या बायांमुळे मला रंडुलेपणाची लाज वाटत नाही

०९ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आता वयाच्या चाळीशीत मला माझ्यात उरलेल्या ‘रंडुले’पणाची अजिबात लाज वाटत नाही. आणि त्यात कमीपणा असतोय असंसुद्धा अजिबात वाटत नाही. कारण एकच, मी याची डोळी याची देही पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या बाया. त्या बाया आठवतात तेव्हा एक जिवंत प्रश्न पडतो की या तर अशा मग कमी कशा? महिला दिन विशेष.

मला लहानपणी रंडुलं म्हणायचे. त्यांच्या मते त्याला कारणं बक्कळ होती. माझ्या डोळ्याला पाणी खूप यायचं. सिनेमा बघताना, गाणी ऐकताना, शिव्या खातानाच नाही तर देतानासुद्धा यायचं. घरात कुणीही कुणाला ओरडो माझ्या डोळ्यात पाणी यायचं. कुणाला खुपलं, कुणाला लागलं, कुणी आजारी पडलं तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं.

मागे कधी काय झालं असेल त्या गोष्टी मनात उकरून आल्या तरी माझ्या डोळ्याला गंगा जमुना. डोळ्यातली पाणी पातळी खालावलीय आता पण पाणी आजही टिकून आहे.

थोडक्यात मऊ मनाचा होतो आणि अशा लोकांना पुरुषी जमातवाल्याकडून ‘रंडुलं’ म्हणजे बायकासारखं म्हणून खिजवलं जायचं. तेव्हा वय लहान होतं. समज कमी होती. त्यामुळं बायकासारखं म्हटलं की लाज वाटायची. त्यामुळं वाईट वाटलं डोळ्याला पाणी आलं तरी ते लपवायची सवय लागली. अन् मर्द बनायच्या कोशिशीत मनाला कोडगं करत नेण्याची प्रक्रिया घडली किंवा घडवली गेली.

हा प्रकार तसा भारतभर कॉमनच. पण काही ‘ढ’ निपजतेतच तसाच मी ‘ढ’ विद्यार्थी निघालो. फुल्ल कोडगा म्हणजे 'मर्द को दर्द नही समझतावाला’ माचोमॅन होणं काई मला जमलं नाही. किंवा माझ्या आजूबाजूला असलेल्या मर्द कार्यकर्त्यांना मला तसं घडवता आलं नाही. आसल ते असो. पण आता वयाच्या चाळीशीत मला माझ्यात उरलेल्या ‘रंडुले’पणाची अजिबात लाज वाटत नाही. आणि त्यात कमीपणा असतोय असंसुद्धा अजिबात वाटत नाही. कारण एकच, मी याची डोळी याची देही पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या बाया. त्या बाया आठवतात तेव्हा एक जिवंत प्रश्न पडतो की या तर अशा मग कमी कशा?

माझी मोठ्याई जानकाबाई उदगीरला शिकायला राहायलेल्या तिच्या लेकरायच्या तोंडात पोटभर कूटका पडावा म्हणून पहाटे चारला गावात येणाऱ्या रेल्वेने डब्बा देण्यासाठी दोनअडीच वाजता उठून पायलीभर दाणे जात्यावर दळायची. तेवढ्याच्या भाकरी बडवायची आणि पाठवायची. बाकी घरात पुरुषाची मेजॉरिटी असल्याने तिला एकटीलाच  रोजची कामं जशी चौसोपी वाडा होता त्याचं सडासारवण, घरात असलेल्या पोरांचा सैपाक, भांडे, धुणं अशी सतरा कामं जोडीला.

आणि हो तिनं तिच्या नवऱ्याला 'मालक' म्हणायची आणि या मालकानी अख्ख्या आयुष्यात कधी तिला किंमत म्हणून दिली नाही. म्हणे जमानाच तसा होता. मोठ्याई सांगायची की तिचे मालक लहानगेपणी बेमारीच्या गड्ड्यापासून का देवीपासून वाचावा म्हणून तिच्या सासूने म्हणजे माझ्या पणजीने नवस बोलला. म्हणे की, 'रोज पाच जोड्याने मारू दे पण माझा ल्योक जगू दे.'

ल्योक जगला अन् ही त्याची म्हातारी मरेपर्यंत त्याच्याकडून पाच जोडे आपल्या सवळ्या डोक्यावर मारून घ्यायची म्हणे. फक्त पोटचं लेकरू नीट राहावं म्हणून. ही  लेकरासाठी जोडे खाणारी म्हातारी तर हिचीच नणंद भागीरथीबाई म्हणजे माझ्या आईच्या बापाची आई. हिला म्हणे लेकरू होत नव्हतं. वंशाला दिवा म्हणून पाहिजे हिनं  स्वतःच्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं.

आणि त्या सवतीला लेकरू होण्याआधी हिलाच लेकरू झालं. पहिला ल्योक झाला दुसरी लेक झाली. आणि बहिणीसारखं नांदवत असणाऱ्या सवतीला माझा आज्जा झाला अन् बाळंतपणात आज्ज्याची सख्खी आई देवाघरी गेली. तर या सावत्र आईने भागीरथीबाईने स्वतःच्या पोरीचं पिणं तोडून या सवतीच्या लेकराला जपलं. यातच पटकीने तिचा नवरा गेला.

भावकीने आता एकटीच आधारहीन रांडमुंड म्हणून प्रॉपर्टीसाठी त्रास द्यायला सुरवात केली. तेव्हा माझ्या पोटच्या लेकरायचा हिस्सा कुणा दुसऱ्याच्या पदरात जाऊ देणार नाही म्हणून या सवळ्या भागीरथी माईने एकटीने भावकीशी धैर्याने जोडाजोडी केली. लेकरं पाठीपोटाला बांधून घोड्यावर बसून ही माय निलंग्याच्या कोर्टात या भावकीवर दावा लावायला जायची म्हणे.

सावत्र आईला स्टिरिओटाईप विलन करून दाखवणाऱ्या आमच्या काळात मला पोटच्या लेकराइतकाच सावत्र पोराला जीव लावणारी भागीरथीमाय स्टिरिओ टाईप मोडून काढणारी वाटायची.

माझे बाबा वकील होते. त्यांच्याकडे घटस्पोटाच्या केसेस याच्या. त्यात नवऱ्यावर दावा लावणाऱ्या एकदोन बाया आजूबाजूला असणाऱ्या स्टिरिओ टाईपला सुरुंग लावणाऱ्याच होत्या. मला एकीकडे माझ्या सोयऱ्यात ढीगभर शिकल्यासवरल्या असूनसुद्धा नवऱ्याचा सासरचा बेदम छळ सहन करणाऱ्या, रडणाऱ्या 'बंदिनी'टाईप लेकी अन् त्यांना माय तुझं नशीब गं म्हणून समजावणाऱ्या त्यांच्या सक्ख्या आया दिसायच्या, ऐकू यायच्या.

अन् दुसरीकडे आमच्या बाबाकडे आलेली एखादीच 'तो लय घाण हाय. लय इजळका हाय. आपण राह्यनाव असल्याबरा' असं ठरवून घटस्फोट घेऊन. हक्काची पोटगी घेऊन.  स्वतःचं आवडणाऱ्या पुरुषाबरबर दुसरं लग्न करणारी दामिनीटाईप्स बायनी दिसायची. शाळेत नोकरी करणाऱ्या कित्तेक शिकल्या बाया मी पाहिल्यात ज्यांची त्यांच्या पगाराच्या छदामावर सत्ता नाही. त्यांचा 'मालकछाप' नवरा त्यांना पैशा पैशाला तरसावतो अन् या तरसतात.

आणि अशा बंदिन्यांमधे एखाद एखाद दामिनीबाई अशी पण पहिली जिणं हक्काने आपलं जे आहे ते डंके की चोट पे वाजवून मोजून घेतलं अन् थोडं जास्तच घेतलं. अशी सबला उदाहरणं फार तुरळक पण पाहिलंय नक्की.

रंडुलं, बायकावनी नाजुकीचं काम, बांगडीवाला नाजूक हात, बाईसारखं कमजोर, बायल्या  असं घरच्या गड्यामंडळींकडून ऐकत अन् ऐकलेलं कधीमधी पोपटावनी बोलत असताना मला माझ्या आईच्या, आजीच्या, चुलतीच्या हातावर, पायाच्या घोट्यावर घट्टे दिसायचे. कायाय वल्या तुराटीच्या चुलीपुढे बसून आख्या घराबाराची खादगी पुरी पाडणं मामुली काम नसायचंच अन् नाजुकीचं तर नाहीच नाही.

असल्या घरच्या आयाबाया 'माय माझं लेकरू म्हणून' तोंडावरून नुसता हात फिरवल्या की तोंडाला मायेबरबर त्यांच्या पुरुषांनी नाजूक कमजोर ठरवलेल्या हाताची मजबूत खरबर जाणवायची. बुडाला गेलेल्या आडाचं पाणी शेंदून हौदं भरल्यानं. नायतर चुलीला पोतेरं नाहीतर भांड्याला माती लावल्यानं हाताला घट्टे पडल्यानं तसं वाटत असंल अन् मी माझ्या आजूबाजूच्या दोस्तायच्या घरातली माझ्या काकवा, मावश्या पुरुषाच्या डबल शेतात काम करताना पाहिलंय तरी त्या नाजूक?

मला कळतंय तसं बघितलंय की सणावाराला आमच्या घरच्या बायाला कधीच गरम म्हणून कुटका मिळालनी अन् त्याच्याबद्दल कधी आमच्या घरच्या पुरषायला कधीच काय वाटायलानी. यात काही वाटून घ्यायचं असतंय याचं कधी ट्रेनिंगच त्यांना मिळायनी अन त्यामुळं त्यांनी ते कधी आम्हाला बी शिकवलनी. पोरींनी कसं वागावं. पोरगी काचेचं भांडं. पोरी म्हणजे चिखलाच्या टिऱ्या. पोरीची जात. बाईची मर्यादा याच गोष्टी मी ऐकलो अन् पोपटासारखं घोकलोसुद्धा.

माझ्या पाहण्यात लय बाया आल्या. ज्यांनी निव्वळ येड्या नालायक धचोट टाइप माणसाबरोबर संसार केला अन् करत असताना आधार व्हावं अशा लोकांकडून फक्त 'तुझं नशीबच असं'चं गरळ ऐकलं अन् पचवलं. कोरड्याठण डोळ्यानं संसार रेटणाऱ्या बाया पाह्यल्या. त्रासाला छळाला कंटाळून आड जवळ करणाऱ्या अबला पाह्यल्या. नालायक नवरा म्हणून सरळ त्याला टाकून मानानं जगू पाहणाऱ्या सबला पायल्यात. आत्ताही बघतोय.

आमच्याकडं एक म्हणाय 'करतंय त्येनंच रडतंय.' कारण करायला काय लागतंय? किती लागतंय? काय जळतंय? प्रत्यक्ष करणाऱ्यालाच कळू शकतंय.

माझी आजी मला आज्यापेक्षा जास्त कर्तबगार वाटतीय. कारण तिचं करणं धडपडणं मी ऐकलंय पाहिलंय. आईच्याही बाबतीत माझं मत सेम आहे. अन् बायकोच्या बद्दल सुद्धा. जर सेन्सिबल असणं रंडुलेपणाचं, बायकासारखं असल्याचं लक्षण असेल तर मला अभिमान नाही गर्व वाटेल स्वतःला बायकासारखं म्हणवून घ्यायचा. 

(चित्रः सुनील यावलीकर.)