रामायण नावाच्या महाकाव्याची विश्वयात्रा

१० एप्रिल २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


अभिजात महाकाव्य म्हणून रामायणाने केलेली विश्वयात्रा भारताच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय देतं. रामायणाची सत्य-असत्यता, कथानकाचं वास्तव, निर्मिती काळ, निर्मितीचं कारण यासंदर्भात अभ्यासकांमधे डावे-उजवे अशी अनेक मतमतांतरं दिसून येतात. भारताच्या पूर्वेला असलेले देश तर भगवान बुद्धाइतकेच रामायणाच्या प्रेमात पडलेले दिसतात.

मॉस्कोतल्या एका नाट्यगृहात रशियन नाटकाचा प्रयोग संपला आणि प्रेक्षकांनी उभं राहून टाळयांचा कडकडाट केला. १९६१चं ते वर्ष. नाट्यप्रयोगाला टाळ्यांची मानवंदना देणार्‍या पहिल्या रांगेत एक गांधी टोपी दिसत होती.

गांधी टोपीवाल्या व्यक्तीचा आनंद आणि उत्साह त्या व्यक्तीच्या पाठमोर्‍या देहबोलीतून जाणवत होता. खरं तर या व्यक्तीला नाटकाचा एकच अंक पाहायचा होता. पहिला अंक संपल्यावर सचिवानं यासंदर्भात आठवण करुन दिल्यावर, कृपया मला माझ्या आयुष्यात एकदा तरी मला हवे तं करूद्या! असं सांगून त्यांनी दटावलं.

रशियन कलाकाराला पद्मश्री

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना रशियन रंगभूमीवरच्या रामायणाचा रशियन आविष्कार समरसून पाहायचा होता. टाळयांचा कडकडाट संपताच त्यांनी रशियन भाषेत रामायण सादर करणार्‍या कलावंतांची भेट घेतली. नाट्यप्रयोगाचा सह-दिग्दर्शक आणि रामाची भूमिका करणारा कलावंत गेनाडी पेचनिकोव याला जवळ घेत ते म्हणाले, तुम्ही आमचे राम आहात.

हा प्रसंग गेनाडी पेचनिकोव यांनी २०११ला एका मुलाखतीत सांगितलाय. त्यानंतर सुमारे तीन दशकं पेचनिकोव यांनी रशियन रामायणाचे प्रयोग रशियाप्रमाणेच भारतात आणि इतर देशांमधे सादर केले. त्यांना इंदिरा गांधी यांनीही भारत भेटीसाठी आमंत्रित केलं होतं. रामायणाच्या माध्यमातून भारत-रशिया यांच्या मैत्री भावाला कलात्मक पातळीवर वृद्धिंगत करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल गेनाडी पेचनिकोव यांना पद्मश्री देऊनही गौरवण्यात आलं.

रामायण रशियात गेलं कसं?

कम्युनिस्ट रशियात रामायण महाकाव्याच्या प्रवेशाबद्दल दोन मतप्रवाह मांडले जातात. एका मतप्रवाहानुसार रामायणाचा रशियात प्रवेश मंगोलियातून झाला. मूळचे मंगोल असलेले काल्मिक जमातीचे लोक या दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात आढळतात. रामायणासारखं एक महाकाव्य या जमातीत लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत रामायणाचा आशियाई रशियात प्रवेश झाला.

रामायणाच्या रशियातल्या प्रवेशाबद्दल दुसरा मतप्रवाह सांगतो की १९व्या शतकात सेंट पीटरर्सबर्ग भागातल्या विद्वांनांना रामायणाविषयी रुची वाटू लागली. त्यामुळे युरोपियन रशियातून रामायण रशियात आलं. पश्चिम असो किंवा पूर्व रशिया एक मात्र खरं की एक महाकाव्य म्हणून रामायणाने रशियन विद्वांनांना आणि साहित्यिक, कलावंतांना भुरळ घातली.

निकोलस रोरिच हे रशियातल्या भारतीय महाकाव्यांचे विख्याते विद्वानही रामायणाने अत्यंत प्रभावित झाले होते. प्रख्यात रशियन इंडोलॉजिस्ट अॅलेक्झांडर बरानिकोव यांनी १९४८मधे रामायण लहान आणि प्रौढ दोन्ही वयोगटातल्या वाचकांसाठी रशियन भाषेत उपलब्ध करुन दिलं. त्यामुळे आज रशियन भाषेत हे महाकाव्य लहान मुलांचं पुस्तक म्हणून प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर, भारतीय साहित्य-संस्कृती यांचा अभ्यास करणाऱ्यांना ग्रंथ स्वरूपात लेख अभ्यासण्याची संधी मिळालीय.

हेही वाचा: जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड

रशियन नाटकातलं रामायण

बरानिकोव यांच्या रशियन रामायणाचा परिचय जेव्हा एक प्रख्यात इंडोलॉजिस्ट नतालिया गुसेवा यांनी गेनाडी पेचनिकोव यांना करुन दिला तेव्हा त्यांना रामायण नाट्यरूपात सादर करण्याची प्रेरणा मिळाली. यासंदर्भात पेचनिकोव यांनी एक आणखी महत्वाची आठवण नमूद केलीय. रशियन रामायणात रामाच्या भूमिकेसाठी पेचनिकोव हेच योग्य आहेत, असं त्यांना रशियातले तत्कालीन भारतीय राजदूत आणि प्रख्यात मुत्सद्दी कृष्ण मेनन यांनी सुचवलं.

त्यावेळी मेनन म्हणाले की, एक तर तुझी आकृती, तू खूप शालीन आहेस, तुझे मोठे डोळे आणि गोल चेहरा आहे, असं व्यक्तिमत्व म्हणून रामाला तू शोभणारा आहेस. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे तू खूप दयाळू आहेस. कारण लोकांचं हित प्रथम ठेवणारा राम हा दयाळूच असला पाहिजे. द्वेषाला त्याच्या व्यक्तिमत्वात जागाच नाही.

पेचनिकोव यांच्या नाटकाचं माध्यमांतर करुन सिनेमा बनवण्यात आला. भारत-सोवियत मैत्रीच्या शिखर काळात हा सिनेमा रशियन मुलांमधे अत्यंत लोकप्रिय होता.

पूर्वेकडच्या देशातलं रामायण

रामायणाची सत्यासत्यता, कथानकाचं वास्तव, निर्मिती काळ, निर्मितीचं कारण यासंदर्भात अभ्यासकांमधे डावे-उजवे अशी अनेक मतमतांतरं दिसून येतात. रामायणात मोहून टाकणारी अनेक सौंदर्यस्थळे आहेत. तसंच अनेक वादस्थळेही आहेत. असं असलं तरी एक कालजयी साहित्यकृती म्हणून रामायण जगासाठी भारताच्या सांस्कृतिक योगदानांपैकी एक आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक सीमेपल्याड जगातली एक श्रेष्ठ साहित्यकृती म्हणून त्याचं महत्व र्निविवाद आहे.

भारताच्या पूर्वेला असलेले देश तर भगवान बुद्धाइतकेच रामायणाच्याही प्रेमात पडलेले दिसतात. यामधे तिबेटी रामायण, पूर्व तुर्किस्तानमधलं खोतानी रामायण, इंडोनेशियाचं ककबिन रामायण, जावामधलं सेरतराम, सैसीराम, रामकेलिंग, पातानी रामकथा, इंडोनेशिया रामकेर्ति, खमैर रामायण, मान्यमारचं युतोकी रामयागन, थायलंडमधलं यामकियेन इत्यादी देशांमधे रामायण अथवा रामकथा शब्दबद्ध करण्यात आलीय. थायलंडमधे आज आपल्याला थाई भाषेत रामायण लिहिलेलं दिसतं.

सम्राट प्रथम राम याने सयामी भाषेत रामायणाचं भाषांतर करुन घेतलं, तर त्याचा मुलगा द्वितीय राम याने नाट्यरूपांतर करुन घेतलं होतं. थायलंडमधे चामड्यावर रामायणातली चित्रं काढण्याची कलाही मध्ययुगीन काळात अस्तित्वात होती. या देशांमधे रामायणासंदर्भातल्या साहित्य, कला, संस्कृती, परंपरा, व्यक्ती नामे इत्यादी अंगाने अनेक दाखलं अभ्यासक देतात. मात्र त्यावर अद्याप अभ्यासकांमधे एकवाक्यता झालेली नाही.

हेही वाचा: रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?

इतिहासाच्या पुस्तकातलं रामायण

काही अभ्यासकांच्या मते, ग्रीक महाकवी होमर याचं काव्य इलियड आणि रोमचा कवी नोनस याच्या डायोनीशिया यांचं रामायणाशी साधर्म्य आढळून येतं. कदाचित इथं त्या अभ्यासकाचा वैयक्तिक दृष्टिकोन प्रभावी असू शकतो. रामायणाच्या अभ्यासकांनी मुगल रामायण नावाचा एक स्वतंत्र गटही केलाय.

बादशहा अकबराने १५८८मधे एक सचित्र रामायण फार्सी भाषेत अनुवादित करुन घेतलं. ३६५ पृष्ठसंख्या असलेल्या या रामायणात चित्रकार लाल केशव आणि बसावन यांची १७६ चित्रं समाविष्ट करण्यात आलीय. जयपूरच्या महल संग्रहालयात हे रामायण संग्रहित करण्यात आलंय. अकबराची आई हमिदा बानू यांच्यासाठी कतारच्या दोहा शहरात एक मुगल रामायण बनवण्यात आलं होतं.

१६ मे १५९४ रोजी हे रामायण लिहून पूर्ण करण्यात आलं होतं. अब्दुल रहीम यांनी रामायणाचा एक सचित्र अनुवाद लिहिलाय. जो आज वॉशिंग्टनच्या फ्री गॅलरी ऑफ आर्ट मधे संग्रहित केलेला आढळतो. या रामायणाचा मुख्य चित्रकार म्हणून श्याम सुंदर ओळखला जातो. डबलिनच्या चेस्टर बेट्टी लायब्ररीत बादशहा अकबर आणि जहाँगीर यांनी तयार केलेलं एक लघु योगवसिष्ठ रामायण ठेवण्यात आलंय. या सचित्र रामायणात ४१ चित्रांचा समावेश आहे.

पश्चिमेकडच्या देशांतलं रामायण

सध्या पश्चिमेकडच्या जगासोबतही रामायणाचा संबंध काही भारतीय अभ्यासक जोडून दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार दक्षिण अमेरिकेतल्या इंका संस्कृतीत रामायण आणि राम-सीता यांचे संदर्भ आढळतात. यासाठी भारतीय अभ्यासकांनी १८३०च्या दशकात एडमंड टेंपल यांच्या पेरूदेशातल्या ‘ट्रॅवल्स इन वेरियस पार्टस ऑफ पेरू’ या प्रवासवर्णनाचा संदर्भ प्रामख्याने वापरलाय. त्यानुसार, दक्षिण अमेरिकेच्या भागात वसलेले हे लोक मूळतः पूर्वेकडच्या जगाच्या किनारपट्टीवरचे लोक होते.

एडमंड टेंपल यांच्या या मताचा विस्तार एडवर्ड मूर यांनी आपल्या ओरिएंटल फ्रॅगमेंट्स या १८३४ला लिहिलेल्या ग्रंथात केलेला दिसतो. त्यांच्या मते टेंपलच्या सिद्धांताला दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतल्या स्थानिक भाषांच्या तौलनिक अभ्यासाचा आधार घेणं उचित ठरतं. या दोन्ही भूभागातल्या नद्या, पर्वत आणि शहरांच्या जुन्या नावांमधे हे संदर्भ सापडू शकतात. या भागात बोलल्या जाणार्‍या प्राचीन भाषांचे अवशेष आणि त्यांचा सण यांचा अभ्यास केल्यास पूर्वेकडच्या जगाशी एक दुवा असल्याचं सूचित होतं.

मूर पुढे म्हणतात की, पेरू आणि मॅक्सिकोमधल्या ठिकाणांच्या नावांकडे या दृष्टिकोनातून पाहिल्यास या सिद्धांताला आधार मिळू शकतो. इंका संस्कृतीत रामसिटोवा हा सर्वात मोठा सण साजरा केला जातो. रेमी आणि त्याची पत्नी सिटुआ यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. राम-सीता यांच्याशी नाम आणि उच्चार साधर्म्य इथं मूर यांना दिसतं.

असं असलं तरी आज टेंपल आणि मूर यांचे निष्कर्ष अंतिम मानण्याइतके संशोधन होणं बाकी आहे. इंका संस्कृतीबद्दल भविष्यात केलं जाणारं संशोधन आणि भाषिक अभ्यास हे सर्व स्पष्ट करेलच. एक अभिजात महाकाव्य म्हणून रामायणाने केलेली ही विश्वयात्रा भारताच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय देत आहे.

हेही वाचा: 

मुंह मे राम, बगल में वोट

गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?