'तुफान'चा अझीज अली खरा की खोटा?

२६ जुलै २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुफान’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालाय. १९६० च्या रोम ऑलिम्पिकमधे सुवर्णपदक मिळवणाऱ्या मोहम्मद अली या महान बॉक्सरला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या सिनेमात केलाय. पण घासून गुळगुळीत झालेली कथा आणि पटकथेची सुमार बांधणी या सिनेमाच्या यशासाठी मारक ठरलीय.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुफान’ सिनेमा नुकताच अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. १९६० च्या रोम ऑलिम्पिकमधे सुवर्णपदक मिळवणाऱ्या मोहम्मद अली या महान बॉक्सरला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या सिनेमात केलाय. पण घासून गुळगुळीत झालेली कथा आणि पटकथेची सुमार बांधणी या सिनेमाच्या यशासाठी मारक ठरली.

‘तुफान’ हा बॉक्सिंगवर आधारित काही पहिलाच सिनेमा नाही. याआधीही ‘रेजिंग बुल’, ‘साऊथपॉ’, ‘नेवर बॅक डाऊन’ यासारख्या विदेशी सिनेमांमधून आणि ‘मेरी कोम’, ‘सुलतान’, ‘साला खडूस’, ‘मुक्काबाज’ अशा हिंदी सिनेमांमधूनही बॉक्सिंगच्या खेळाचा थरार प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर अनुभवता आलाय.

खरंतर, अशा सिनेमांचा शेवट काय असणार, हे सगळ्यांनाच माहीत असतं. त्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरार निर्माण करण्याचं आव्हान दिग्दर्शकासमोर असतं. त्यासाठी आधार घेतला जातो मनोरंजक मुल्यांची योग्य सांगड घालत कथेच्या शेवटाकडे नेणाऱ्या उपकथानकांचा. आणि नेमका इथेच ‘तुफान’ कमी पडतो.

हेही वाचा : फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

फरहानकडून असणाऱ्या अपेक्षा

सिनेमात अझीझ अली यांची मध्यवर्ती भूमिका साकारलीय फरहान अख्तरने. हा कमालीचा गुणी अभिनेता यापूर्वीही राकेश ओमप्रकाश मेहरांच्याच ‘भाग मिल्खा भाग’मधे प्रचंड घाम गाळताना दिसला होता. मिल्खा सिंग यांचा जीवनपट मांडणारा हा सिनेमा फरहानने आपल्या अभिनयाने आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीने कुठच्या कुठे नेऊन ठेवलाय.

ब्रिटीशांकडून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या बदल्यात वाट्याला आलेली फाळणी, त्यातून झालेल्या दंगली, मिलिटरी प्रशिक्षण, वंशवाद, इत्यादींवर आधारित दमदार उपकथानकांच्या जोरावर ‘भाग मिल्खा भाग’ने यश मिळवलं. त्यामुळे ‘तुफान’कडूनही चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. 

‘तुफान’मधलं अझीझ अली हे पात्र सध्याचा मोहम्मद अली असावा अशा रीतीने सादर केलं गेलंय. बॉक्सिंग मॅचच्या सिक्वेन्समधे गल्ली क्रिकेटला साजेशी कमेंटरी आहे. परेश रावलच्या वाट्याला आलेल्या काही डायलॉगमधून ते वारंवार प्रेक्षकांवर ठसवलंही गेलंय. पण फरहान ‘ना फुलपाखरासारखा तरल होता, ना त्याचा पंच मधमाशीसारखा विषारी होता.’ मोहम्मद अलीच्या वजनाखाली फरहान पुरता दबला गेला आणि प्रेक्षकांच्या पदरी निराशाच आली.

ध्येयापर्यंतचा ‘सिनेमॅटिक’ प्रवास

मग बायोपिकचा मुखवटा धारण करून आलेला हा अझीझ अली नक्की होता तरी कोण? हा खरा की खोटा? फक्त बॉक्सिंगमधे नाही तर एकंदर क्रीडाक्षेत्रात कित्येक अझीझ अली असेच दबले जात असतील का? अशा प्रश्नांचं डोक्यात वादळ सुरू होतं.

क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, जलतरण, कबड्डी, बॉक्सिंग, कुस्ती, धावण्याच्या शर्यती, नेमबाजी, बैलगाडा शर्यती, जलीकट्टू, स्केटिंग, बॅडमिंटन, बाईक रेसिंग अशा कित्येक खेळांवर आशयघन सिनेमा भारतीय सिनेमासृष्टीने बनवलेत. त्यातले काही सिनेमे काही प्रसिद्ध खेळाडूंच्या जीवनावर आधारित आहेत.

या सिनेमांमधली प्रमुख व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखेचा तिच्या ध्येयापर्यंतचा एकंदरीत ‘सिनेमॅटीक’ प्रवास पाहता हे खेळाडू कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत येतात? झटक्यात मिळालेल्या प्रसिद्धीला कसे सामोरे जातात? त्यांच्या लेखी, यशाची व्याख्या नेमकी काय असते? त्यांना मिळालेला पाठींबा त्यांच्या यशापयशात कोणती भूमिका पार पाडतो?

त्यांच्या यशापयशाचा, वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा तत्कालीन समाजमनावरचा प्रभाव नेमका कसा असतो? सिनेमात दाखवतात तसं हे चित्र खरंच एका रात्रीत पालटतं का? अशा प्रश्नांच्या फैरी मनात झडू लागतात. भारतातल्या क्रीडाक्षेत्राचा आरसा समजले जाणारे एकेक बायोपिक डोळ्यांसमोर झरझर तरळू लागतात.

हेही वाचा :  इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

बॉलीवूड मसालेपटांचा शिक्का

गेल्या दशकात आलेल्या मिल्खा सिंग, मेरी कोम, बुधिया सिंग, गीता-बबिता फोगाट, पानसिंग तोमर, महेंद्रसिंग धोनी, सायना नेहवाल, मोहम्मद अझरूद्दीन अशा खेळाडूंवरच्या बायोपिकने भरपूर प्रसिद्धी मिळवली. यातले बरेचसे सिनेमे बॉक्सऑफीसवर अपयशी ठरले असले तरी आशयाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले.

या सगळ्या बायोपिक सिनेमांचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे, क्रिएटिव लिबर्टीच्या नावाखाली अवास्तव आणि नाट्यमय घटनांना मूळ कथेपेक्षा अकारण अधिक महत्त्व देऊन दाखवलेला मध्यवर्ती पात्राचा संघर्षमय प्रवास! मग ते प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या सिनेमाशी जोडून ठेवणारी ‘भाग मिल्खा भाग’मधली मिल्खासिंगच्या अपयशासाठी कारणीभूत ठरलेली हाक असो किंवा ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मधे धोनीच्या पूर्वप्रेयसीने त्याची पहिली मॅच पाहणं असो. 

असे कित्येक प्रसंग सिनेमातलं मनोरंजन वाढवतात खरे. पण प्रत्यक्षात अशा घटना घडल्याच नसल्याचं लक्षात आल्यावर भ्रमनिरास होतो. एखाद्या ‘बायोपिक’मधे कितीही वास्तविकता आणली तरी त्याच्यावर बॉलीवूड मसालेपटांचा शिक्का मारल्याशिवाय तो प्रदर्शित होऊच शकत नाहीत, हे कटू सत्य २०१४ला आलेल्या ओमंग कुमार दिग्दर्शित ‘मेरी कोम’ या चित्रपटातून अधोरेखित झालंय. चवीपुरता मेलोड्रामा भरलेला हा सिनेमाही बॉक्सिंगवरच आधारित होता, हे विशेष!

उपकथाच बनतात यशाची कारणं

मैदानातले खेळाडू पडद्यावर हिरो किंवा हिरॉईनचं रूप धारण करत असल्याने त्याला टिपिकल मसाला सिनेमाछाप नृत्य किंवा गायन करणं अपरिहार्य ठरतं. इथूनच अपेक्षित वास्तविकतेला छेद देत सिनेमा त्या खेळाडूच्या हिरो बनण्याकडे प्रवास करू लागतो. त्या खेळाडूने निव्वळ आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर मिळवलेलं यश दुय्यम ठरवलं जातं. सिनेमाची रंजकता वाढवण्यासाठी जन्माला घातलेल्या उपकथानकांना त्या यशाची प्रमुख कारणं म्हणून रंगवलं जातं.

मग कधी हा हिरो समाजव्यवस्थेत भरडला गेलेला, शोषणाचा बळी ठरलेला असतो तर कधी तो प्रेयसीने, मित्राने किंवा नातेवाईकाने केलेल्या अपमानाने डिवचला गेलेला असतो. कधीकाळी आपला खेळ गाजवूनही इतर कारणांमुळे बहिष्कृत केला गेलेला खेळाडू प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करून नव्या दमाच्या खेळाडूंना हरवताना दिसतो. 

तर कधी अगदीच साधारण कौशल्यांचा वापर करून तो नव्या तंत्रज्ञानावर मात करताना दिसतो. बऱ्याचदा काही अतिशयोक्तीपूर्ण उपकथानके जोडून त्या खेळाडूने केलेल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला जातो. या सर्वच गोष्टी ‘बायोपिक’ या शब्दाचं वजनच काढून घेतात.

हेही वाचा : दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

प्रतिमासंवर्धनाचं माध्यम?

‘एम. एस. धोनी’चा निर्माता असलेल्या अरुण पांडेंच्या मते, अशा चुका म्हणजे फक्त जाणूनबुजून पसरवलेल्या अफवा असतात. त्याचं उगाच अवडंबर केलं जातं. त्यामुळे या चुकांना सिनेमात दाखवून त्या खेळाडूच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं योग्य दिसत नाही. पांडेंचं हे मत सिनेमाच्या कमर्शियल सक्सेससाठी महत्त्वपूर्ण ठरत असलं तरी ते सिनेमाला ‘बायोपिक’ म्हणून सादर करण्यासाठी मारक ठरतं.

असे सिनेमे एक जीवनपट म्हणून ओळखले जाण्यापेक्षा प्रतिमासंवर्धनाचं एक माध्यम म्हणून ओळखले जातात. त्यातल्या उपकथाही निव्वळ खोट्या कुबड्या वाटू लागतात. क्लायमॅक्समधे संपूर्ण लक्ष हिरोच्या झगमगत्या यशावर केंद्रित केल्याने या उपकथानकांच्या अपेक्षित पडसादांचा बेमालूमपणे शेवट केला जातो.

‘क्रिएटिव लिबर्टी’ची चकाकी

याउलट, विविध खेळांना कथेचा केंद्रबिंदू ठेवून त्यावर आधारित असलेल्या पण ‘बायोपिक’ नसलेल्या सिनेमांमधे मात्र अशी दमदार उपकथानकं पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, ‘मुक्काबाज’मधला जातीयवाद हा ‘तुफान’मधल्या लव जिहादपेक्षा जास्त भिडतो. तर ‘साला खडूस’मधलं गुरुशिष्यांचं लवहेट रिलेशनशिप ‘तुफान’मधल्या पक्षपातासमोर कधीही उजवं ठरतं. क्रीडाक्षेत्रातल्या खाचखळग्यांचं वास्तवदर्शी चित्रीकरण अशा सिनेमांमधे अधिक दाहकपणे प्रेक्षकांसमोर मांडलं जातं. हे स्वतःला ‘बायोपिक’ म्हणवून घेणाऱ्या सिनेमांचं सर्वात मोठं अपयश आहे.

आजही बॉलिवूडच्या मसाला जॉनरचा आधार घेऊन कुठलीही स्पोर्ट्स फिल्म आली तर तिचं प्रेक्षकांकडून तितक्याच दणक्यात स्वागत केलं जाईल यात जराही शंका नाही. तरी एखाद्या प्रथितयश खेळाडूचा ‘बायोपिक’ म्हणून रिलीज होणारा सिनेमा हा त्या व्यक्तीचा आरसा असायला हवा. ‘क्रिएटिव लिबर्टी’ची चकाकी जरी त्या चेहऱ्यावर असली तरी त्यावरचे डागही खुलेपणाने स्वीकारले जावेत, ही प्रेक्षकांची मागणीही तितक्याच ‘खिलाडूवृत्ती’ने तमाम फिल्ममेकर्सनी स्वीकारायला हवी.

हेही वाचा : 

विराट असा कसा तू वेगळा वेगळा

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?