महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
गांधीजीच्या जयंती दिनाचं औचित्य साधून सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाची केवळ घोषणा केली आहे, अजून सिनेमाच्या कथानकाबद्दल काहीही स्पष्टता नाही. पण तरीही मांजरेकरांवर टिका सुरू झाली. मांजरेकरांच्या पुर्वीच्या अनुभवावरून ही टिका सुरू झाली असली तरी सिनेमाच्या कथानकाबद्दल माहिती नसताना अशी टीका योग्य नाही. त्यामुळे थोडा संयम ठेवायला हवा.
गांधीजींवर टिकात्मक लेखन किंवा त्यांच्या भुमिकांची चिकित्सा सतत होत आली आहे. या चिकित्सेतून गांधीजींच्या विचारांची उपयुक्तताही सिद्ध झालेली आहे. त्यामुळे मांजरेकरांचा सिनेमा आला तरी हरकत नाही, असं माझं मत आहे.
महाराष्ट्रात 'गांधी विरूद्ध गांधी' हे नाटकही यापुर्वी येऊन गेलंय. हिंदीत 'मैने गांधी को नही मारा' हा अनुपम खेर अभिनित तसंच 'हमने गांधीजीको मार दिया' हे सिनेमाही येऊन गेले आहेत. गांधीजींचा मुलगा हिरालाल गांधी यांच्या चरित्रावर आधारीत अक्षय खन्नाचा 'गांधी माय फादर' हा गांधीजी कसे अयशस्वी पिता होते सांगणारा अनिल कपुर निर्मित सिनेमाही येऊन गेला आहे. त्यामुळे सिनेमातून गांधीजींवर टीका नवीन नाही.
रिचर्ड एँटिनबरो या जागतिक फिल्म निर्मात्याने गांधीजीवर १९८२ ला गांधी ही अप्रतिम कलाकृती जगभरातल्या सुजान सिनेरसिकांसमोर मांडली. विधु विनोद चोपडा यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमातून गांधीजींचे विचार नव्या परीप्रेक्षात मांडले. त्यातून गांधीगीरी हा नवा शब्दप्रयोग रूढ झाला. अनेकांनी या प्रयोगाला नावाजलं तर अनेकांनी टिकाही केली.
हेही वाचा: नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता
गांधीजींची हत्या भारतीय स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच महिन्यात झाली. भारतीय स्वातंत्र्य, फाळणी, पाकीस्तानची निर्मिती, धार्मिक दंगे अशा समुद्र मंथनातून निघालेलं विष पचवायला गांधीजीसारखा निळकंठ शिव भारतात होता, त्यांनी हे विष स्वत:ची आहुती देऊन संपवलं.
गांधीजींनी आहुती देऊनही हे विष संपलं नाही म्हणून गांधीजीवर दोषाआरोप अजूनही होत असतात. त्यातून गांधीजीच्या विरोधाचीही एक बाजू आहे, असा युक्तीवाद केला जातो. हा युक्तीवाद चुकीचा असला तरीही त्याच अस्तित्व समाजात होतं आणि आहे, हे वास्तव आहे. गांधीहत्येवरचं गोपाळ गोडसेंचं पुस्तक याच प्रयत्नाचा भाग आहे.
गांधीजींच्याच्या मारेकऱ्यांचीही एक बाजू आहे, असा एक मतप्रवाह आहे. हा मतप्रवाह प्रामाणिक नाही किंवा तो मान्यही नसला तरी तो मांडण्याचे प्रयत्न अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं आणि सिनेमातून झालेला आहे. स्टँनली वॉलपर्ट यांनी नथुरामची बाजू मांडण्याचा एक तटस्थ प्रयत्न १९६२ ला 'नाईन अवर्स टू रामा' या कादंबरीच्या माध्यमातून केला होता. त्यावर अमेरिकेत याच नावाचा सिनेमाही येऊन गेला.
भारतात या दोन्हींवरही बंदी घालावी अशी मागणी काँग्रेसनेही केली आणि हिंदुत्ववाद्यांनीही केली होती. त्याचं एक कारण म्हणजे त्यात नथुरामचे अनैतिक सबंधही मांडले होते. 'गोकुळ शंकर' नावाचा एक भारतीय सिनेमाही या कादंबरीवर आला पण त्यावरही बंदी घातली गेली कारण तो स्टँनली वॉलपर्ट यांच्याच कादंबरीवर आधारीत होता.
'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक तर सगळीकडे प्रसिद्ध झालं. कमल हसनने याच स्टँनली वॉलपर्टच्या कादंबरीवर आधारीत 'हे राम' हा सिनेमा काढला पण त्याने हा विषय सिनेमॅटीक लिबर्टी वापरत गांधीजींचीच बाजू ठळकपणे मांडली आणि हत्येचं समर्थन नाही केलं.
हेही वाचा: गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!
स्टँनली वॉलपर्टची 'नाईन अवर्स टू रामा' ही कादंबरी आणि त्यावरचा सिनेमा हा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून मांडलेली कलाकृती होती. त्यात गांधीजीबद्दल द्वेष नव्हता तर गांधीजींचा तिरस्कार करणारे लोकही भारतात होते आणि त्यांनी गांधीजींची हत्या करताना त्यांची गुन्हेगारी का असेना पण नेमकी काय भुमिका होती हे मांडलं होतं.
कमल हसनही भारतीय सिने निर्माता असला तरी त्याची दृष्टी व्यापक होती. पण 'मी नथुराम बोलतोय' या नाटकाचा हेतु मात्र नथुरामचं उदात्तीकरण नि गांधींचा द्वेष असाच होता. महाराष्ट्रीय उच्चवर्णिय प्रेक्षक समोर ठेऊन केलेला हा प्रयोग होता. जो कमालीचा यशस्वी ठरला कारण महाराष्ट्रातल्या उच्चवर्गात नि विशेष करून बहुसंख्य ब्राह्मणांमधे गांधीजीबद्दल तिरस्कार आहे, हे वास्तव आहे.
महेश मांजरेकर हे केवळ मराठी नाही तर भारतीय सिने निर्माता आहेत. पण त्यांच्या विचारात व्यापकता नाही तर तद्दन बाजारूपणा आहे. त्यांचा 'मी शिवाजीराजे बोलतोय'हा सिनेमा तर मनसेचा राजकीय अजेंडा रेटण्याचा सिनेप्रयोग होता.
नथुरामची बाजू मांडणारा, नथुराम या गुन्हेगाराची मानसिकता मांडणारा मनोविश्लेषणात्मक प्रयोग म्हणून एखाद्या गुन्हेगारांवर सिनेमा निघणं नवीन नाही. क्रिमीनल सायकॉलॉजीचा अभ्यास लॉ अभ्यासक्रमात गुन्ह्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न असतो. पण त्यात गुन्हेगाराचं किंवा गुन्ह्याचं समर्थन, गुन्हेगाराबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी असं अजिबात नसतं.
भारतीय सिने निर्माते हे प्रबोधन मुल्यापेक्षा बाजारू मुल्यांना महत्व देतात. अमिताभ बच्चनचा 'दिवार' असो शहारूख खानचा 'डर' वा अक्षय खन्नाचा 'रूस्तुम' हे सिनेमा तर गुन्हेगारालाच नायक बनवणारे आहेत.
हेही वाचा: गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल
महेश मांजरेकरांच्या वास्तवमधे गुन्हेगार गँगस्टर 'रघू' हाच नायक होता. आता कदाचित नथूराम हा नायक असेल. आपला समाज गुन्हेगारी वृत्तीने बरबटला आहे. वास्तवचा 'रघू' काय आणि येणाऱ्या गोडसे मधला कदाचित 'नथुराम' काय, लोकांना आवडतं ते पुरवणं हा सिनेनिर्मात्यांचा आणि आजच्या लोकप्रिय न्यूज चॅनलचा बाजारू फंडा आहे. महेश मांजरेकर सिनेजगतातले अर्नब गोस्वामी आहेत की वेगळं काही आहेत? हे सिनेमा रिलीज झाल्यावरच समजेल.
पण आज गांधीजयंतीदिनी गोडसे सिनेमाची घोषणा ही मनोविकृतीच आहे. पण विकृतीलाच प्रतिष्ठा मिळण्याचे दिवस सध्या असल्यामुळे यावर केवळ उद्विग्न होणं एवढंच हातात आहे. पण महत्वाची गोष्ट अशी की, असे कितीही सिनेमा, नाटकं, कथा, कादंबरी येऊ द्या, गांधीजींचा विचार कधीही मरणार नाहीत कारण गांधीजींचे विचार प्राचीन हिंदू संस्कृतीत वर्णन केल्याप्रमाणे विश्वकल्याणाची आस असणारे आहेत.
या विचारांवर अहिंसा, सत्य, करुणा, बंधूभाव आदी मानवी मुल्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे तो गांधीच्या मारेकऱ्यांच्या समर्थकांप्रमाणे कोणाही जातीधर्माच्या समूहापुरता संकुचित नाही. कोणाच्या द्वेषावर, असत्यावर आधारित नाही.
गांधीजीबद्दल सतत मनात द्वेष बाळगणाऱ्या आणि गांधी जयंतीदिनी नथुराम भक्तांची देवताही स्वदेशात नि परदेशातही प्रात:स्मरणीय गांधीजींच्या चरणांवर नतमस्तक होताना दिसून येतं. स्वच्छता अभियान असो, स्वदेशीचा नारा, गांधीजींना देखाव्यासाठी का होईना वंदन करावं लागतं.
गांधींजींची हत्या झाल्यावर नेहरूंनी 'द लाईट हॅज गॉन आऊट' असा संदेश दिला होता. त्यात त्यांनी गांधीजींच्या मारेकऱ्याचा नामोल्लेख 'ए मॅडमन' म्हणजे एक माथेफिरू असा केला होता. माथेफिरूला नायक ठरवत सिनेमा काढण्याचा विचार एखादा माथेफिरूच करू शकतो. महेश मांजरेकर असा माथेफिरूपणा करणार नाहीत, अशी आशा व्यक्त करूया!
गांधीजींचा विचार प्रेम, क्षमा करुणा आणि समस्त मानवजातीचं उत्थान यावर आधारित आहे. त्यामुळे असे अनेक माथेफिरू येतील आणि जातील पण गांधीजींचे विचार शाश्वत होते, आहेत आणि पुढेही राहतील.
हेही वाचा:
बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं
नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?
प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट