आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?

२२ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज जागतिक जल दिन. एचटूओ हा पाण्याचा केमिकल लोच्या सांगणारा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांनाच माहितीय. पण पाणी म्हणजे त्या पलिकडे भरपूर काही असतं. वेदांपासून डार्विनपर्यंत सगळ्यांनीच पाण्याची थोरवी गायलीय. आईच्या पोटातल्या पाण्यामुळंच आपल्या जन्म झालाय. हे सगळं आपल्याला माहीत असतानाही आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?

ही संपूर्ण पृथ्वी प्रामुख्यानं दोन गोष्टींनी बनलीय. एक जमीन आणि दुसरं पाणी. पृथ्वीवरचा ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यातलं फक्त २.५ टक्के पाणी पिण्यालायक आणि वापरण्यालायक असतं. उरलेला संबंध भाग समुद्राच्या खारट पाण्यात गेलाय.

आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असतं. आपला मेंदू आणि हृदय हे ७३ टक्के पाण्याचं बनलेलंय. फुफ्फुस तर ८३ टक्के पाण्यापासून बनलीयत. आपल्या त्वचेला ६४ टक्के पाणी लागतं. इतकंच काय तर आपल्या हाडांचाही ३१ टक्के भाग पाण्याने बनलेला असतो. ही सगळी वैज्ञानिक माहिती माहीत असतानाही गेल्या कित्येक शतकांपासून आपण म्हणतोय की पाणी हेच जीवन. आज या पाण्याविषयी बोलण्याचा दिवस म्हणजेच जागतिक जल दिन.

हेही वाचा : भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

पाण्यामुळे हवामान बदल थांबवता येईल

दरवर्षी २२ मार्च या दिवशी पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक जल दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव युनायडेट नेशन्स अर्थात यूएननं १९९२ मधे मांडला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९९३ पासून जागतिक जल दिवस साजरा केला जाऊ लागला. जगातल्या प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी मिळेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत याची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस साजरा करायचं ठरवण्यात आलं होतं. त्यासाठी शुद्ध पाणी देणारे स्रोतही निर्माण करावे लागतील हेही लक्षात घेतलं गेलं. 

यूएनकडून जागतिक जल दिनासाठी दरवर्षी एक थीम ठरवली जाते. त्याप्रमाणे पाणी आणि हवामान बदल अशी यंदाची थीम ठरवण्यात आलीय. हवामान बदलाचा पाण्याच्या स्रोतावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि पाण्याचा वापर करूनच हवामान बदल थांबवू शकतो, असं यूएनचं म्हणणं आहे. सोबतच कोरोनाचा हाहाकार पाहता पाणी आणि हॅण्डवॉश यावरही लक्ष केंद्रीत करायचं यूएनने ठरवलंय.

दरवर्षी २२ मार्च रोजी वर्ल्ड वॉटर डेवलमेंट रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. पाण्यासंदर्भातल्या योजना ठरवण्यासाठी कोणती साधनं वापरली जाऊ शकतात याची माहिती या रिपोर्टमधे दिलेली असते. शिवाय, यूएनच्या थीमचीही माहिती दिलेली असते. यंदा हा रिपोर्ट सोमवारी म्हणजे २३ मार्चला प्रसिद्ध होणार होता. पण कोरोनामुळे त्याचं प्रकाशन पुढे ढकलण्यात आलंय, असं यूएननंच आपल्या वेबसाईटवर जाहीर केलंय.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!

पाणी जगाचं मुलतत्त्व

हा जागतिक दिवस १९९२ मधे सुरू झाला असला तरी त्या आधी लोकांना पाण्याचं महत्त्व कळतच नव्हतं, असं काही नाही. आपल्या वेदांनी पाण्याची थोरवी गायलीय. बायबलमधे देवाने सगळ्यात पहिलं पाण्यातलं जग निर्माण केलं, असं म्हटलंय. नंतर डार्विननेही त्याच्या थिअरीमधे पहिला जीव पाण्यात निर्माण झाला असावा, असं सिद्ध केलंय. पाण्यातला हाच जीव नंतर पृथ्वीवर आला आणि हजारो, लाखो वर्षांचा उत्क्रांतीचा प्रवास करून आजच्या माणसासारखा झाला. तरी त्याची पाण्याबरोबर असलेली नाळ तुटली नाही. माणसासाठी आजही पाणी हेच जीवन आहे.

इतकंच नाही, तर ग्रीकमधला पहिला तत्त्वचिंतक थेलिस यालाही पाणी हेच सगळ्या जगाचं सार आहे असं वाटत होतं. ही पृथ्वी म्हणजे पाण्यावर तरंगणारी एक तबकडी आहे, असं तो म्हणत असे. पाणी ही एकमेव अशी गोष्ट आहे जी द्रव, घन आणि वायू अशा तिन्ही स्वरूपात उपलब्ध असते. पाण्याचा बर्फ होतो आणि पाण्याची वाफही होते. त्यामुळेच पाणी हेच या विश्वासचं मुलतत्त्व आहे असं थेलिस म्हणत असे.

पाण्यात नव्या गोष्टी निर्माण करायची ताकद असते. पृथ्वीवर पाऊस येतो तेव्हा त्या पावसाच्या पाण्याला कुठलाच रंग नसतो. पण एकदा हे पाणी पृथ्वीवर आलं की या जमिनीवर लाखो रंग फुलवतं, अशी कल्पना एका स्पॅनिश कवितेत केलेली आहे.

हेही वाचा : भाषणांचा सुकाळ, भीषण दुष्काळ

पाणी कधीच एचटूओपुरतं मर्यादित नसतं

जागतिक पाणी दिवस म्हणजे पाण्याबद्दलच्या प्रश्नांबद्दल माहिती करून घेण्याची एक संधीच समजायला हवी. त्यासाठी प्रयत्न करून जगातल्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं पाणी मिळेल यासाठी फक्त यूएन किंवा फक्त सरकारने नाही तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.

पूर्वी भारतात पाण्याची विभागणीही जातवार पद्धतीनं केलेली होती. नदीचा वरचा भाग हा वरच्या जातीतल्या लोकांसाठी राखीव असायचा. तिथलं शुद्ध पाणी लोक वापरायचे. तिथं आपली गुरं धुवायचे, भांडी धुवायचे आणि तिथून खाली वाहत आलेलं अशुद्ध पाणी दलितांसाठी म्हणजेच कथित खालच्या जातींसाठी ठेवलेलं असायचं. आजच्या पाणी दिवसाच्या निमित्तानं वरून टाकलेलं पाणी ओंजळ करून पिणाऱ्यांना काय वाटत असेल याचा आपण एकदा विचार करायला हवा.

आज काहींच्या घरात, शहरांत रोज २४ तास पाणी वाहत असतं. पण पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या दुष्काळग्रस्तांची आठवण या दिवशी काढायला हवी. पाण्यामुळे शिक्षण सोडावं लागणाऱ्या मुलींचे डोळे पहायला हवेत. कुठल्याशा शहराची तहान भागवण्यासाठी धरणाच्या पाण्यात बुडलेल्या गावाची हकीकतही ऐकायला हवी. पाणी कधीही फक्त एच टू ओ का नसतं हेही समजून घ्यायला हवं.

हेही वाचा : 

पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!

काकडधरा गावानं वॉटरकप स्पर्धा जिंकली पण

नदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत?

कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?

तेलंगणाने गोदावरीवर कसं उभारली जगातली सर्वांत मोठी पाणीउपसा योजना?