बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?

१२ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


नेते पक्ष का बदलतात, यावर चर्चा कायम सुरू असते. पण सध्याच्या नेत्यांची लोकसेवेची कारणं कुणाला पटत नाहीत. पण आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांनी १९८०मधे इंदिरा काँग्रेसमधे प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या हेतूविषयी विरोधकांनाही शंका नव्हती. म्हणून त्यांनी समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांना पक्षांतराची सांगितलेली कारणं आजही महत्त्वाची ठरतात.

प्रख्यात साहित्यिक, लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि माजी खासदार सरोजिनी बाबर यांनी महाराष्ट्राच्या डॉक्युमेंटेशनचं महत्त्वाचं काम केलं. त्यातलंच एक पुस्तक म्हणजे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेलं मी पाहिलेले यशवंतराव. या पुस्तकातला ग.प्र. प्रधान मास्तरांचा लेख इथं देत आहोत. त्यांनी यशवंतराव चव्हाणांची एक महत्त्वाची आठवण यात नोंदवलीय.

याला पार्श्वभूमी आहे ती आणीबाणीची. यशवंतरावांना आणीबाणीचा निर्णय मान्य नव्हता. तरीही आणीबाणीनंतर अडीच वर्षांनी इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी इंदिरा काँग्रेसमधे प्रवेश केला. प्रधानांनी त्याची कारणं यशवंतरावांना विचारली. त्याचं उत्तर महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण करणाऱ्या सगळ्यांनाच पुढची अनेक वर्षं लक्षात ठेवावं लागेल. 

ग.प. प्रधानांनी पाहिलेले यशवंतराव असे आहेत. 

हेही वाचाः आणि यशवंतरावांनी पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला

श्री. यशवंतराव चव्हाण यांनी १९८० मध्ये इंदिरा काँग्रेसमधे प्रवेश केल्यावर, काही दिवसांनी ते मुंबईस आले असताना मी त्यांना भेटलो. त्या वेळी मी म्हणालो, ‘आपण इंदिरा काँग्रेसधे कोणत्याही अपेक्षेने गेला नाहीत, ही माझी खात्री आहे. पंरतु श्रीमती गांधींनी आणीबाणी जाहीर करावयास नको होती, असे आपले मत असताना आपण पुन्हा त्यांच्या पक्षात का गेलात?’

यशवंतराव हसले आणि म्हणाले, ‘तुम्ही माझ्या हेतूबद्दल शंका घेणार नाही ही मला खात्री आहे. थोडं स्पष्टच सांगतो. इंदिरा काँग्रेस हाच राष्ट्रीय जीवनाचा मुख्य प्रवाह आहे. या प्रवाहापासून बहुजन समाजाने दूर राहू नये हे सांगणं आणि सांगण्याआधी स्वत: ते करणं हे माझे कर्तव्य होतं. बहुजन समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून मी हे केलं. माझ्या वैयक्तिक मानापमानापेक्षा मला बहुजन समाजाचं हित महत्त्वाचं वाटतं.’ 

यावर मी म्हणालो, ‘सत्ता म्हणजे राष्ट्रीय जीवनाचा मुख्य प्रवाह असं आपण मानता का ?’

यावर यशवंतराव म्हणाले, ‘हो. समाजाची सुधारणा, समाजात बदल करण्याचं प्रमुख साधन सत्ता हेच आहे. बहुजन समाजाची अद्याप खूप सुधारणा व्हायची आहे. यासाठी हे साधन बहुजन समाजाने प्रभावीपणे वापरलं पाहिजे. त्या साधनावर बळकट पकड ठेवली पाहिजे.’ यावर मी विचारलं, ‘मग एस.एम., गोरे, डांगे हे जन्मभर विरोधी पक्षात राहिले. माझ्यासारखे अनेकजण त्यांच्या मागोमाग वाटचाल करीत राहिले हे चुकलं का?’

हेही वाचा : भाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा

यशवंतराव म्हणाले, ‘हे तुम्हीच अंतर्मुख होऊन तपासलं पाहिजे. परंतु विरोधी पक्षातील कामाला मी कमी लेखत नाही. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं हे लोकशाहीत आवश्यक आहे.’ यावर थोडा रागावून मी म्हणालो, ‘आपलं म्हणणं असं की, बहुजन समाजाने सत्तेवर पकड ठेवावी आणि आम्ही विरोधी पक्षातच राहावं? मला हे मान्य नाही.’

यशवंतराव म्हणाले, ‘मी असं का म्हणतो ते समजून घ्या. पांढरपेशा समाजाला १९ व्या शतकापासून शिकायला मिळालं. त्यामुळे त्या समाजातील माणसांना एक शक्ती मिळाली आहे. त्यांना सत्तेचा पाठिंबा नसला तरी ते आपला विकास करून घेऊ शकतात. पांढरपेशा समाजाच्या संस्था आणि पांढरपेशा समाजातील तरुणांचं कर्तृत्व हे एस.एम. अगर गोरे यांच्या पाठिंब्यावर अवलंबून नाही. बहुजन समाजाचं तसं नाही. आमच्या संस्था आणि आमची तरुण पिढी यांना आधाराची जरूर आहे.`

यशवंतराव पुढे म्हणाले, `अनेक वर्षं ज्ञानापासून वंचित राहिलेल्या शेतकरी समाजाची अद्याप सुधारणा व्हायची आहे. सत्तेचा आधार दिला तर आमच्या संस्था उत्तम काम करतील आणि आमच्या मुलांचं कर्तृत्व वाढेल. अद्याप निदान ५० वर्षं तरी सत्तेच्या साह्यानेच प्रगतीला खरी गती येईल. कर्मवीर अण्णांचा अपवाद वगळता, अन्य कोणी केवळ स्वसामर्थ्यावर संस्था उभारू शकला नाही. मी बहुजन समाजाचं सामर्थ्य काय आहे हे जाणतो. पण बहुजन समाजाच्या कर्तृत्वाला सत्तेची जोड आणखी काही वर्षं मिळालीच पाहिजे, हे ही मी जाणतो, आणि ते बहुजन समाजाला स्पष्टपणे सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो. प्रत्येक समाजाची काही ऐतिहासिक गरज असते. ती ओळखून मी वागतो. मग ते कोणाला पटो वा ना पटो.’

हेही वाचा : 

यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी

भाजप प्रवेशावेळी ज्योतिरादित्य शिंदे बोलले त्याचा अर्थ काय?

ठाकरे सरकारचा फोकस सांगणाऱ्या बजेटमधल्या ७ कामाच्या गोष्टी

७० वर्षांपूर्वीच्या दंगलीवेळी सरदार पटेलांनाही फेकन्यूजशी लढावं लागलं

शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?

(मी पाहिलेले यशवंतराव या साहित्य संस्कृती मंडळाच्या पुस्तकातून साभार)