महिला क्रिकेटला लागलीय महिला प्रीमियर लीगची लॉटरी

२० फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही.

मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्या वारसदार असलेल्या स्मृती मानधना, हरमान प्रीत कौर अशा भारतीय महिला क्रिकेटपटू समाजमान्य, लोकप्रिय असल्या तरी त्यांना स्वतःचं कौशल्य अधिक प्रगल्भतेने दाखविता येईल, असं हक्काचं व्यासपीठ हवं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अलीकडेच महिला प्रीमियर लीगची घोषणा करत भारताच्या युवा खेळाडूंना हे हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलंय.

महिला प्रीमियर लीगची घोषणा

इंडियन प्रीमियर लीग २००८मधे सुरु झाली. त्यावेळी असलेल्या या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षात रुपांतर झालंय. केवळ भारतीयच नाही तर अनेक परदेशी खेळाडू ही या लीगमधेच खेळण्यासाठी उत्सुक असतात.

काही खेळाडू तर आपल्या देशाकडून खेळण्यापेक्षाही आयपीएलसारख्या भरघोस उत्पन्नाच्या हुकमी माध्यमाला जास्त प्राधान्य देतात. आयपीएलची व्याप्ती आणि लोकप्रियता वाढत गेली तशी महिला क्रिकेटपटूंसाठीही अशीच एक स्पर्धा आयोजित केली गेली पाहिजे अशी सातत्याने मागणी होत होती.

अलीकडेच भारताच्या १९ वर्षांखालच्या महिला टीमने जगज्जेतेपद मिळविल्यानंतर या मागणीला आणखीनच जोर चढला होता. शेवटी महिलांच्या प्रीमियर लीगला मुहूर्त मिळालाय. पाच टीममधे आयोजित करण्यात आलेली ही पहिली लीग ४ ते २६ मार्च या कालावधीत मुंबईत होईल.

हेही वाचा: जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

खेळाडूंवर कुटुंबाची जबाबदारी

आयपीएलने फक्त भारतच नाही तर इतर अनेक टीमलाही चांगले खेळाडू मिळवून दिलेत. पूर्वी आपल्या देशासाठी कसोटी किंवा मर्यादित षटकांच्या सामन्यांमधे प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहायचा. मात्र आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला कशी संधी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो.

अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोटीच्या कोटी रुपयांची कमाई होत असते. चार-पाच वर्षे कसोटी खेळल्यानंतर जेवढं उत्पन्न मिळतं, कदाचित त्यापेक्षा जास्त उत्पन्न आयपीएलद्वारे एका मोसमात मिळू शकतं. साहजिकच युवा खेळाडू आयपीएलमधे चमकण्यासाठीच सर्वस्व ओतून प्रयत्न करत असतात.

क्रिकेट किंवा इतर व्यावसायिक क्रीडा प्रकार हे चांगलं उत्पन्न मिळवून देणारं करियर होऊ लागलंय. हे लक्षात घेतलं तर अनेक खेळाडूंच्या पालकांनाही असं वाटतं की आपल्या मुलाने किंवा मुलीने अशा व्यावसायिक क्रीडा प्रकारांमधे चमकदार कामगिरी करत कुटुंबाची आर्थिक समस्या सोडवावी.

गेल्या काही वर्षांमधे क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, कुस्ती, हॉकी अशा खेळांच्या व्यावसायिक स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत भारतीय खेळाडूंनी स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी समर्थपणे पेललीय असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही.

सौरभ गांगुलींचं योगदान

भारतीय महिला क्रिकेटपटू भारतीय पुरुष टीमसारखंच जागतिक स्तरावर सातत्याने चमकदार यश मिळवत असल्या तरीही महिला क्रिकेट सामन्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकीच होती.

महिला क्रिकेट क्षेत्राचा दर्जा उंचवायचा असेल तर महिलांचे सामने वाढवले पाहिजेत, आयपीएलसारखी स्पर्धा आयोजित केली पाहिजे या मागण्यांचा क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांनी गांभीर्याने विचार केला.

त्यांनी स्वतःच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत देशांतर्गत महिलांच्या सामन्यांची संख्या वाढवली. तसंच महिला प्रीमियर लीगबद्दलही त्यांनी प्राथमिक स्तरावर संबंधित लोकांची चर्चाही केली होती. क्रिकेट नियामक मंडळावर नवीन पदाधिकारी आल्यानंतर त्यांनी महिलांच्या प्रीमियर लीगला मूर्त स्वरूप दिलं.

हेही वाचा: भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?

भारतीय महिला क्रिकेटचा फायदा

भारताची महिला क्रिकेट टीम दोनदा फायनलला जाऊनही विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली होती तसंच गेल्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारताला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं होतं.

भारताला वरिष्ठ गटात विश्वविजेतेपद मिळवायचं असेल तर परदेशी खेळाडूंबरोबर अधिकाधिक सामने आयोजित केले पाहिजेत. परदेशी दौर्‍यांवर जास्त खर्च होऊ शकतो तसंच तिथल्या सामन्यांना अपेक्षेइतकी प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळेच की काय महिला प्रीमियर लीगला प्राधान्य मिळालं. या लीगद्वारे केवळ भारतीय महिला क्रिकेटपटूंना नाही तर क्रिकेट मंडळालाही भरघोस उत्पन्न मिळेल.

किंबहुना आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीगही क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. या स्पर्धेद्वारे मंडळास पाच वर्षाच्या कालावधीसाठी ४६६९ कोटी रुपयांचं घसघशीत उत्पन्न मिळेल. या उत्पन्नाचा काही भाग खेळाडूंच्या विकासाकरिता आणि सहभागी टीमनाही दिला जाईल. 

महागड्या बोलीची रेलचेल

महिला प्रीमियर लीगमधे सर्वाधिक बोली मिळण्याचा मान अष्टपैलू खेळाडू स्मृती मानधना हिला मिळालाय. तिला सर्वाधिक म्हणजेच ३.४० कोटी रुपये मिळतील. भारताच्या दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिक्स, शेफाली वर्मा यांना दोन कोटी रुपयांची बोली मिळालीय.

पूजा वस्त्रकर, रिचा घोष यांना प्रत्येकी एक कोटी ९० लाख रुपये मिळतील. भारताची कर्णधार हरमान प्रीत कौर हिला मात्र तिच्या दर्जाच्या तुलनेत कमी बोली मिळालीय. तिला एक कोटी ऐंशी लाख रुपये मिळतील.

एक मात्र नक्की की भारतीय खेळाडूंसाठी किमान बोली दहा ते वीस लाख रुपये या दरम्यान ठेवण्यात आली होती आणि प्रत्येक टीममधे जास्तीत जास्त सातच परदेशी खेळाडू असावेत हे बंधन घालण्यात आलं होतं. त्यामुळे भारताच्या अनेक युवा खेळाडूंना विशेषतः नुकतंच विश्वविजेतेपद मिळवणार्‍या भारतीय टीममधल्या अनेक खेळाडूंना चांगल्या रकमेची बोली मिळालीय.

इतर खेळांप्रमाणेच भारताच्या सर्व वयोगटाच्या महिला टीममधेही अनेक खेळाडू आदिवासी किंवा ग्रामीण भागातून आलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या स्थितीतून आणि अनेक अडथळे पार करत क्रिकेटची कारकीर्द करणार्‍या खेळाडूंना महिला प्रीमियर लीग ही स्पर्धा स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

हेही वाचा: पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

अनेकांना मिळणार रोजगार

आयपीएलप्रमाणेच महिला प्रीमियर लीग ही स्पर्धा म्हणजे केवळ खेळाडूच नाही तर इतर अनेक संबंधित लोकांसाठी चांगल्या उत्पन्नाचं साधन आहे. एका टी-२० सामन्यासाठी थेट प्रक्षेपण करणारे विविध कॅमेरामन, संबंधित तंत्रज्ञ, स्टेडियमच्या वेगवेगळ्या प्रवेशद्वारांवर असणारे पोलीस आणि खाजगी रक्षक, संयोजनातले इतर सपोर्ट स्टाफ, समालोचक अशांना या स्पर्धेद्वारे चांगला रोजगार मिळेल.

मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना अनुक्रमे गुजरात आणि मुंबई टीमने मेन्टॉर म्हणून नियुक्त केलंय. बंगलोर टीमने ग्रँड स्लॅम टेनिसपटू सानिया मिर्झा हिला मेन्टॉर म्हणून काम करण्याची संधी दिलीय.

तिची निवड अनेकांना आश्चर्यजनक वाटली मात्र सानिया ही केवळ टेनिसपटूंची नाही तर इतर उदयोन्मुख खेळाडूंसाठी देखील आदर्श खेळाडू मानली जाते. सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणार्‍या या खेळाडूने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत रोहन बोपण्णाच्या साथीत मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं.

खेळाच्या दृष्टीने आपण प्रौढ असलो तरी जिद्द, आत्मविश्वास इत्यादी गुणांच्या दृष्टीने आपण युवा खेळाडूंइतकेच अव्वल दर्जाचे आहोत हे या जोडीने दाखवून दिलं होतं. त्यामुळेच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यामधे जिंकण्याची ईर्षा निर्माण करण्याची जबाबदारी सानिया सहजपणे पार करील अशी आशा आहे.

लोकसहभाग वाढवायला हवा

आयपीएलच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण अनेक वाहिन्यांवर केलं जात असलं तरीही प्रत्यक्ष उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच की काय आयपीएलच्या सामन्यांनाही ‘हाऊसफुल’ प्रतिसाद असतो. या पार्श्वभूमीवर महिला प्रीमियर लीगला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे कारण महिलांच्या सामन्यांना प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद असतो.

अर्थात १९ वर्षाखालची विश्वविजेती भारतीय टीम मायदेशी परतल्यानंतर या टीममधल्या खेळाडूंचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे जो भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रेक्षकांची उपस्थिती अतिशय लक्षणीय होती. आता तसाच प्रतिसाद महिला प्रीमिअर लीगला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे.

फार पूर्वी पुण्यामधे महिलांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघटकांनी प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळावा म्हणून अनेक शाळांमधे या सामन्याचे मोफत पास दिले होते. त्यांचा हेतू साध्य झाला. कारण या आंतरराष्ट्रीय सामन्यास नेहरू स्टेडियमवर मोठ्या संख्येने लहान मुलामुलींची उपस्थिती होती.

महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढवायची असेल तर मुंबईमधे होणार्‍या महिला प्रीमियर लीगच्या सामन्यांसाठी असाच उपक्रम राबवला पाहिजे. मुळात ही स्पर्धा ज्या काळामधे होईल त्याच काळात शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षांचा मोसम असतो. हे लक्षात घेतलं तर प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी आगळे वेगळे उपक्रम करण्याची गरज आहे.

महिला प्रीमियर लीग ही स्पर्धा भारताच्या युवा खेळाडूंसाठी निश्चितच कौशल्य दाखवण्याचं हुकमी व्यासपीठ असेल. त्याचा फायदा चांगल्या रीतीने घेत भारतीय टीमची दारे कशी ठोठवता येईल असा प्रयत्न युवा खेळाडूंनी दाखविला पाहिजे तरच ही स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू सफल होईल.

हेही वाचा: 

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

त्यांच्या वर्णद्वेषाचा धिक्कार, आपल्या वर्णद्वेषाचा उदो उदो

मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील

फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?

(लेख दैनिक पुढारीतून साभार)