पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी

१४ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे.

१८ डिसेंबर २०१५. संजय लीला भन्सालींचा `बाजीराव मस्तानी` सिनेमा आला, गाजला आणि खूप चालला. आता बरोबर चार वर्षांनी ६ डिसेंबर २०१९. पुन्हा एकदा पेशव्यांच्या इतिहासावर सिनेमा आला, `पानिपत`. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमाची चर्चा झाली, पण तो चालला नाही.

बाजीराव मस्तानी सिनेमा संपतो तो थोरले बाजीराव आणि मस्तानी साहेब यांच्या विरहामुळे झालेल्या निधनाने. एप्रिल १७४०ची ही गोष्ट. बरोबर २० वर्षांनी फेब्रुवारी १७६० मधे झालेल्या उद्गीरच्या लढाईने पानिपत सिनेमाची गोष्ट सुरू होते. जणू आधीच्या सिनेमाचा पुढचा भागच.

एका सिनेमातला विलन, दुसऱ्यात सज्जन

दोन सिनेमांच्या रिलीजमधे प्रत्यक्षात चार वर्षांचं अंतर आहे. त्या गॅपमधे दोन सिनेमांमधल्या कथेमधला २० वर्षांचा इतिहास बदलून जातो. बाजीराव मस्तानी सिनेमात महान बापाच्या मृत्यूला कारणीभूत असणारा २० वर्षांचा नानासाहेब विलन असतो. तोच नानासाहेब पानिपत सिनेमात चाळीसाव्या वर्षी पेशवा म्हणून राज्य करताना दिसतो. इथे तो सद्गुणांचा पुतळा बनून महान राजा बनलेला असतो.

बाजीराव मस्तानी सिनेमात नानासाहेब बाजीराव आणि मस्तानी यांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी षडयंत्र करताना दाखवलेत. ब्राह्मण संघटनांच्या धमक्यांना घाबरून या सिनेमातला एक सीन कट करण्यात आला होता. `डिलीटेड सीन बाजीराव मस्तानी’ असं सर्च केलं की तो सीन यूट्यूबवर सापडतो.

त्यात नानासाहेब अपरात्री मस्तानींच्या महालात जाऊन त्यांच्याशी लगट करण्याचा नीचपणा करतानाही दिसतात. मस्तानी नानासाहेबांना त्यांची जागा दाखवताना सांगतात, `लहान बाळालाही इतके संस्कार असतात की तो डोळे मिटून आईचं दूध पितो.` 

हेही वाचाः पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

निघाले युद्धाला, वाटेत केलं लग्न

असे मस्तानींविषयी टोकाचा द्वेष असणारे नानासाहेब पानिपत सिनेमात मात्र मस्तानीचे चिरंजीव सरदार समशेर बहाद्दूर यांचा सन्मान करताना दिसतात. समशेर आणि त्यांची बायको या दोघांनाही पेशवे कुटुंबातले एक सदस्य म्हणून स्थान देतात. जेवणखाण, युद्ध, व्यायाम, मसलती, युद्धभूमी अशा प्रत्येक ठिकाणी पेशव्यांमधले एक म्हणून समशेर बहादूर दिसतात.

मराठा सैन्य पानिपतावर भुकेने मरत असताना नानासाहेब ४० हजारांच्या सैन्यानिशी मदतीला म्हणून निघाले. पण त्यांनी राक्षसभुवनच्या जवळ हिरडपूर इथे २८ डिसेंबर १७६०ला त्यांनी दुसरं लग्न केलं. पहिली बायको गोपिकाबाई जिवंत असताना त्यांनी चाळीसाव्या वर्षी अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीशी लग्न केलं. त्याच्या जंगी सोहळ्यात चाळीसेक दिवस आणि लाखो रुपये वाया घालवले.

याच नानासाहेबांनी त्यांचे उत्तरेतले सरदार गोविंदपंत बुंदेले यांना ८ जुलै १७६० ला लिहिलेलं पत्रं प्रसिद्ध आहे. त्यात ते लिहितात, `सरकारांत नाटकशाळांचे प्रयोजन आहे, तरी जातीच्या शुद्ध, चांगल्या, जरूर दोनतीन तरण्या मिळवून पाठवविणे. फार चांगल्या पाठवविणे.` नाटकशाळा म्हणजे उपभोगासाठी जनानखान्यात ठेवायच्या बायका. 

नानासाहेब म्हणे गुप्तरोगाने मेले

उत्तरेतल्या मोहिमेवर गेलेले सेनापती सदाशिवरावभाऊ याच काळात नानासाहेबांकडे पैसे, दारुगोळा आणि सैन्य मागवत होते. पण नानासाहेबांचं वेगळ्याच गोष्टींना प्राधान्य होतं. सैन्याच्या ऐवजी नाटकशाळा, युद्धभूमीऐवजी तीर्थक्षेत्रं आणि युद्धाऐवजी लग्न त्यांना महत्त्वाचं वाटत होतं.

इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी `पानिपत १७६१` या महत्त्वाच्या ग्रंथात नानासाहेबांच्या दुसऱ्या लग्नाची सविस्तर चर्चा केलीय. त्यात गुप्तरोगावर उपाय म्हणून लहान मुलीशी संबंध ठेवण्यासाठी नानासाहेबांनी दुसरं लग्न केलं असण्याची शक्यता व्यक्त केलीय.

`पानिपत असं घडलं` या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकाचे लेखक संजय क्षीरसागर याविषयी सांगतात, `फक्त गुप्तरोगच नाही, तर नानासाहेबांच्या खासगी विलासांचे इतरही दाखले इतिहासात आहेत. पण तसं वर्तन त्या काळात सत्ताधाऱ्यांसाठी सर्वमान्य होतं. पानिपतातल्या पराभवासाठी इतर कारणं आहेत. सदाशिवरावभाऊंना पानिपत स्वारीत स्वातंत्र्य न देणं, शिंदे आणि होळकरांत भांडणं लावणं, चौथाईच्या वसुलीवरून उत्तरेतल्या सत्ताधाऱ्यांना दुखावणं, अशा अनेक गोष्टींसाठी नानासाहेबही पानिपतातल्या पराभवाला जबाबदार आहेत.`

पानिपत सिनेमामधे यापैकी काहीच आढळत नाही. दिसतं ते या आशुतोष गोवारीकरांनी पेशव्याचे गायलेले गोडवे.

हेही वाचाः अश्लीलता ही काय भानगड आहे: र. धों. कर्वेंचं न झालेलं भाषण

पानिपत आजही आपल्या बोलण्यात येतं

पानिपत या हरयाणा राज्यातल्या शहराशेजारी भारताचा इतिहास बदलणारी तीन मोठी युद्ध झाली. पानिपतच्या पहिल्या युद्धात १५२६ मधे मोगल बादशाह बाबराने दिल्लीच्या गादीवर बसलेल्या शेरशाह सुरीला तर १५५६मधे दुसऱ्या युद्धात अकबराने हेमू या दिल्ली जिंकलेल्या हिंदू राजाला हरवलं. या युद्धांमुळे मोगलांच्या दिल्लीतल्या सत्तेचा पाया रचला गेला. मात्र पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर काही वर्षांतच दिल्लीचा मोगल बादशाह हा मराठ्यांच्या हातचं कळसूत्री बाहुला बनला. भले १७६१मधे झालेल्या या युद्धात अफगाणिस्तानचा राजा अहमदशाह अब्दाली याने मराठ्यांचा पराभव केला होता.

१७६१च्या संक्रांतीला महाराष्ट्रावर संक्रांत आली. एक लाख चुडा फुटला, हे पानिपताचं वर्णन अतिशयोक्तीचं नाही. गावोगावच्या तरण्याबांड सैनिकांची एक अख्खी पिढीच या युद्धात कापली गेली. या युद्धाने महाराष्ट्रावर खोलवर घाव केला. तो इतका खोलवर आहे की आजही आपण क्रिकेटमधल्या किंवा निवडणुकांतल्या मोठ्या पराभवाचं वर्णन `पानिपत झालं` असं करतो.

विश्वास पानिपतात गेला, असं सर्रास म्हणतो. विनाकारण लोक जमा झाले असतील तर त्याला `भाऊगर्दी` म्हटलं जातं. कारण पानिपतावरच्या पठाणांच्या गर्दीत सदाशिवरावभाऊ शेवटचे हरवले होते. त्यानंतर त्यांना कुणी जिवंत किंवा मेलेलं पाहिलं नाही.

पानिपतच्या पराभवातही विजय होता

पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला, मोठं नुकसान झालं. ही मराठ्यांची शोकांतिका असल्याचीच मांडणी प्रामुख्याने झाली. पण पानिपत हा मराठ्यांसाठी अभिमानास्पद वारसा असल्याचं सर्वसामान्य मराठी माणसांपर्यंत पोचवला, तो कादंबरीकार विश्वास पाटील यांनी. वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्यांनी लिहिलेली कादंबरी `पानिपत`ने त्यांना `पानिपतकार` बनवलं. पानिपत सिनेमावाल्यांनी आपल्या कादंबरीचा श्रेय न देता आधार घेतला, असा आक्षेप घेत विश्वास पाटील यांनी आशुतोष गोवारीकर यांना कोर्टात खेचलंय.

पानिपतच्या लढाईविषयी विश्वास पाटील म्हणतात, `पानिपताच्या पराभवातच मराठ्यांचा विजय होता. एक मराठी समाज सोडला तर दिल्लीच्या रक्षणासाठी संपूर्ण भारतात एकतरी समाज, प्रदेश कधी लाखोंच्या संख्येने पुढे धावलाय का? राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लाखोंच्या संख्येने एका दिवसात बलिदान देणारा दुसरा कुठला समाज आहे का? आमचे दोष होतेच. पण अत्यंत विपरीत परिस्थितीत आम्ही लढलो, हे महत्त्वाचंच आहे ना! म्हणूनच अहमदशाह अब्दालीने विजयाच्या जाहिरनाम्यात म्हटलंय की रुस्तुम आणि इस्फिंदारसारखे आमचे नायक असते तरी त्यांनी मराठ्यांचं शौर्य पाहून बोटं तोंडात घालून कराकरा चावली असती.`

पानिपत या कादंबरीतून केलेल्या मांडणीविषयी विश्वास पाटील म्हणतात, `पानिपतावर लढलेले पस्तीस छत्तीस मुख्य सरदार होते. त्यात फक्त पाच ते सहा ब्राह्मण होते. बाकी सगळे बहुजन समाजातले होते. पानिपतानाच्या मातीतूनच पुढे शिंदेशाही आणि होळकरशाही स्थिर झाली. बडोद्याचे गायकवाडही त्यातूनच उदयाला आले. त्यामुळे पानिपत हा महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या जीवनातला अलौकिक क्षण होता, हे मला सापडलेलं मर्म मी कादंबरीत मांडलं. तसं त्याच्याआधी कुणी मांडलेलं नव्हतं.`

हेही वाचाः कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

और भी लडेंगे म्हणणारे दत्ताजी चवीपुरतेच

मात्र पानिपत सिनेमा बघताना बहुजन सरदार आणि सैनिकांचं शौर्य दिसतच नाही. हा सिनेमा फक्त पेशव्यांच्या भोवतीच फिरतो. सदाशिवरावभाऊंचं थोरपण सांगत राहतो. एक सेनापती म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत ते लढत राहिले, हे त्यांचं मोठेपण होतंच. पण उत्तरेतल्या राजकारणाचा, भूगोलाचा आणि हवामानाचा अंदाज त्यांना आला नाही, हेही खरं होतंच. असं सगळं असलं तरी भाऊंचं मोठेपण कुठेच कमी होत नाही. मात्र याचा अर्थ असाही नाही की इतर सरदारांचं योगदान सिनेमात दिसूच नये.

दत्ताजी शिंदे यांनी अब्दालीला दिल्ली जिंकता येऊ नये म्हणून त्याला रोखून ठेवलं होतं. बुरांडी घाटात नजीबखान आणि कुतुबशाहने त्यांना मारलं. `पटेल, हमारे साथ और भी लडोगे?` असं विचारलं. त्यावर दत्ताजींनी दिलेलं उत्तर इतिहासात अमर झालं. ते उत्तरले, `निशा अकताला, (इन्शाअल्लाचा मराठी उच्चार) बचेंगे तो और भी लडेंगे.` कुतुबशाहने दत्ताजीचं मुंडकं भाल्याला लावून मिरवलं. त्याचा बदला घेण्यासाठी मराठी सैन्य एकवटलं आणि शेवटपर्यंत झुंजलं.

मात्र सिनेमात दत्ताजी एका गाण्यात आणि अर्ध्या मिनिटाच्या सीनमधे संपतात. सदाशिवरावभाऊंच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच दत्ताजींच्या खुनाची बातमी येते आणि त्यांना उत्तरेकडे निघावं लागतं, असं सिनेमात दाखवलंय. पण प्रत्यक्षात भाऊंची दोन लग्न झाली होती.

पार्वतीबाईंशी लग्नही पानिपताच्या दहा वर्षांआधीच झालं होतं. त्यांची दोन मुलं जन्मताच दगावली. त्यामुळे स्वारीसोबत तीर्थयात्रा, व्रतवैकल्य करण्यासाठी पार्वतीबाई सोबत आल्या. सिनेमावर दाखवलीय तशी त्यांनी पानिपतावर तलवारबाजी केल्याचा पुरावा कुठेही नाही. असलाच तर पुरावा मल्हारराव होळकरांच्या मदतीने पानिपतावरून पळून जाण्याचा आहे.

शिंदे होळकरांचं असं चित्रण का?

शिंदे घराण्याचे प्रमुख असणारे जनकोजी शिंदे पानिपतच्या वेळेस अवघ्या पंधरा वर्षांचे होते. सिनेमात ते बुजुर्ग गोविंदपंत बुंदेले -खेर यांना वाकून नमस्कार करताना दाखवले आहेत. त्यावरून मराठा इतिहास अभ्यासकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केलीय. असं असलं तरी आपल्या पित्याचा खुनी कुतुबशाहला माफ करणारे जनकोजी समंजस, नम्र असण्याची शक्यता आहे. ते बुंदेलेंना वाकून नमस्कार करतीलही. 

पण बुंदेलेंच्याच वयाचे मल्हारराव होळकर यांच्या पाया पडताना कुणीही दिसत नाही. ना २० वर्षांचे विश्वासराव त्यांच्या पाया पडत, ना तीस वर्षांचे सदाशिवराव. मल्हाररावांइतका उत्तरेतला अनुभव मराठी सैन्यात कुणाकडेही नव्हता. त्यांच्या मार्गदर्शनातच रघुनाथराव पेशव्यांनी थेट अफगाणिस्तानातल्या अटकेपार झेप घेतली होती. मात्र सदाशिवरावभाऊंनी त्यांच्या अनुभवाचा, क्षमतेचा उपयोग करून घेतला नाही. सिनेमात तर त्यांना थकलेला, हताश, गोंधळलेला म्हातारा बनवलंय. बुंदेले ब्राह्मण आणि मल्हारराव धनगर असल्यामुळे हे घडल्याचा आरोप कुणी केला, तर त्यांना चुकीचं कसं ठरवायचं? 

हेही वाचाः मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

पानिपत सिनेमात हा इतिहास नाही

पानिपतात ऐतिहासिक चुका तर खूप आहेत. त्यात बाजारबुणगे कुठे दिसत नाहीत. व्रतवैकल्यांसाठी महिनोंमहिने थांबणं नाही. मेहेंदळे आणि बुंदेले यांचं हौतात्म्य नाही. नानासाहेबांचा बेजबाबदारपणा नाही. अन्नधान्य नसल्यामुळे झाडाची सालं खाण्याची नामुष्की नाही. दिल्लीच्या लाल किल्ल्यातलं चांदीचं तख्त फोडून नाणी पाडणं नाही. 

मात्र इतिहासाशी विसंगत असणाऱ्या अनेक प्रसंग आणि व्यक्तिरेखा आहेत. पण ते गोळा करून दोन घटका रंजन होत असेल, तर तेही नाही. सूरजमल जाट यांचं चुकीचं चित्रण केल्याचे आरोप झाल्यानंतर सिनेमाचा काही भाग कापण्यात आलाय. त्यामुळे तर शेवटी सिनेमा अचानक संपतो. पानिपतवर मराठी सैन्य अडीच महिने अडकलं होतं, हे सिनेमा सांगतच नाही. 

पानिपतानंतरही अब्दालीचं भारतावर आक्रमण

पानिपतचं युद्ध जिंकून अहमदशाह अब्दाली कंदहारला निराश होऊनच परततो. कारण युद्ध जिंकूनही त्याची वाताहत होते. सिनेमा संपल्यावर पडद्यावर एक ओळ येते, अहमदशाह अब्दाली याने पुन्हा भारतावर आक्रमण केलं नाही. अब्दालीने मराठ्यांची दहशत घेऊन भारताकडे पुन्हा वाकडी नजर केली नाही, हाच मराठ्यांचा विजय असल्याचं त्यातून सांगितलंय. 

पण इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी सांगतात, `अब्दालीने भारतावर सात स्वाऱ्या केल्या. पानिपतच्या युद्धानंतर लगेचच त्याने १७६२-६३ या काळात पंजाबवर तर १७६४-६७ या काळात सियालकोटवर आक्रमण झालं. आता पंजाब आमच्या हिंदुस्तान या व्याख्येत कदाचित बसत नसेल. किंवा आमच्या पूर्वजांचे गोडवे गाण्यात अडचण होत असल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो.` 

पंगतींचा भेद तेव्हा होता, आजही आहे

मराठे आणि अब्दाली यांचं सैन्य यमुनेच्या दोन किनाऱ्यांवर काही महिने अडकलं होतं. तेव्हाचा एक प्रसंग पानिपताविषयीच्या सर्व महत्त्वाच्या पुस्तकांत सापडतो. अब्दाली मराठ्यांच्या सैन्यात अनेक चुली पेटलेल्या बघतो. त्याला आश्चर्य वाटतं. तो आपल्या सहकाऱ्यांना त्याचं कारण विचारतो. कारण असतं जात. जातभेदामुळे भारतीय एकत्र जेवत नसल्याचं त्याला कळतं. तेव्हा तो म्हणतो, इतके विभागलेले असतील तर जिंकणार कसे? 

अफगाणिस्तानातल्या जमातींना एकत्र करून तिथे साम्राज्य उभारणाऱ्या अब्दालीला एकीचं महत्त्व माहीत होतंच. पण आपण भारतीयांना ते अजूनही कळलेलं नाही. पुढच्या महिन्यात पानिपताला २६० वर्षं होतील. तरीही अजून आमचा पंगतींचा भेद संपलेला नाही. निदान पानिपत सिनेमाच्या पडद्यावर तो लपवण्याची पराकाष्ठा करूनही उघडा पडतोच. पानिपत सिनेमा मोठ्या पडद्यावरचा नवा पंक्तिभेद मांडत राहतो.

हेही वाचाः 

पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं? 

पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा

शनिवारवाडा १८१८:  पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार

(साप्ताहिक चित्रलेखामधील लेखाचा संपादित भाग.)