आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय.
गुजराती मतदारांना जवळ आणण्यासाठी शिवसेनच्या काही नेत्यांनी पत्रक काढलं. ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ असं त्यात लिहिलं होतं. शिवसेना गुजराती मतदारांना आत्तापासूनच आपलंसं करतेय अशी राजकीय कुजबुज सुरू झाली.
तसं फाफडा असो, ढोकळा असो, खमण असो किंवा कच्छी पद्धतीची बाकरवडी असो कच्छी दुकानदारांनी हे पदार्थ कधीचेच मराठी घराघरांमधे पोचवलेत. तसंच मराठी आणि गुजराती संबंध हे फक्त बहुभाषिक मुंबईचा आविष्कार इतके तोकडे नाहीत. त्याला राजकारणाच्या पलिकडे आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक अशी किनार आहे.
तशी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्ये ब्रिटिश काळात मुंबई इलाका किंवा बॉम्बे प्रेसिडन्सीत एकत्रच नांदत होती. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. म्हणजे एक गुजरातीच. त्यांनी शांततेत विरोध करणाऱ्या विरोधकांवर गोळीबार करायला लावला. १०५ हुतात्म्याचं रक्त स्वत:ला गांधीवादी म्हणवणाऱ्या मोरारजी देसाईंच्या हाताला लागलं.
तेव्हाच्या मराठा वर्तमानपत्रात संपादक आचार्य अत्रेंनी हेडलाईन दिली होती, ‘मराठी आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या नराधम मोऱ्याची बोटं सडो आणि त्याला कुष्ठरोग होवो.‘ ही घटना अधिक ठळकपणे आठवते. कारण माझे आजोबा गोविंद वैद्य हे अत्र्यांकडे अकाऊटंट होते.
ही हेडलाईन आल्यावर पेपरावर सरकारने जप्ती आणली. आमच्या दादरच्या घरातल्या माळ्यावर पेपर लपवला गेला. कारण भीती होती की मराठ्याच्या स्टाफवर पोलीस कारवाई करू शकतील.
हेही वाचा : शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही
मोरारजी देसाईंचं नाव म्हणूनच आजही मुंबईत कुठेच दिसत नाही. परंतु हा राग तेव्हा आणि नंतरही वैयक्तिकरित्या गुजरात्यांवर कधीच काढला गेला नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या अग्रणी तारा रेड्डी एकदा मला म्हणाल्या होत्या की, आम्ही तेव्हा या लढ्यात एवढ्या हिरिरीने सहभाग घेतला होता की इथं जसा आंदोलकांनी महाराष्ट्रासाठी सत्याग्रह केला तसाच आम्ही महागुजरात व्हावा यासाठीही सत्याग्रह केला होता आणि तुरुंगवासही भोगला होता.
यामुळे एक गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते. सगळे गुजराती व्यापारी आणि सगळे मराठी मध्यमवर्गीय असं कुठलं सरळसोट समीकरण नाही. प्रमुख उद्यम आणि व्यापार केंद्र असल्यामुळे अनेक वैष्णव गुजराती मुंबईत रहात असतील आणि राहिले असतील. पण त्याचबरोबर मुंबई इलाक्याची राजधानी असल्यापासून मध्यम आणि गरीब वर्गातलेही अनेक गुजराती या शहरात राहतात. त्यामुळे एक मोरारजींच्या विषयीची टोकाची भावना सोडली तर गुजराती आणि मराठी लोकांमधे वैयक्तिक पातळीवर फारशी भांडणं नाहीत.
तसं बघायला गेलं तर हे मान्य करावं लागेल की व्यापारी म्हणून का होईना गुजराती लोकांनी मराठी शिकण्याची आणि बोलण्याची इच्छा सतत दाखवली. मुंबईत छोट्या धंद्यामधे सरशी मिळवण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. पण एक असा वर्ग गुजराती समाजात होता आणि आहे जो सतत मराठी लोकांना नोकरपेशे, धंद्यात न पडणारे, कायम राजकारणात रस घेणारे, असं समजतो. हे समजणं तिथंच थांबत नाही. ते कधी कधी धंद्यातल्या यशामुळे शहरातल्या कामगारवर्गीय मराठी वर्गाला हीनभावना देण्यातही परावर्तित होतं.
एका पक्षाच्या एका दिवंगत अभिनेत्रीने सत्तरच्या दशकात मुंबई मराठ्यांची आणि भांडी घासा गुजरात्यांची अशा स्वरुपाचं विधान केलं होतं. तेव्हा केवढा गहजब झाला होता! नंतर त्या अभिनेत्रीला मुंबईकरांची माफी मागावी लागली होती. मराठी आणि गुजराती लोकांमधे वैयक्तिक भांडणं आणि वितंडवाद असा काहीच नाही. पण आर्थिक वर्चस्ववाद आणि हीनतावादाची किनार येते तेव्हा नक्कीच संबंध तापले आणि ताणले जातात.
हेही वाचा : 'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?
मुंबईतला बहुसंख्य मराठीवर्ग हा कोकणातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला आहे. बहुसंख्य लोक मांसाहारी आहेत. पण नव्वदच्या दशकानंतर गुजराती आणि मारवाडी समाजामधे महागडी घरं विकत घेण्याची कुवत असल्यामुळे शाकाहारी समुदायांची मागणी जोर पकडू लागली.
मी स्वत: २००५ च्या आसपास हायमा देशपांडे यांच्या एक्सप्रेसमधल्या बातमीनंतर खामकर मसालेवाल्यांची मुलाखत घेतली होती. झालं होतंअसं की चार पिढ्या मसाले विकणाऱ्या या मराठी उद्योजकाला मांसाहारी असल्यामुळे फ्लॅट नाकारला गेला. मलबार हिल इथं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं निवासस्थान आहे. तिथे हॉटेलांमधला मांसाहार तिथल्या गुजराती-मारवाड्यानी बंद केला ही वस्तुस्थिती आहे.
माटुंग्यामधे एक प्रथितयश चायनीज चेनच्या हॉटेलला फक्त शाकाहारी जेवण द्यावं लागतं. पैसा आणि नवीन टॉवरमधे घरांच्या जोरावर मुंबईत शाकाहारी फॅसिझम राबवल्यामुळे दोन समुदायातल्या सौख्यपूर्ण संबंधांना कायम गालबोट लागत राहिलंय.
एवढं सगळं असताना डीएनएमधे मराठीपणा असणारी शिवसेना आज शहरातल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं का फेकतेय याचं उत्तर सोपंय. या समाजाचा मुंबई वाढत असलेला प्रभाव.
महानगरपालिकेतल्या किमान ४० ४५ जागांवर गुजराती सरळ प्रभाव टाकतात. भाजपबरोबर युती असताना या जागा जिंकण्याची चिंता सेनेला कधी भेडसावली नाही. पण महाविकास आघाडीत गेल्यावर या मतांची रुखरुख नक्कीच पक्षाला लागून राहिली असणार.
आघाडीतले सगळे घटक पक्ष सतत प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री शहा यांना लक्ष्य करत आलेत. मोदींनी आपल्या स्वकेंद्री आणि एकछत्री अमलाखाली मुंबईला कसं ठेंगणं दाखवायचा प्रयत्न केलाय असे आरोप कायम भाजपवर करण्यात आलेत.
हेही वाचा : संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
आंतराष्ट्रीय उद्योग केंद्र मुंबईतून गुजरातमधे हलवलं. बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला फारसा लाभ नसताना आर्थिक संकटात असलेल्या राज्याच्या माथी मारला. मेट्रो कारशेडच्या कांजुरमार्गातल्या जमिनीसाठी राज्य सरकारला तंगवत ठेवलं. महाराष्ट्राच्या हिश्श्याचे जीएसटीचे २२,००० कोटी रुपये दिले नाहीत. जगातल्या कुठल्याही राष्ट्रप्रमुखाला मुंबईत न आणता गुजरातेत नेलं, असे अनेक आरोप.
या विषयांवर विरोधी पक्ष कायमच आक्रमक राहिलाय. हे आरोप गुजराती नेत्यांवर केलेत. पण आपली प्रचारयंत्रणा सुप्त आणि प्रकट पद्धतीने वापरुन असा समज केला जाऊ शकतो की सध्याचं उद्धव ठाकरे सरकार हे गुजरातीविरोधी आहे. त्यामुळे आपला मोदी आणि शाहविरोध हा गुजराती लोकांचा विरोध नाही हे दाखवणं ही शिवसेनेची राजकीय गरज होऊन बसलीय.
अनेक मराठी बहुल इलाक्यामधे टावर उभे राहिलेत आणि त्यामधे नवश्रीमंत मराठी वर्गाबरोबरच अनेक गुजराती लोकांनी घरं घेतलीयत. त्यामुळे मुंबईत असे ही अनेक मतदारसंघ आहेत जिथे जिंकण्याचा फरक कमी असल्यास ही काही शेकडा मतंही हारजीत ठरवू शकतात.
एक, लोकसभेच्या वेळचा आकडा खूप बोलका आहे. ६० टक्के इतकी सर्वाधिक मतदानाची टक्केवारी गुजराती बहुल मुंबई उत्तर या मतदारसंघात होती. हीच टक्केवारी सर्वात कमी मराठी लोक बऱ्यापैकी असणाऱ्या दक्षिण मुंबईत ५१.४ टक्के इतकी होती. सर्वात जास्त मतदान बोरिवली विधानसभेतून ६६.२ टक्के इतकं झालं होतं. तेच कुलाबा मतदारसंघात सर्वात कमी ४५.२ इतकं झालेलं. या आकड्याने स्पष्ट होतं की मोदींचं गारुड या व्यापाराभिमुख समाजावर एवढं आहे की एकगठ्ठा मतदान करायला तो हिरिरीने पुढे आला होता.
बरं, मुंबईतला गुजराती लोकांची मतदानाचा कल आणि गुजरातमधल्या गुजराती मतदारांचा कल यामधे फरक आहे. गुजरातची निवडणूक जिंकायला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त दहा जागा काँग्रेस कमी पडल्या होत्या, हे लक्षात घ्यायला हवं. एवढं यश तिथं तुमचा मतदार असल्याशिवाय नाही कमवता येत.
इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबईत गुजराती समाजाला आपल्या जवळ करायला कमी पडले असंच म्हणावं लागेल. मोरारजींनंतरही बीएल देसाई असू दे, मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते राहिलेले गुणवंत शहा असू दे, बीएल देसाईंची कन्या सुसीबेन शहा असू दे किंवा राष्ट्रवादीमधून शिवसेनेत गेलेले हेमराज शहा असू दे, अशा नेत्यानंतर जाणीवपूर्वक या समाजाला नेतृत्व देण्याचा प्रयत्न खुंटला. म्हणूनच काँग्रेसचा एक मोठा मतदार गुजरातमधे असूनही मुंबईतला मतदार मोदींची माळ जपण्यातच धन्यता मानतोय.
वरळीत ‘केम छो वरळी’चे बॅनर आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीत लावण्यापासून सुरू झालेली गुजराती प्रेमाची ही सुरवात आता ‘आपडा उद्धव ठाकरे’पर्यंत येऊन स्थिरावलीय. या शहरात मराठी लोकांच्या खांद्याशी गुजराती समाज हा गुण्यागोविंद्याने राहिलाय.
पुन्हा, कोणताही समाज हा एका पक्षाची जहागिरी कधीच नसतो. या तर्काने शिवेसेनेच्या या पावलाचं स्वागत करायला हवं. या पावलाचं आणि प्रयोगाचं राजकीय यश या समाजाचे मतदान आपल्याकडे फिरवण्यात येणाऱ्या यशानेच मोजलं जाईल.
हेही वाचा :
उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत
आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे
बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती
(लेखक हे राजकीय विश्लेषक आणि केवीकॉमचे संस्थापक आहेत.)