भारताकडून ऑस्करवारीला गेलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ची गोष्ट

१५ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


सिनेजगतात मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ऑस्करची नामांकनं नुकतीच जाहीर झालेली आहेत. यात भारताकडून पाठवल्या गेलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचं नामांकन मिळालेलं आहे. ऑस्कर नामांकनाचा बहुमान मिळवणारी ही पहिलीच भारतीय डॉक्युमेंटरी ठरलीय.

सिनेमा हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात पुरस्कारप्राप्त सिनेमे आणखीनच जवळचे असतात. सिनेसृष्टीतल्या पुरस्कारांच्या गर्दीत मानाचं पान आहे ते ऑस्करचं. एखाद्या कलाकृतीला ऑस्कर मिळणं हा त्या कलाकृतीचा सर्वोच्च सन्मान समजला जातो. दरवर्षी अमेरिकेत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात जगभरातल्या दर्जेदार सिनेमांचा गौरव केला जातो. त्यातल्या मोजक्याच कलाकृती मुख्य पुरस्कारांसाठी पात्र ठरतात.

जागतिक सिनेमांच्या या गर्दीत ऑस्कर मिळणं ही लांबची गोष्ट आहे. याचं कारण म्हणजे त्या गर्दीचा भाग होण्यासाठी लागणारा कस! दरवर्षी प्रत्येक देश काही मोजक्याच कलाकृती म्हणजेच सिनेमे किंवा माहितीपट ऑस्करच्या शर्यतीत पाठवतो. त्या शर्यतीत परीक्षकांच्या मतांनुसार नामांकन प्रक्रिया पार पडते आणि नामांकन मिळालेल्या कलाकृतींमधून ऑस्करविजेती कलाकृती निवडली जाते.

भारताकडून यावर्षी ‘मरक्कर’ हा मल्याळम आणि ‘जय भीम’, ‘कुळांगल’ हे तमिळ सिनेमे पाठवले गेले होते. त्याचबरोबर ‘मनसानमः’ हा तेलुगू, ‘सोनसी’ हा हिंदी लघुपट आणि ‘रायटिंग विथ फायर’ ही डॉक्युमेंटरी ऑस्कर नामांकन प्रक्रियेसाठी पाठवली गेली होती. या नामांकन प्रक्रियेत ‘रायटिंग विथ फायर’ची निवड झाली असून, ऑस्करसाठी नामांकन मिळवणारी ही पहिलीच भारतीय डॉक्युमेंटरी ठरलीय.

दलित स्त्रिया बनल्या पत्रकार

‘रायटिंग विथ फायर’ ही डॉक्युमेंटरी ‘खबर लहरिया’ या हिंदी साप्ताहिक वर्तमानपत्रावर आधारित आहे. अवघ्या आठ पानाचं हे वर्तमानपत्र अवधी, बुंदेली आणि भोजपुरी या हिंदी बोलीभाषांमधून प्रसारित केलं जातं. याची खासियत अशी की, हे वर्तमानपत्र फक्त आणि फक्त दलित स्त्रियाच चालवतात. रिपोर्टिंग, एडिटिंग, छपाई, वितरण अशा वृत्तपत्रकारितेच्या सगळ्या आघाड्या या दलित स्त्रिया खंबीरपणे सांभाळत असतात.

२००२ला मेमधे सुरू झालेलं हे वर्तमानपत्र उत्तरप्रदेशसोबतच बिहारमधेही लोकप्रिय आहे. २०१३मधे ‘खबर लहरिया’ने स्वतःची वेबसाईटही सुरू केली. या वेबसाईटवर बोलीभाषेतल्या बातम्या वाचायला मिळतात. असा प्रयोग करणारी ही एकमेव वेबसाईट आहे. २०१६मधे आपला स्वतःचा वीडियो चॅनल सुरू करत ‘खबर लहरिया’ने डिजिटल मीडिया पत्रकारितेत दमदार एण्ट्री केली. हातात लेखणी धरणाऱ्या स्त्रिया आता गावोगावी वीडियो कॅमेरा घेऊन फिरत आहेत.

न्याय मिळवून देणारी पत्रकारिता

‘खबर लहरिया’मधे काम करणाऱ्या सर्व स्त्रिया दलित समाजातून आलेल्या आहेत. भारतीय समाजव्यवस्थेत शेवटच्या पायरीवर असलेल्या या समाजाला न्याय काय असतो याची पुरेपूर जाणीव आहे. हीच जाणीव ‘खबर लहरिया’च्या निर्भीड पत्रकारितेचा मुख्य आधारस्तंभ आहे. राजकारण्यांनी दुर्लक्ष केलेल्या दुर्गम गावखेड्यांच्या कानाकोपऱ्यात जाऊन या स्त्रिया तिथल्या लोकांशी संवाद साधतात.

त्यांचं म्हणणं नुसतं ऐकून न घेता, त्यांची भावना परखडपणे मांडण्याची धमक या स्त्रियांमधे आहे. बोलीभाषेतून संवाद साधण्याच्या शैलीमुळे लोकांनाही ‘खबर लहरिया’ची पत्रकारिता जवळची वाटते. समाजाने आपल्या जातीवर, स्त्री असण्यावर लादलेली बंधनं झुगारून लावत या स्त्रिया बेधडकपणे आपलं काम करत असतात. खाणकाम करणाऱ्या मजुरांच्या शोषणावर, खाणकाम व्यवसायातल्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारताना त्या डगमगत नाहीत.

खेड्यातल्या स्त्रियांचं होणारं लैंगिक शोषण ‘खबर लहरिया’ने कसलाही आडपडदा न ठेवता जगासमोर आणलं. त्यांच्या बाईपणाच्या वेदनांना वाचा फोडली. ‘आमचा इतर कुणावर विश्वास नाही. ‘खबर लहरिया’ हीच आमची एकमेव आशा आहे.’ असं गावपुढाऱ्यांच्या बलात्काराला बळी पडलेल्या एका महिलेचा नवरा म्हणतो. ‘जे आहे ते असं आहे’ अशा स्वरुपात बातम्या देणारी ‘खबर लहरिया’ इथल्या पीडितांना आपलं दुःख जाणून घेणारी आणि न्याय मिळवून देणारी संस्था वाटते.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

कागदावरून पडद्यावर येण्याचा प्रवास

२०१५मधे दिग्दर्शक सुश्मीत घोष यांना इंटरनेटवर काही फोटो दिसले. भर उन्हात पेपर विकणाऱ्या स्त्रियांचे ते फोटो घोष यांना भावले. आणखी खोलात शिरल्यावर या स्त्रिया ‘खबर लहरिया’साठी काम करतात असं त्यांना कळालं आणि तेव्हाच त्यांनी या विषयावर डॉक्युमेंटरी बनवायचं ठरवलं. या प्रोजेक्टवर त्यांच्यासोबत रिंटू थॉमस यांनी सहदिग्दर्शिका म्हणून काम पाहिलं.

गेली पाच वर्षं घोष आणि थॉमस ‘खबर लहरिया’बरोबर राहिले. त्यांच्या कामाच्या पद्धतीचा जवळून आढावा घेतला. प्रिंट मीडियापासून सुरू झालेला ‘खबर लहरिया’चा डिजिटल मीडियापर्यंतचा प्रवास घोष आणि थॉमस यांनी या डॉक्युमेंटरीत चित्रबद्ध केलाय. या डॉक्युमेंटरीत हा प्रवास तर आपल्याला पाहायला मिळतोच, त्याचबरोबर ‘खबर लहरिया’च्या पत्रकारांची संघर्षकथाही जाणून घेता येते.

कौतुक संस्थेचं आणि डॉक्युमेंटरीचंही

आपल्या बोलीभाषेतून बातम्या देणाऱ्या ‘खबर लहरिया’ला २००९मधे युनेस्कोच्या ‘किंग सेजाँग साक्षरता पुरस्कार’ मिळाला आहे. त्याचबरोबर २०१२मधे ‘टाईम्स नाऊ’कडून ‘अमेझिंग इंडियन’ आणि ‘संयुक्त राष्ट्र जनसंख्या कोष’कडून ‘लाडली मीडिया’ हा पुरस्कार देण्यात आला. २०१४मधे जर्मनीत झालेल्या ‘बेस्ट ऑफ ब्लॉग’ वार्षिक परिषदेत मानाचा ‘ग्लोबल मीडिया फोरम’ पुरस्कार देऊन ‘खबर लहरिया’ला गौरवण्यात आलं.

जगभरातल्या पत्रकारितेला आपल्या कार्याची दखल घ्यायला लावणाऱ्या ‘खबर लहरिया’वर बनलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ या डॉक्युमेंटरीवरही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमधे कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. ऑस्करच्या नामांकनासोबतच मानाच्या समजल्या जाणाऱ्या अनेक फिल्म फेस्टिवलमधे ‘रायटिंग विथ फायर’ने तब्बल २८ विशेष पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. स्वतंत्रपणे सिनेमे बनवणाऱ्यांना प्राधान्य देणाऱ्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या ‘सनडान्स फिल्म फेस्टिवल’मधे सर्वाधिक प्रभावशाली डॉक्युमेंटरी म्हणून ‘रायटिंग विथ फायर’ला गौरवण्यात आलंय.

हेही वाचा: आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

हा प्रवास सोपा नव्हता

मीरा जाटव आणि कविता देवी यांनी स्थापन केलेल्या ‘खबर लहरिया’चं नाव आज जगभरात गाजतंय. उत्तर प्रदेशच्या चित्रकुट जिल्ह्यातल्या कारवीसारख्या छोट्या गावातून सुरू झालेल्या ‘खबर लहरिया’साठी हा प्रवास कधीच सोपा नव्हता. आपल्या भागात इतके प्रश्न असूनही कुणालाच आपली दखल घ्यावी वाटत नाही ही खंत फक्त बोलून न दाखवता त्यावर कृती करण्याचं धाडस इथल्या दलित स्त्रियांनी दाखवलं. त्यांच्या प्रयत्नाला साथ देण्यासाठी ‘निरंतर’ ही एनजीओ धावून आली आणि ‘खबर लहरिया’ सुरू झालं.

पुरेसं शिक्षण नसलेल्या या स्त्रिया ‘निरंतर’च्या मदतीने हळूहळू पत्रकारितेचे धडे गिरवू लागल्या. सुरवातीच्या दिवसात ‘खबर लहरिया’चा आवाका फक्त स्त्रियांच्या प्रश्नांपुरता मर्यादित होता. राजकारण आणि इतर गोष्टींपासून चार हात असल्याने वाचकवर्गही मर्यादितच होता. हे चित्र बदलण्यासाठी त्यांनी २००४च्या लोकसभा निवडणुकीची संधी साधली. फक्त स्थानिक निवडणुकांचा अनुभव गाठीशी असलेल्या ‘खबर लहरिया’ने ही निवडणूक जनतेच्या नजरेतून कवर केली आणि एक सक्षम ग्रामीण वर्तमानपत्र म्हणून आपली ओळख निर्माण केली.

जिथं अजून पुरेसा वीजपुरवठा होत नाही, तिथं डिजिटल मीडिया सुरू करणं हेही एक दिव्यच होतं. जुने बटनांचे फोन वापरताना गोंधळणाऱ्या बायकांना स्मार्टफोन शिकवण्यातही बराच वेळ गेला. पण आपल्या जिद्दीच्या जोरावर या स्त्रिया प्रत्येक आव्हान मोडून काढत प्रगतीचं पाऊल टाकत राहिल्या. पूर्वी कधी हिंग लावून न विचारणारे मोठमोठे संपादक आज स्थानिक बातम्यांसाठी आवर्जून ‘खबर लहरिया’मधे फोन करतात. मोठमोठ्या पत्रकार परिषदांमधे प्रथितयश पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून ‘खबर लहरिया’ जाब विचारताना दिसते.

निर्भीड पत्रकारितेची मशाल

आपल्या किती प्रती खपतात, आपल्या वार्षिक आर्थिक उलाढालीचे आकडे काय आहेत असल्या प्रश्नांवर चर्चासत्रं गाजवण्यात ‘खबर लहरिया’ला काडीचाही रस नाही. त्यांना रस आहे तो जनतेचे प्रश्न समजून घेण्यात आणि ते प्रभावीपणे मांडण्यात. कुणाच्याही दबावाला बळी न पडता खरी परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी त्यांच्या लेखण्या आग ओकत असतात. समाजातल्या दोषांकडे जाणूनबुजून डोळेझाक करणाऱ्यांना त्यांचा कॅमेरा डोळे उघडायला भाग पाडतो.

गेल्या काही वर्षांत पत्रकारितेवरचा दबाव वाढतोय. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा मीडिया राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं बनू पाहतोय. प्रत्येक बातमीसाठी ‘फॅक्ट चेक’ करत बसणं जनसामान्यांना झेपणारं नाही. सोशल मीडियावर मिळणारी प्रत्येक बातमी खरी समजून ती वाऱ्यासारखी वायरल केली जाते. अशा परिस्थितीत समता, न्याय आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी ‘खबर लहरिया’ पत्रकारितेच्या अंधाऱ्या जगातली मशाल बनतेय.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे