लिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन

२६ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी हिंदी भाषिकसह सर्व राज्यांना 'ळ' या अक्षराचा वापर योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्यात. अक्षरांची भाषिक देव-घेव सुरू असताना मराठीवरचा 'हिंदी'चा प्रभाव टाळण्यासाठी 'ल'चा वापर करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या राज्य भाषा विभागाने जारी केलेत. लिपी- वर्णमालेच्या सुधारणांनी भाषा प्रभावी होत नाही. त्यासाठी भाषेचा कालानुरूप वापर आवश्यक असतो.

'अक्षर' हा भाषेचा पाया आहे. अक्षरांचा मेळ घालूनच शब्दांचा खेळ खेळला जातो. त्यातूनच भाषा विकसित होत असते. अशा विकास प्रक्रियेत भाषा खेळती राहिली, तरच ती टिकते. या अक्षरांचा मूळसंबंध उच्चारांशी आहे. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला 'वर्ण' म्हणतात. हे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत; म्हणून ते लिहून ठेवतात. ते ज्या सांकेतिक खुणांनी लिहिले जातात, त्यांना ध्वनिचिन्हं किंवा 'अक्षर' असं म्हणतात. नष्ट होत नाही ते 'अक्षर'!

हेही वाचा: मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

असंय स्वर-व्यंजनांचं गणित

मराठी भाषेत सध्या असे ५२ 'वर्ण' आहेत. त्यांच्या समूहाला 'वर्णमाला' किंवा 'मूळाक्षरं’ म्हणतात. वर्णमालेत 'स्वर' आणि 'व्यंजन' असे दोन प्रमुख भाग आहेत. ज्या वर्णाच्या उच्चारासाठी कंठातल्या कोणत्याही अवयवांची मदत घ्यावी लागत नाही, त्यांना 'स्वर' म्हणतात. त्यानुसार, पूर्वी 'अ, आ, इ, ई, ड,उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः' असे १२ 'स्वर' होते. त्यात आता राज्य शासनाच्या भाषा विभागाच्या आदेशानुसार 'ॲ, ऑ' आणि 'ऋ, लृ' या चार स्वरांची भर पडलीय.

'ॲ-ऑ, उ-ऊ, ऋ- ॠ, लृ, लॄ, ए-ऐ, ओ-औ' हे स्वर सजातीय म्हणजे एकाच उच्चार स्थानातून जात असल्यामुळे स्वरांची लिखित संख्या ४ ने वाढली तरी ती प्रत्यक्षात १२ च राहिलीय. कारण त्याचा संबंध संगीतातल्या 'सा, रे रे, ग ग, म मे, प, ध ध, नी नी' या कोमल आणि शुद्ध बारा स्वरांशी आहे. तसाच A, E, I,O, U या इंग्रजीतल्या मूळाक्षरांच्या स्वराशीही आहे.

मराठी मूळाक्षरात १२ स्वर आहेत; तशीच 'क, ख, ग... ते ह, ळ, क्ष, ज्ञ' अशी ४१ व्यंजनं आहेत. त्यांचा उच्चार करताना जीभ, कंठ, तालू, मुर्धा, दात आणि ओठ या अवयवांचा वापर करावा लागतो. या स्वर-व्यंजनाच्या एकत्रित उच्चारांतून आपल्या व्यक्त होण्यासाठीचे शब्द-वाक्यं तयार होतात. त्यांना मराठी अक्षरात आणण्यासाठी आपण 'देवनागरी लिपी'चा वापर करतो.

हिंदी भाषिक राज्यांचा आग्रह

संस्कृत- हिंदी- मराठीसह भारतातल्या १२० भाषात देवनागरी लिपीचा वापर होतो. भाषांच्या उच्चार-भिन्नतेमुळे या भाषांच्या मूळाक्षरांच्या स्वरूपात आणि स्वर-व्यंजनातही भिन्नता निर्माण होणं, स्वाभाविक आहे. ती टाळण्यासाठी ५० वर्षांपूर्वी भारतातल्या भाषा तज्ज्ञ आणि राज्य सरकारांनी एकत्रित प्रयत्न करून वर्णमालेत सुसूत्रता आणली. त्यानुसार पूर्वीचा 'रव'चा असा 'ख' झाला. तसाच पाकळीयुक्तचा असा 'ल' झाला. 'ख' आणि 'ल' ही अक्षरं हिंदीतून मराठीत आली. त्याआधी मराठीला 'अनुनासिक' करणारे अनावश्यक अनुस्वार लेखन- छपाईतून बाद करण्यात आले होते.

या बदलामुळे मराठीत 'खी’चा 'रवी' करणारा गोंधळ संपला. मराठीतल्या पाकळीयुक्तचा त्याग आपल्याला हिंदीतल्या 'ल’साठी करावा लागला. त्यासाठी महाराष्ट्रासह दक्षिणेतल्या राज्यांनी आपल्या 'ळ'चा उच्चार आणि लेखनात हिंदी भाषिक राज्यांनी 'ल'मधे करू नये, असा आग्रह धरला होता. तो मान्य करून हिंदी भाषिक राज्यांनी आपल्या वर्णमालेत 'ळ'चा समावेश केला. त्याचा प्रत्यक्ष वापर न झाल्यामुळे लोणावळा- लोनावला, तमीळनाड- तमीलनाड, मल्याळम- मल्यालम असे चुकीचे उच्चार आणि लेखन सुरू राहिलं.

या कायद्यात सुधारणा व्हावी यासाठी विदर्भातल्या प्रकाश निर्मळ यांनी केंद्रीय भाषा मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना २०२० मधे यश आलं. भाषा विभागाचे केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी हिंदी भाषिकसह सर्व राज्यांना 'ळ' या अक्षराचा वापर योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्या. त्याची सुरवात कमळापासून झालीय. अशी अक्षरांची भाषिक देव-घेव सुरू असताना मराठीवरचा 'हिंदी'चा प्रभाव टाळण्यासाठी पाकळीयुक्त 'ल'ची पुनर्स्थापना करण्याचे आणि सोबत शेंडीयुक्त 'श'मधे बदल करण्याचे आदेश राज्य भाषा विभागाने जारी केलेत. यातला 'रा'सारख्या दिसणाऱ्या शेंडीयुक्त 'श'मधला बदल उपयुक्त आहे. 'ल' बाबतचा आग्रह मात्र पटणारा नाही.

हेही वाचा: गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

मूळभाषेचा प्रभाव कायम

कुठल्याही भाषेचा प्रभाव लिपीतून नाही, तर वापरातून पडू शकतो. पण प्रभाव उपयुक्त असेल तर मूळभाषा अधिक विकसित होते; टिकून राहते. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यात 'कोर्लाई' नावाचं गाव आहे. तिथल्या ख्रिस्तीपाड्यात हजारेक ख्रिस्ती कुटुंब राहतात. त्यांचं शिक्षण मराठी-इंग्रजी माध्यमांच्या शाळात झालंय; होतंय. पण ते पोर्तुगीजांची 'नोवलीन' ही बोलीभाषा बोलतात. त्या भाषेत २५ टक्के मराठी शब्द आहेत. 'संख्या' तर पूर्णपणे मराठीत बोलतात.

असाच प्रकार दीव-दमण इथल्या 'सिल्वासा' या भागात पाहायला मिळतो. कारण तिथंही पोर्तुगीजांचं राज्य होतं. तिथंही 'पोर्तुगीज भाषा' बोलली जाते. ह्या भाषेची स्वतंत्र लिपी नाही. ती इंग्रजीत लिहिली जाते. गोव्यात मराठी बरोबरच 'कोंकणी’ भाषेलाही राज्यभाषेचा दर्जा आहे. पण तीही इंग्रजीत लिहिली जाते.

भाषेचा कालानुरूप वापर हवा

ज्यांना कॉम्प्युटर किंवा मोबाईल  फोनवर मराठीत टाईप करता येत नाही, ते मराठी इंग्रजीत टाइप करतात. त्याने काही अडत नाही आणि 'मराठी बाणा' काही मोडत नाही. याचा अर्थ, मराठी लिपीकडे, उच्चारांकडे, शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावं असा नाही. पण आवश्यक त्या बदलात सोपेपणा असावा; क्लिष्टता वाढवणारा आग्रह नसावा. कारण 'मराठी लिपी'ची महतीच तशी आहे. ती सांगताना- कविश्रेष्ठ सोपानदेव चौधरी म्हणतात-

लिपी आमुची नागरी, स्पष्ट उच्चारांचे वर्ण
महाराष्ट्रीयां लाभली, वाणी तैसी संपूर्ण॥१
नसे उच्चाराची व्याधी, नसे लेखनात अढी।
जाई धोपट मार्गाने, स्वर-व्यंजनांची जोडी॥२
अहो, हिची जोडाक्षरे, तोड नाही त्यांना कुठे।
उच्चारातली प्रचीती, जशी ओठांवर उठे॥३
जैसे लिहू तैसे वाचू, जैसे बोलू तैशा खुणा।
जे जे लेखी तेच मुखी, ऐसा मराठी बाणा॥४
सर्व उच्चारांचे शोधा, शास्त्रज्ञांनो एक यंत्र।
तेच दिसेल तुम्हांला, महाराष्ट्रीयांचे मुख॥५
नाद-ध्वनी उच्चारांना, देत सदा आवाहन।
लिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन॥६

या सर्वस्पर्शी  कवितेत सोपानदेव चौधरी यांनी मराठीचं व्याकरण, उच्चारण आणि आचरण सांगितलंय. लिपी-भाषा हे वाहन आहे. अनावश्यक सुधारणांनी, दुरुस्त्यांनीही वाहन नादुरुस्त होतं. लिपी- वर्णमालेच्या सुधारणांनी भाषा प्रभावी होत नाही. त्यासाठी भाषेचा कालानुरूप वापर आवश्यक असतो. तरच सारा मुलूख आपला होतो.

हेही वाचा: 

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

‘नमस्ते वहाला’: भारतीय तरुण आणि कृष्णवर्णीय तरुणीची प्रेमकथा

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट

(लेख साप्ताहिक ‘चित्रलेखा’मधून साभार)