नायजेरियाच्या गोझी ओकोन्जो यांची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर बसणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि कृष्णवर्णीय व्यक्ती. त्यांच्या रंगा आणि लिंगावरून त्यांना हिणवलं जातंय. पण गोझी अध्यक्षस्थानी आल्या की अनैतिक व्यापाराला आळा बसणार हे सगळ्यांना माहितीय. गोझींची कामगिरी तेच सांगते.
गोझी ओकोन्जो. आपल्या भारतीयांसाठी हे नाव जरा विचित्रच आहे ना? पण ६६ वर्षांच्या या बाई १ मार्चला आपल्या नवीन ऑफिसमधे जाऊन अध्यक्षाच्या खुर्चीवर बसतील तेव्हा त्यांना तीन बिरुदं लागलेली असतील. एक, जगाची आर्थिक सूत्रं सांभाळणाऱ्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे डब्लूटीओच्या त्या डायरेक्टर जनरल असतील. दुसरं, हे पद स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला आणि तिसरं, आफ्रिकन वंशाच्या पहिल्या व्यक्ती.
डब्लूटीओ ही जगभरातल्या सरकारांनी एकत्र येऊन बनवलेली आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. १६४ देश याचे सदस्य आहेत. जगातला जवळपास ९६ टक्के व्यापार या संस्थेच्या प्रतिनिधित्वाखाली होतो. त्याचं हेडक्वार्टर आहे जिनेवा म्हणजेच स्वित्झर्लंडमधे. १ जानेवारी १९९५ ला ही संस्था आकाराला आली. जवळपास २६ वर्षांनंतर तिला आपली पहिली महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष मिळतेय.
गोझी ओकोन्जो – ईवेला हे त्यांचं पूर्ण नाव. ईवेला हे त्यांचं सासरचं आडनाव. मागच्या वर्षी रॉबर्टो ऍझेवेडो यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासूनच आता अध्यक्षस्थानी त्याच येणार अशी चर्चा सुरू झाली होती. तरीही, डब्लूटीओच्या २६ वर्षांच्या इतिहासातली त्यांची निवड सगळ्यात वादग्रस्त ठरली.
हेही वाचा : सरकारी उद्योग विकणं हा तर कातडीबचावूपणा : अभय टिळक
गोझी अध्यक्षपदाची निवड जाहीर झाली आणि लगेचच अनेक स्वित्झर्लंडच्या स्थानिक वृत्तपत्राचे मथळे आग ओकू लागले. ‘आता या आजी डब्लूटीओच्या अध्यक्ष होतील’ अशा तुच्छता दाखवणाऱ्या त्या हेडलाईन होत्या. अनेकांना एक महिला या जागेवर बसतेय याचाच त्रास होत होता. तर त्या कृष्णवर्णीय आहेत यानं अनेकांच्या दुःखात भरच टाकली.
पण गोझी या कुणी साध्यासुध्या कृष्णवर्णीय महिला नाहीत. या पदावर पोचण्यासाठी त्यांनी जगातल्या ४ खंडातल्या ८ सर्वोत्तम नेत्यांचा पराभव केलाय. त्यातही निवडीच्या अंतिम फेरीत पुरुषी वर्चस्वाची काचेची भिंत तोडत त्या आणि साऊथ कोरियाच्या ‘यो मुंग ही’ या दोन महिलाच टिकून राहिल्या.
डब्लूटीओची निवड प्रक्रिया एकमतावर चालते. सगळ्या सदस्यांनी संमती दिली तरच अध्यक्ष निवडला जातो. पण गोझी या कृष्णवर्णीय महिलेला ट्रम्प प्रशासनाने विरोध केला. ‘त्या वर्ल्ड बँकेत विकासाचं काम बघणाऱ्या आहेत. त्यांना व्यापाराचा काहीही अनुभव नाही,’ असं कारण त्यांच्याकडून देण्यात आलं. त्यामुळे त्या बाजूला पडून यो मुंग ही या अध्यक्ष पदावर येतील अशी चिन्ह दिसत होती.
अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडेपर्यंत डब्लूटीओच्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रश्न तसाच ठेवला. निवडणूक झाल्यानंतर बायडन प्रशासनाने गोझी यांच्या निवडीला हिरवा कंदील दाखवला आणि त्या डब्लूटीओच्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या!
पण ट्रम्प प्रशासनाचा विरोध हा फक्त गोझी यांच्या लिंगाभोवती आणि रंगाभोवती फिरणारा नव्हता. गोझी या विकासाच्या बाजूच्या आहेत हेही त्यांच्या नकाराचं महत्त्वाचं कारण आहे, अशी माहिती डेली मॅवेरिक या वेबसाईटवरच्या एका लेखात देण्यात आलीय.
अमेरिकेसारखे श्रीमंत, बलाढ्य देश कधीही चांगल्या मार्गाने व्यापार करत नाहीत. गरीब देशांना फसवून, त्यांना लुटून, दबाव टाकून आपल्याला हवं ते मिळवण्यात ते कधीही मागे राहिलेले नाहीत. या गरीब आणि श्रीमंत देशांमधला दुवा म्हणून डब्लूटीओची स्थापना झाली होती. योग्य आणि नैतिक व्यापार व्हावा यासाठी काही नियम त्यांनी बनवले. पण या नियमांकडेही कधी श्रीमंत देशांनी फारसं लक्ष दिलं नाही. ते पाळणं वगैरे तर सोडाच!
आपल्या कारकिर्दीची चार वर्ष ट्रम्प यांनी चीनसोबत जळजळीत आर्थिक युद्ध खेळण्यात घालवली. त्यासोबत डब्लूटीओवर आरोपप्रत्यारोप, अनैतिक गोष्टी, नॉर्थ अटलांटिक फ्री ट्रेडचं उल्लंघन, ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप ट्रेड डील तोडणं अशा अनेक गोष्टी सांगता येतील. गोझी डब्लूटीओच्या अध्यक्षस्थानी बसणार म्हणजे या सगळ्या गोष्टींना आळा घातला जाणार हे या बलाढ्य देशांना चांगलंच माहितीय. गोझी यांची आधीची कामगिरी तेच सांगते.
हेही वाचा : ब्रिटनची युरोपियन संघातली 'ब्रेक्झिट' कुणाच्या फायद्याची?
२०१६ पासून गोझी ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन अँड इम्युनायझेशन म्हणजेच ‘गावी’ या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून काम करत होत्या. गरीब देशातल्या मुलांपर्यंत लसीकरण पोचावं यासाठी ही संस्था काम करते. कोरोना वायरसवर निघालेल्या कोवॅक्सिन या लसीच्या संशोधनातही या गावी संस्थेचा वाटा आहे.
यासोबतच गोझी यांनी वर्ल्ड बँकेसाठीही २५ वर्षं काम केलंय. अमेरिकेत डेवलपमेंट इकॉनॉमिस्ट म्हणून काम करत असताना त्या दुसऱ्या नंबरच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर गेल्या होत्या. हे पद सांभाळताना वर्ल्ड बँकेचा आफ्रिका, दक्षिण आशिया, युरोप आणि मध्य आशियाचा ८१ बिलियन डॉलरचा व्यवहार त्या बघत होत्या.
वर्ल्ड बँकेच्या अनेक चांगल्या योजनांचं नेतृत्व त्यांनी केलंय. २००८-०९ ला आलेल्या उपासमारीच्या संकटात त्यांनी गरीब देशांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. २०१० मधे त्या इंटरनॅशनल डेव्हलमेंट असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. गरीब देशांना अनुदान आणि कर्ज मिळवून देण्यासाठी ४९.३ बिलियन डॉलरचा निधी उभारण्याचं काम यातून यशस्वीपणे झालं.
वर्ल्ड बँकेचं काम करत असतानाच गोझी यांनी दोनदा नायजेरियाचं अर्थमंत्री पद सांभाळलंय. २००३ ते २००६ आणि नंतर २०११ ते २०१५. या मधल्या काळात त्या एकदा नायजेरियाच्या परराष्ट्र मंत्रीही होत्या. या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी नायजेरियात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नायजेरियाच्या डोक्यावरचं कर्ज त्यांनी कमी केलं.
१९८० पासून नायजेरियावर ३० बिलियन डॉलरचं कर्ज होतं. या कर्जासंदर्भात पॅरिस क्लबशी गोझी यांच्या नेतृत्वाखाली एका टीमनं वाटाघाटी सुरू केल्या. त्यामुळे हे सगळं कर्ज संपुष्टात आलं. इतकंच काय, उशिरा पैसे भरल्याने किंवा व्याज लागल्याने जमा झालेलं १८ बिलियन डॉलर कर्ज तर तिथल्या तिथे रद्द झालं.
२००३ मधे त्यांनी तेलाची किंमत देशाच्या बजेटमधून वेगळी केली. तेलाच्या विक्रीतून मिळणारा सगळा पैसा त्यांनी एका वेगळ्या ‘द एक्सेस क्रुड अकाऊंट’ या खास खात्यात ठेवला. त्यामुळे तेलाच्या किंमती वाढत असतानाही नायजेरियाला पैसा वाचवता आला. नायजेरियाची आर्थिक अस्थिरता कमी झाली.
हेही वाचा : कोरोनाकाळात टाळायच्या सहा आर्थिक चुका
महिला आणि तरुणींसाठी ‘ग्रोईंग गर्ल्स अँड वुमन इन नायजेरिया’ या नावाने जेंडर बजेटची योजना त्यांनी चालू केली. ‘यूविन’ या आणखी एका योजनेनं तरुण मुलामुलींच्या हाताला काम लागेल, नवे व्यावसायिक तयार होतील यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या आर्थिक सुधारणांमुळे अतिशय कठीण प्रसंगातून नायजेरिया बाहेर आला. पण या सुधारणांची मोठी किंमत गोझी यांना चुकवावी लागली.
नायजेरियातला भ्रष्टाचार कमी करायचं त्यांनी ठरवलं होतं. सरकारकडून पगार घेतात असे ५ हजार खोटे सरकारी नोकर त्यांनी शोधून काढले. क्रूड तेलाची चोरी करणाऱ्या राजकारण आणि सैन्यातल्या अनेक मोठ्या पदावरच्या व्यक्तींना त्यांनी खाली खेचलं. नायजेरियात इंधनाचे आयातदार विकल्या न गेलेल्या इंधनासाठी सरकारकडून सबसिडीच्या रूपात भरपूर पैसै काढत होते. हा भ्रष्टाचार संपावा यासाठी गोझी यांनी दुसऱ्यांदा अर्थमंत्री असताना प्रयत्न चालू केले.
या सगळ्यात गोझी यांना गप्प करण्यासाठी कमेन ओकेंजो या त्यांच्या ८२ वर्षांच्या आईचं त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केलं. आईच्या अपहरणानंतर गोझी यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. तुमच्या पदावरून राजीनामा द्या आणि मग खंडणी जमा करा असंही धमक्या देणारे सांगत होते. पण गोझी यांनी दोन्हीपैकी काहीही करणार नाही, असं ठामपणे सांगितलं. ५ दिवसांनी त्यांच्या आईंना अपहरणकर्त्यांनी सुखरूप सोडून दिलं.
नायजेरियातल्या सगळ्या मंत्र्यांपेक्षा गोझी खूप वेगळ्या होत्या. एकतर नायजेरियासारख्या पुरुषी वर्चस्व असणाऱ्या देशात त्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं. नायजेरिया ही त्यांची जन्मभूमीच होती. तिथल्या डेल्टा राज्यातल्या ओगावकी ऊकू या ईग्बो संस्कृतीच्या शहरात त्यांचा जन्म झाला होता. शाळा वगैरे करुन वयाच्या अठराव्या वर्षी त्या अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिवर्सिटीत अर्थशास्त्रातलं पदवीचं शिक्षण घेण्यासाठी आल्या. तिथंच मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.
अमेरिकेतच वर्ल्ड बँकेत गोझी काम करत होत्या. पण त्यांचं नागरिकत्व होतं नायजेरियाचं. २०१९ मधे त्यांना अमेरिकेची ड्युअल सिटिशनशीप मिळाली. म्हणजे आता त्या नायजेरिया आणि अमेरिका अशा दोन्ही देशांच्या नागरिक आहेत. पण २००६ मधे देशावरच्या प्रेमापोटी नायजेरियाच्या अर्थमंत्री म्हणून काम करण्यासाठी त्यांनी अमेरिकेतलं आपलं बस्तान, आपलं कुटुंब सोडलं. तेव्हा त्या ४ मुलांच्या आई होत्या.
त्यांचा नवरा ईकेम्बा ईवेला डॉक्टर आहेत. इतर मंत्र्यांप्रमाणे त्यांनी कधीही घरकामासाठी माणसं, दिमतीला गाडीघोडं ठेवलं नाही. शक्य होईल तेव्हा माझा स्वयंपाक मला करायला आवडतो, असं त्यांनी फायनॅन्शियल टाईम्सला २०१५ ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.
हेही वाचा : भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?
त्यांचा पेहरावही खूप खास असतो. ईग्बो समुदायातल्या स्त्रियांसारख्या अतिशय रंगीबेरंगी कपड्यांसोबत तसेच दागिने आणि डोक्यावर रूमालासारखं कापड त्या बांधतात. त्यांचं वेगळेपण दाखवणारा हा पोशाख म्हणजे खरंतर ४ मुलांच्या, काम करणाऱ्या आईला सोपं पडावं म्हणून केलेला आहे असं त्या हसत हसत सांगतात.
१९६७, १९७० ला झालेलं नायजेरियन सिविल वॉरही गोझी यांनी अनुभवलंय. या युद्धात त्यांच्या पालकांकडे होतं नव्हतं ते सगळं गेलं होतं. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणतात, ‘मी गरिबी पाहिलीय. नऊ वर्ष मी माझ्या आजीकडे राहत होते. एखादी खेड्यातली मुलगी करते ते सगळं मी केलंय. पाणी काढलंय, आजीसोबत शेतात जाऊन माती तुडवून काम केलंय. गरिबी काय असते, गरीब असणं काय असतं हे मी खूप जवळून अनुभवलंय.’
जगण्याचे असे सगळे बरेवाईट अनुभव घेतल्यामुळेच त्या म्हणतात, ‘मी गार पडलेल्या जमिनीवरही झोपू शकते. आणि पिसांच्या मऊसूत पलंगावरही.’ आपल्याकडे असणाऱ्या सुखाने त्या हुरळून जात नाहीत.
म्हणूनच गोझी यांच्या रंगाला कुणी घाबरत नाही. त्यांच्या महिला असण्याचंही कुणाला काही फार पडलेलं नाही. पडलंय ते त्यांच्या विकास घडवण्याच्या, बदल घडवण्याच्या निश्चयाचं. ‘मी पहिली महिला आहे, पहिली कृष्णवर्णीय आहे या सगळ्या महान गोष्टी असतीलही. पण डब्लूटीओची अध्यक्ष म्हणून मी काहीच केलं नाही, तर या सगळ्याला काही अर्थ उरत नाही,’ असं डब्लूटीओच्याच एका वीडियोमधे त्यांनी म्हटलंय.
डब्लूटीओची जबाबदारीही त्यांनी कोरोनाच्या काळात उचललीय. जगभरातल्या अर्थव्यवस्था आता साथरोगानंतरचा ताप सहन करतायत. इतकंच नाही, तर डब्लूटीओच्या नेत्यांबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलही एकप्रकारचं नकारात्मक वातावरण जगात आहे. डब्लूटीओवरचा विश्वास त्यांना परत लोकांच्या मनात पेरायचाय.
पण ते करण्याआधी एक मोठं काम त्यांची वाट पाहतंय. कोरोना वायरस साथरोगामुळे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि आरोग्यव्यवस्था यांची घडी त्यांना पुन्हा बसवायचीय. त्यासाठी त्या सगळ्या गरीब देशांपर्यंत कोरोना वायरसची लस पोचवणं या कामाला प्राधान्य देणार आहेत. लस राष्ट्रवाद होऊ नये, यासाठी त्यांचे प्रयत्न असतील. त्यांच्या हातात असणाऱ्या जगाच्या आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी आता विकासाची अनेक दारं उघडली जातील असा विश्वास ठेवायला हरकत नाही.
हेही वाचा :
पेट्रोलची शंभरी पार, जबाबदार आधीचं सरकार?
मोदी शहांना तरुण कार्यकर्त्यांची इतकी भीती का वाटते?
प्रिया रमानी खटला : बाईचा सन्मान जपणारं कोर्टाचं जजमेंट