सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको.
आज सकाळीच सकाळी बातमी मिळाली. बाब्या आणि नाऱ्यामधे थर्टी फर्स्टच्या पार्टीत जोरदार भांडण झालेलं. सकाळी दारातला पेपर उचलायला दार उघडलं तर राणे काकू लागलीच आत शिरल्या. पेपरमधल्या बातम्या वाचण्याआधीच नेने काकूंनी सोसायटीतलं बातमीपत्र ओकलं. बातमीचा मथळा काय तर पार्टीत, ‘बेशरम रंग गाणं वाजवायचं नाही कारण पठाण बॉयकॉट करायचाय’- बाब्या उर्फ बाबुराव गणपतराव आपटे.
सकाळचा चहा घ्यायला थेट आपट्यांच्याच घरी गेले. चहाचा पहिला घोट घेण्याआधी आपट्यांचे चिरंजीव डोळे चोळत बाहेर आले. मला पाहताच त्यांची गर्जना- मी नाऱ्याला 'कॅन्सल' करणार सोसायटी ग्रुप मधून. मी म्हटलं, बाब्या, लेका आज ३ जानेवारी २०२३, अजून तुझी थर्टी फर्स्टची उतरली नाही की काय? तर तो म्हणतो कसा मी Woke आहे. मी म्हटलं, अरे Woke नाही Awake असतं ते. त्यामुळे woke नको होऊस Awake हो! यावर बाब्याचं उत्तर ऐकताच मी कपाळाला हात लावला!
हेही वाचा: आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच
बाब्याचं उत्तर तुम्हाला मी सांगतेच पण त्याआधी बाब्या आणि मी काय बोलत होतो ते समजून घ्या. बाब्या नाऱ्याला कॅन्सल करणार म्हणजे काय तर बाब्या नाऱ्याला बॉयकॉट करणार. अशाप्रकारे एखाद्याला, एखाद्या कलाकृतीला बॉयकॉट करणं म्हणजेच 'कॅन्सल कल्चर'चाच एक भाग. सध्या बॉयकॉट बॉलीवूड जबरदस्त ट्रेंडिगमधे आहे. आला सिनेमा की करा बॉयकॉट अशी प्रथा मागच्या वर्षात सुरु झालीच आहे. पठाणच्या निमित्ताने या वर्षात ती सुरुच राहील.
कॅन्सल कल्चर, किंवा कॉल-आउट कल्चर २०१०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २०२० च्या सुरवातीला सुरु झालं. त्यात एखाद्याला सामाजिक किंवा व्यावसायिक वर्तुळातून बाहेर काढलं जातं. मग ते ऑनलाइन असो, सोशल मीडियावर, किंवा वैयक्तिकरित्या. कॅन्सल कल्चर म्हणजे एखाद्याला त्याच्या किंवा तिच्या मतांसाठी, कृतींसाठी प्रतिबंधित करता. बॉयकॉट बॉलीवुड हे भारतातल्या कॅन्सल कल्चरचाच एक भाग.
हॅरी पॉटरच्या जन्मदात्या जे. के रोलिंग या कॅन्सल कल्चरच्या बळी ठरल्या. स्कॉटलंडमधे लिंग चाचणीबाबत नवीन कायदे करण्यात आले. स्कॉटलंड पोलिसांचं म्हणणं होतं की, बलात्कार किंवा कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपीने स्वत:ची ओळख एक महिला म्हणून दिली, तर पोलिस त्याच्या रेकॉर्डमधे त्याची नोंद एक महिला म्हणून करतील. जरी आरोपीने कायदेशीररित्या लिंग बदललं नाही तरीही.
काही स्त्रीवादी संघटनांनी या कायद्याला विरोध केला आहे. या कायद्यामुळे महिलांच्या आकडेवारीची अचूक नोंद होणार नाही आणि महिलांची वाईट प्रतिमा तयार होईल, असं स्त्रीवादी गटांचं म्हणणं आहे. हॅरी पॉटरच्या लेखिका जेके रोलिंग यांनी 'युद्ध म्हणजे शांतता. गुलामगिरी हे स्वातंत्र्य आहे. उपेक्षा हेच सामर्थ्य आहे. ज्याने तुमच्यावर बलात्कार केला ती एक स्त्री आहे.' असं ट्विट केलं. ट्रान्सजेंडर समुदायाबाबतच्या या वादळी ट्विटनंतर जे. के रोलिंग यांना अनेक नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. रोलिंग यांचं ट्विटर अकाऊंट हॅरी पॉटर फॅन्सकडूनच कॉल आऊट तसंच अनफॉलो करण्यात आलं.
हेही वाचा: इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?
कॅन्सल कल्चर हे वोक कल्चरला दिलेले उत्तर आहे. मी वोक आहे म्हणजे मी फक्त जागृत नाही तर माझ्या जाणीवा समृद्ध आहेत. मी माझी मत फक्त समाजमाध्यमांवर पोस्ट करुन थांबत नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात तसा वागतो किंवा वागते. जर कोणी वोक नसेल तर त्याच्यासाठी, ए मी अमुक एका गोष्टीबाबत वोक आहे! तू नाहीयेस का? असा भेदभाव करत नाही.
माझं वोक असणं हे माझ्या आयुष्यभरासाठी नसून मला न पटणाऱ्या विशिष्ट मुद्द्यांवर आहे. मी स्त्रीवादी महिला असून माझा टिकलीला विरोध आहे पण मला फॅशन म्हणून टिकली लावायला आवडते. याबद्दल कोणी जर त्याचे विचार मांडत नसेल, तर ती निद्रावस्थेत आहे म्हणजेच वोक नाही असं होतं का?
आता वोक असणं किंवा कॅन्सल करणं नवीनच आहे का? आणि फक्त युरोप किंवा भारतातच आहे का? आज आपण आपल्या साऊमायचा म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा जागर करतोय. पण साऊंनाही स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला म्हणून समाजाने कॅन्सल म्हणजेच बॉयकॉटचं केलेलं की! त्यांच्यावर शेण फेकणारेही स्वत:ला वोक समजत असतील. पण खऱ्या वोक होत्या साऊ आणि जोतिबा.
हे दोघे फक्त वोक झाले नाही तर आपल्या जाणीवेनुसार समाज बदलायची कृती केली. ज्ञानोबांना सन्याशाची पोरं म्हणतं वाळीत टाकणारे त्यांना कॅन्सलच करत होते. ही झाली इतिहासातली गोष्ट. अगदी आजही अनेक गावात काही कुटुंबांना वाळीत टाकलं जातं. आमच्या एका मित्रानं एक गोष्ट सांगितली की, त्यांच्या नवबौद्ध कुटुंबाला वाडीतल्या आणि नवबौद्धांनीच वाळीत टाकलंय. कारण, त्यांनी बौद्ध धर्माप्रमाणे आचरण केलं नाही, म्हणून.
आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वोक केलेल्या या समाजातले काही जण वोक झालेच नाहीत. त्यांना बाबासाहेब समजलेच नाहीत. त्यांना वोकची पुढची पायरी गाठण्यात अपयश आलं आणि त्यांनी कॅन्सल कल्चर स्वीकारलं. हे फक्त बौद्ध नाही तर, स्वतःला उच्चवर्णीय म्हणवणारेही करतात. त्यामुळे मुद्दा काय, तर अमेरिकन स्टाइलनं आज 'वोक कल्चर', ‘कॅन्लस कल्चर' अशी नावं पडली असली, तरी विषय जुनाच आहे.
हेही वाचा: द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज
बराक ओबामा म्हणतात, मी फक्त वोक असून उपयोग नाही मी त्या पुढे त्यासाठी काय करतो आहे याला महत्व आहे. मी वोक आहे, तू वोक आहेस का असा प्रश्न मी समोरच्याला विचारत नाही तर त्याची मत काळजीपूर्वक समजून घेत मला पटत नसतील तर बदलण्याचा प्रयत्न करतो. हे खरंतर कॅन्सल करण्याऐवजी चांगलं आहे.
सुधारण्याची संधी ही प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीला बॉयकॉट करुन त्याची त्या विषयावरची विचारप्रक्रियाच संपवणं हा गुन्हा ठरवला गेला पाहिजे. त्या व्यक्तीला सुधारण्याची पूर्ण संधी दिली गेली पाहिजे.
वोक हा १९३० पासून सुरु झालेला अफ्रो-अमेरिकन लोकांचा वंशवादाचा लढा आहे. हा वर्णवादाविरोधात उठवलेला आवाज आहे. पण हा फक्त रेसिझम पुरता मर्यादित नाही तर याचा आवाज २०१० पासून विस्तारला आहे. हा सेक्सिझम पासून भारतातल्या कास्टिझम पर्यंत येऊन पोचला आहे.
हिंदुत्ववादी संघटना हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठवणं, याला वोक म्हणत आहेत. पण खरंच वोक कशाला म्हणायचं हे समजण्याची गरज आहे. एखाद्याबाबत केला जाणारा न्याय हा दुसऱ्यावर अन्याय असू शकतो ही शक्यताच कोणी लक्षात घेत नाही. सोशल वर्क करणारी व्यक्ती समाजाच्या कल्याणासाठी जेव्हा तिच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करते, तेव्हा तो तिच्या मुलांवर अन्याय होत नाही का? त्यामुळेच आता अमेरिकेतल्या गौरवर्णीयांना कृष्णवर्णीयांच उदात्तीकरण हा त्यांच्यावरचा अन्याय वाटत आहेत आणि याच कृष्णवर्णीयांना ते वोक पोलिस असं म्हणत आहेत. जसे आपल्याकडे मॉरल पोलिस तसे हे वोक पोलिस.
आता बाब्याचं उत्तर जाणून घेऊ. बाब्या असं म्हणतो मी वोक नाही अवेकच आहे पण तुम्ही अवेक आहात का? मला या प्रश्नाच उत्तर शोधायला ही वाचन, संशोधन आणि लेखनमीमांसा करावी लागली. त्यामुळे तरुणांनो सोशल मिडियावर लांबच्यालांब पोष्टी टाकण्यापेक्षा तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात वोक आहात का? हा प्रश्न स्वत:ला विचारा अन् मग स्वत:पासून त्याची सुरवात करा. १९९०ला मी होमोसेक्शुअल आहे असं बोलायला घाबरणारे तुम्ही होमोसेक्शुअलिटी सेलिब्रेट करता. हेच बाब्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ही उत्तम सुरवात आहे.
हेही वाचा:
मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!
उषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार
स्त्रीवादी कामिनी रॉय यांच्या डूडलमधून गुगलला काय सांगायचंय?
रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली
फ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन