बँकेऐवजी पोस्टात एफडी करणं फायद्याचं का झालंय?

२६ जून २०२१

वाचन वेळ : ३ मिनिटं


बँकेचे व्याजदर हे सगळ्यात तळाला पोचलेत. त्यामुळे बँकेत फिक्स्ड डिपॉझिट पैसे गुंतवणं आता फायद्याचा सौदा राहिलेला नाही. पण व्याजदर घसरलेले असतानाही पोस्टाच्या फिक्स डिपॉझिटवरचं व्याज बँकेच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे आपण बँकेऐवजी पोस्टात एफडी केल्या तर ते जास्त फायद्याचं ठरेल.

बँकेचे व्याजदर हे वर्ष-दोन वर्षापूर्वीच्या बचत खात्याच्या व्याजदरावर आलेत. अशावेळी बँकेत एफडी फायदेशीर ठरत नसल्याचं चित्र आहे. तरीही काही मंडळी अजूनही आपले भांडवल बँकेतच ठेवतायत. पण त्यांना अपेक्षेप्रमाणे लाभ मिळत नाहीय. काही दिवसांपासून सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या अनेक बँकांनी एफडीवरच्या व्याजदरात बदल केलेत. या बदलानंतर बँकेत एफडी केल्यास गुंतवणूकदाराला कितपत फायदा मिळू शकतो, हे जाणून घेऊ. 

पोस्टाच्या एफडीचं वैशिष्ट्य

पोस्टात एफडी ठेवणार्‍या गुंतवणूकदारांना आता बँकेपेक्षा जास्त व्याज मिळतंय. पाच वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक केल्यास सध्या ६.७० टक्के व्याज दिलं जातंय. अर्थात एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी किमान व्याजदर ५.५ तर कमाल व्याज ६.७० टक्के आहे. पोस्टात एफडी सुरू करणं हे खूपच सोयीचे आणि सुलभ आहे.

कोणतीही व्यक्‍ती रोख, चेक किंवा ड्राफ्टच्या मदतीनं खातं सुरू करू शकते. अल्पवयीन मुलांसाठीही पोस्टात खातं सुरू करण्याची सुविधा आहे. याशिवाय जॉईंट अकाऊंटही काढता येतं. पोस्टात एफडीसाठी किमान एक हजार रुपये असणं गरजेचं आहे. तर कमाल पैसे ठेवण्यास कोणतीही मर्यादा नाही. पोस्टाच्या एफडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं वार्षिक व्याज खात्यात जमा केलं जातं. तर त्याची आकारणी तिमाहीच्या आधारावर केली जाते.

हेही वाचा : मृत्यूनंतर म्युच्युअल फंडमधल्या पैशांचं काय होतं?

सरकारी सुरक्षेची हमी

पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनेत ठेवण्यात येणार्‍या प्रत्येक पैशाला सरकारची सुरक्षा आणि हमी असते. त्यामुळे एरवी तुलनेने व्याजदर कमी असले तरी पोस्टातली गुंतवणूक सगळ्यात सुरक्षित मानली जाते. बँकेतल्या एफडीवरवर फक्त पाच लाखांपर्यंत हमी मिळते.

पोस्टात पैसे ठेवल्यानंतर गुंतवणूकदारांना आणखी एक संधी मिळते. ती म्हणजे संकटकाळात पैसा मुदतीच्या आधीही काढता येतो. पण त्यासाठी खातं सुरू करून किमान सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला पाहिजे. पोस्टातल्या एफडीवर इनकम टॅक्सची सवलत मिळते आणि कुणालाही नॉमिनी करता येतं.

बँकांचे व्याजदर किती?

बँकेत सध्या एफडीचे व्याजदर हे ५ ते ६ टक्क्यांच्या आसपास आहेत. एखादा व्यक्‍ती दहा लाखांची रक्‍कम पाच वर्षांसाठी ठेवत असेल, तर त्याला ५.२५ टक्के व्याज मिळेल. २००० च्या दशकात एफडीचे व्याजदर हे ९ टक्क्यांच्या आसपास होते. यावरून अनेक वर्षांपासून व्याजदरात घसरण होत असल्याचं आपल्याला लक्षात येईल. 

यानुसार एखादा व्यक्‍ती खासगी आयसीआयसीआय बँकेत दहा लाखांची एफडी पाच वर्षांसाठी करत असेल, तर त्याला ५.२५ टक्के दराने व्याज मिळेल. तर हीच एफडी अ‍ॅक्सिस बँकेत केली, तर त्याला ५.७५  टक्के मिळेल. अशा वेळी एफडी करणं हा फायद्याचा सौदा राहत नाही.

हेही वाचा : कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

पोस्ट की बँक?

या स्थितीला काही पर्याय आहे का? बँकेच्या व्याजदरापेक्षा अधिक व्याज देणार्‍या अन्य कोणत्या योजना आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. अशा वेळी  बँकेपेक्षा अधिक व्याज दर देणार्‍या योजनांची माहिती घेऊ.

पोस्टाप्रमाणेच बँकेच्या खातेधारांना विविध सुविधा मिळतात. मात्र बँकेतील प्रत्येक एफडी ही करमुक्‍त नसते. काही विशेष एफडींनाच करसंरक्षण देण्यात आलंय आणि त्याचा कालावधीही पाच वर्षांचा आहे. दुसरीकडे पोस्टातल्या सगळ्याच एफडींवर इनकम टॅक्समधून करसवलत दिलीय. खातेदार पोस्टाचा असो किंवा बँकेचा. त्याला सारख्याच सुविधा मिळतात. एकुणात बँकेत एफडी करायची की पोस्टात हा निर्णय शेवटी आपल्यावरच अवलंबून असेल.

हेही वाचा : 

तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस भारतात इन्वेस्टमेंट का करतोय?

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?

श्रीमंतांकडून जास्त टॅक्स घेण्याची सूचना अभिजीत बॅनर्जी का करतात?