जागतिक पुस्तक दिन: थोरामोठ्यांना प्रेरणा देणारी पुस्तकं

२४ एप्रिल २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


पुस्तक हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही. पुस्तकांमधे मानवी मनाला नवचेतना, नवसंजीवनी देण्याचं, प्रेरणा आणि स्फूर्ती देण्याचं एक अलौकिक सामर्थ्य असतं. जगभरातील असंख्य युवकांना असंख्य पुस्तकांनी पिढ्यान्पिढ्या प्रेरणा दिल्याची उदाहरणं आहेत. आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तकांचं हे प्रेरणादायी जग आपण समजून घ्यायला हवं.

पुस्तकांचं जग काही विलक्षणच असतं. पुस्तक हातात घेऊन शांतपणे-निवांतपणे वाचत त्यातल्या आशयाचा आस्वाद चवीचवीनं घेण्याचा आनंद अनोखाच असतो. वाचता वाचता काही समजलं नाही किंवा काही भाग खूप आवडला, तर पानं मागं उलटून पुनःपुन्हा वाचण्यातही वेगळी मौज असते. 

बालपणीची अंगठा चोखायची सवय सुटल्यानंतर लहान लहान घास घेत मोठं होताना पुस्तकांची ओळख झाल्यानंतर अक्षरांशी नातं जोडत जोडत आपण लहान लहान पुस्तकं वाचायला आरंभ करतो, तेव्हा एका अफाट आणि जादूभर्‍या विश्वात प्रवेश केलाय याची जाणीव मनाला कळत-नकळत होत असते.

छापलेलं पुस्तक हातात घेऊन वाचत बसण्याची ही गंमत आहे, पण पुस्तक हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही. पुस्तकांमधे मानवी मनाला नवचेतना, नवसंजीवनी देण्याचं, प्रेरणा आणि स्फूर्ती देण्याचं एक अलौकिक सामर्थ्य असतं. जगभरातल्या असंख्य युवकांना असंख्य पुस्तकांनी पिढ्यान्पिढ्या प्रेरणा दिल्याची उदाहरणं आहेत.

हेही वाचा: रा. ना. : महाराष्ट्राच्या इतिहासाचा संगणक

शिवरायांवर ग्रंथांचे संस्कार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर पराक्रमाच्या कथांचे आणि नैतिकतेचे संस्कार झाले होते. त्यांच्या बालपणी छापील पुस्तकं उपलब्ध नव्हती. छपाईच्या शास्त्राचा त्या वेळी भारतात विकास झालेला नव्हता. त्या काळी सर्व पुस्तकांच्या हस्तलिखित प्रती काढल्या जायच्या. रामायण, महाभारत आणि इतर प्राचीन ग्रंथ हस्तलिखित काढलेल्या स्वरूपात मिळत होते.

हस्तलिखित असल्यामुळं ते दुर्मीळ असायचे; पण राष्ट्रमाता जिजाऊंनी ते ग्रंथ मोबदला देऊन लिहवून घेऊन ते वाचून शिवबाला त्यातल्या गोष्टी सांगितल्या होत्या. प्राचीन साहित्यातल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत सांगत जिजाऊंनी त्यांच्या शौर्याला आकार दिला होता. पराक्रमाच्या कथांचे संस्कार शिवरायांच्या जडणघडणीत उपकारक ठरलेले आहेत. अधर्म अणि अन्यायाशी लढा, नैतिकता, सदाचरण यांचा त्यांना पाठ मिळाला.

भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून राजनिती, व्यूहरचना, कर्मयोग इत्यादी सद्गुणांची प्रेरणा त्यांनी घेतली. शिवरायांच्या व्यक्तित्वातून एक युगपुरुष निर्माण झाला, त्याला हे ग्रंथाचे संस्कारही प्रेरक ठरलेले आहेत. नंतर त्यांचं स्वतःचं चरित्र हीच एक महान स्फूर्तिगाथा बनली. स्वपराक्रमाने युगपुरुष होऊन राहिलेल्या शिवरायांच्या चरित्रानं जगभराच्या महान लोकांना प्रेरणा दिलेली आहे.

विएतनाम हा अमेरिकेच्या तुलनेत एक चिमुरडा देश. सतत वीस वर्षं हे छोटं राष्ट्र अमेरिकेशी लढत राहिलं. अखेर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला या छोट्या राष्ट्रासमोर नमतं घ्यावं लागलं. ही लढण्याची प्रेरणा त्या राष्ट्रानं कोणाकडून घेतली? त्यांचे राष्ट्राध्यक्ष हो चि मिन्ह यांनी ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र वाचून घेतली, असं मोठ्या अभिमानानं सांगतात.

शिवचरित्राची जादू

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्याचे महानायक होते. त्यांनीही शिवरायांची चरित्रगाथा वाचूनच स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा घेतली. कोलकात्यातल्या आपल्या निवासस्थानातून सुभाषबाबूंनी ब्रिटिश पोलीस आणि गुप्तहेरांच्या हातावर तुरी देऊन देश सोडला आणि नंतर जपान गाठलं; ती त्यांची महान गाथा छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या नाट्यमय, धीरोदात्त जीवननाट्यातूनच त्यांनी बेतली होती.

सुभाषबाबूंचं वेशांतर आणि देश सोडून निसटून जाण्याचं नियोजन अत्यंत नीटनेटकं आणि अभ्यासपूर्ण होतं. शिवाजी महाराज जसे आग्य्राहून औरंगजेबासारख्या क्रूरकर्मा आणि धूर्त बादशहाच्या कडक पहार्‍यातून निसटले, अगदी तसेच सुभाषबाबू निसटलेले आहेत. त्या नजरकैदेत असताना त्यांनी शिवरायांच्या चरित्राचे काळजीपूर्वक वाचन केलं होतं.

डॉ. बाळकृष्ण यांनी १९३२मधे इंग्रजीत लिहिलेलं चार खंडाचं, एकूण १८०० पानांचं चरित्र जगभर पोचलंय. डॉ. बाऴकृष्ण हे मराठी नव्हते. ते मुल्तान-पंजाबमधून म्हणजेच आजच्या पाकिस्तानमधून कोल्हापूरला आलेले विद्वान होते. लंडन विद्यापीठाचे ते विद्यावाचस्पती होते. त्यांनी हे महाचरित्र लिहिलं.

कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना राजर्षी शाहू महाराजांनी संशोधनासाठी अनुदान देऊन शिवचरित्र लिहायला लावलं. हे चरित्र अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारं ठरलेलं आहे. त्याशिवाय मराठी- इंग्रजीतली अनेक शिवचरित्रे वाचकांना प्रेरणा देत असतात. 

हेही वाचा: नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास

गीतेचा थोरामोठ्यांवर प्रभाव

श्रीमद्भगवद्गीता हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. अठरा अध्यायांची ही गीता भारतीय स्वातंत्र्यसमरातील असंख्य सेनानी आणि सैनिकांची स्फूर्तिगाथा होती. शत्रूशी लढण्याची शिकवण देणारी ही गीता हातात घेऊन चापेकर बंधू आणि त्यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक फासावर चढलेले आहेत.

आझाद हिंद सेना ब्रिटिश सेनेविरुद्ध लढत असताना सुभाषबाबूंनी गीतेची प्रत जवळ ठेवली होती आणि ते वेळ मिळेल तेव्हा गीतेचे वाचन करीत असत. ‘गीतारहस्य’ हा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला अत्यंत मोलाचा ग्रंथ आहे. गीता हा ग्रंथ महात्मा गांधींनाही प्रेरक वाटत होता. ते नेहमी आपल्यासोबत गीतेची प्रत बाळगत होते.

गांधींच्या आयुष्यातलं महत्त्वाचं पुस्तक

जॉन रस्किन यांचं ‘अनटू धिस लास्ट’ हे १८६२मधे प्रसिद्ध झालेलं पुस्तक गांधीजींच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. गांधीजींना या पुस्तकानं जी प्रेरणा दिली, ती समस्त भारतीयांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे.

भारतासारख्या देशांची आर्थिक व्यवस्था कशी असावी याबाबात गांधीजींनी मांडलेला सिद्धांत ‘अनटू धिस लास्ट’ ह्या पुस्तकावर बेतलेला आहे. गांधीजी म्हणतात, रस्किन यांचं हे पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि मी आमूलाग्र बदलून गेलो. हे पुस्तक वाचून मी माझं आयुष्य बदलून टाकण्याचा निर्धार केला.

विश्वस्तपणाचा सिद्धांत, मालक अणि नोकर यांच्यातील संबंध, भारताच्या संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, आर्थिक समानता, खेड्यांची स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याविषयीच्या कल्पना मला रस्किन यांच्याकडून मिळाल्या. समता आणि बंधुता तसेच अन्य आदर्शाविषयीच्या कल्पना मानवजातीने जाणून घेतल्या, तर संबंध मानवजात त्या तत्त्वाचा स्वीकार करेल.

हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू 

मार्क्स आणि आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात पुस्तकांचं महत्त्व किती होतं, हे तर सार्‍या जगाला माहीत आहे. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला तो पूर्ण अभ्यासान्ती. आयुष्यातला कोणताही निर्णय त्यांनी अभ्यासाशिवाय घेतलेला नव्हता. तब्बल एकवीस वर्षे त्यांनी जगातल्या सर्व धर्मांचा काळजीपूर्वक अभ्यास केला. शेकडो ग्रंथ वाचले, तपासले आणि भारतीय भूमीत जन्माला आलेल्या, मानवतेचा पुरस्कार करणार्‍या आणि विज्ञानवादी बुद्ध धम्माचा स्वीकार केला.

कार्ल मार्क्सचा ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ असो, की, त्यानं लिहिलेले बाकीचे ग्रंथ असोत. हे ग्रंथ वाचून कोट्यवधी वाचकांना समाजवादाची प्रेरणा मिळाली. मालक आणि मजूर, भांडवलदार आणि श्रमिक यातला फरक ठळकपणानं जगभरातील लोकांना समजला, त्यांना वर्गीय लढ्याला प्रवृत्त केलं. आर्थिक विषमतेविरुद्धचा लढा मार्क्सच्या ग्रंथांनी निर्माण केला आणि बळकटही केला. मार्क्स, एंगेल, लेनिन, स्टालिन यांच्या ग्रंथांनी मोठी सामाजिक जागृती केली.

प्रेरणा आणि मनोरंजनाचा मिलाफ

साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ ह्या कादंबरीनें लाखो बालमनांचं पोषण केलं. त्यांच्याच गोड गोष्टींनी मुला-मुलींचं सकस मनोरंजन केलं. बाल आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या मुला-मुलींना जीवनात शून्यातून काहीतरी नवं निर्माण करण्याची उमेद ज्या पुस्तकानं दिली, ते पुस्तक म्हणजे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं ‘एक होता कार्व्हर’.

हे पुस्तक जगण्याचं बळ देतं. जॉर्ज वॉशिग्टन कार्व्हर नावाच्या एका दरिद्री घरातल्या कृष्णवर्णीय मुलानं कृषी क्षेत्रात घडवलेली क्रांती जगाचे डोळे दिपवणारी ठरली. हे पुस्तक निश्चितच असंख्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं ठरलंय.

पुस्तक प्रेरणा देतात. जीवन बदलवून टाकण्याची शक्ती पुस्तकात असते. तशी प्रेरणा देणार्‍या पुस्तकांची यादी तशी मोठी आहे. एकाच लेखात सगळ्या पुस्तकांचा परामर्श घेता येणार नाही. प्रेरणा देणाऱ्या सगळ्याच पुस्तकांविषयी लिहायचं झालं तर त्याचीच एक पुस्तकमालिका होईल, याची खात्री वाटते.

हेही वाचा: 

टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!

करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर

केला होता अट्टहासः शोषणमुक्त भारत प्रत्यक्षात येण्यासाठी तरुणांनी वाचायला हवी अशी कादंबरी