महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय.
अध्यात्म मार्गामधील गुरू ही संस्था भारताचे एक खास वैशिष्ट्य मानलं जातं. गुरुशिष्यांविषयीच्या अनेक आख्यायिका आगदी उपनिषत्कालापासून प्रचलित असल्याचं आपल्याला ठाऊक आहे. गेल्या काही वर्षांमधे तर परदेशी लोकांनाही भारतामधील गुरूंविषयी आकर्षण वाटून आता ते गुरूमार्गाकडे वळत आहेत. जॉन मिचनर या अभ्यासकाने तर भारतात येऊन भारतात प्रसिद्ध असलेल्या अनेक गुरूंचा पद्धतशीर अभ्यास करुन ॠणठणया नावाने पुस्तकच लिहिले आहे. भारत देश आणि गुरू यांच्यामधील नातेसंबंध हा आता इतका सुप्रस्थापित झालेला आहे की, गुरूसंबंधी भारतात कोणी काही वेगळा विचार कधी केलेला असेल हे कोणाला खरंही वाटणार नाही. पण वारकरी परंपरेने तो केलाय.
आपल्या प्राचीन परंपरेत आणि विशेषत: तंत्रमार्गात तसंच वेदांमधेसुद्धा गुरूला महत्त्व देण्यात आलंय. याचं एक कारण म्हणजे गुरूकडे काहीतरी गूढविद्या असून ज्याच्यावर तो प्रसन्न होईल त्यालाच ती मिळेंल. इतकंच नव्हे तर एखादा अतिशहाणा शिष्य अन्य एखाद्या उपायाने ती मिळवू पाहील तर ती सफल तर होणार नाहीच पण प्रसंगी विपरीत फलही देईल अशी धारणा आपल्या परंपरेत आहे. अध्यात्मविद्येतील अथवा साधनेमधील ही धारणा लौकिक क्षेत्रामधेही झिरपली असल्याचं दिसून येतं. त्यामुळे परशुरामाने कर्णाला दिलेली धनुर्विद्या, शाप देऊन परशुराम विफल करू शकतो, तर द्रोणाचार्य एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून घेऊ शकतात. गुरुकृपा, गुरुदक्षिणा,गुरुसेवा इ.
यासंबंधी आपल्यात प्रचलित असलेल्या समजअपसमजांचा धांडोळा घेतला, या संदर्भातील प्रचलित आख्यायिका गोळा केल्या तर विशिष्ट गरजांमुळे ज्याची सूचनशीलता वाढलेली आहे, अशा शिष्यवर्गाची फसवणूक आणि शोषण करणं फारसे अवघड नाही हे सहज ध्यानात येईल. हे शोषण कधीकधी शिष्यांच्या बायकांच्या प्रथमोपभोगाच्या विशेषाधिकारापर्यंत जाते ही बाब धर्माच्या अभ्यासकांना अज्ञात नाही. थोडक्यात फसवणूक आणि भ्रमनिरास हा नियम, तर चांगला अनुभव हा अपवाद असेच या संस्थेचे वर्णन करता येईल.
हेही वाचा: वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं
वारकरी परंपरेमधे गुरूला फारसं महत्त्व नाही, विशेष म्हणजे या पंथाची पायाभरणी करणारे ज्ञानदेव ज्या परंपरेने उपदिष्ट होते तो नाथपंथ हा गुरुमार्गाचा पक्का पुरस्कर्ता होता. या पंथाच्याच गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला आणि निवृत्तीनाथांनी तो ज्ञानदेवांना केला. त्यामुळे साहजिकच ज्ञानदेवीत निवृत्तीनाथ या आपल्या श्रीगुरूंचं वारंवार स्तवन केलेलं दिसतं, ही गोष्ट नाथपरंपरेला साजेशीच आहे. पण, आपलं ‘गुरुक्रमाने‘ प्राप्त झालेलं ज्ञान पुढे संक्रमित करताना गहिनीनाथांनी एक क्रांतिकारक कृती केली. स्वत: गहिनीनाथांपर्यंत चालत आलेली पारंपरिक प्रथा म्हणजे गुरूने आपल्या मर्जीतल्या एखाद्या दुसर्या शिष्याला ते ज्ञान गुप्तपणे द्यायचं अशी होती. गहिनीनाथांनी या परंपरेला छेद दिला आणि परंपरेने प्राप्त झालेल्या ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करण्याचा आदेश निवृत्तीनाथांनी दिला. या आदेशाचं वर्णन करताना ज्ञानदेव लिहितात-
ना आदिगुरुशंकरा | लागोनु शिष्यपरंपरा |
बोधाचा हा संसारा | झाला जो आमुते ॥
तो हा तो घेऊनि आघवा | कळी गिळतया जीवा |
सर्व प्रकारे धावा | करी पा वेगी ॥
आधीच तव तो कृपाळु | वरी गुरुआज्ञेचा बोलु |
झाला जैसा वर्षाकाळु | खवळणे मेघा ॥
मग आर्ताचेनि वोरसे | गीतार्थ ग्रथन मिसे |
वर्षला शांतरसे | तो हा ग्रंथु ॥
साहजिकच पारंपरिक अर्थाने निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायातले शेवटचे गुरू ठरतात. त्यानंतर ‘गुरू’ हा शब्द राहिला असेल. पण त्याचं वजन आणि परिणाम दोन्ही बदललं. त्यामागील गूढतेचे वलय, विशेषाधिकाराचे लचांड आशा बाबी निघून गेल्या. गुरुने निवड करून शिष्याला एकांतात मंत्रोपदेश करायचा, कानात करायचा या सार्या भानगडी मिटल्या. कानफुंक्या परंपरेचा अस्त झाला.
ज्ञानभांडार सार्वजनिक झालं. बंदिस्तपणा जाऊन खुलेपणा आला. अध्यात्म म्हणजे काहीतरी गुढ, अद्भुत अशी भावना जाऊन तो प्रकृत जीवनाचाच एक भाग बनला. कोणी कोणाचं शोषण करण्याची, सेवेच्या नावाखाली राबवून घेण्याची शक्यता संपुष्टात आली. याचा अर्थ असा नाही की, आपल्यापेक्षा जास्त अधिकारी असलेल्या ज्येष्ठांविषयी आदर बाळगू नये. कोणी कोणाकडून ज्ञान घेऊ नये. वा कोणाला ज्ञान देऊ नये. या ज्ञानव्यवहारामागे असलेला अद्भुतरम्य भाबडा श्रद्धावाद वरकर्यांना मान्य नाही एवढाच याचा अर्थ.
हेही वाचा: संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न
स्वत: ज्ञानदेवांना नाथपंथीय परंपरेप्रमाणे गुरूपदेश झालेला असल्याने त्यांना हे सर्व स्पष्टपणे मांडता आलेलं नाही. तुकाराम महाराज मात्र अशा बंधनात नव्हते. त्यामुळे वारकर्यांचे गुरू या संस्थेबद्दलचे विचार समजावून घ्यायचे असतील तर तुकोबांकडेच वळलं पाहिजे. एका बाजूला गुरुसंस्थेचा बडेजाव थांबला पाहिजे. पण त्याचबरोबर दुसर्या बाजूला ज्ञानव्यवहाराचं संक्रमण थांबता कामा नये, अशा उद्देशाने जो उपदेश करण्यात येतो त्याला ज्ञानदेवांनी मेघवर्षाची उपमा दिलेली आहे.
पै गुरुशिष्यांच्या एकांती| जे अक्षरा एकाची वंदती |
ते मेघाचिया परी त्रिजगती | गर्जती सैंघ ॥
तुकोबांनी हीच उपमा या संदर्भात वापरली, मेघवृष्टीने करावा उपदेश | परिगुरुने न करावा शिष्य ॥ आपल्या स्वत:च्या उपदेशाच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण करताना ते म्हणतात- नव्हे हे गुरुत्व मेघवृष्टी वाणी मेघवृष्टीचे वैशिष्ट्य म्हणजे सुपीक नापीक, बरड, कसदार, जिराईत-बागाईत, शहर-खेडे आसा कोणत्याही प्रकारचा भेदाभेद अथवा आवडनिवड न करता मेघ सर्वत्र वर्षाव करतो. ज्या जमिनीचा जसा कस असेल त्याप्रमाणे तिच्यात पीक येते. ’नाही विचारीत मेघ हागणदारी सेत’ तसे उपदेश करीत राहणे हा जणू स्वभावच व्हायला हवा. आपापल्या अधिकारानुरूप त्यातून जो बोध घ्यायचा तो श्रोते घेतील, जसं वर्षा म्हणजे हा मेघाचा स्वभाव आहे.
पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे |
आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥
केवळ आपण सांगितल्यामुळे लोकांमधील गुरुव्यवहार संपुष्टात येईल, असं मानण्याइतके तुकोबा भाबडे नव्हते. म्हणून होतकरू गुरूंसाठी त्यांनी एक महत्त्वाचा संकेतही सांगितला. शिष्याने गुरूची सेवा करावी ही आजवरची रूढी. तुकोबा याउलट सांगतात.
त्याचा फळे उपदेश |
आणिका दोष उफराटे ॥
ज्याचा गुरूविषयक दृष्टिकोन मुळातच अशा प्रकारचा चिकित्सक आहे त्याच्या तडाख्यात समकालीन दांभिक आणि धंदेवाईक गुरू सापडले नाही तर नवल.
एक करिती गुरुगुरु |
भोवता भारु शिष्यांचा ॥
पुंस नाही पाय चारी |
मनुष्य परी कुतरी ती ॥
हेही वाचा: संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरात येत होती
इतक्या कठोर शब्दात तुकोबा त्यांचा धिक्कार करतात. सर्व प्राणिमात्र सारखेच आहेत. सर्वांमधे एकच परमात्मा भरलेला आहे. आपल्यासारखेच इतरही आहेत. तर मग गुरुशिष्यभावाला वावच कुठे आहे, असा सवाल तुकोबा वेदांत आणि गुरुत्व या दोहोंचा एकाच वेळी पुरस्कार करणार्यांना करतात.
गुरुशिष्यपण | हें तो अधम लक्ष्मण ॥
भूतीं नारायण खरा | आप तैसाचि दुसरा ॥
वारकर्याच्या या असा धोरणामुळेच ते उच्च-नीच, लहान-थोर असा भेद न करता एकमेकांच्या पाया पडतात.
वारकर्यांची कीर्तनपद्धती ही तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे मेघवृष्टीच असते. गौरवाने वा उपचाराने एखाद्या ज्येष्ठ कीर्तनकाराला गुरू, सद्गुरू किंवा गुरुवर्य असं म्हटलं जात नाही असं नाही. पण, अशा केवळ शब्दप्रयोगांमुळे गुरुमार्गाची सर्व तात्त्विक भूमिका वारकर्यांना मान्य आहे, असं होत नाही. वारकरी संप्रदायात प्रवेश करण्यासाठी माळ घालावी लागते. ही माळ अगोदरच्या एखाद्या ज्येष्ठ आणि अधिकारी वारकर्याकडून घालण्याचा प्रघात आहे. अशा या ज्येष्ठ वारकर्यालाही गुरू म्हटलं जातं. पण, तेही गौणत्वानेच. पारंपरिक गुरुप्रमाणे ‘वारकरी गुरू’जवळ शिष्याला सांगण्यासाठी एकही कानमंत्र नसतो. वारकर्यांचा सर्व मामला खुला असतो. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा| असा हा उघडा आणि खुला पंथ आहे.
वै. विष्णू नरसिंह जोग तथा जोग महाराज या आधुनिक काळातील वारकर्याने तर या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकलं. जोग महाराजांनी एक तर देहूकरांकडून किंवा वासकरांकडून माळ घालायची या सर्वसामान्य संकेताला झुगारून देऊन गुरूची औपचारिक मातबाबरीही ठेवली नाही. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर तुळशीची माळ ठेवून ती आपल्या हाताने आपल्या गळ्यात घातली. अर्थात, जोग महाराजांच्या परंपरेमधे त्यांचा आणि नंतरच्या सोनोपंत दांडेकरांसारख्या ज्येष्ठांचाही उल्लेख गुरुवर्य असाच करतात, हे खरं आहे. त्याच्यातल्या औपचारिकतेचा भाग नेमका किती हे त्यांना कितपत ठाऊक असतं, हे मात्र नक्की सांगता येत नाही. देहूकर किंवा वासकर यांना पर्याय म्हणून जोगमहाराज असे नसून जोगमहाराजांनी वारकरी संप्रदायात प्रविष्ट होण्यासाठीच नवा पर्याय उपलब्ध करून दिला, असं म्हणावं लागतं. ज्ञानोबा-तुकोबांसारखे परम्गुरू असताना आणखी दुसर्या गुरूची आवश्यकताच काय, असा कदाचित जोगमहाराजाचा विचार असावा.
हेही वाचा: बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?
तुकाराम महाराजांनी स्वत: होऊन कोणाला साक्षात शिष्य केलं नाही. त्यांची मेघवृष्टी ऐकून प्रभावित झालेल्यांनी त्यांना गुरू मानले हा भाग वेगळा. त्यामुळे तुकोबा हे मिचनरला अभिप्रेत असलेले भारतीय परंपरेतील गुरू ठरत नाहीत. अगदी अलीकडील काळात जे. कृष्णमूर्ती यांनी गुरुत्वाला कडाडून विरोध केला होता. पण त्यांच्या हयातीतच त्यांना गुरू मानणार्यांनी पारंपरिक अर्थाने मानलेलं नसावं, अशा अपेक्षा. गुरुत्वाच्या पारंपरिक कल्पनेचा त्याग करताना तुकोबांचा, काहीही करून परंपरा मोडायची असा नकारात्मक दृष्टिकोन नव्हता. पारंपरिक गुरुमार्गातल्या त्रुटी, धोके त्यांनी सांगितले. लोकांना सावध केलं. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे ईश्वराचं प्रेमस्वरूप समजावण्यात गुरुमार्ग असमर्थ आहे, असं ते मानतात. या संदर्भातील त्याचा पुढील अभंग फार महत्त्वाचा आहे.
गुरुचिया मुखें होईल ब्रह्मज्ञान |
न कळे प्रेमखुण विठोबाची ॥
वेदाते विचारा पुराणाते पुसा |
विठोबाचा कैसा प्रेमभाव ॥
तुका म्हणे साडा जाणिवेचा शीण |
विठोबाची खूण जाणती सत ॥
हेही वाचा: वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
या अभंगात महाराजांनी गुरू आणि संत यांच्यात भेद केलेला आहे. गुरू जास्तीत जास्त ब्रह्मज्ञान देऊ शकतो. विठोबाची प्रेमखुण देण्याचं सामर्थ्य वेदांना, पुराणांना किंवा गुरूला नाही. ते कार्य फक्त संतच करू शकतात. प्रेमाची अवस्था श्रेष्ठ अवस्था आहे. गुरू अज्ञान दूर करून ज्ञान देऊ शकतो. पण हे ज्ञान भक्तिप्रेमाच्या आड येतं. एकनाथांनी केलेल्या रूपकाचा उपयोग करून असं म्हणता येईल, की अज्ञानाचा विंचू उतरविण्यासाठी गुरू ज्ञानाचा विंचू डसवितात. त्यामुळे शिष्याच्या अंगी भिनलेलं अज्ञानाचं विष उतरतं खरं पण आता ज्ञानाचं विष त्यांच्या अंगी भिनतं. ते घालविण्याचं बळ गुरूच्या ठायी नाही. त्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे किंवा देवाला. जाणोनि नेणते करी माझे मन | तुझी प्रेमखुण देऊनिया ॥ अशी प्रार्थना तुकोबा देवाकडे करतात. त्याचा अर्थ हाच आहे. प्रेमाची अवस्था ही ज्ञान पोटात घेऊन पुढे जाणारी अवस्था आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंद रे असे ज्ञानदेवांनी एका अभंगात म्हटले आहे. खुद्द ज्ञानदेव ज्ञान पोटात घालून, पचवून गोविंदाचे गाणे गाऊ शकले याचं कारण त्यांचे गुरू निवृत्तीनाथ हे नुसते ‘गुरू’ नव्हते तर संतही होते. गुरू आणि संत यांच्यातील फरक दाखवून ईश्वरी ज्ञानाचे रहस्य सर्वापुढे प्रगट करणे, ही वारकरी परंपरेची देणगी आहे. तिची सुस्पष्ट मांडणी तुकोबांच्या अभंगांमधून सापडते.
येथे बोलोनिया काय | व्हावा गुरु तरी जाय ॥
मज न साहे वाकडे | या विठ्ठल कथेपुढे ॥
ऐकोनि मरसी कथा | जव आहेसी तू जीता ॥
हुरमतीची चाड | तेणे न करवी बडबड ॥
आम्ही विठ्ठलाचे वीर | ङ्गोडू कळीकाळाचे शीर ॥
घेऊ पुढती जन्म | वाणू कीर्ति, मुखी नाम ॥
तुका म्हणे मुक्ती | नाही आसचि ये चित्ती ॥
तुकोबांचा गुरुत्वासंबंधिचा हा दृष्टिकोन अभिनव आणि न पचणारा होता यात संशय नाही. त्यांच्यावर या संदर्भात बराच दबाव येत असणार हेही स्पष्ट आहे. तुकोबांनी कोणाही गुरूचा साक्षात उपदेश घेतला नाही. त्यांना जो उपदेश झाला तो स्वप्नात. त्याचे वर्णन करणारा अभंग प्रसिद्ध आहे.
सद्गुरुरायें कृपा मज केली |
परी नाही घडली सेवा काही ॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना |
मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥
भोजना मागती तूप पावशेर |
पडिला विसर स्वप्नामाजी ॥
काही कळे उपजला अंतराय |
म्हणोनिया काय त्वरा जाली ॥
राघव चैतन्य केशव चैतन्य |
सांगितली खुण माळिकेची ॥
बाबाजी आपुले सांगितले नाम |
मंत्र दिला रामकृष्ण हरी ॥
माघशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार |
केला अंगीकार तुका म्हणे ॥
तुकारामचरित्रकार महिपती ताहराबादकर यांच्यापुढे अभंगाचा योग्य पाठ असल्याने त्यांनी मात्र गुरुपदेशाचा संपूर्ण कथाभाग व्यवस्थित आणि सुसंगतरीत्या सांगितलेला आहे. तुकोबांनी गुरू केला नसल्यामुळे इतर सामान्य लोकही याबाबतीत त्याचेच अनुकरण करतील या चिंतेने स्वत: पांडुरंगाने बाबाजी चैतन्यांच्या रूपाने तुकोबांना स्वप्नात अनुग्रह दिला.
महिपतीने केलेला शुद्ध पाठाचा उपयोग जसा महत्त्वाचा, त्याचप्रमाणे त्याने स्वप्नोपदेशाची लावलेली तात्त्विक संगतीही तितकीच महत्त्वाची. ती तुकोबाच्या अगोदर विशद केलेल्या भूमिकेशी सुसंगत आहे. तुकोबांना भक्तीचा व्यवहार खंडित करणारा अद्वैत वेदांत, ब्रह्मज्ञान मान्य नव्हतं आणि म्हणून असा ज्ञानाचा उपदेश करणारा गुरूही नको होता. यातूनच स्वप्नाला पर्याय निघाला. विशेष म्हणजे स्वप्नात या गुरूंनी महावाक्याचा उपदेश न करता तुकोबांना अगोदरच आवडणारा रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. यात गुप्त किंवा गूढ काहीच नाही. महिपतीबाबांनी स्वत: पांडुरंगानेच तुकोबांना बाबाजीरूपाने उपदेश केला, असं जे सांगितले आहे त्यास तुकोबांच्या अभंगातच आधार आहे.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव |
आपणची देव होय गुरू ॥
असा तो अभंग आहे. ईश्वरप्राप्ती हे परमार्थाचे साध्य असेल आणि शेवटी या साध्यप्रत नेणारा मार्गदर्शक म्हणून गुरूचं महत्त्व असेल, तर तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे ज्याला ईश्वराची खरोखरच एवढी आस आहे, त्याच्यासाठी ईश्वरच मार्गदर्शक गुरू होऊन पुढे येईल. येथे तुकोबा परंपरेला एक कलाटणी देतात. गुरू हाच देव अशी पारंपरिकांची समजूत. तुकोबा म्हणतात की, देव हाच गुरू.
ईश्वर हे प्राप्रक असं एकदा ठरलं की, गुरू गौण बनतो. समजा एखाद्या गुरूच्या उपदेशामुळे ईश्वर दुरावतो आहे, असं दिसलं तर काय करावं? तुकोबा म्हणतात, न मनावे तैसे गुरुचें वचन | जेणें नारायण अंतरेल ॥
देहू संस्थान, देहूकर फड आणि वासकर फड या संस्था आज तुकोबांचा संप्रदाय चालवीत आहेत. त्यांच्यामधील धुरिणांना वारकरी गुरू मानतात, त्यांच्याकडून माळा घालतात पण हे सर्व चालते आहे ते ‘गुरुत्वा’च्या तुकोबाप्रणित नव्या अर्थाने. कदाचित वासकरांच्या फडावर कीर्तन करायला मिळावं, अशा हेतूने काही मंडळी देहूकर आणि वासकर यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असावीत, अशा संशयाला जागा आहे. वारकर्यांना मुळात रूढ अर्थाची ‘गुरुत्व’ ही संकल्पनाच मान्य नाही, तर मग उत्तराधिकारी वासकर की देहूकर या वादाला जागाच राहते कुठे? वारकरी देहूकरांना वा वासकरांना मान देतात त्याचे कारण ते तुकोबांची उपदेशपरंपरा वाढवायला निमित्त ठरलं आहे म्हणून. तुकोबा वजा केले तर कोण देहूकर? कोण वासकर? आणि कोठलं देहू संस्थान?
खरंतर वारकरी संप्रदाय एवढा फोफावला, तळागाळापर्यंत पोचला याचं कारण म्हणजे. ‘गुरुत्वा’ च्या रूढ रीतीला फाटा देऊन त्याने नवी पद्धत निर्माण केली हे होय. त्याचा खुलेपणा हे त्याचे बळ होय. हे विसरून उद्या कोणी वारकर्याने गुरुपौर्णिमा साजरी करण्याची टूम काढली, तर तो दिवस संप्रदायाच्या र्हासाची सुरुवात ठरेल.
हेही वाचा:
कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?