पृथ्वीचं वाढतं तापमान देतंय धोक्याचा इशारा

१३ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत.

मार्च महिन्यातल्या उकाड्याने १२१ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. हवामानशास्त्र खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमधेही अशीच परिस्थिती राहील आणि आपल्याला उन्हापासून सुटका मिळणार नाही. भारतात मार्च ते जून हा कालावधी उन्हाळ्याचा मानला जातो. पण मे महिन्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र असतात.

सरासरी तापमानापेक्षा ४.५ अंश अधिक तापमान असण्याच्या स्थितीला उन्हाच्या झळा किंवा उष्णतेची लाट म्हटलं जातं. तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा ६.४ अंशांनी अधिक असेल, तर ती गंभीर लाट मानली जाते. पण हवामानशास्त्र खात्याकडून यावर्षी पहिली उष्णतेची लाट मार्च महिन्यातच नोंदवली गेलीय.

उष्णतेच्या लाटांचा तडाखा

तेव्हापासून आतापर्यंत अशी स्थिती दहा-बारा वेळा येऊन गेलीय आणि हे अत्यंत गंभीर आहे. देशाच्या अनेक भागांमधे तीव्र उन्हाच्या झळांमुळे जंगलात आग लागण्याचे प्रकार वाढतायत. बद्रीनाथ धाम परिसरातला बर्फ वेळेच्या कितीतरी आधीच वेगाने वितळू लागलाय. हवामानात झालेला हा बदल फक्त भारतापुरताच सीमित आहे, असं नाही.

अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या ध्रुवीय प्रदेशांवरही उष्णतेच्या लाटेसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागतय. तिथलं तापमान ३० ते ४७ अंशांपर्यंत नोंदवलं जातंय. कुवेतबद्दल तर असं म्हटलं जातंय की, काही वर्षांनी हा संपूर्ण देशच मानवाला वास्तव्य करण्यायोग्य राहणार नाही. कारण तिथलं तापमान ५० अंशांच्या आसपास पोचलंय.

समुद्रही वाढत्या तापमानापासून दूर राहू शकत नाही. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याचं सातत्याने अवलोकन करणार्‍या शास्त्रज्ञांनी असा दावा केलाय की, १९८२पासून २०२०पर्यंत या सागरी प्रदेशात १५०पेक्षा अधिक वेळा उष्णतेच्या लाटेचा अनुभव आला. गेल्या ३८ वर्षांच्या कालावधीत हिंदी महासागरात उष्णतेची लाट येण्याच्या घटना चौपटीने वाढल्यात; तर बंगालच्या उपसागरात या घटना तिप्पट वाढल्यात, ही खरी चिंतेची गोष्ट आहे.

हवामानात वेगाने होत असलेले हे बदल म्हणजे जलवायू परिवर्तनाचा परिणाम आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. धोका आपल्या अगदी जवळ आल्याचे संकेत परिस्थिती आपल्याला देतेय. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या द़ृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही.

हेही वाचा: जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

शेती आणि आरोग्य धोक्यात

आरोग्यापासून शेती आणि अर्थव्यवस्थेपर्यंत काहीही या परिस्थितीच्या परिणामांपासून वाचू शकणार नाही. सरासरीपेक्षा अधिक तापमान हा आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. भारत सरकारचं राष्ट्रीय आजार नियंत्रण केंद्र तापमान आणि मृत्यू यांच्यातल्या संबंधांचा शोध घेण्यासाठी सातत्याने विश्लेषण करतंय. या विषयाकडे आणखी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जर वाढतं तापमान आणि मृतांची संख्या यात काही विशिष्ट पॅटर्न दिसून आला, तर आपल्याला अनेक मृत्यू रोखता येतील. 

वाढतं तापमान आणि उष्णतेची लाट फळे आणि अन्नधान्याच्या उत्पादनावरही थेट परिणाम करू शकते. यावर्षी मार्चपासूनच येत असलेल्या उष्णतेच्या लाटांचा परिणाम आंबे आणि लिची या फळांच्या उत्पादनावर दिसून येण्याची शक्यता आहे. जसजशा या नैसर्गिक आपत्तींची वारंवारिता वाढत जाईल, तसतसा आपल्या कृषी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होईल.

भारतासाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे कारण आपली ७० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शेतीशी जोडलेली आहे. उत्पादन घटलं तर महागाई वाढेल. हवामानात होत असलेल्या मोठ्या बदलांची कारणं जागतिक आहेत. त्यावर भारताचं नियंत्रण नाही.

स्थानिक पातळीवर या बदलांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाऊ शकतात. पण त्यावर गांभीर्याने विचारविनिमय करण्याबरोबरच तातडीने अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. हिरवाई वाढवून, पाण्याचा अपव्यय आणि मातीची धूप रोखून या दुष्परिणामांपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

प्रदूषणावर तोडगा हवा

आज देशातल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक जितक्या वेगाने खराब होत चाललाय, तितक्या वेगाने कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे वृक्षाच्छादन वाढताना दिसत नाही. सर्वांत गंभीर चिंतेचा विषय म्हणजे भारताचं फुप्फुस मानलं जाणाऱ्या ईशान्य हिमालयातलं वनाच्छादन कमी होत चाललंय. जगातल्या सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ भारतात आहेत.

एकदा हवेत सोडलेला कार्बन किमान दोनशे वर्षं वातावरणात तसाच राहतो. नैसर्गिक तेल, कोळसा आणि गॅसच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन वातावरणात होतं. जागतिक तापमानवाढीचं हेच मूलभूत कारण आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी केलेली जंगलतोड आता आपल्या मुळावर आलीय. 

प्रगतीच्या पायर्‍या चढण्यासाठी आपण इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा विचार करतो. तसंच शहरांच्या जवळपासची खेडीही आता शहरात समाविष्ट होऊ लागलीत. यामुळे जमीन वापरात मोठे बदल होत असून, या बदलांचाही परिणाम वातावरणावर होतोय. सिमेंटीकरण आणि जमीन वापरातल्या बदलामुळे तापमानवाढीला अधिकच चालना मिळालीय.

याशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून होणारं हरितगृह वायूंचं उत्सर्जनही तापमानवाढीस कारणीभूत ठरलंय. हानिकारक वायूंचा वापर अनेक क्षेत्रांमधल्या उत्पादन प्रक्रियेत केला जातो. त्यामुळे वातावरणाचा नूर पालटून तापमानवाढीचं संकट ओढावलंय आणि इथून पुढच्या काळात हे संकट वाढतच जाणार आहे, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.

हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

पृथ्वीचं तापमान वाढतंय

२०१९मधे ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञांनी इशारा देताना असं म्हटलं होतं की, पुढची पाच वर्षं ही गेल्या १५० वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक उष्ण राहणार आहेत. वातावरणाविषयी जी पूर्वानुमाने जाहीर झालीत, त्यानुसार जगाच्या तापमानात वेगाने वाढ होणार आहे. जागतिक तापमानात सरासरी १.५ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

खरं तर, गेल्या काही दशकांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतायत. याचा अर्थ असा की, शेकडो वर्षांपासून पृथ्वीचं जे सरासरी तापमान होतं, त्यात बदल होतोय. पृथ्वीचं सरासरी तापमान सध्या १५ अंश सेल्सिअस आहे. पण गेल्या काही वर्षांमधे तापमानात बदल होतोय. त्यामुळे उन्हाळ्याचा काळ वाढतोय आणि हिवाळ्याचा काळ लहान होत चाललाय.

पर्यावरणवादी आणि वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वी२ अंश तापमान वाढ सहन करू शकेलही. पण २ अंश तापमानाची वाढ खूप भयानक आणि विध्वसंक आपत्तींना जन्म देऊ शकते. इतकी वाढ झाली तर काही देश समुद्राच्या पोटात गायब होतील, तर काही देशांचे मोठे तर काही देशांचा लहानसा भाग समुद्राच्या पोटात सामावेल.

संवेदनशील नाही,कृतीशील व्हा

आज पृथ्वीच्या तापमानात केवळ ०.७ टक्क्यांची वाढ झालीय. तरीही आपल्याला इतक्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतंय. अशा वेळी जर दोन अंशांनी तापमान वाढलं तर काय स्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी!

तापमान वाढ आणि हवामान बदलांच्या तडाख्यातून शेती जगवताना तापमानवाढीला प्रतिरोध करू शकणारं बियाणं शोधायला हवं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवं संशोधन करायला हवं. नव्या प्रजाती शोधायला हव्यात. पण या सर्वांना होणारा उशीर ही आज खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे. हा उशीर का होतोय? कारण भविष्यातल्या या संकटाकडे आपण दुर्लक्ष करतोय.

आता मात्र धोक्याची घंटा वाजू लागलीय, त्यामुळे या प्रश्नाबद्दल असलेला निष्काळजीपणा तत्काळ सोडून देण्याची आणि पर्यावरण रक्षणाबद्दल संवेदनशील नाही, तर कृतिशील होण्याची गरज आहे. बांगलादेश, इस्राईलसह जगातल्या अनेक देशांमधे काही प्रयोग सुरु आहेत. भारताच्या संदर्भाने त्याचं गांभीर्याने अध्ययन व्हायला पाहिजे.

जगभरातल्या तज्ज्ञांना एकत्र आणून चर्चा घडवून आणणं आवश्यक आहे. पुढच्या २५ ते ५० वर्षांसाठी आपल्याला लढाईसाठी तयार व्हायचं असेल तर हे प्रामाणिक प्रयत्नच कामी येतील.

हेही वाचा: 

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)