कोरोना वायरसची लागण होण्याचा एक मार्ग म्हणजे आपले हात. कोरोनाची लागण टाळण्यासाठी चेहऱ्याला हात लावू नका असा सल्ला आपल्याला अनेकदा दिला जातोय. तरीही आपण हात लावायचं सोडत नाही. अनेकदा तर नकळतपणे लावतो. कारण आपण सवयीचे गुलाम झालोय. म्हणूनच ही सवय मोडण्याच्या काही टिप्सचं आपण पालन करायला हवं.
कोरोना वायरसची लागण होऊ नये यासाठी आपल्याकडे एक खास आणि सोपा मंत्र आहे. ‘घराबाहेर पडल्यावर स्वतःच्या किंवा दुसऱ्या चेहऱ्याला हात लावू नका!’ आपण एखाद्या वस्तूला किंवा जागेला हात लावला तर त्यावर कोविड १९ या साथरोगाचे वायरस म्हणजेच आपले लाडके कोरोना वायरस असू शकतात. त्या वस्तूवरचे वायरस हातावर येतात आणि तसाच हात आपण नाकाला, डोळ्यांना लावला की ते वायरस आपल्या शरीरात जायची शक्यता अधिक असते.
म्हणूनच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसकट सगळ्याच संस्था, सरकारं, तज्ञ लोक तोंडाला हात लावू नका, असा सल्ला देतायत. बड्या संस्थाच कशाला आता तर शेंबड्या पोरालाही हे माहीत झालंय. पण तरीही असं प्रत्यक्षात घडताना दिसत नाही. आपल्या तोंडाला, नाकाला आपला हात लागतोच. अनेकदा तर आपल्या नकळत ही गोष्ट घडत असते. यातून कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. म्हणूनच ही सवय मोडणं खूप गरजेचं आहे.
आपण माणसं दिवसातून अनेकवेळा आपल्या चेहऱ्याला हात लावत असतो. नाकाला खाज येते, डोळ्याला खाज येते, डोळ्यात घाण जाते, ओठ कोरडे पडतात असं काही कारण असलं म्हणजे आपण चेहऱ्याला हात लावतोय हे आपल्या लक्षात येतं. पण याशिवायही कितीवेळा आपण उगाचच चेहऱ्याला हात लावत असतो, असं शास्त्रज्ञ म्हणतात.
अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया युनिवर्सिटीतले मार्क निकास आणि डॅनिअल बेस्ट यांनी एका तासात एखादा माणूस किती वेळा चेहऱ्याला हात लावतो याबद्दल २००८मधे एक संशोधन केलं होतं. त्यासाठी हे दोघं ऑफिसमधे काम करणाऱ्या १० लोकांचं निरीक्षण करत होते. तीन तास निरीक्षण केल्यावर माणूस साधारणपणे एका तासात १६ वेळा आपल्या चेहऱ्याला हात लावतो, असं समोर आलं.
पण २०१५ मधे झालेल्या ऑस्ट्रेलिया युनिवर्सिटीतल्या संशोधनात मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या २६ विद्यार्थ्यांचं निरीक्षण केलं गेलं. तेव्हा तर साधारणपणे माणूस एका तासात २३ वेळा आपल्या चेहऱ्याला हात लावतो, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त स्पर्श हे नाक, तोंड आणि डोळ्यांना केले होते.
विद्यार्थी डॉक्टरकीचं शिक्षण घेणारे होते म्हणजे वायरस हातामार्फत शरीरात जातात ही मुलभूत गोष्ट त्यांना माहीतच असणार. तरीही आपल्या चेहऱ्याला हात लावण्यापासून ते रोखू शकत नव्हते. तसंच मोठ्या पदावरच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही चेहऱ्याला हात लावायचा नाही, ही गोष्ट लक्षात येत नाही. हे कर्मचारीही २ तासात १९ वेळा हात चेहऱ्याला लावतात. सामान्य माणसापेक्षा तर हे कर्मचारी वायरस आणि बॅक्टेरियाच्या जास्त संपर्कात असतात.
हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
अशा प्रकारे तोंडाला हात लावण्याची सवय आपल्याला आहे आणि ती मोडता येईल एवढीच ही गोष्ट मर्यादीत नाही. तर चेहऱ्याला हात लावणं हे आपल्या डीएनएतच आहे, असं मानसोपचारतज्ञ नताशा तिवारी बीबीसीशी बोलताना सांगतात. माणूस म्हणून आपण काही मुलभूत गोष्टी करतो त्यातलीच ही एक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
हे फक्त मोठी माणसंच करतात असं नाही. एखादं लहान बाळसुद्धा अनेक वेळा आपल्या चेहऱ्याला हात लावत असतं. इतकंच काय, तर आईच्या पोटात असलेलं बाळसुद्धा आपल्या चेहऱ्याला मधून मधून हात लावतं, असं सोनोग्राफीत नेहमीच दिसतं. बाळानं अशाप्रकारे आपल्या चेहऱ्याला हात लावणं हे त्याचा विकास नीट होतोय याचं द्योतक मानलं जातं. हाताने चेहऱ्याला स्पर्श करता येतो हे कळण्याइतपत त्याची मज्जासंस्था विकसित झालेली आहे, हे यातून कळतं.
आपण मोठी माणसं अनेकदा खाज आली, गुदगुदली झाली की चटकन तोंडाला हात लावायला जातो. यामागे स्टिम्युलस काम करत असतो, असं शास्त्रज्ञ म्हणतात. आपल्याला खाज आली की त्या जागेतून मेंदूपर्यंत संदेश पोचवला जातो. मग मेंदू लगेचच हाताच्या बोटांना संदेश देतो आणि तोंडाला किंवा नाकाला स्पर्श करा, खाजवा असं सांगतो. हे सगळं आपल्याला न कळतपणे आणि अगदी काही सेंकदांत घडत असतं.
हेल्थलाईन या वेबपोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, आपण मुद्दाम चेहऱ्याला हात लावत असू तर ते थांबवून काहीतरी दुसरा मार्ग शोधणं आपल्याला शक्य होतं. पण बहुतांश वेळा आपण चुकून किंवा न कळतपणे हात लावत असतो. काहींना वाचताना, काम करताना, मिटिंगमधे वगैरे नख खाण्याची, तोंडात बोट घालण्याची, उगाचच तोंडावरून हात फिरवण्याची सवय असते. असे लोक तर दिवसातून अनेकदा तोंडाला हात लावतात. बेसल गांगलिया या मेंदूच्या एका भागात अशा सवयी साठवून ठेवलेल्या असतात. आपण नखं खातोय हे आपल्या लक्षात येत नसलं तरी मेंदूचा हा भाग आपलं काम चोख बजावत असतो.
आपल्या समाजात चेहऱ्याला हात लावणं हे संवादाचंही एक माध्यम आहे. आपल्याला आश्चर्य वाटलं की आपण तोंड आ वासून उघडतो आणि त्यावर हात ठेवतो. किंवा लाज वाटली तर चटकन आपल्या हाताने आपले डोळे झाकून घेतो. भीती वाटली तरी नकळतपणे आपले हात चेहऱ्याजवळ जातात. किंवा अगदी शांतपणे काही ऐकत असू तर आपलं डोकं किंवा हनुवटी आपण हातावर रेलतो, अशा अनेक गोष्टींसाठी कळत न कळतपणे आपण चेहऱ्याला हात लावतो.
थोडक्यात, चेहऱ्याला हात लावणं हे स्वतःला शांत करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी शरीराने तयार केलेलं एक तंत्र आहे. आपला चेहरा, नाक, ओठ, डोळ्यांसारखे अवयव हे जास्त संवेदनशील असतात. हे संवेदनशील अवयव मेंदूच्या वेगवेगळ्या भागाशी जोडले गेलेत. त्यामुळे त्यांना हात लावल्याने, स्पर्श केल्याने आपल्याला शांत, सुरक्षित वाटत असतं असं मानसोपचारतज्ञांचं म्हणणं आहे.
कोरोनाच्या काळात तर आपण नेहमीपेक्षा जास्तच वेळा चेहऱ्याला हात लावतो, असं दिसून आलंय. एखादी गोष्ट करू नका असं सांगितलं असता तिच गोष्ट वारंवार करणं हा मानवी स्वभाव आहे. हत्तीचा विचार करू नका म्हटलं तरी हत्तीच आपल्या डोक्यात येतो. तसंच, चेहऱ्याला हात लावू नका असं म्हटलं तरी आपण नकळतपणे जास्त हात लावतो.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
सुदैवाने, कोरोना वायरस पसरण्याचा मुख्य मार्ग हा चेहऱ्याला हात लावणं हा नाहीय. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेनं या मार्गनं संसर्ग होण्याची भीती खूप कमी असल्याचं सांगितलंय. धोका कमी असला तरी पूर्णपणे गेलेला नाही. हा धोका टाळायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सतत हात धुवत राहणं.
हात धुण्याचा मार्ग सोपा असला तरी पूर्णपणे सुरक्षित आहे, असं म्हणता येणार नाही. दर १५ मिनिटांनी हात धुतले तरी मधल्या १५ मिनिटांत संसर्ग होण्याचा धोका राहतोच. त्यामुळे असे तात्पुरते उपाय करण्याऐवजी ही सवय आपण कायमची बदलायला हवी किंवा निदान कमी तरी करायला हवी.
या गोष्टीबाबत अति साशंक राहणं ही त्यातली पहिली पायरी असेल. सतत आपल्या चेहऱ्यावर आणि हातावर नजर ठेवणं आणि आपल्याला हात लावायची इच्छा तर होत नाहीय ना याकडे लक्ष ठेवणं हा एक प्राथमिक उपाय आहे. त्यानंतर मात्र वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब आपल्याला करावा लागेल.
युनिवर्सिटी ऑफ टेक्सासमधल्या साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटर या संस्थेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही सवय मोडायची तर आपल्याला आपल्या हाताचं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करावं लागेल. त्यासाठी काही क्रिएटिव पद्धतींचा वापर करता येईल.
या संस्थेनं सांगितलेला एक उपाय म्हणजे हातावर अंगठी किंवा घड्याळासारखा बॅण्ड घालणं. आपला आवडता दागिना यावेळी कामाला येईल. चमकणारी अंगठी किंवा वाजणाऱ्या बांगड्या, ब्रेसलेट असं काही हातावर असेल तर हात चेहऱ्यापाशी नेल्यावर आपलं त्याकडे लक्ष जाईल किंवा त्याचा आवाज ऐकू येईल. त्यावरून आपण सावध होऊन आपला हात मागे घेऊ शकू. पैसे खर्च करायचे नसतील तर अगदी घरातल्या टाकाऊ वस्तूंपासूनही ही टिकाऊ गोष्ट तयार करता येईल.
ही गोष्ट सतत आपल्या डोळ्यासमोर असली तरी आपण सावध राहू शकू. घरात, हॉलमधे, बेडरूममधे, किचनमधे सगळीकडे आकर्षक रंगाच्या कागदावर चेहऱ्याला हात लावू नका हे वाक्य लिहून ठेवलं तर आपलं त्याकडे लक्ष जाईल. पण कागदाचे हे रंग सतत बदलले पाहिजेत नाहीतर डोळ्यांना त्याची सवय होऊन जाईल.
हेही वाचा : जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
घरातून बाहेर पडताना आपल्या आसपास कागद नसतील. अनेकदा अशी ज्वेलरी घालणंही शक्य होणार नाही. तेव्हा आपण गडद रंगाचे ग्लोव घालू शकतो. तोंडाजवळ हात नेला की ते आपल्याला अलर्ट करतील.
काहींनी तर फेस टचिंग अॅपही काढलेलेत. फिटबीट या घड्याळ बनवणाऱ्या कंपनीचं जेलेपनो म्हणजेच JalepeNo! हे अॅप आपल्याला डोळ्यांना, ओठांना आणि नाकाला स्पर्श न करण्याची आठवण करून देतं. अमेरिकेच्या हवाई युनिवर्सिटीतल्या प्राध्यापिका किम बिन्टेड यांनी हे अॅप तयार केलंय. हे मशीन घडाळ्यासारखं हातात घालायचं. पण ते तोंडाजवळ जाईल तेव्हा आपोआप वायब्रेट होतं.
याशिवाय नाकाला सवय नसणाऱ्या वासाचा वापर करणं, आपले हात सतत दुसऱ्या कामात व्यस्त ठेवणं अशा पद्धतींचाही वापर करता येईल. महत्त्वाचं म्हणजे, चेहऱ्याला हात लावायचा नाही याऐवजी आपण मी चेहऱ्याला हात लावण्याबाबत जास्त जागरूक राहीन असा विचार आपण करायला हवा. सोप्पा मार्ग म्हणजे, दर एक तासाने हात न लावण्याचा अलार्म आपण मोबाईलमधे सेट करू शकतो. असं नाहीतर तसं, हा नाही तर तो, पण काही ना काही उपाय करून चेहऱ्याला हात लावण्याची ही सवय आपल्याला लवकरात लवकर मोडायलाच हवी.
हेही वाचा :
युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण
कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!
विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?