मेकॅनिकल बोर्डचा क्लिकक्लिकाट किती गरजेचा?

१० जून २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


सध्याच्या डिजिटल युगात कीबोर्ड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट झालीय. पण साध्या कीबोर्डने टाइप करताना अनेक चुकाही राहतात. त्यामुळेच स्प्रिंगचा वापर केलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या ट्रेण्डमधे आहे. या कीबोर्डनं टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळतो.

टेक्नॉलॉजीचं  युग आलं तसं टाइपराटरच्या टकटकीनं भारतातल्या जवळपास सगळ्या लोकांचं आयुष्य व्यापलं. अगदी आपल्या साहित्यातही या आवाजाच्या अवतीभोवती कथा फिरू लागली. तसा मान कीबोर्डला मिळालेला नसला तरी आजच्या काळात टाइपरायटरसारखं कीबोर्डनंही आपलं आयुष्य व्यापलंय. फक्त ऑफिसातच नाही तर घराघरात हा कीबोर्ड जाऊन बसलाय. टायपिंगसोबतच, ऑफिसमधल्या इतर अनेक कामांसाठी, अभ्यासासाठी, गेम खेळण्यासाठीही या कीबोर्डचा उपयोग होतो. 

आपल्याला कशासाठी कीबोर्ड वापरायचाय त्यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकारही बाजारात आहेत. सिनेमा बघण्याची हौस असणाऱ्यांना मल्टीमिडीया कीबोर्ड बरा वाटतो. फिरण्याची हौस असेल तर फ्लेक्झिबल म्हणजे अक्षरशः घडी होणारा कीबोर्ड हवा असतो. गेमिंगचा कीबोर्ड, वायरलेस, एर्गोनोमिकपासून ते मोबईलमधल्या वर्चुअल कीबोर्डपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी कीबोर्ड आहे. पण या सगळ्याला पुरुन उरणारा कीबोर्डचा बाप असलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या फारच गाजतोय.

साध्या कीबोर्डचं अंतरंग

सर्वसाधारणपणे कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला असतो त्याला मेम्बेरन कीबोर्ड म्हणतात. इंग्लिश अल्फाबेट्सच्या तीन ओळी, एक नंबरची ओळ, मधे स्पेसचं मोठालं बटन, आपल्याला वापरताही येत नाहीत इतकी विरामचिन्हं आणि उजव्या हाताला ऍरो कि सोबत पुन्हा आकड्यांचं एक नम पॅड. साधारण असा कीबोर्ड आपण सगळेच वापरतो.

असा मेम्ब्रेन कीबोर्ड कॅल्क्युलेटर, टीवीच्या रिमोटलाही असतो. समजा आपण टीवीचा रिमोट उघडून पाहिला तर वरच्या टणक बटणांखाली आतमधे एक मऊ रबरचं मेम्ब्रेन दिसतं. यावर बटणांच्या खुणा केलेल्या असतात. त्याखाली असतं सर्किट बोर्ड.

आपण बटण दाबतो तेव्हा रबर मेम्ब्रेन एक भाग खालच्या सर्किट बोर्डला स्पर्श करतो. आणि आतमधे असणाऱ्या इलेक्ट्रिक वायर चालू होतात. आपण आपलं बोट वर उचललं की लगेचच रबर मेम्ब्रने त्याच्या आधीच्या आकारात येतं आणि त्याचा सर्किटशी झालेला संपर्क तुटतो. हे कीबोर्ड जास्त वापरले जातात कारण ते स्वस्त असतात. पण त्यामुळे टाइप करताना अनेक अडचणी येतात.

हेही वाचा : मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?

मेकॅनिकल कीबोर्ड म्हणजे काय?

मेम्ब्रेन कीबोर्डने गरजेच्या त्या सगळ्या गोष्टी करता येतात. यात शंका नाहीच. पण अनेकदा आपण पटापट टाइप करत असलो की काही अक्षरं गाळली जातात. अनेकदा एखादं बटन आपण दाबलंय असं आपल्याला वाटत असतं पण प्रत्यक्षात ते दाबलंच जात नाही. त्यामुळे या कीबोर्डवर टाईपिंग करताना हातालाही खूप ताण येतो. शिवाय गेम खेळताना, कोडिंग करताना कीबोर्डची बटणं भराभर दाबावी लागतात. तेव्हाही हा मेम्ब्रेन कीबोर्ड नीटसं काम करत नाही.

एखाद्याने मेकॅनिकल कीबोर्ड वापरला असेल तर त्याला मेम्ब्रेन आणि मेकॅनिकल कीबोर्डमधला हा फरक लगेच जाणवतो. बोटांचं हळूवार फिरणं, एखादं बटण सहज पटकन दाबलं जाणं, दाबल्यानंतर येणारा क्लिक असा आवाज याने कीबोर्ड वापरणं फारच सोपं जातं. 

एकतर, मेम्ब्रेन कीबोर्डमधे असणाऱ्या इलेक्ट्रिक स्वीचऐवजी या कीबोर्डमधे प्रत्येक बटणाखाली मेकॅनिकल स्वीच असतं. म्हणजे, रबर मेम्ब्रेनऐवजी इथं अधिकच चिन्ह असतं त्यासारख्या स्टेम आणि स्प्रिंग लावलेल्या असतात. यामुळे बटणावर हलकं बोट ठेवलं तरी स्प्रिंगमुळे ते लगेच दाबलं जातं. शिवाय टाइपरायटरसारखा मोठा क्लिक असा आवाजही होतो. त्यामुळे बटण दाबलं गेलंय की नाही हे एकाचवेळी आपल्या बोटांना आणि कानालाही कळतं.

कीबोर्डचं सौंदर्यशास्त्र

यामुळेच मेकॅनिकल कीबोर्डने टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली असली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळता येतं. त्यामुळेच गेमिंग, मल्टिमीडिया, टायपिंग अशा अनेक कीबोर्डचं काम एकाच मेकॅनिकल कीबोर्डमधून होऊ शकतं. याशिवाय, या कीबोर्डमधे विविधताही भरपूर असते. मेम्ब्रेनसारखं एकाच साच्यातले सगळे कीबोर्ड नसतात. आपल्या गरजेनुसार आपण कीबोर्ड निवडू शकतो. रंगं, मटेरिअर यामधेही अनेक पर्याय उपलब्ध असतात.

मेम्ब्रेन कीबोर्ड एकाच काळ्या, पांढऱ्या नाहीतर करड्या रंगात येतो. तर मेकॅनिकल कीबोर्डमधे आपल्याला हवं तसं अनेक रंगांचं कॉम्बिनेशन करता येतं. अनेकांना उजवीकडे असणारं नंबरचं नम पॅड लागत नाही. अशावेळी ते गाळता येतं. नम पॅड लागत नाही पण ऍरो की लागतात. मग फक्त नम पॅड गाळून तेवढ्याच ठेवता येतात.

मेम्ब्रेम कीबोर्डपेक्षा मेकॅनिकल कीबोर्ड जास्त टिकतात. २ ते १० कोटीवेळा आपण मेकॅनिकल कीबोर्डची प्रत्येक बटण वापरू शकतो. तरीही ती लवकर खराब होत नाही. तर मेम्ब्रेन कीबोर्डच्या बटणांनी आत्तापर्यंत ५० लाख ते १ कोटीपर्यंतच साथ दिलीय. मेकॅनिकल कीबोर्ड जास्त जड, टणक आणि जास्त चांगल्या पद्धतीने तयार केलेले असतात.

हेही वाचा : फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

मेकॅनिकल बटणांचा क्लिकक्लिकाट

मेकॅनिकल कीबोर्ड एवढे खास असतात तर मग मेम्ब्रेन सोडून आपण तेच का वापरत नाही? यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मेकॅनिकल कीबोर्ड खूप महाग असतात. अमेरिकेत साधारणपणे २०० डॉलरला एक मेकॅनिकल कीबोर्ड मिळतो. म्हणजे भारतातले १४ हजार रुपये. भारतात हे कीबोर्ड साधारण तीन ते चार हजाराला मिळतात.

शिवाय, हे कीबोर्ड खूप आवाज करतात. त्यांच्या क्लिकक्लिकाटात घरातला झोपलेला माणूस जागा होईल. तसंच, ऑफिसमधे आपल्या सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा त्रास होईल. इतकंच काय, तर त्याच्या आवाजात कधीकधी आपलंही लक्षं कामावर नीट लागत नाही. शिवाय, जड असल्याने इकडून तिकडे नेता येत नाही.

सध्या बाजारात चीनमधे बनवलेले कमी आवाज करणारे, कमी किंमतीचेही काही कीबोर्ड उपलब्ध आहेत. पण सतत टायपिंग करावं लागत असेल, कोडिंग वगैरे असेल तरच मेकॅनिकल कीबोर्डची गरज पडते. डाटा एण्ट्रीसारखी काही साधी काम करायची असतील तर साधा कीबोर्डही चालतो. तरीही गेम वगैरे खेळण्यासाठी काही लोक हौसेने मेकॅनिकल कीबोर्ड विकत घेतात. पण एकदा मेकॅनिकल कीबोर्ड वापरायला सुरवात केली की पुन्हा मेम्ब्रेन कीबोर्ड वापरणं फारच अवघड जातं हे लक्षात ठेवून निवड केली पाहिजे.

हेही वाचा : 

 नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!

 कोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर!

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय