबवर बाबासाहेबांचं नाव सर्च केलं. त्या भल्यामोठ्या लिस्टमधे आठवड्याभरापूर्वीच रिलीज झालेला ‘जीवाला जीवाचं दान’ वीडियो होता. तिच्या आवडत्या सोनू निगमचं नाव वाचून मम्मीने तो भीमगीतांचा वीडियो पाहिला. खरंतर अनुभवला!

मी तेव्हा कॉलेजला होते. मला तिचा फोन आला. ‘ऍन, आज येताना बाबासाहेबांचं एखादं पुस्तक घेऊन ये.’ ढीगभर इंग्लिश कादंबऱ्या आणि ‘स्वामी’, ‘ययाती’सारख्या मोजक्या मराठी कादंबऱ्या वाचणारी मम्मी बाबासाहेब वाचायचं म्हणतेय हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी तिने स्वतःहून घेतलेला हा पुढाकार, उत्साह आजतागायत टिकून आहे.

एकवेळ तिच्या हातात बायबल नसेल, पण बाबासाहेबांचं एखादं तरी पुस्तक तिच्या आसपास असतं. ती कॅरोल्सही गाते आणि भीमगीतंही गाते. आता तिला सहा डिसेंबरची गर्दी खटकत नाही. परिवर्तनाची ही वाट उशिराने का होईना, मम्मीला सापडली आणि त्यात बाबासाहेबांचं योगदान निश्चितच मोठं आहे.

हेही वाचा: 

दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख