इंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय?

२६ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान कार्यालयात केलेल्या दारू पार्ट्यांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या महासंकटाशी झुंजताना अवघा देश गलितगात्र झालेला असताना देशाचे पंतप्रधान आपल्या शंभरेक मित्रांना निमंत्रण देऊन सरकारी कार्यालयात पार्टी करत असतील तर ते निश्चितच आक्षेपार्ह आहे. ब्रिटनच्या महान संसदीय लोकशाही परंपरेला यामुळे एक कलंक लागलाय.

भारतावर १५० वर्षं जुलमी राजवट गाजवूनही ब्रिटिशांच्या राहणीमानाचे, जीवनशैलीचे गोडवे आपल्याकडे आजही गायले जातात. आपल्या घरच्या आजीविषयीही नसेल इतकी ब्रिटनच्या महाराणीची माहिती असणारे अनेक जण आपल्या देशात आहेत. ब्रिटिशांच्या शिष्टाचारांचा पगडा तर भारतीयांच्या विशेषतः बुद्धिजीवी वर्गातल्या लोकांवर प्रचंड असल्याचा दिसतो. अशा परमोच्च आदर्श असणार्‍या ब्रिटनच्या पंतप्रधानांना दारू पार्टीमुळे पायउतार होण्याची वेळ येऊन ठेपलीय.

सात दशकांपूर्वी ब्रिटनचे दिवंगत पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते, ‘मुळात भारत हा एकसंध देश नाही. हा अनेक देशांचा समूह आहे. ब्रिटिश या देशातून गेल्यानंतर हा देश फुटेल.’ ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर हा देश फुटला नाही. उलट आशिया खंडातल्या सर्वाधिक काळ अखंडत्व टिकवून राहिलेली लोकशाही म्हणून भारताकडे संपूर्ण जग आज कौतुकाने पाहतंय.

भारतासोबत स्वतंत्र झालेल्या शेजारच्या इतर देशांमधे लोकशाही शासनव्यवस्था आजही प्रस्थापित झालेली नाही. भारतीय लोकशाहीमधे अनेक उणिवा असतील, अपरिपक्वता असेल; पण या सर्वांना दूषण देण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहे, असं मानून चालणार्‍या इंग्लंडच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीबाबत ज्या गोष्टी समोर आल्यात, त्या थक्क करणार्‍या आहेत.

काय आहे पार्टीगेट प्रकरण

या पार्टीगेट प्रकरणाबाबत इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समधे मजूर पक्षाचे अध्यक्ष सर कियर स्टॉमर यांनी जेव्हा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची शाळा घेतली, त्यानंतर पंतप्रधानांचा चेहरा वर्गात दंगा करणार्‍या विद्यार्थ्याने शिक्षकांचा ओरडा खाल्ल्यानंतर होतो तसा झाला होता. अर्थातच बोरिस जॉन्सन यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे.

सगळा ब्रिटन जेव्हा कोरोनाच्या महासंकटापुढे गुडघे टेकत होता, त्यावेळी देशवासीयांना या संकटातून बाहेर काढण्याची नैतिक जबाबदारी असणारे पंतप्रधान आपल्या कार्यालयात १० डाऊनिंग स्ट्रीटच्या लॉनवर दारू पार्टी करत होते. आपल्या सरकारी निवासस्थानी मित्रांना बोलावून त्यांनी दारू पार्टी आयोजित केली होती. पंतप्रधान जॉन्सन यांच्या खासगी सचिवाने पाठवलेला ईमेल आता समोर आलाय.

जॉन्सन यांच्या सुमारे १०० मित्र आणि सहकार्‍यांना ईमेल पाठवला होता. त्यात पार्टीत सहभागी होणार्‍या प्रत्येकाला आपापलं मद्य आणायला सांगितलं होतं. ही पार्टी २०२०च्या ख्रिसमसमधे झाली. यानंतर एप्रिल २०२१ मधे संपूर्ण ब्रिटन प्रिन्स फिलिप यांच्या निधनामुळे शोकाकुल झालं होतं. ब्रिटनचा राष्ट्रध्वज अर्धा झुकवला होता. त्यांच्या अंत्यविधीवेळी ब्रिटनची राणी एलिझाबेथ एकटीच बसल्याचं छायाचित्र प्रसिद्ध झालं होतं.

या छायाचित्रामुळे कोरोनाची विदारकता आणि ब्रिटनमधील निर्बंध चर्चेत आले होते. या अंत्यविधीला मोजक्याच लोकांना परवानगी होती. पण अंत्यविधीच्या काही तास आधी ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरी दारू पार्टी सुरू होती आणि डाऊनिंग स्ट्रीटवर मद्याचे एकामागून एक घोट रिचवत आनंद लुटला जात होता. 

पार्टीच्या नादात नैतिकता धाब्यावर

या पार्टीचा ‘इतिवृत्तांत’ डेली टेलिग्राफ आणि डेली मिरर या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाला असून त्यानुसार रात्री पार्टीचा कैफ जेव्हा ‘सातवे आसमान पर’ गेला होता तेव्हा मद्य संपल्याचं लक्षात आलं. तेव्हा एका कर्मचार्‍याला रात्री सुटकेस घेऊन जवळच्या सुपर मार्केटमधे दारू आणायला पाठवलं. पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी एक जण पंतप्रधानांच्या मुलासाठी बनवलेल्या झोपाळ्यावर चढला आणि त्याच्या वजनाने तो तुटलाही! यावरून पार्टीतल्या सर्वांनाच थोडी जास्तच झाली होती, असं समजतं.

या पार्टीकडे पाहायचा आणखी एक द़ृष्टिकोन आहे. लॉकडाऊन असताना ब्रिटिश जनतेला घरातही पार्टी करता येणार नाही, केल्याचं आढळल्यास ८०० पाऊंडचा दंड आकारला जाईल, असं फर्मान गृहसचिव प्रीती पटेल यांनी काढलं होतं. सुरुवातीला हा दंड २०० पाऊंड होता. कोरोनामुळे त्यावेळी सलून, वाचनालये, रेस्टॉरंट, सर्व काही बंद करण्यात आलं होतं. लोकांना गळाभेट घ्यायलाही मज्जाव केला होता.

पंतप्रधानांचा भारत दौराही रद्द करण्यात आला होता. अशा सर्व निर्बंधांच्या काळात पंतप्रधान कार्यालयातल्या कर्मचार्‍यांनी दारू पार्टी आणि नाचगाण्याची मैफल रंगवली. त्यामुळेच आता चहूबाजूंनी जॉन्सन यांच्यावर टीका होतेय. मजूर पक्षाचे नेते केर स्टार्मर यांनी देशाचे नेतृत्व करण्याची नैतिकता जॉन्सन यांनी गमावलीय, असे म्हटले आहे.

हेही वाचा : ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची? 

बेजबाबदार वर्तनामुळे खुर्ची धोक्यात

बोरिस जॉन्सन यांची मागे चर्चा रंगली ती त्यांच्या विवाहामुळे. २०१९मधे माध्यमांनी बोरिस जॉन्सन आणि कॅरी यांचं नातं जगासमोर आणलं होतं. फेब्रुवारी २०२०मधे बोरिस यांनी आपण कॅरीसोबत साखरपुडा केल्याचं आणि कॅरी गर्भवती असल्याचं जाहीर केलं होतं. बोरिस हे ५६ वर्षांचे आहेत, तर कॅरी या ३३ वर्षांच्या आहेत. आता ‘पार्टीगेट’मुळे त्यांची पंतप्रधानपदाची खुर्ची धोक्यात येते की काय, असा प्रश्न निर्माण झालाय.

घटनात्मक पदांवर असणार्‍या व्यक्तींचं वर्तन अत्यंत जबाबदारीपूर्ण असलं पाहिजे, असा संकेतच नाही तर दंडक आहे. इथे तर प्रश्न पंतप्रधानपदावरील व्यक्तीचा आहे. २०१९मधे जॉन्सन यांनी सार्वत्रिक निवडणुकांमधे विजय मिळवून पंतप्रधानपद स्वीकारलंय. याचाच अर्थ जनतेनं बहुमताने राज्यकारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलीय.

अशा वेळी परिस्थितीचं तारतम्य बाळगण्याची किमान अपेक्षा त्यांच्याकडून असणं यात गैर काहीच नाही. खरं तर ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. हे गांभीर्य देशासमोर आल्यानंतर जॉन्सन यांनी आपली चूक मान्य करत माफीही मागितलीय. पण सुरुवातीला त्यांनी प्रकरण दडपायचा प्रयत्न केला होता. पण या पार्ट्यांचे विडीओच समोर येऊ लागल्यामुळे आता पळवाटा बंद झाल्यात हे लक्षात आल्यानं कदाचित जॉन्सन यांना उपरती झाली असावी.

इंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा

घडला तो प्रकार अत्यंत निषेधार्हच होता, याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता, याची आठवण जॉन्सन यांच्या या कृत्याने झाल्यावाचून राहात नाही. संसदीय लोकशाही ही इंग्लंडने जगाला दिलेली एक महान देणगी आहे.

इंग्लंडच्या संसदीय लोकशाहीला प्रमाण मानून जगातल्या इतर अनेक देशांनी या पद्धतीचा स्वीकार केलाय. इंग्लंडमधील संसदीय व्यवस्था ही सर्वांत जुनी व्यवस्था मानली जाते. अशी महान परंपरा असलेल्या देशाच्या मुख्य पदावरील व्यक्तीकडून बेजबाबदार वर्तणूक घडणे हा त्या परंपरेचा अपमान आहे.

भारतासारख्या देशाला स्वातंत्र्य बहाल करताना आणि ते दिल्यानंतरही इथल्या लोकांना सदैव हीन लेखणार्‍या ब्रिटिशांनी ही बाब सदैव लक्षात ठेवावी की, गेल्या सात दशकांमधे इथल्या राज्यकर्त्यांच्या असंख्य चुका झाल्या असतील, निर्णयक्षमता कमी पडली असेल, द़ृष्टिकोन चुकले असतील, पण त्यांनी कधीच ही पातळी गाठली नाही.

हेही वाचा :

सरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार?

माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?

वीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या पुतिन यांना का बदलायचंय रशियन संविधान?

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की