देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय. यावेळी पेशंटमधे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांचाही समावेश आहे. लसीचे डोस घेतलेल्यांना कोविडची लागण ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतेय. त्यामुळेच लस घेऊनही कोरोना होत असेल तर लस घ्यायचीच कशाला असी मानसिकता तयार होताना दिसतेय. या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे.
सध्या भारतात कोरोना वायरसवरच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढतेय. त्याचबरोबर लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोविड होत असल्याच्या बातम्याही येतायत. त्यामुळे अर्थातच संभ्रमाची स्थिती निर्माण झालीय. लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोविड होत असेल तर मग लस घ्यायचीच कशाला, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय.
या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे. दुर्दैवाने मागच्या वेळेसारखीच लोकांमधे लस न घेण्याची मानसिकता तयार होतेय. या पार्श्वभूमीवर नक्की दोन्ही डोस घेऊनसुद्धा कोविड का होतोय, याच्या खोलात जाऊन पाहण्याची गरज आहे.
आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार केला तर असं दिसून येतं की, लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोविडचा संसर्ग झालेल्या पेशंटमधे आजाराची गंभीर लक्षणं निर्माण झाली नाहीत. हॉस्पिटलमधे दाखल करण्याची तर बिलकुल गरज पडली नाही.
पण केरळ आणि महाराष्ट्रातल्या एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्या काही पेशंटना हॉस्पिटलात दाखल करण्याची गरज पडतेय. असं कशामुळे होतंय हा प्रश्न सर्वांना कोड्यात टाकतोय. यामागची काही कारणं समजून घेऊयात. पहिलं म्हणजे लसींची परिणामकारकता. जगातल्या वेगवेगळ्या लसी लसीकरणासाठी प्रमाणित केल्या गेल्या तेव्हा सगळ्याच कंपन्यांनी त्यांची परिणामकारकता जाहीर केली होती.
भारतात सध्या वितरित असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठानं शोधलेल्या कोविशिल्डच्या दोन्ही डोसनंतरची परिणामकारकता ही सुमारे ६५ ते ७० टक्क्यांच्या आसपास आहे. तर रशियन स्पुटनिक-वीची परिणामकारकता ही ९० टक्क्यांच्या आसपास आहे. तिसर्या कोवॅक्सिन लसीची नक्की परिणामकारकता अजून समजलेली नाही. याचाच अर्थ असा होतो की १०० लोकांनी जर कोविशिल्ड लस घेतली तर ७० लोकांना कोविड होणार नाही. तेच प्रमाण स्पुटनिक-वीसाठी ९० असेल.
म्हणजेच कोविशिल्ड लस घेतली तर ३० लोकांना कोविड आणि स्पुटनिक-वी लस घेतली तर १० लोकांना कोविड होण्याची शक्यता आहे. पण, लस घेऊनही या लोकांना कोविड झाला तरी त्यांना वर सांगितल्याप्रमाणे कोविडची गंभीर लक्षणं निर्माण होणार नाहीत आणि त्यांना हॉस्पिटलात दाखल करण्याची गरज पडत नाही.
हेही वाचा : लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?
दुसरं कारण म्हणजे कोरोना वायरसचे येणारे नवनवीन स्ट्रेन्स. आतापर्यंत मूळ वायरसचे पाचपेक्षा अधिक स्ट्रेन्स जगभरात कोविडचा हाहाकार घालताना दिसून आलेत. आता दिल्या जाणार्या सगळ्याच लसी या मार्च-एप्रिल २०२० मधे विकसित करण्यात आल्यात आणि या सर्वच लसी कोरोनाच्या मूळ स्ट्रेन्सवर प्रभावी ठरतील अशा प्रकारे विकसित केल्यात. दुर्दैवाने कोरोनाचे नवीन स्ट्रेन्स अतिशय वेगाने निर्माण झाले.
याचबरोबर काही नवीन वेरियंट आता लसीमुळे तयार होणार्या अँटिबॉडीजपासून स्वतःला वाचवू शकतायत किंवा लसीमुळे तयार झालेल्या प्रतिकारशक्तीला फसवत आहेत, असं सांगणारेही काही अहवाल समोर आलेत. काही लोकांना दोन्ही डोस घेऊनही पुन्हा कोविड होतोय. यामागे नवीन तयार झालेले स्ट्रेन्स किंवा वेरियंटही तेवढेच कारणीभूत आहेत का याचा मात्र अभ्यास अजून समोर आला नाही.
याचबरोबर वायरसच्या बदललेल्या प्रकाराविरुद्ध नवी लस तयार करावी लागेल, असाही एक मतप्रवाह आहे. सध्या तरी सगळ्याच कंपन्या या शक्यता फेटाळून लावतायत. त्याचबरोबर म्हाताऱ्यांना लसीचा तिसरा डोस द्यावा का, याच्याही शक्यता पडताळून पाहिल्या जातायत. किंवा दोन वेगवेगळ्या कंपनींच्या लसी देऊन यावर उपाय शोधता येईल याबाबतही संशोधनपर चाचपणी सुरूय.
लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोविड होण्याचा प्रकार फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात दिसून येतोय. इंग्लंडमधल्या इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडनच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दोन्ही डोस घेतल्यावर कोविड होण्याचं प्रमाण ०.२ टक्के एवढे आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या १००० लोकांपैकी फक्त २० लोकांना पुन्हा कोविड होतोय. तर १००० लोकांपैकी फक्त एका व्यक्तीला हॉस्पिटलमधे दाखल करावं लागतंय.
असाच एक अहवाल ऑस्ट्रेलिया देशातून आलाय. त्यात असं दिसून आलंय की, ८० वर्षांवरील व्यक्तीने लसीचा एकही डोस घेतला नाही आणि त्याला कोविड झाला तर त्याला हॉस्पिटलमधे दाखल करण्याची शक्यता ९९ टक्के आहे, तर त्यांच्या मृत्यूचं प्रमाण ३२ टक्के एवढंय ७० वर्षांखालील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण १४ टक्के, ६० वर्षांखालील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण ३ टक्के आणि ५० वर्षांखालील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण फक्त १ टक्के एवढेच आहे. याउलट जर ८० वर्षांवरील व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे १ टक्क्यापेक्षा कमी आहे आणि तरुण लोकांच्यात तर हे शून्यच आहे.
हेही वाचा : आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो? ही सवय कशी मोडायची?
जगभरात अजून एक सर्वसामान्य स्थिती दिसून आलीय. ती म्हणजे लस ही काही १०० टक्के कोविड रोखणारा उपाय नसून त्याच्याबरोबर इतर उपायही करावे लागतायत. मुळातच लस ही एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीला वायरसविरुद्ध अँटिबॉडीज तयार करण्यासाठी उत्तेजित करतात. या अँटिबॉडीज लसीसाठी विषाणू किंवा रोगजनकांच्या विरुद्ध असतात आणि शरीराला संसर्ग होण्याआधीच लढा देण्यास आणि गंभीर रोग रोखण्यास कारणीभूत ठरतात.
काही लोकांमधे लसीला पुरेशी प्रतिकारशक्ती नसेल आणि वायरसच्या संपर्कात आल्यास अजूनही कोविडची लागण होण्याची शक्यता दिसून येतेय. एखादी व्यक्ती लसीला कसा प्रतिसाद देते यावर अनेक वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होतो. यामधे त्या व्यक्तीचे वय, लिंग, औषधे, आहार, व्यायाम, आरोग्य आणि तणाव पातळी यांचा समावेश आहे.
भारतामधील शास्त्रीय अभ्यासातून तयार झालेली माहिती अजून समोर आली नाही. तरी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना कोविड होण्याचे प्रमाण कमी असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
सध्या अजून एका प्रश्नाची सर्वत्र चर्चा असून त्याचं उत्तर सापडणं अवघड झालंय. हा प्रश्न म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणाचं करायचं काय? ते कधी सुरू होणार? झालं तर कोणत्या वयोगटाला आधी मिळणार आणि ते नक्की किती दिवस चालणार? मुलांसाठी वेगळी लस तयार करावी लागणार का?
सध्या मोठ्या व्यक्तींना ज्या लस दिल्या जातायत त्याच लसींच्या क्लिनिकल ट्रायल्स ६ ते १२ या वयोगटातील मुलांवर चालूयत. पण नक्की कधीपर्यंत त्याची माहिती जाहीर केली जाईल, हे मात्र सांगता येत नाही. तसंच लहान मुलांसाठी नवीन लस विकसित करावी लागणार नाही. आहे त्याच लसी कमी-अधिक प्रमाणात मात्रा देऊन उपयोगी ठरतील.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांची प्रतिकारशक्ती अतिशय वेगाने विकसित होत असते. नैसर्गिक वातावरणात वाढणार्या मुलाला जन्मापासून त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत ४००० प्रकारच्या वेगवेगळ्या जीवजंतूंचा आक्रमणाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती ही तुलनेने मोठ्या व्यक्तींपेक्षा फारच मजबूत असते. त्यामुळेच संपूर्ण जगात लहान मुलांना कोविड होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.
हेही वाचा : कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
संपूर्ण इंग्लंडमधे फक्त एका लहान मुलाचा कोविडमुळे मृत्यू झाला. संपूर्ण ब्रिटनमधल्या सगळ्या शाळा गेले वर्षभर नियमितपणे सुरूयत. त्यामुळे लहान मुलांना अतिशय कमी वेळेत कोविडची लस देण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. जगात फक्त कॅनडामधेच फायजर या कंपनीची लस लहान मुलांना दिली जातेय. पण, या कंपनीने अशा प्रकारच्या क्लिनिकल ट्रायल केलेल्या नाही. त्यांच्या ट्रायल आत्ता सुरू आहेत. त्याची परिणामकारकता आणि मुलांवर होणारे इतर परिणाम याची माहिती अजून जाहीर केली नाही.
कॅनडा सरकारने मुलांना लस देण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला असून त्याची मात्रा मोठ्या व्यक्तींना दिल्या जाणार्या डोसइतकीच आहे. भारतातही अशा प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जातायत. पण, कोणत्याही क्लिनिकल ट्रायल्स न घेता किंवा त्यांचे परिणाम जाहीर न करता लहान मुलांचं लसीकरण सुरू केलं तर आणखीनच गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. जगभरातील परिस्थितीचा विचार केला असता असं दिसून येतं की लहान मुलांच्या लसीकरणाची गरज भासणार नाही.
हेही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?
ताप मोजणाऱ्या बंदुकीनं कोरोना वायरसवर अचूक निशाणा साधता येईल?
(लेखक लंडनमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधक आहेत.)