इंटरनेटवरचे मीम आपल्या वर्च्युअल जगातली एक भन्नाट गोष्ट बनलेत. गेल्या आठवड्यातच साने गुरूजींच्या शामची आई कादंबरीतल्या पात्रांवर मीम बनवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आजच्या तरूण पिढीचं अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून या मीमकडे पाहिलं जातं. हा जमानाच मीमचा आहे, त्यामुळे या नव्या माध्यमाचं स्वागत आपल्याला करायलाच लागेल.
‘ते साथरोगासारखं दिसतं आणि वायरससारखं वागतं. त्यालाच मी मीम म्हणतो,’ ‘मीम’चा शोध लावणारे रिचर्ड डाऊकिन्स २०१४ मधे ऑक्सफर्ड युनियन या संस्थेच्या कार्यक्रमात सांगत होते.
इंटरनेटवरचे मीम आपल्या वर्च्युअल जगातली एक भन्नाट गोष्ट बनलेत. आपल्या आयुष्यातली एखादी आश्चर्यकारक गोष्टबद्दल ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातल्या ‘जरा चमत्कारीकच आहे!’ असं म्हणणाऱ्या आजी पाहिल्या नंतर हा डायलॉग इथे किती चपखल बसलाय याचं आपल्याला फार हसू येतं. किंवा आईनं आपलं आवडतं जेवणं बनवल्यावर आपला मूड कसा होतो हे सांगण्यासाठी एखादं नाचणारं मांजर आलं तर त्याची आपल्याला अजूनच गंमत वाटेल.
हेही वाचा : ज्ञानदा कदमः वायरल होणारी मराठी न्यूज अँकर
असंच एक मीम परवा पाहण्यात आलं. ‘आयुष्य सुंदर आहे’ असं ठकळ अक्षरात लिहिलेलं. तर खाली छोट्या पण ठकळ फॉण्टमधे लिहिलं होतं, ‘फक्त साने गुरूजींवर मीम बनवणं बंद केलं पाहिजे.’ गेला आठवडाभर या साने गुरूजी प्रकरणावरून रान पेटलं होतं. भरपूर वाद झाला होता. हा वाद अगदी पोलिस स्टेशनपर्यंतही गेला. तरीही पुन्हा त्याच विषया उपरोधिकपणे लिहून लोकांना हसवण्याची जबाबदारी पार पाडण्याचं काम फक्त आणि फक्त मीमच करू शकतं!
या मीममधे विशेषतः तरूण फारच रमतात. सोशल मीडियावर रोज एखादातरी मीम आपल्याला पहायला मिळतोच. अनेकदा त्यात मनोरंजन नसतं तर उपरोधिकपणाने आपल्याला टोमणाही मारलेला असतो. ‘काहीतरी खुपतंय डोळ्यात’ असं म्हणणारा दुनियादारी सिनेमातला स्वप्नील जोशी हा भारतीय समाज आहे, असं दाखवून त्याच्या डोळ्यात आंतरजातीय विवाह खूपतोय, असं सांगणारं मीम पाहिलं की शालीतून जोडे मारणं काय असतं हे आपल्याला कळून जाईल.
मीम बहुतेकवेळा आपलेसे वाटतात. ‘अरे! माझ्याबरोबरही असंच होतं की’ असं आपल्याला हमखास वाटतं. असा मीम आपण पाहिला आणि फारच आपलासा वाटला तर कधीकधी आपण तो शेअर करतो. आता आपण शेअर केलेला हा मीम आणखी चार लोक पाहतात. तेही त्यावर हासतात, त्यांनाही तो आपलासा वाटतो. त्यातले काहीजण अजून पुढे हा मीम शेअर करतात. असा हा मीम एखाद्या वायरससारखा पसरतच जातो. त्यामुळे इंटरनेट मीमच्या बाबतीत मीमचे निर्माते रिचर्ड डाऊकिन्स यांचं म्हणणं अगदी तंतोतंत जुळत असलं तरी मुळात त्यांनी हा शब्द वापरला होता तो जीवशास्त्र म्हणजे बायलॉजीच्या संदर्भात.
डाऊकिन्स हे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ आहेत. १९७६ला त्यांचं ‘द सेलफिश जीन’ हे पुस्तक बाजारात आलं. या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा मीम या शब्दाचा वापर केला. या पुस्तकात ते बोलत होते माणसाच्या आणि सगळ्या जगाच्या उत्क्रांतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा जीन्स म्हणजेच गुणसुत्रांबद्दल. सेम टू सेम स्वतःसारखं दुसरं जीन निर्माण करायची कला अख्ख्या जगात फक्त या जीनला अवगत आहे. त्याच्या या कलेमुळेच आपण सगळे माकडाचे माणूस झालो. पण डाऊकिन्स म्हणतात असं नाहीय. या जीनव्यतिरिक्त स्वतःसारखाच दुसरं काहीतरी निर्माण करायची कला अनेक गोष्टींना अवगत आहे, असं त्यांचं मत होतं आणि या गोष्टीलाच त्यांनी मीम असं नाव दिलं.
आता याचा मीम बनवायचा तर तो कसा बनवला जाईल? सोप्पंय! बास्केटबॉलचा खेळ दाखवायचा. त्यात एक खेळाडू बॉल नेटमधे टाकतोय आणि त्याचा बॉल जाणार इतक्यात दुसऱ्या खेळाडूने तो अडवला असं आपलं टेम्प्लेट असेल. आता यातला बॉल अडवणारा खेळाडू म्हणजे आपले डाऊकिन्स काका. बॉल म्हणजे ‘फक्त जीनलाच आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करण्याची कला अवगत आहे’ हे वाक्य. ते नेटमधे जाणार म्हणजे त्यावर शिक्कामोर्तब होणार तितक्यात डाऊकिन्स मीमचा शोध लावून तो बॉल परतवून लावतात.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
ग्रीक भाषेतल्या मिमेमे (Mimeme) या शब्दापासून मीम हा शब्द तयार झालाय. अनुकरण करणाऱ्या गोष्टीला ग्रीक भाषेत मिमेमे असं म्हटलं जातं. एका सजीवाच्या डोक्यातून थेट दुसऱ्या सजीवाच्या डोक्यात जाणारी संकल्पना म्हणजे मीम असं डाऊकिन्स यांचं म्हणणं आहे. हे मीम वायरसारखे परसत जातात.
समजा, घरात काम करताना आपली आई एखादी ट्यून किंवा धून गुणगुणत असेल तर ती धून आपल्या डोक्यात जाते. मग आपण घरातून कामाला गेलो की ऑफिसमधे धून गुणगुणतो. आपले सहकारी ती धून ऐकतात आणि त्याच्या घरी जाऊन ती गुणगुणतात. असं वायरसप्रमाणे हे पसरत राहतं. फक्त ट्यूनच नाही तर हेअरस्टाईल, बोलण्याची शैली किंवा एखादा शब्द या सगळ्या गोष्टींना डाऊकिन्स मीम असं म्हणतात. गंमत म्हणजे, आपण माणसं आपली संस्कृतीसुद्धा अशाच प्रकारे पसरवत असतो, हे कळाल्यापासून मुळात जीवशास्त्रात शोधलेला मीम संस्कृती अभ्यासकही वापरू लागेलत.
आता हे मीम इंटरनेटवर धुमाकूळ घालतायत. आजच्या तरूण पिढीचं अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून या मीमकडे पाहिलं जातंय. मीम बनवणं ही एक कला आहे, त्याचे काही अलिखित नियम आहेत, असं तरूण मंडळी छाती ठोकून सांगतात. इंटरनेटच्या जगात या मीमर्ससाठी कोणताही विषय वर्ज्य नाही! धर्म, जात, वर्ण, लैंगिकता, संस्कृती, देव, राजकारण, समाजकारण, इतिहास, भूगोल, भाषा अशी कुठली गोष्ट असो मीमर्स मस्त डोकं लावून मीम्स करतायत. तुमचा भुगोलाचा पेपर आहे आणि तुमचा अभ्यास झाला नाहीय तेव्हा तुम्ही असे दिसाल असं म्हणून शेजारी नकाशे छापलेला शर्ट घातलेला एक मुलगा दाखवला जातो.
मीम बनवण्यासाठी टेम्प्लेट म्हणजेच साचा लागतो. हे टेम्प्लेट ऍप्सवर किंवा इंटरनेटवर उपलब्ध असतात. काही मीमर तर मालिका, सिनेमे यांच्यातल्या सीनचा वापर करून नवेनवे टेम्पलेट स्वतः शोधून काढतात. आता यात टिकटॉकवरच्या वीडियोचीही मदत होते. खरंतर, मीम हे काही इंटरनेटचं देणं नाही. व्यगंचित्र काढणारे ब्रशचे फटकारे मारून मोजक्याच शब्दात मोठा संदेश देतात. तेच डिजिटल पद्धतीनेही केलं जातंय. आता मीम बनवताना चित्र काढण्याची कला यावी लागते असं काही नाही.
मोबईल, लॅपटॉप आणि इंटरनेटची ज्ञान माहिती असली की मीमर होण्याची पूर्वतयारी झालीच म्हणून समजायचं! आता तर मीम बनवणारे अनेक ऍप आणि वेबसाईटही आहेत. त्यामुळे अगदी कुणीही मीम तयार करू शकतं. एक मात्र खरं, यात चित्रकलेची गरज पडत नसली तरी व्यंगचित्रांप्रमाणे क्रिएटिविटीचा मात्र कस लागतो. मीमरची विचार करण्याची पद्धतही वेगळी असते. अशा वेगळ्या हसवणाऱ्या मीमवर आता कॉपीराईटचं झाडही उगवतंय. आधी असे मीम फक्त इंग्रजी भाषेत तयार होत होते. आता स्थानिक भाषांमधल्या मीमना अच्छे दिन आलेत.
हेही वाचा : आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं
ग्राफिक्सचा वापर करून मायकल गिरार्ड यांनी १९९५ च्या आसपास तयार केलेलं नाचणारं बाळ हा इंटरनेवरचा पहिला वायरल मीम असं म्हटला जातो. भारतात साधारण २००९-१० च्या सुमारास मीम सुरू झाले. २०१४ च्या निवडणुकीआधी मीमचा वापर सगळ्यात जास्त वाढला. राजकीय पक्षांच्या आयटी सेलने मीमचा वापर करून आपल्या राजकीय पक्षाची प्रसिद्धी आणि दुसऱ्या पक्षाची बदनामी असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचं काम केलं.
आता फक्त आयटी सेल वालेच नाहीत तर साधे इंटरनेट युजर्सही मीम बनवतात. एखादी गृहिणी तिच्या घरात घडणाऱ्या गोष्टींवर मीम बनवते. चहा देताना नवऱ्यासमोर हात थरथरावा अशी अपेक्षा असताना त्या पोरींचा मीम वाचताना मोबाईल धरलेले आपले हात थरथरतील असे हे मीम असतात.
वीडियो मीम हे मीमच्या उत्क्रांतीतली सगळ्यात नवी गोष्ट आहे. एडिटिंगच्या माध्यमातून एखादं मराठी गाणं अमेरिकेतल्या सुपरस्टारच्या तोंडी लावणं, सिनेमातल्या एखाद्या सीनचं डबिंग करणं असं या वीडियो मीमचं स्वरूप असतं. शेगावच्या कचोरीमुळे राष्ट्राध्यक्ष जालो असं सांगणारे ट्रम्प तात्या गाजलेही होते. फोटो मीमपेक्षा हे वीडियो मीम बनवायला जास्त मेहनत आणि कौशल्य लागतं.
अनेक कंपन्या आपल्या ब्रॅंडचं मार्केटिंग करण्यासाठी या फोटो आणि वीडियो मीमचा वापर करतायत. डिजिटल मार्केटिंगमधेही या मीममुळे नवी क्रांती येऊ घातलीय. काल परवाच सोनी कंपनीच्या महागड्या मोबाईलने शाहरूख खानच्या डोळे भरून आलेला एक फोटो शेअर केला होता. वर लिहिलं होतं, आई तुम्हाला सोनीचा मोबाईल घेऊन देते तेव्हा असेच आनंदाश्रु येतात.
हा जमाना मीमचा आहे. आपला दृष्टीकोन बदलण्याची ताकद या मीममधे असते. मीम आपल्या राजकीय विचारसरणीवर आणि पर्यायाने रोजच्या जगण्यावरही प्रभाव पाडतात. इतकंच नाही, तर राजकीय नेत्यांचं संपूर्ण कतृत्व संपवण्यासाठीही एक मीम पुरू शकतो. म्हणूनच १० लेख करू शकत नाहीत ते एक मीम करू शकतो, असं म्हटलं जातंय.
गांधी, नेहरू अशा अनेक महापुरूषांबद्दल चुकीची माहिती पसरवून त्यांच्याबद्दलचं नकारात्मक मत लोकांमधे तयार करण्यात हे मीम यशस्वी झालेत. या मीममधे सांगितलेल्या गोष्टी हाच खरा इतिहास असं लोकांना वाटू लागलंय. त्याच भीतीमुळे श्यामची आई सिनेमातल्या सीनवर केलेल्या मीमवरून वाद उठला होता. दोन पिढ्यातल्या विसंवादाचं उदाहरण म्हणून शामची आई मीमवादाकडे पाहिलं जातंय. मीम जपून वापरावेत हे जरी खरं असलं तरी तरूण पिढीच्या अभिव्यक्तीच्या नव्या साधनाचं स्वागत करण्यावाचून आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.
हेही वाचा :
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?
फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट
सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?
भाजप नेत्यांना ट्रोल करून महाआघाडी चकमकी जिंकेल, युद्ध नाही
अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प आले, पण आपले 'खास रे' ट्रम्प तात्या कुठं गेले?