कसोटी क्रिकेटला नव्या फोडणीची 'टेस्ट'

१३ जून २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतीय टीमला न्यूझीलंडला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला विजेता म्हणून इतिहास रचण्याची संधी आहे. भारत भारतात तर न्यूझीलंड ही न्यूझीलंडमधे बाप टीम समजली जाते. पण, आता इंग्लंडमधे दोन्ही टीम समान पातळीवर असणार आहेत. कोणत्याही टीमला मायदेशातल्या परिस्थितीचा फायदा मिळणार नाही. याही परिस्थितीत भारताने मॅच जिंकली तर त्या विजयाची गोडी काही औरच असणार आहे.

क्रिकेटचा जन्मदाता देश इंग्लंडमधे १८ जून २०२१ ला पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ऐतिहासिक फायनल होणार आहे. कसोटी क्रिकेटसाठी हे एक ऐतिहासिक स्थित्यंतर ठरणार आहे. टी ट्वेन्टीमय झालेल्या क्रिकेटचा मूळ ढाचा कालबाह्य ठरत होता. कसोटी क्रिकेट आता इतिहासजमा होणार की काय, अशी भीती अनेक जाणकार व्यक्त करत होते. पण, ज्या पायावर टी ट्वेन्टी क्रिकेटचा सर्व रोमांच उभा आहे, त्या पायाची जाणीव करून देण्यासाठीच बहुदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अस्तित्वात आली असावी.

कसोटीने कात टाकली

क्रिकेटची खेळापासून मनोरंजन व्यवसायाकडे वाटचाल सुरू होती तेव्हापासूनच कसोटी क्रिकेट हे त्यांच्यासाठी सवतीचं पोर झालं होतं. मोठमोठ्या क्रिकेट संघटना या मनोरंजन व्यवसायाशी हस्तांदोलन करत नफ्यांची गठळी बांधत होते. तेव्हा ही युती कसोटीच्या नरडीचा घोट घेणार, असं चित्र निर्माण झालं.

पहिल्यांदा ५० ओवरच्या मॅचनी नफ्यांचे इमले बांधायला सुरवात केली. त्यानंतर ‘मनोरंजनात्मक’ टी ट्वेन्टीने त्याच्यावर कळस चढवला. ही टोलेजंग इमारत उभी होती ती कसोटी क्रिकेटवरच. पण, याचा विसर पडतो की काय, अशी स्थिती मध्यंतरी झाली होती.

पण, कसोटी क्रिकेटनेही आपली कात टाकत या नव्या जगात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आधी प्रेक्षक वेळ काढून कसोटी क्रिकेटची मजा घेत. मुंबईचं जुनं क्रिकेट विश्व याची साक्ष देतं. आता प्रेक्षकांच्या वेळेनुसार कसोटीने आपली वेळ बदलली. कसोटी क्रिकेट आता दिवस-रात्र खेळवलं जातंय. हे शक्य होण्यासाठी कसोटीमधल्या लाल चेंडूने आपला रंगही सोडला. आता त्याने नजरेत भरण्याच्या धडपडीत भडक पिंक रंग चढवला आहे.

हेही वाचा :  लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

कसोटी स्पर्धात्मक व्हायचं कारण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपने कसोटी स्पर्धात्मक केली. यापूर्वी कसोटी मॅच दोन देशात खेळल्या जात. आधी ही सिरीज ५ मॅचची असायची. ती हळूहळू ३ आणि २ मॅचवर आली होती. कसोटी सिरीज म्हणजे उपचार असंच समीकरण झालं होतं. हे एक प्रकारच्या र्‍हासाचंच लक्षण होतं. पण, गेल्या वर्षा-दीड वर्षापासून सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपने हीच दोन देशांमधली उपचार म्हणून खेळवण्यात येणारी कसोटी सिरीज स्पर्धात्मक केली.

यातला जय-पराजय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलशी जोडण्यात आला. त्यामुळे तिथे आपला देश अव्वल स्थानी असला पाहिजे, अशी स्वाभाविक अपेक्षा चाहत्यांमधे निर्माण झाली. ही स्पर्धात्मकताच प्रेक्षकांना पुन्हा कसोटी फॉलो करण्यास भाग पाडत आहे.

दुसर्‍या दोन देशांत सुरू असलेल्या कसोटीचा परिणाम हा आपल्या देशाच्या रँकिंगवर पडणार आहे. त्यामुळे क्रिकेट रसिक त्यावरही लक्ष ठेवून असतात. त्याची चर्चा आपल्या देशातही घडते. या सर्व गोष्टी अधिकाधिक लोकांना कसोटी क्रिकेट फॉलो करण्यासाठी उद्युक्त करतात. ही कसोटी क्रिकेटचे फॅन फॉलोईंग वाढवण्याची पहिली पायरी आहे.

कसोटी खेळण्याची बदललेली स्टाईल

कसोटी क्रिकेट म्हटलं की अनेक लोकांना दिवसभर रटाळवाणा खेळ, निर्धाव बॉलचा रतीब, फोर सिक्सचा दुष्काळ, ना कोणता दंगा असा समज झाला होता. क्लायमॅक्ससाठी पाच दिवस तंगत बसायचं. आजकालच्या गिगाबाईट स्पीड पकडलेल्यांना हे युगायुगांचं बफरिंग वाटणं साहजिकच आहे.
पण, आता कसोटी क्रिकेट खेळण्याची स्टाईल बदलली आहे. बॅट्समनही वेगाने धावा करतायत.

आताच्या आधुनिक बॅट्समननी टी ट्वेन्टी मधले फटके कसोटीतही वापरायला सुरवात केली आहे. त्यामुळे कसोटीत मनोरंजनाचे अधिक रंग भरले जात आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऋषभ पंत. तो कसोटी क्रिकेमधेही टी ट्वेन्टी स्टाईल बॅटिंग करू शकतो. जगभरातल्या बहुतांश कसोटी टीम आता मॅच अनिर्णीत ठेवायला अनुत्सुक असतात. ते आरपारच्या लढाईवर विश्वास ठेवतात.

हेही वाचा : स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

भविष्यातली आयडियल स्पर्धा

विराट कोहली तर संधी असेल तर कसोटी मॅच निर्णायक स्थितीत न्यायला प्राधान्य देतो. आजकाल जाणकारही कसोटी अनिर्णीत ठेवण्याच्या डावपेचांवर सडकून टीका करताना दिसत आहे. कसोटीमधलं हे सर्व हॅपनिंग आता चाहत्यांना रंजक वाटू लागलंय.

‘जागतिक क्रिकेटमधे कसोटी रसातळाला गेली होती.’ या विधानाला अपवाद आहेत ते अ‍ॅशेस आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफी. या दोन कसोटी दरम्यान, या देशांमधे क्रिकेटचा फिवर टीपेला पोचलेला असतो. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशात क्रिकेटला चांगली व्यूवरशिप मिळते. पण, उर्वरित क्रिकेट जगाचं काय?

आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे या उरलेल्या क्रिकेटमधल्या कसोटी मॅच याच कक्षेत आणण्यात आल्या आहेत. अ‍ॅशेस आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात सुरू असलेली कसोटीची सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर परिणाम करणार आहे. तिथल्या चढ-उतारावर आता सर्वच कसोटी टीमचं आणि त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप कसोटीचा सर्वच देशात प्रसार करण्यासाठी भविष्यातील आयडियल स्पर्धा ठरण्याची संधी आहे.

इतिहास रचण्याची भारताला संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्कोरमधे भारतीय टीम कायम पहिल्या तीनमधे खेळत होती. पण, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा क्लायमॅक्स जवळ येईल तसे त्याचे नियम बदलले. भारतीय टीमचा फायनलचा प्रवास खडतर झाला. पण, भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात मात देत आपली फायनलची दावेदारी पुन्हा सिद्ध केली. त्यानंतर इंग्लंडला मायदेशात धूळ चारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली.

भारताला कसोटी टीमचा दर्जा २५ जून १९३२ ला मिळाला होता. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी १९५२ मधे भारताने आपला पहिला कसोटी विजय साजरा केला. सुरवातीच्या काळात भारतीय क्रिकेट संघ हा दुबळा समजला जायचा. पण, त्यानंतर भारताने क्रिकेट जगात आपले पाय रोवत तीनही क्रिकेट प्रकारांमधली एक तगडी टीम असा दबदबा निर्माण केला. आता भारतीय टीमला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम मॅचमधे न्यूझीलंडला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला विजेता म्हणून इतिहास रचण्याची संधी आहे.

विशेष म्हणजे हा अंतिम सामना दोन्ही टीम तिसर्‍या ठिकाणी खेळणार आहेत. भारत भारतात तर न्यूझीलंड न्यूझीलंडमधे बाप टीम समजली जाते. पण, आता इंग्लंडमधे दोन्ही टीम समान पातळीवर असणार आहेत. कोणत्याही टीमला मायदेशातल्या परिस्थितीचा फायदा मिळणार नाही. या परिस्थितीत भारताने मॅच जिंकली तर त्या विजयाची गोडी काही औरच असणार आहे.

हेही वाचा : 

क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी