मासिक पाळी स्वच्छता दिवस २८ मेलाच का साजरा केला जातो?

२८ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!

मुलगी न्हाती होते म्हणजे काय होतं? मुलीला मासिक पाळी येते. पण मासिक पाळी असा शब्द तर उच्चारायचा नसतो. मग मासिक पाळीच्या शेवटच्या दिवशी मुलीच्या शुद्धीकरणासाठी मुलीनं डोक्यावरून पाणी घ्यायचं. याला साध्या भाषेत ‘न्हाईलं’ असं म्हणतात.

मासिक पाळीसाठी अशाच कित्तीतरी शब्दांचा उच्चार केला जातो. कावळा शिवला, बाजुला बसलीय, अडचण आलीय, प्रॉब्लेम आलाय, बायकांचा त्रास सुरू आहे असे अनेक शब्दप्रयोग केले जातात. काही काही ठिकाणी तर मासिक पाळी म्हणजे प्रत्येक बाईला होणारा एक आजार असतो, असंही समजण्यात येतं. या सगळ्या गैरसमजूतींमुळे मुलीला सामाजिक त्रास तर सहन करावा लागतोच. पण मासिक पाळीकडे बघण्याच्या समाजाच्या वाईट दृष्टीकोनाचा शारीरिक त्रास या मुलींना सोसावा लागतो. मासिक पाळीत नीट स्वच्छता न बाळगल्यामुळे मासिक पाळी येणाऱ्या मुलींना आणि बायकांना खरोखरचेच आजार होतात.

मासिक पाळीबद्दलच्या गैरसमजुतींना फाटा देऊन मासिक पाळीत नेमकी काय काळजी घ्यायची याचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी २८ मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा : साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

कुणी सुरू केला मासिक पाळी स्वच्छता दिवस?

प्रत्येक बाईचं मासिक पाळीच्या दिवसांचं गणित वेगळं असतं. पण साधारणतः मासिक पाळीचं चक्र २८ दिवसांचं असतं, असं जगभरातले डॉक्टर्स आणि वैज्ञानिक मानतात. म्हणूनच मे महिन्यातल्या २८ वा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून वॉश या जर्मनीमधल्या संस्थेकडून निवडला गेला.

कचरा, हात धुणे, स्वच्छ वातावरण असे जागतिक स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वॉश युनायटेड ही एनजीओ काम करते. २०१८ मधे २८ मे हा दिवस पहिला मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून या संस्थेकडून साजरा केला गेला.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, मासिक पाळीबद्दलचं मौन तोडून या काळात चांगली स्वच्छता ठेवली गेली तर महिला आणि मुलींचं किती मोठ्या प्रमाणावर सबलीकरण होईल याचा प्रचार करण्यासाठी, त्याची आठवण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. त्यासाठी मासिक पाळीवर काम करणाऱ्या सगळ्या संस्था, सरकारं, खासगी कंपन्या, मीडिया आणि व्यक्तींनी एकत्र हा या मागचा उद्देश होता.

यंदाची थीमः ही कृती करण्याची वेळ

जगभरात दररोज कोट्यवधी बायकांची मासिक पाळी चालू असते आणि यातल्या जवळपास सगळ्यांनाच मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करता येत नाही. भारतासकट अनेक देशात मासिक पाळी आल्यावर मुलींचं शाळेत जाणं किंवा कामावर जाणं बंद केलं जातं. शहरातल्या भागात मुली आणि स्त्रीया कामावर, शाळेत जात असतील तरीही तिथं त्यांना स्वच्छ वातावरण मिळत नाही, मासिक पाळीची पुरेशी साधनंही मिळत नाहीत. यासगळ्याचा परिणाम मुलींच्या शिकण्यावर, त्यांच्या काम करण्यावर होत असतो. त्या आपोआपच स्वतःवर सार्वजनिक निर्बंध लावून घेतात.

हे अगदी २०२० मधेही सर्रास दिसतं. म्हणूनच आता ‘ही कृती करण्याची वेळ आहे’ हे यंदाच्या मासिक पाळी दिवसांचं ब्रीदवाक्य आहे. मासिक पाळी येणाऱ्या व्यक्तीसाठी पुरेशी साधनं उपलब्ध करून दिली पाहिजेत. समाजातला मासिक पाळीबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोन बाजूला सारला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे हे अधोरेखित करण्यासाठी मासिक पाळी दिवसांचं हे ब्रीदवाक्य स्वीकारण्यात आलंय.

मासिक पाळीबाबत अशा प्रकारचं काम करण्यासाठी सगळ्यात आधी देशाच्या सरकारांनी धोरण बनवणं गरजेचं आहे ,असं युनायडेट स्टेस्ट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेवलपमेंट म्हणजे यूएसएआयडी या संस्थेनं म्हटलंय. या धोरणात देशातल्या सगळ्या मुली आणि बायकांपर्यंत मासिक पाळीदरम्यान लागणारी साधनं कशी पोचतील, स्वच्छ वातावरण आणि खासगी किंवा बाथरूम वगैरे गोष्टींची सोय कशी होईल आणि मासिक पाळीबद्दलच्या अंधश्रद्धा कशा प्रकारे जातील यासाठी प्रयत्न केले जावेत, असं युएसएआयडीचं म्हणणं आहे.

हेही वाचा : 

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

कशासाठी करायची स्वच्छता?

याचबरोबर मासिक पाळीमधे स्वच्छता कशी करावी याबद्दलचंही शिक्षण मुलींना आणि महिलांना मिळणं गरजेचं आहे. मासिक पाळीची स्वच्छता कशी ठेवावी यासाठी युनायडेट नेशन्स चिल्ड्रन्स फंड संस्थेच्या वेबसाईटवर रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलाय. यात मासिक पाळीतून होणारा रक्तस्राव टिपून घेण्यासाठी कोणतं साधन वापरलं जावं, ते कसं वापरावं आणि त्याची स्वच्छता कशी बाळगावी याची माहिती दिलीय.

इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे मासिक पाळीचं रक्त घाणं असतं म्हणून त्याची स्वच्छता करायची असा दृष्टीकोन बरोबर नाही. मासिक पाळीचं रक्त हे मुळात घाण नसतं. पण ते शरीरातून बाहेर आल्यावर बाहेरच्या हवेतले रोगजुंती त्यावर बसल्याने त्यातून इन्फेक्शन पसरू शकतं म्हणून त्याची स्वच्छता करणं गरजेचं असतं.

मासिक पाळीत बहुतांश मुली सॅनिटरी पॅडचा वापर करतात. मेडिकल किंवा दुकानात मिळणारं या सॅनिटरी पॅडमधे रसायन भरलेली असतात. त्यामुळेच ६ तासांपेक्षा त्याचा वापर करणं धोकादायक असल्याचं युनिसेफनं सांगितलंय. दर ६ तासांनी हे पॅड बदलल्यावर वापरून झालेलं पॅड पेपरमधे गुंडाळून त्यावर लाल रंगाचा डॉट काढावा आणि मग ते कचऱ्याच्या डब्यात फेकावं. लाल डॉटमुळे कचरा वेचणारे कामगार हे पॅड इतर कचऱ्यापासून वेगळं करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावतात.

अंधश्रद्धा संपली तरच स्वच्छता होऊ शकेल

मात्र, भारतात अनेक महिलांना हे पॅड विकत घेणं परवडत नाही. कोरोना वायरसमुळे जग लॉकडाऊन झालेलं असताना या पॅडचा तुटवडाही निर्माण झालाय. तसंच, हे पॅड आरोग्यसाठीही धोकादायक असतं. त्यामुळेच याचा वापर करणं टाळलेलंच बरं, असं युनीसेफचं म्हणणं आहे.

मासिक पाळीसाठी टॅम्पोन आणि मेन्स्ट्रुअल कप असेही काही पर्याय उपलब्ध आहेत. पण हे सगळे पर्याय थोडे खर्चिक पडू शकतात. त्यामुळेच मासिक पाळीमधे साधं कापडाचं पॅड किंवा कापडाची घडी वापरता येईल. त्यासाठी स्वच्छ सुती कापड हा चांगला पर्याय आहे. वापरून झाल्यावर हे कापड किंवा कापडी पॅड वाहत्या पाण्याखाली साबणाने धुवून अगदी कडक उन्हात वाळत घालणं गरजेचं आहे. असं झालं नाही तर त्यातून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. कडक उन्हात वाळवलेला हा कपडा किंवा कापडी पॅड पुन्हा वापरता येऊ शकतं.

मासिक पाळीबद्दलचे सगळे गैरसमज, अंधश्रद्धा आणि घृणास्पद भावना काढून टाकली जाईल तेव्हाच ही सगळी स्वच्छता पाळणं, त्याचे नियम अमलात आणणं शक्य होईल. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता पाळण्याआधी आपल्याला आपल्या मनाची स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे.

हेही वाचा : 

चला, आज तरी मासिक पाळीवर चर्चा करूया

मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

बरं झालं, आमच्या देवाला मासिक पाळीचं वावडं नव्हतं

मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

माझा कोरोना पॉझिटिव काळातला अनुभव सांगतो, घाबरायचं काम नाही

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

राधिका सुभेदार सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा