भारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो?

११ जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद.

नवी दिल्लीतल्या सभेत खासदार असदुद्दीन ओवेसी राज्यघटनेचा संदर्भ देत, मुस्लिम इथे किरायेदार नसून हिस्सेदार आहेत, असं सांगितलं. तर याला उत्तर देत भाजप नेते माधव भंडारी यांनी म्हटलं, `त्यांनी विचार करून बोललं पाहिजे. हिश्श्याची भाषा करत असतील तर, १९४७ ला हिस्सा दिला आणि विषय संपला` असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. दोन्ही उजवे एकमेकांना बरळण्यासाठी मुद्दे देत असतात. ते असं का बोलले याची इथे केलेली उकल.

स्थळ कॉलेज कॅंटीन

समीर : किती उशीर? कुठे अडकला होतास?

साहिल : तू इथं काय करतोस?

समीर : म्हणजे, तुझी वाट पाहतोय? आपलं ठरलं होतं ना?

साहिल : तू इथं काय करतोस, म्हणजे इथे भारतात काय करतोय?

हेही वाचा: रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

समीर : म्हणजे? माधव भंडारींचं स्टेटमेंट वाचलेलं दिसतं. त्याशिवाय डोक्यावर परिणाम झाल्यासारखं तू काहीही बडबडणार नाहीस.

साहिल : डोक्यावर परिणाम काय? भंडारी काय म्हणाले, हिश्श्याची भाषा करत असाल तर १९४७ साली हिस्सा दिला आणि विषय संपला. साधं लॉजिक आहे. मुस्लिमांना त्यांच्या वाट्याचा स्वतंत्र देश मिळाल्यानंतर पुन्हा त्यांचा वाटा या देशात उरतो कसा?

समीर : थांब जरा. तुला गाडी लावताना पाहिलं आणि कॉफीची ऑर्डर दिलीय. बघ, आणतोय तो.

साहिल : ढगाळ वातावरणात कॉफीची मजाच वेगळी. तर मी सांगत होतो...

समीर : मी या देशात कसा?

साहिल : चिडू नकोस. आठवड्यापासून विचार करतोय...

समीर : विषय १९४७ आहे, इतिहासात जावं लागेल.

साहिल : इतिहासाची मढी नको ना उकरू...

समीर : त्याशिवाय उकल व्हायची नाही. मला माहिती आहे, तुझा इतिहास कादंबऱ्यांपुरताच आहे. ऐतिहासिक संशोधनाची पुस्तकं तुला रूक्ष वाटतात.

साहिल : बरं बोल.

समीर : पाकिस्तान कुणाची मागणी होती? मुस्लिमांची की मुस्लिम लीगची?

साहिल : मुस्लिम काय किंवा मुस्लिम लीग काय एकच की?

समीर : काँग्रेस काय आरेसेस काय एकच की?

साहिल : नाही. अजिबात नाही. दोघांचं नेतृत्व हिंदू करत असले तरी दोहोत जमीनअस्मानचा फरक आहे. एकाला सोबत सर्व समाज घटक बरोबरीने पाहिजेत, दुसऱ्याला अन्य समाजघटक सोबत नकोत आणि आलेच तर दुय्यम स्थान स्वीकारावं अशी मूल्यव्यवस्था मानणारा आहे. त्यांच्यात टोकाचे वैचारिक मतभेद आहेत.

समीर : तर मग मुस्लिमांमध्ये असा फरक का करत नाही?

साहिल : तो दिसत नाही.

हेही वाचा: हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?

समीर : इतिहासाची पुस्तकं डोळसपणे वाचली असती तर हा फरक कळला असता. शॉर्टकट पाहिजे असेल तर मुस्लिम अगेंस्ट पार्टिशन ऑफ इंडिया वाच. दिल्ली विद्यापीठातल्या प्रा. शम्सुल इस्लाम यांनी लिहिलं आहे.

साहिल : ते वाचेनच. तू आता समजावून सांग की?

समीर : हे बघ. भंडारी बुद्धिभेद करत आहेत. थोडक्यात सांगतो. ४७ साली वाटा मागणारे आणि वाटा घेतलेले मुसलमान हे आजचे भारतीय मुसलमान नाहीत. 

साहिल : म्हणजे?

समीर : जसं महंमदअली जिनांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या मागणीस पाठिंबा देणारे मुसलमान होते, तसंच त्या मागणीला विरोध करणारे धर्मनिरपेक्ष मुसलमानही होतेच. त्यांचं नेतृत्व मौलाना आझाद यांच्याकडे होते. हे सर्व पाकिस्तानात गेले नाहीत. इथेच राहिलेत.

साहिल : म्हणजे राष्ट्रीय मुसलमान.

समीर : राष्ट्रीय नाही. धर्मनिरपेक्ष मुसलमान. त्यांना राष्ट्रीय मुसलमान म्हणण्यात आणखी कुणीतरी अराष्ट्रीय मुसलमान आहे, असं अप्रत्यक्ष सांगायचं असतं. आपण बोलताना राष्ट्रीय हिंदू, अराष्ट्रीय हिंदू असा भेद करतो का? 

साहील : बरं, धर्मनिरपेक्ष मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष हिंदू. तर मला सांग, मुस्लिमांना पाकिस्तान दिल्यानंतर सर्व मुस्लिमांनी तिथे जायला पाहिजे, असंच ठरलं होतं ना. 

समीर : नाही. मुस्लिमांना स्वतंत्र देश दिला. त्यामुळे उरलेला देश हिंदूंचा, अशी समजूत कधीच नव्हती. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करत असलेल्या काँग्रेसमधे केवळ हिंदूच नव्हते. त्यांच्या बरोबरीने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन, बौद्ध, दलित, आदिवासी हे बिगरहिंदू सहभागी होते. तसंच स्वतःला हिंदू न समजणाऱ्या तमिळभाषी घटकांसारखे इतर घटकही होते. या सगळ्यांचा मिळून भारत झाला.

साहिल : बरं, मग?

समीर : मग, काय? या सगळ्यांच्या जाणिवा धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारलेल्या होत्या. या त्यांच्या मूल्यांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आधुनिक भारत उदयास आला.

साहिल : म्हणजे हिंदूराष्ट्र झालं नाही. 

समीर : हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात असलं तरी त्यांचा आवाज मूठभर संघटित ब्राह्मण्यवाद्यांपुरताच होता. तो कधीही जनसामान्यांचा, मासेसचा आवाज नव्हता. जनता त्यांच्यासोबत नसल्याने संघवाल्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. त्यांची दुसरी एक मागणी होती, सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात धाडण्याची, तीही पूर्ण झाली नाही. भारत हा काही धर्मवादी देश नाही. त्यामुळे इच्छा नसलेल्या मुस्लिमांनी इथून जाण्याची सक्ती नाही. म्हणूनच संघवाल्यांचा महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि काँग्रेस यांच्याशी वैरभाव अजूनही आहे. 

साहिल : भंडारी यांच्या बोलण्यात हीच भूमिका आहे की काय?

हेही वाचा: ऑन द स्पॉट बालाकोटः इथे सत्याचे मु़डदे दिसत आहेत

समीर : आत्ता कसं! तुम्हाला तुमचा हिस्सा दिलाय, असेच ते म्हणत आलेत. मुळात आम्ही तो हिस्सा मागितला नव्हता आणि तो आम्ही घ्यायचा प्रश्नही नव्हता. सब घोडे बारा टक्के हे त्यांचं धोरण. पाकिस्तानवादी मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष मुस्लिम असा भेद ते करत नाहीत. त्यामुळेच त्यांचे बगलबच्चे भारतीय मुस्लिमांना अधूनमधून पाकिस्तानी म्हणून शिवी देत असतात. बरं, यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान शून्य. 

साहिल : म्हणजे... 

समीर : म्हणजे काय? देश ऐतिहासिक पर्वात स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असताना आरएसएसवाले त्यात सामील नव्हते. त्यांनी कधीच स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. उलट हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दुही माजवत देशाचं ऐक्य धोक्यात आणून ब्रिटिशांना मदत करत होते. अशांचे वारसदार भंडारी यांनी भारतीय मुस्लिमांचा अपमान केला आहे. 

साहिल : हे तर अन्याय करणं आहे.

समीर : होय तर, स्वतंत्र देशाचा पर्याय असतानाही भारतीय मुस्लिम गेले नाहीत. त्यांनी जातीयवादाला विरोध करत याच देशात राहाणं पसंत केलं. मातृभूमीची फाळणी नाकारली. अशी अग्निपरीक्षा जगात अन्य कुणालाही द्यावी लागली नाही. त्यांनी देशाप्रती बांधिलकी केव्हाच सिद्ध केली आहे. तसंच स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठं आहे.

साहिल : असदुद्दीन ओवेसींचा एमआयएम पक्ष तरी कुठे स्वातंत्र्याच्या बाजूने होता?

समीर : अगदी बरोबर. हे दोन्ही उजवे, एकमेकांना पूरक ठरेल असं बरळत असतात. ओवेसींना कुणी विचारलं होतं का? तुम्ही किरायेदार आहात का हिस्सेदार आहात? नाही. तरीही ते बोललेच. 

साहिल : होय. द्रष्टे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणालेच होते, दोन्हींकडील जातीयवादी शक्ती एकमेकांना पूरक काम करत असतात. एकीकडचा वाढला की दुसरा आपोआप वाढतो. अल्पसंख्याकांतील जातीयवादाचा धोका तसा कमी कारण तो सत्तेत येऊ शकत नाही. मात्र, बहुसंख्याकांमधील जातीयवाद सत्तेवर येऊ शकतो. त्यामुळे तो जास्त धोकादायक.

समीर : म्हणूनच या जातीयवाद्यांना थारा देता कामा नये.

साहिल : परवा ईदचा शिरकुर्मा मस्तच होता. 

समीर : पुन्हा खायचंय?  येत्या बुधवारी शिशी ईद आहे. ये घरी.
साहिल : म्हणजे?

समीर : सारखं म्हणजे म्हणजे करत असतोस. शिशी म्हणजे सहाव्या दिवशी येणारी ईद. ये तर, पुन्हा खाऊ.

हेही वाचा: नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता