'व्हॉट्सअ‍ॅप'वरली भांडणं, एकमेकांच्या जीवावर उठलीत!

०४ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


पुण्यात गेल्या आठवड्यात भयानक घटना घडलीय. व्हॉट्सअ‍ॅप गृपमधून रिमूव्ह केलं, यावरून झालेलं भांडण हाणामारीपर्यंत गेलं. शेवटी या मारामारीत गृप अ‍ॅडमिनची जीभच कापली गेलीय. सोशल मीडियावरची शाब्दिक हिंसा ही ट्रोलिंग, कॅन्सलिंग पासून आता कोणत्या थराला पोचतेय, याची साक्ष देणारी ही घटना आहे. या घटनेचं गांभीर्य घटनेच्या पलिकडे जाऊन पाहायला हवं.

आज काल स्मार्टफोन वापरणारा जवळपास प्रत्येकजण किमान आठ-दहा व्हॉट्सअ‍ॅप गृपमधे असतो. त्यातल्या काही गृपमधे हे कर्तव्य म्हणून राहावं लागतं, तर काही गृपमधे आपण मनापासून सहभागी असतो. जे काही कारण असेल ते असेल, पण आपण व्हॉट्सअ‍ॅप गृपमधे असतो, हे आजच्या घडीचं अटळ सत्य बनलंय. या गृपमधे अनेकदा भांडण होतं, त्याची कारण वेगवेगळी असतात. ही भांडणं आता शाब्दिक उरली नसून, ती आता हिंसक होऊ लागली आहेत.

समाज म्हणून आपण कुठे आहोत, असा प्रश्न पडावा अशा काही घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. आपण ज्या व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग दिवसातून अनेकदा तीन ते चार तास करतो, त्याच्यात नक्की काय घडतंय हे समजून घेणं गरजेचं आहे. व्हॉट्सअ‍ॅप असो किंवा अन्य कोणताही सोशल मीडिया, त्याच्या किती आहारी जायचं हे आपण ठरवायचंय. पण आपण अनेकदा यात फरफटत जातो. त्यामुळे काळजी घ्यायलाच हवीय.

पुण्यात नक्की काय घडलं?

ही घटना आहे, पुण्यातल्या हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली. २८ डिसेंबर २०२२ रोजी रात्री दहाच्या सुमारास फुरसुंगीतल्या ओम हाईटस सहकारी गृहनिर्माण सोसायटीत घडली. या इमारतीच्या रहिवाशांच्या असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप गृपमधे त्यातल्या पोस्टवरून संघर्ष झाला. त्यामुळे सुरेश किसन पोकळे यांनी आपल्याला 'ओम हाईटस ऑपरेशन' या गृपमधून का काढलं, असा मेसेज किरण हरपळे यांना केला. 

हरपळे यांनी पोकळे यांच्या मेसेजला काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे पोकळे यांनी हरपळे यांना फोन करुन भेटायला बोलावलं. तिथं पुन्हा दोघांची बाचाबाची झाली. हरपळे यांनी गृपमधे कोणीही काहीही पोस्ट टाकत आहेत, म्हणून गृप बंद केलाय असं सांगितलं. त्यावरून पोकळे यांनी मारहाण सुरू केली. ही मारहाण एवढ्या पातळीवर गेली की, त्यात हरपळे यांची जीभ कापली गेलीय.

किरण हरपळे यांची पत्नी प्रीती हरपळे यांनी याबद्दल हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यानुसार सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला गेलाय. हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. शेळके पुढचा तपास करतायत. 

हेही वाचा: सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही

स्टेटसवर खुनाच्या बदल्याची धमकी

व्हॉट्सअ‍ॅपच्या गैवापरासंदर्भात आणखी एक घटना पुणे परिसरातच ऑक्टोबरमधे घडलीय. झालंय असं की, २५ ऑक्टोबर रोजी जाधववाडी सीएनजी पंपाजवळ पवन लष्करे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला. या खूनाचा बदला घेऊ, अशा आशयाचा स्टेटस आतीश काळे आणि अर्जून वंजारी यांनी ठेवला. त्यावरून झालेल्या तक्रारीमुळे त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे प्रकरण स्थानिक गुंडगिरी, हाणामारीचं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी त्यांचा मित्र पवन लष्करे याचे फोटो वापरून वीडियो तयार केला आणि तो स्टेटसवर ठेवला. त्यात त्यांनी 'ए दोस्त अपनी दोस्ती की मिसाल एक ना एक दिन जरूर देंगे, चाहे कितने भी दिन गुजर जाए तेरे मौत का बदला हम जरूर लेंगे' असा आवाज लावला होता.

या सगळ्याचा परिणाम शेवटी असा झाला की, आतीश काळे आणि अर्जून वंजारी यांनाही पोलीस ठाण्याची हवा खावी लागली. व्हॉट्सअ‍ॅप गृप असो की व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आपण कुठे कसं व्यक्त होतोय, याचं भान न बाळगल्यानं काय होऊ शकतं, याचं उत्तम प्रत्यंतर या सगळ्या प्रकरणावरून येतं. सोशल मीडियाचा गैरवापर करून हिंसा कोणत्या पातळीवर जाऊ शकते, हे पाहणं भीषण ठरतंय.

व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर गुन्हेगारांच्या पथ्यावर

व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वी ‘फोटो सेट टू सी वन्स’ हे नवीन फिचर लॉंच केलंय. या नवीन फीचरमुळे एखाद्या व्यक्तीने पाठवलेला फोटो-वीडियो, आपण फक्त एकदा बघू शकतो. त्यानंतर आपल्याला तो फोटो-वीडियो परत बघता येत नाही. पण या नव्या फीचरमुळे अट्टल गुन्हेगारांकडून सायबर गुन्हा करुन पुरावा नष्ट करण्याची भीती सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी 'मटा'च्या बातमीमधे व्यक्त केलीय.

देशभरात सध्या ५३् कोटी युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. ज्या वेगाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढतेय, त्याच वेगाने सायबर गुन्हेगारी सुद्धा वाढतेय. सायबर गुन्हेगारीचं स्वरूप व्यापक असलं तरी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून होणारी गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात आहे. गुन्हे करुन पुरावे मिटवण्याचं साधन म्हणूनही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर होतोय.

नवनवे फीचर वापरुन हे गुन्हेगार गुन्हे करतात आणि प्रबळ पुराव्यांअभावी कायद्याच्या कचाट्यातून सुटतात, आणि पुन्हा गुन्हे करायला मोकाट असतात. अशाच गुन्हेगारांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचं ‘फोटो सेट टू सी वन्स’ हे फिचर गुन्हे करुन पुरावे मिटवण्याचं साधन ठरु शकतं. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या प्रत्येकाने सावध राहण्याची गरज तज्ञ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: ट्रम्पना सोशल मीडियातून बॅन करण्याची मागणी का होतेय?

व्हॉट्सअ‍ॅपवरचं राजकारण

व्हॉट्स्अ‍ॅप हा प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून किंवा एकंदरीतच सोशल मीडियावर आजवर अनेक गृप्समधे राजकीय विषयावरून होणारी भांडणे ही नेहमीचीच झाली आहेत. राजकीय विचारधारेवरच्या भांडणांमुळे अनेक कुटुंबांमधे, इमारतीमधे, नातेवाईकांमधे, मित्रांमधे नाती दुभंगली आहेत. आपली विचारधारा आणि नातं यांची होणारी ही गल्लत पुढे कोणत्या पातळीवर जाईल, याचा नेम आज उरलेला नाही.

गृप सोडणं, एकमेकांशी न बोलणं इथपासून एकमेकांना ट्रोल करणं इथपर्यंत अनेक प्रकार देशभर झालेले आहेत. त्यामुळे आपल्या गृपवर राजकारणावर चर्चा करायची नाही, असं काही गृपनी ठरवलंय. पण राजकारण हा असा विषय आहे की, तो कोणत्याही मुद्द्यावरून सुरू करता येतो. त्यामुळे अनेक गृपमधे राजकारण नको, असा नियम असतानाही राजकारण येतं आणि भांडणे वाढतात.

साधारणतः जे विचार पटत नाहीत, ते विचार ऐकायचेच नाहीत अशी हटवादी आणि एकाग्रही भूमिका वाढलेली आहे. त्यामुळे आपल्याला न पटणारे विचार मांडूच द्यायचे नाहीत, अशी अरेरावी मोठ्या प्रमाणात होताना दिसते. त्यामुळे संवाद बंद होऊन अनेकदा हे गट हमरीतुमरीवर येतात आणि नंतर त्याचं रुपांतर शाब्दिक हिंसेत होते. गेल्या काही वर्षात ही प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत, हे आपल्याला सहजरित्या कळेल.

माणसं आहेत, हे विसरून चालणार नाही

एखाद्या माणसाचा विचार आपल्याला पटला नाही किंवा त्याचं वर्तन आपल्याला आवडलं नाही, तर भांडणावर उतरण्याआधी प्रत्येकानं शांतपणे विचार करायला शिकायला हवं. आपलंच म्हणणं खरं अशी भूमिका घेणं म्हणजे भविष्यातल्या हिंसेला आमंत्रित करणं आहे, याचं भान आज आपण हरवत चाललोय. त्यामुळे सोशल मीडियावर वागताना संयम बाळगणं गरजेचं आहे, हे वरच्या अनेक उदाहरणांवरून आता स्पष्ट होऊ लागलंय.

इमारतीतले प्रश्न असो किंवा देशाच्या राजकारणातील मुद्दे असोत, एखाद्या धार्मिक गोष्टीसंदर्भातला मुद्दा असो किंवा आपल्या आवडत्या गायकाबद्दलचा मुद्दा असो, सोशल मीडियावर आक्रमकपणे भांडणं हे आज नेहमीचं होताना दिसतंय. हीच भांडणं उद्या गटातटांना आमंत्रित करतायत आणि त्यावरून संघर्ष होऊ लागलेत. 

भविष्यात हे संघर्ष वाढू नयेत, म्हणून 'रिस्पॉन्सिपल नेटिझन'सारख्या चळवळी आता आकार घेऊ लागल्या आहेत. त्यात आपले विचार संयतपणे कसे मांडावेत इथपासून इंटरनेटवर होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला कसं वाचवायचं, याचं प्रशिक्षण दिलं जातंय. गरज आहे ती प्रत्येकानं नेटिझन म्हणून आणि सर्वात आधी माणूस म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची.

हेही वाचा: 

फेसबुक झालंय 'बुक्ड'!

मीम्सवादाचा भावनिक जांगडगुत्ता!

सोशल मीडियाच्या फोडणीसाठी अॅक्सिडेंटलचा मसाला

आयट्यून बंद झालं, आता आपल्याला हे ३ पर्याय मिळणार