हिंसेला नकार देणारं विल स्मिथचं माफीपत्र नेमकं काय सांगतं?

३० मार्च २०२२

वाचन वेळ : २ मिनिटं


२०२२च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावेळी एक वेगळीच घटना घडली. विल स्मिथ या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने क्रिस रॉक या कॉमेडियनच्या थोबाडीत लगावली. क्रिस यांनी स्मिथ यांची पत्नी जेडा पिंकेट यांच्या संदर्भात विनोद केला होता. स्मिथ यांनी लगोलग माफीही मागितली. त्यांचं छोटंसं माफीपत्र लक्षवेधक आहे. त्या पत्राचा अनुवाद केलेली श्रीरंजन आवटे यांची ही फेसबुक पोस्ट.

अमेरिकेच्या लॉस एंजलिस इथं २०२२चा ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगला होता. ऑस्कर म्हटलं की, उत्सुकता असते. तशीच उत्सुकता यावेळीही होती. पण एका वेगळ्याच आणि अचानक घडलेल्या घटनेनं यावेळचा पुरस्कार सोहळा जगभर चर्चेत राहिला.

विल स्मिथ हे हॉलिवूडमधले सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. ऑस्कर विजेत्या ठरलेल्या या अभिनेत्याने पुरस्कार सोहळ्यादरम्यान क्रिस रॉक या अमेरिकन कॉमेडियनच्या थोबाडीत लगावली. क्रिस हे २०२२च्या ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कारावेळी सूत्रसंचालन करत होते.

विल स्मिथच्या पत्नी जेडाला ऑटोइम्युन आजार झालाय. या आजारात डोक्यावरचे केस जातात. क्रिसने यावेळी जेडाच्या आखूड केसांच्या संदर्भाने विनोद केला होता. तो विनोद ऐकून सहन न झाल्यामुळे विल स्मिथने थप्पड लगावली. नंतर भावनिक होऊन माफीही मागितली आहे.

नरसंहार करूनही गेंड्याच्या कातडीचे असलेले आणि माफीचा लवलेशही नसलेले लोक पहात असताना विल स्मिथची माफी मागण्याची कृती महत्वाची आहे. त्यानं शेअर केलेलं छोटंसं माफीपत्रही तितकंच लक्षवेधक आहे. हे माफीपत्र म्हणजे माणूस असण्याचं, सहृदयी असण्याचं देखणं लक्षण आहे. त्या पत्राचा अनुवाद केलेली श्रीरंजन आवटे यांची ही फेसबुक पोस्ट.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

विल स्मिथचं पत्र:

हिंसा कुठल्याही स्वरूपात विषारी आणि विनाशकारी असते. काल ॲकॅडमी पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमातलं माझं वर्तन अक्षम्य स्वरूपाचं होतं. माझ्यावर केले गेलेले विनोद हा माझ्यासाठी नेहमीचा भाग आहे; पण जाडाच्या आजारपणावरुन केलेला विनोद मला सहन झाला नाही आणि मी भावनिक आवेगात प्रतिक्रिया दिली. 

क्रिस, मी तुझी सार्वजनिकरित्या माफी मागू इच्छितो. मी मर्यादा ओलांडली आणि ही माझी चूक होती. मी खजील झालो आहे, अशा प्रकारचा माणूस मला बनायचं नाही. प्रेम आणि सौहार्द्राच्या या सुंदर जगात हिंसेला स्थान नाही. 

मला ॲकॅडमीची, शोच्या निर्मात्यांची, उपस्थितांची आणि जगभरातून पाहणा-या सर्वांचीच माफी मागायची आहे. मला विल्यमच्या कुटुंबाची आणि किंग रिचर्डच्या फॅमिलीचीही माफी मागायची आहे. आपल्या देदीप्यमान प्रवासाच्या आलेखावर हा कलंक माझ्यामुळे लागला याचा मला पश्चाताप होतोय. 

माझा माणूस म्हणून घडण्याचा प्रवास सुरुच आहे!

तुमचाच,
विल स्मिथ

हेही वाचा:

ऑस्करच्या आयचा घो!

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका