तुमची पोरं उद्या जाळपोळ करतील कारण ठिणगी तुम्ही लावलीय!

०२ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का? विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? तरुणाईला घडवणाऱ्या पिढीला आत्मभानाचा जाब विचारणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट.

‘तुम्हाला राग येत नाही का?’ लोक मला विचारत असतात. ‘तुमच्या पोस्टवर काही कमेंट्स इतक्या घाणेरड्या असतात. त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का?’ वाटतं. खूप वाटतं. हिंदू-मुस्लिम आंतरधर्मीय विवाहाचं कौतुक करणारी पोस्ट लिहल्यावर कोणतरी माझी आई-बहीण काढतं, तेव्हा बरंच काही वाटतं. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना औरंगजेबाच्या समाधीकडं जातो. मग लोक मला फासावर देऊ पाहतात, तेव्हा बरंच काही वाटतं.

आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चात भाषण करणाऱ्या तरुणीला, ‘तू आंतरजातीय लग्न करशील का?’, असं मी टीव्हीवर विचारलं म्हणून माझी जात काढली जाते. तेव्हा खूप काही वाटतं. माझ्या एखाद्या पोस्टवरून मला पार विषमतावादी गोटात ढकललं जातं आणि अश्लील टिप्पणी केली जाते, तेव्हा आतून बरंच काही वाटतं. वाटत नाही असं कसं होईल? वाटतंच. 

अगदी खरं सांगतो. तेव्हा एकच वाटतं. हा असा विचार करणाऱ्या, अशी भाषा वापरणाऱ्या माणसांच्या घरात जी लहान मुलं आहेत, जी किशोरवयीन मुलं आहेत, ती उद्या कशी वाढतील? कशी वागतील? 

हेही वाचा: आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल

कधी कधी वाटतं

उद्या ही तरूण मुलं रस्त्यावर उठून धर्माच्या नावानं दंगली पेटवतील. जातीच्या नावानं जाळपोळ करतील. अशावेळी मुली-महिलांचं काय होईल याची कल्पनाच करवत नाही. इतर देशांत ध्रुवीकरण झालं तरी त्याचं पर्यावसान फारतर दोन धर्मांच्या, वंशांच्या दंगलीत किंवा हाणामारीत होईल. इथं तर, एवढे धर्म, एवढ्या जाती, एवढे वंश, एवढ्या भाषा. प्रत्येक अस्मितेवर लोक आक्रमक झाले तर इथं वणवा पेटेल.

शेकडो तुकडे होतील या देशाचे. नाही झाले तरी शेकडो छावण्या तयार होतील आणि त्या एकमेकांमधे धुमसत राहतील. तुमच्या मुलांना तुम्ही सगळ्या भौतिक सुविधा दिल्या. अरे, पण त्यांना तुम्ही कोणता देश देताय? कोणतं आयुष्य देताय? ‘तुमची मुलं ही तुमची मुलं नसतात. ती आयुष्याची मुलं असतात,’ असं खलिल जिब्रान म्हणतो. कोणतं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलंय याचा आपण विचार तरी करतोय का? 

धार्मिक द्वेषाचे बळी

मुस्लिम महिलांचं घाणेरडं चित्र रंगवून त्यांच्या लिलावाची भाषा करणारी मुलं किती वर्षांची होती? बुल्लीबाई ॲप प्रकरणातली मुख्य आरोपी असलेली एक पोरगी अवघ्या अठरा वर्षांची होती. बाकी मुलंही त्याच वयाची होती. ही पोरं काही व्यावसायिक गुन्हेगार नव्हती. त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष टोकाचा होता. एवढं विष भिनलं कसं त्यांच्या मनात?

धर्म अथवा संसद हे दोन्ही समजत नाही अशी माणसं धर्मसंसदेत इतर धर्माच्या माणसांना ठेचून मारण्याची भाषा करतात. पंजाबमधे अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू होतो. त्या जमावाच्या मते, या तरुणाने तिथं रेलिंगवरून उडी मारून पावित्र्यभंग करणारी कृती केली होती. मग सुवर्ण मंदिरातल्या उपस्थितांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

अस्मितेच्या नावाखाली दिशाभूल

काय चाललंय हे? काय पेरतोय आपण? आजही आई-बाप जिथं पोराचं नाव ‘शिवबा’ ठेवतात, तिथं छत्रपती शिवाजी महाराज म्हणा नाहीतर तलवारीनं कापून टाकू, असली भाषा कशी जन्माला येते? परवा अहमदनगरमधे एक मोठा फलक बघितला. ‘शिवाजी चौक नाही. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक असंच म्हणायचं!’ काहीसा धमकावणारा सूर. त्या चौकात वाहतूक कोंडी, कमालीची दुर्गंधी, पण मुद्दा वेगळाच. 

मधे एक वीडियो वायरल झाला होता. एका कॉलेजचे प्राचार्य त्यांच्या केबिनमधे महिलांबद्दल अश्लील शब्दांत बोलत होते. त्यांच्या मागे बुद्धमूर्ती दिसत होती. या वीडियोवर लोकांनी आक्षेप घेतला की, ‘हा बुद्धाचा अवमान आहे. तो वीडियो डिलिट करा’. तो प्राचार्य काय बोलतोय हा मुद्दाच नाही. एका टीव्ही मालिकेत कोणीतरी शिलाई मशीनला लाथ मारली. तर लगेच एका जातीच्या भावना दुखावल्या.

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला अभिवादन केलं नाही म्हणून कोणत्या तरी समूहाच्या भावना दुखावतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख सातत्याने फक्त ‘आंबेडकर’ असा केला म्हणून एका वक्त्याचं भाषण बंद पाडलं जातं. पौरोहित्य करणाऱ्यांविषयी काहीतरी वर्णनं आहेत म्हणून एक समूह मोर्चा काढतो. ज्याने गांधींचा खून केला, तो तुमचा नवा 'राष्ट्रपिता' होण्याची वेळ येते इथवर मजल जाते! 

द्वेषाच्या डेटाचं इंधन

हे सगळं ज्या समाजात घडतंय, तिथं वाढणाऱ्या तरुणाईचं भावविश्व कसं आकाराला येतंय याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का? कुणाचं तात्कालिक राजकारण होईल, कुणाची दुकानदारी चालेल, कुणाला लोकप्रियता मिळेल. पण उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का?

दारू, सिगारेट पिल्यानं तरूणाईचं होणारं नुकसान किरकोळ आहे. पण जे विष तुम्ही त्यांना रोज पाजताय, त्यामुळं त्यांचं काय होणार आहे? तुम्हाला आवडत नाही म्हणून एखाद्या महिला नेत्याला तुम्ही विरोध करा. मुख्यमंत्र्यांच्या बायकोला विरोध करा. पण ज्या भाषेत तुम्ही बोलता तीच उद्याच्या पिढीची मातृभाषा झाली तर ही पोरं उद्या कशी वागतील?

‘इट टेक्स ए विलेज टू रेज ए चाईल्ड’ म्हणजेच मूल जन्माला तुम्ही घालता, पण ते वाढवतं अवघं गाव. या गावात काय चाललंय, तुम्हाला ठाऊक आहे का? आता तर ‘ग्लोबल विलेज’ म्हणजे जग हेच गाव झालंय. हे गाव मोबाईल नावाच्या यंत्रानं आपल्या पोटात घेतलंय आणि हा मोबाइल पोरांच्या खिशात आहे. डेटा हे नवं इंधन असेल तर आधीच्या इंधनानं केलं तसं हे नवं इंधनही आग लावू शकतं. ते ऊर्जाच देईल असं नाही. ते युद्ध भडकवू शकतं.

हेही वाचा: बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज

ध्रुवीय राजकारणाचा कालखंड

हे भारतातच नाही, जगभर सुरूय. जागतिकीकरण आल्यानंतर दबलेल्या समूहांना आवाज मिळाला. नव्या अस्मिता तयार झाल्या. दोन ध्रुव असलेल्या जगात आणखी ध्रुव तयार झाले. म्हणूनच, बर्लिनची भिंत कोसळली. १९८९नंतर पुढची अडीच दशकं भारतात कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळू शकलं नाही. प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय राजकारणाची जागा व्यापली. अमेरिकेत बराक ओबामांसारखा बहुसांस्कृतिक ओळख असणारा तरूण राष्ट्राध्यक्ष झाला.

पण, ओबामांच्या देशात डोनाल्ड ट्रम्प आले. गांधींच्या देशात असत्याचे प्रयोग सुरू झाले. जागतिकीकरणाच्या खुलेपणानेच नवी बंदिस्तता जन्माला घातली. एकसुरी, एकसाची अशा एकसंधतेची कल्पना जन्माला येऊ लागली. एक ठळक सूर आणि त्याला विरोध करणारा दुसरा ठळक सूर यांच्यामधले सगळे आवाज संपू लागले. सपाटीकरण वेगाने सुरू झालं. जग पुन्हा एकध्रुवीय झालं. बर्लिनच्या कोसळलेल्या भिंती पुन्हा उभ्या राहिल्या. ‘बर्लिन ते ब्रेक्झिट’ असा हा कालखंड आहे. 

‘वर्च्युअल शत्रू’चा भुलभुलैय्या

माहितीच्या महामारीला कोरोनाच्या महामारीची आता साथ मिळालीय. माणसं एकमेकांपासून दूर जाऊ लागलीत. डिजीटल जगाची मातृभाषाच विखार ही आहे. भंजाळलेपण ही नव्या जगाची प्रकृती आहे. वाढलेली विषमता कोरोनाने वाढवत नेलीय. माणसं निराश, एकाकी झालीत आणि मीडिया नावाच्या उत्तेजक द्रव्यानं त्यांच्यात भयंकर कृत्रिम तरतरी आणलीय. ‘वर्च्युअल शत्रू’ असल्याशिवाय हल्ली पोरांना खेळही खेळता येत नाहीत.

एकीकडं बाजारानं आयपीएलमधून देशांच्या सीमारेषा संपवून टाकल्या. पण मोबाईल गेममधे मात्र शत्रूला धाडधाड गोळ्या घातल्याशिवाय पोरांना चैन पडत नाही. समाजकारणात, राजकारणात, रोजच्या वावरण्यातही असाच वर्च्युअल शत्रू हवा असतो. मग स्थलांतरितांच्याच जोरावर वाढलेल्या अमेरिकेसारख्या देशालाही ‘बाहेरच्यां’ची भीती वाटू लागते. ही भीती दाखवून प्रगतीची स्वप्नं दाखवली जातात. 

डिजिटल जगात पोरं मग्न असतानाच बिचारे स्थलांतरित मजूर आपल्या देशात रेल्वेखाली चिरडले जातात. या डिजिटल नशेनं वास्तवापासून दूर जाता येतं, पण जेव्हा ते समोर येतं तेव्हा आत्मघाताशिवाय दुसरा मार्ग नसतो. विरोधी सूर नको असणाऱ्या व्यवस्थेत ‘भक्त’ तयार होतात. ते विरोधी सूर संपवू पाहतात. त्यांना विरोध करणारेही मग त्यांच्याच भाषेत बोलू लागतात. राजकारण अशा वळणावर जातं की कोणी प्रशांत किशोर सत्तेची गणितं बदलू शकतो.

भारतातल्या सर्वसामान्य माणसाला प्रजासत्ताकानं ‘नागरिक’ केलं. निवडणुकांच्या राजकारणानं त्यांना ‘व्होटबॅंक’ करून टाकलं. जागतिकीकरणानं त्यांना ‘बाजारपेठ’ केलं. या डिजिटल जगानं माणसांचं रूपांतर फक्त ‘डेटा’मधे करून टाकलंय. अशा जगात ‘आऊट ऑफ साईट’ असलेली माणसं टाचा घासून मरतायत आणि श्रीमंतांच्या तिजोरीत रोज नवी भर पडतेय. इथं वाढणारी पोरं रोज ‘वर्च्युअल शत्रू’ उभे करतायत. ट्रोल, ब्लॉक, अनफ्रेंड करतायत. तीच भाषा आत्मसात करतायत.

हेही वाचा: आपले राजकारणी पुस्तकं का लिहित नाहीत?

विखारात हरवलीय निरागसता

विखाराला विरोधही विखारी भाषेतच होणार असेल, तर तो विजय विखाराचा आहे हे नक्की. त्यामुळे एक चेहरा जाईल, दुसरा चेहरा येईल. पण विखार हाच जगण्याचा केंद्रबिंदू होईल, त्याचं काय? ‘गांधींच्या मारेकऱ्यांना माफ करावं’ अशी याचिका करणारी महात्मा गांधींची मुलं, ‘माझ्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना माफ करा’ असं सांगणाऱ्या सोनिया हा काही फार जुना इतिहास नाही. त्याच देशात सुडाचं राजकारण उभं राहतं, हा कशाचा परिपाक आहे?

तुम्ही सर्वधर्मसमभावाची मांडणीही विखारी शैलीत करणार असाल, तर तो विखाराचा विजय आहे. लोकशाही मूल्यांची मांडणी तुम्ही ठोकशाही पद्धतीनं करणार असाल तर तो संकुचित राष्ट्रवादाचाच विजय आहे. विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? ‘पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसाच मनालाही घाण लागू नये, म्हणूनही जप हो’, असं सांगणारी ‘श्यामची आई’ हा आज विनोदाचा विषय होऊ शकतो. कारण, कशावर विश्वास ठेवावा, कोणाबद्दल खात्री बाळगावी, असा हा काळच नाही. 

तो वेडा पांडुरंग सदाशिव साने हा भाबडा आणि निरागसच वाटणार. अरे, निरागस तर माझा बुद्धही होता. म्हणून सगळं लौकिक सोडून घराबाहेर पडला. निरागस तर कबीर होता, तुकाराम होता आणि ज्ञानेश्वरही होता. पोरवयात मावळ्यांसोबत स्वराज्याचं तोरण बांधणारा आमचा शिवबाही तर स्वप्नाळू होता. त्या काळात सुशासन करणारी आमची झुंजार अहिल्यादेवी होळकर आणखी काय होती?

गांधी भाबडा नसता तर शस्त्र हातात न घेता बलाढ्य सशस्त्र सेनेचा पराभव करायचा, असं म्हणला नसता. गांधींचा लाडका जवाहर लख्ख स्वप्नाळू नसता तर साक्षात नियतीशी करार करू शकला नसता. माझा भीम भाबडाच तर होता म्हणून या पोलादी व्यवस्थेला टक्कर देऊन संविधान निर्माण करण्याचं स्वप्न पाहू शकला. विरोधी अवकाशही मान्य करायला सांगू शकला. ही निरागसता कुठं गेलीय आपली? आपल्या बछड्यांची? कशी काय सगळ्याच डोळ्यांतली स्वप्नं मेलीत? 

संवाद, सामंजस्य, सहिष्णुता

मला आठवतं. शाळेतला एक मुलगा खूप शिव्या द्यायचा. दांडगाई करायचा. एकदा मी संतापलो आणि मीही त्याला शिवी दिली. ‘कडू’ किंवा अशीच काही. आईनं ते ऐकलं. ती माझी शिक्षिकाही होती. ती मला म्हणाली, ‘संजू, तू आयुष्यात दिलेली ही अखेरची शिवी. यापुढं तू कधीच शिवी द्यायची नाही. त्यानं माझ्यावरून तुला शिवी दिल्यानं माझं काहीच बिघडलं नाही. पण तुझ्या ओठांवर शिवी येणं हा त्याचा विजय आणि माझा पराभव आहे. तू प्रयत्न असा कर की, त्यानंही कधी शिव्या देऊ नयेत. त्यासाठी त्याच्याशी बोल, भांड. पण भांडता भांडता कधीही त्याच्या भाषेत बोलू नकोस.’

आज सवाल तोच आहे. आपली मातृभाषा कोणती? ‘हिंदुस्तानी भाऊ’मुळं पोरं आज चेकाळली आहेत. कारण तीच भाषा आपण या पोरांच्या ओठात दिलीय. ठिणगी तुम्ही लावलीय. उद्या तुमची हीच पोरं रस्त्यावर आग लावत सुटणार आहेत. प्रचंड आकांक्षा, खोल निराशा, रोजचा भ्रमनिरास, भयंकर एकाकीपण, वाढणारी धर्मांधता, फुकाच्या अस्मिता, भडकवणारा भवताल, अमर्याद डेटा आणि सळसळणारं तारूण्य यांचं हे मिश्रण यापेक्षा आणखी वेगळं काही करू शकत नाही. 

वेळ अजूनही गेली नाही. संवादाच्या, सामंजस्याच्या, सहिष्णुतेच्या वाटेनं जाणं अजूनही शक्य आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचाय. हा देश बुद्धांचा की निर्बुद्धांचा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच शोधायचंय. त्यासाठी कोणताही 'टेलिप्रॉम्प्टर' कामाचा नाही.

हेही वाचा:

चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!

दारिद्र्याची शोधयात्राः आपल्या अवतीभवतीच्या छळछावण्यांचं कथन

जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल

चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत