भारत पाटणकरांना तरुण शुभेच्छा का देतात?

०५ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला वाढदिवस. दरवर्षी सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहितात. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी त्यांनी नाळ जोडून ठेवली असल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं.

जागतिकीकरणानंतर भारतीय समाज आतून बाहेरून बदललाय. शोषितांचे असंख्य प्रश्न नव्याने फणा काढून उभे आहेत. त्यांना भिडणं तर सोडाच उलट व्यवस्थेचे हस्तक बनून अनेकजण फायदा उपटताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूने धर्मांध जातीयवादी शक्ती अधिक आक्रमक बनल्यात. अशा कठीण काळात काही लढवय्ये परिस्थितीला शरण न जाता भूमिकेवर ठाम राहत व्यवस्थेच्या छाताडावर घट्ट पाय रोवून उभी आहेत. अशाच लढणाऱ्या माणसांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे डॉ. भारत पाटणकर.

क्रांतीचा वारसा

भारत पाटणकर यांना लढण्याचा हा वारसा त्यांच्या आईवडिलांकडून मिळाला. क्रांतिविरांगना इंदुताई पाटणकर आणि क्रांतिवीर बाबूजी पाटणकर या सातारच्या प्रतिसरकारमधील सशस्त्र दलात सक्रीय असलेल्या दाम्पत्याचा हा एकुलता एक मुलगा. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी बाबूजी पाटणकर यांची राजकीय हत्या झाली. त्यानंतरही इंदूताईंनी भारत पाटणकर यांना लढ्याचे संस्कार दिले. पुढे एमबीबीएस झाल्यानंतर एमडीचे शिक्षण घेत असतांना ते श्रमिकांच्या चळवळीत ओढले गेले. ते `मागोवा` या क्रांतिकारक गटात सक्रीय झाले. डॉक्टरकीची पदवी असली तरी पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचा निर्धारामुळे त्यांनी आयुष्यात एकही दिवस प्रॅक्टिस केली नाही. १९७३ ते ७६ या काळात अनेक कामगार संघटनात ते सक्रीय होते. त्यांनी मुंबईतल्या गिरणगावात `क्रांतिबा जोतिबा फुले सांस्कृतिक मंच`ची स्थापना केली. त्यात जातवर्चस्वाच्या विरोधात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं.

डॉक्टरांनी १९७३ला सांगली जिल्ह्यात `श्रमिक संघटना` या नावाने शेतमजुरांची संघटना स्थापन केली. आणीबाणीच्या काळात कल्याण अंबरनाथ परिसरात भूमिगत राहून लढा सुरू ठेवला. ते गिरणी कामगारांच्या चळवळीतही ते आघाडीवर होते. त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्हे पिंजून काढत शेतकरी आणि कामगार यांना एकत्र करून लढे दिले.

हेही वाचा : ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या शिक्षकांना ‘नितळी’च म्हणायला हवं

पाणी पेटू लागलं

गिरणी कामगार संपाच्या ग्रामीण आंदोलनातून पुढे आलेल्या चळवळीचं दुष्काळ निर्मूलनाच्या सर्वंकष चळवळीत रूपांतर करण्यात डॉक्टरांनी पुढाकार घेतला. सांगली जिल्ह्यात ‘मुक्ती संघर्ष चळवळ’ या संघटनेची स्थापना केली. त्यातून जनपर्याय मांडून त्यांच्या प्रस्थापनेसाठी लढे संघटित करण्याची नवी पद्धत सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या चळवळीचा भाग असलेल्या ‘बळीराजा स्मृती धरण’ या आंदोलनाचं नेतृत्व करून त्यांनी त्याला तात्विक बैठक दिली. या संघर्षातून समन्यायी पाणी वाटप, पर्यायी शेती, दुष्काळ निर्मूलनाचे नवे क्रांतिकारक धोरण पुढे आलं. पुढे याच क्रांतिकारक धोरणाच्या आधारे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील तेरा दुष्काळी तालुक्यात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सोबतीने पाणी संघर्ष चळवळ उभी केली.

आटपाडी तालुक्यातील मूठभर गावांना पाणी देणारी सरकारी पाणी वाटपाची आखणी बदलायला लावली. त्यातून सर्व गावांना आणि शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व कुटुंबाना पाणी देणारं नवं धोरण आलं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातही समन्यायी पाणी वाटपासाठी हा पथदर्शी प्रकल्प ठरला. त्यात बंद पाईपने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत मोजून पाणी देणारा क्रांतिकारी कार्यक्रम सरकारला घ्यायला भाग पाडलं. दुष्काळी भागातील जनतेला उपसा सिंचन योजनेतून दिल्या जाणाऱ्या पाण्याचं वीजबिल शेतकऱ्यांच्या माथी मारलं जात होतं. त्यासाठी डॉक्टरांच्या नेतृत्वात निर्णायक संघर्ष झाला. शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी भांडवलदारांना देण्याचा सरकारी डाव जनतेच्या सहभागातून उधळून लावण्याच्या संघर्षात डॉक्टर कायम अग्रभागी राहिले. त्यामुळे सरकारला पाण्याचे प्राधान्यक्रम पूर्वीसारखे करावे लागले. 

विद्रोही सांस्कृतिक चळवळ

आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत डॉक्टरांनी महत्त्वाचा सहभाग दिलाय. कॉ. शरद पाटील यांच्या पुढाकाराने उभा राहिलेल्या ‘दलित आदिवासी ग्रामीण साहित्य सभेच्या’ स्थापना होताना ते सोबत होते. त्यांनी  चळवळीच्या वतीने दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य संमेलनं यशस्वी केली. विसावं शतक सरत असताना महाराष्ट्रात उभं राहिलेले विद्रोही नावाचं वादळ जन्माला घालण्यात डॉक्टरांची भूमिका निर्णायक आहे. त्यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका ठरवण्यात, तिला तात्विक पाया आणि नवी सांस्कृतिक ओळख देण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान दिलं.

९० च्या दशकात अयोध्या वादाच्या पार्श्वभूमीवर देशात धार्मिक द्वेषाचं वातावरण तयार होत होतं. तेव्हा डॉ. भारत पाटणकरांनी त्याविरोधात स्पष्ट भूमिका घेऊन जातीयवादी धर्मांध शक्तींचा बिमोड करण्यासाठी लाखो कष्टकरी जनतेला रस्त्यावर उतरवलं. ‘हिंदू की सिंधू’ या पुस्तिकेतून त्यांनी त्याचा वैचारिक पायाही समजावून सांगितला. २००२ च्या गुजरात नरसंहारानंतर महाराष्ट्रात गुजरात होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीने पुण्यात हजारो तरुणांचा एल्गार मोर्चा काढला. यातूनच ‘हिंदी है हम... हिंदोस्ता हमारा’ या चळवळीचा जन्म झाला. या चळवळीच मुस्लिमांनी दबलेला आवाज व्यक्त केला.

हेही वाचा : पत्रकार पांडुरंग रायकरचा बळी का गेला, हे आपण समजून घ्यायला हवं

बडवे हटाव

पंढरपूरचं विठ्ठल हे हजारो कष्टकऱ्यांचं श्रद्धास्थान. समतेचे प्रतीक. पण बडव्यांनी विठ्ठलालाच जातिवर्चस्वाच्या आधारे वेढलं होतं. त्यांची हकालपट्टी करण्यासाठीच्या बडवे हटाव चळवळीचं नेतृत्वही डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवलं. आता ‘विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलन’ उभं करून विठ्ठलाच्या पूजेतलं पुरुषसूक्त काढून टाकण्याची मागणी केलीय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून पुजारी हटवण्यामागेही त्यांचं ‘गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन’ महत्त्वाचं कारण होतं. अंबाबाईच्या समग्र मुक्तीची लढाई अजून चालूच आहे.

जातिव्यवस्थेचा अंत 

‘जातिव्यवस्थेचा अंत’ या पुस्तकातून डॉक्टरांनी जातिअंताची ठोस भूमिका मांडली. केवळ भूमिका मांडून न थांबता त्या दिशेने पावलं उचलण्यासाठी `सत्यशोधक शेतकरी श्रमिक संघटना` आणि `श्रमिक मुक्ती दल` यांनी संयुक्तपणे जाती अंताच्या परिषदा संघटीत केल्या. अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या विरोधात पुणे ते खर्डा या लाँग मार्चमध्ये सहभाग घेतला. याबरोबरच त्यांनी राज्यातल्या पुरोगामी संघटनांना निमंत्रित करून ‘सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ’ स्थापन केली. या चळवळीच्या वतीने पुणे ते कोल्हापूर अशी ‘संघर्ष यात्रा’ आयोजित करून डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करणाऱ्या सनातनी प्रवृतीवर हल्ला चढवला. कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर ‘सनातन संस्था` या हत्येमागे आहे, अशी रोखठोख भूमिका घेऊन डॉक्टरांनी कोल्हापूरमधील `सनातन प्रभात`च्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला. 

धरणग्रस्तांची चळवळ

डॉ. भारत पाटणकर आणि श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांच्या चळवळीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. वर्षानुवर्षं रखडलेल्या कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्सवनाची लढाई आता आता अंतिम टप्प्यात आणण्यात डॉक्टरांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यांनी धरणग्रस्तांच्या लढाईला नवा आयाम दिलाय. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमधील धरणग्रस्तांना संघटित करून धरणग्रस्तांच्या फायद्याचे निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडलं.

डॉक्टरांच्या लढ्यामुळेच ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ हे तत्व कायद्यात रूपांतरित झालं. या तत्त्वाच्या आधारे उरमोडी आणि चित्री या धरणांचा संघर्ष यशस्वी करून पुनर्वसनाचा नवा पॅटर्न तयार केला. त्यातून भावाबरोबर बहिणीला पुनर्वसनाचा अधिकार मिळाला. धरणग्रस्तांना घरबांधणीसाठी १० हजार रुपये अनुदान, जमीन मिळेपर्यंत ६०० रुपये उदरनिर्वाह भत्ता, जमिनीला पाणी मिळेपर्यंत दरमहा ६०० रुपये पाणी भत्ता आणि पर्यायी जमीन मिळेपर्यंत ६५ टक्के रकमेवरील व्याज असे महत्वपूर्ण निर्णय करून घेतले. 

धरणग्रस्तांची आंदोलनं सुरू असतानाच डॉक्टर पवनचक्कीग्रस्तांचा लढा संघटित करत होते. त्यांनी टाटा रिलायंस औष्णिक उर्जा प्रकल्पाच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील नऊ गावातील शेतकऱ्यांचा संघर्ष उभारून प्रकल्प मागे घ्यायला लावला. तसंच जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातही मोठी परिषद संघटित केली. 
डॉ. भारत पाटणकर हे वर्गीय, जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत करून नवा समृद्ध पर्यावरणसंतुलित समाज निर्माण करू पाहणाऱ्या लढ्यातील एक नेतृत्व आहे. त्यासाठी श्रमिक कष्टकरी जनतेला संघटित करून सातत्याने त्यांचा संघर्ष अविरतपणे चालू आहे. आईवडिलांनी दिलेला लढ्याचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवलाय. त्यात त्यांच्या पत्नी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक आणि समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ओम्वेट उर्फ शलाका पाटणकर यांची भक्कम साथ त्यांना मिळालीय.

हेही वाचा : 

फेसबुक झालंय 'बुक्ड'!

लोकशाही वाचवण्याचा वीस कलमी कृतीक्रार्यक्रम

क्रांतिसिंह नाना पाटीलः गळ्यात तुळशीची माळ घालणारा कम्युनिस्ट

भेकडाचे शौर्य सांगणाऱ्या मंदिर निर्माणाच्या आठवणींनी सत्य लपवता येतं

पुरूषी वर्चस्व टिकवण्यासाठीच वापरलं जातं बायकांवरच्या विनोदाचं हत्यार