रामाने केलेली शंबूकहत्या, सीतात्याग किती खरा, किती खोटा?

१० एप्रिल २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


रामायणाचा नायक असलेल्या रामाविषयी कोणती भूमिका घ्यावी याविषयी आपल्या समाजात गेली दोन-सव्वा दोन हजार वर्ष उलटसुलट चर्चा चालू आहे. रामाबद्दल वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. काही लोक विशेषतः पुरोगामी चळवळीतले लोक अन्यायी राजा म्हणून त्याच्यावर कठोर टिका करतात. याउलट बहुसंख्य लोक त्याच्याविषयी नितांत श्रद्धा बाळतात.

रामायणात सात कांडं आहेत. कांड या शब्दाचा मूळ अर्थ कांडे किंवा विभाग असा आहे. ग्रंथाच्याबाबतीत कांड हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ प्रकरण किंवा अध्याय यासारखा विभाग असा होतो. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किन्धाकांड , सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड ही रामायणातली सात कांडं. एक ते पाच या कांडांची समाप्ती आणि सहाव्या युद्धकांडाची समाप्ती यांच्या आशयात प्रचंड तफावत आहे.

उत्तरकांडच रामायणात घुसडलंय?

सहाव्या कांडाचा शेवट केवळ विशिष्ट घटनेचं निवेदन करून झालेला नाही. युद्धकांडाच्या शेवटी फलुश्रुती सांगितली आहे. ही फलश्रुती आणि तिच्यात आलेले वाक्यांश एक गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित करतात ती म्हणजे मूळचा रामायण हा ग्रंथ युद्धकांडाअखेर संपला होता. मात्र सध्याचा उपलब्ध रामायण हा ग्रंथ युद्धकांडाबरोबर संपलेला नाही. तो उत्तरकांडाबरोबर संपतो.

मूळचं रामायण हे युद्धकांडाच्या अखेरीला संपलेलं असेल तर उत्तरकांड नंतरच्या काळात कोणीतरी विशिष्ट्य उद्देशाने रामायणाला जोडलंय. उत्तर या शब्दाचा अर्थच नंतरचे असा आहे. म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात उत्तरकांड नव्हतं. ते नंतर कोणीतरी जोडलं. म्हणजेच नंतरच्या काळात रामायणात घुसडण्यात आलं.

एखाद्या ग्रंथांत मुळात नसलेला भाग लेखकाशिवाय दुसर्‍या कोणीतरी घुसडण्याच्या क्रियेला प्रक्षेप असं म्हणतात. एखाद्या ग्रंथात जो भाग प्रक्षेपाने आलेला असतो त्याला प्रक्षिप्त असं म्हणतात. संपूर्ण उत्तरकांडच रामायणात नंतर घुसडलेलं असेल तर त्यामधे आलेल्या विविध घटनाही नंतर घुसडलेल्या आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण

रामावर ज्या दोन घटनांसाठी सर्वात मोठा ठपका ठेवला जातो त्या घटना म्हणजे त्याने ब्राम्ह्मणाचा मुलगा जिवंत करण्यासाठी केलेली शंबूकाची हत्या आणि लोक सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतात म्हणून त्याने केलेला तिचा त्याग. शंबूकाच्या हत्येचा प्रसंग उत्तरकांडात ७३ ते ७६ सर्गात आला आहे. तसंच सीतेच्या त्यागाचा प्रसंग उत्तरकांडातच ४३ ते ४८ सर्गात आलाय.

उत्तरकांडच प्रक्षिप्त असेल तर या सर्गामधे आलेले वरचे दोन्ही प्रसंगही प्रक्षिप्त हे उघड आहे. रामायणाचं उत्तरकांड प्रक्षिप्त आहे याविषयी शंकाच नाही. पण याचा अर्थ असा नाही की रामायणात फक्त येवढाच भाग प्रक्षिप्त आहे. वस्तुतः रामायणाचं मूळ असलेलं दशरथजातक अगदी संक्षिप्त आहे. त्याचा विस्तार करून वाल्मिकींनी रामायण लिहलं.

वाल्मिकींनी जे रामायण लिहलं त्याने प्रस्थापित व्यवस्थेतल्या लोकांचं समाधन होत नव्हतं. आपलं याबाबतीतलं असमाधान दूर करण्यासाठीच त्यांच्याकडून रामायणात उत्तरकांड घुसडण्यात आलं. याच पद्धतीने बालकांडापासून ते युद्धकांडापर्यंत असंख्य गोष्टी रामायणात घुसडण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं

महाभारत, रामायणाचं ब्राह्मणीकरण

प्रक्षेप हे काही केवळ रामायणातच झाले आहेत असंही नाही. कौटिलीय अर्थशास्त्रासारखे महान ग्रंथही या तडाख्यातून सुटलेले नाहीत. ही प्रक्रिया प्रामुख्याने घडली ती इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकात. पुष्यमित्र शुंगाने सम्राट अशोकाच्या वंशजाची हत्या केली आणि त्यानंतर ब्राम्ह्मणी राजवट प्रस्थापित केली.

मनुस्मृतीचा आणि विषमतावादी तत्सम साहित्याचा उदय त्या काळातच झाला. या काळात आपल्या देशाच्या इतिहासातल्या कदाचित सर्वांत मोठ्या उलथापालथी म्हणता येतील असे प्रकार घडले. असंख्य ग्रंथाचं, सांस्कृतिक मूल्यांचं स्वरूप बदलवून टाकण्यात आलं.

या प्रक्षेपप्रक्रियेचा सर्वात मोठा फटका महाभारत आणि रामायण या ग्रंथांना बसला. त्यांचं आरपार ब्राह्मणीकरण करण्यात आलं. रामाचे चरित्र समजून घेताना त्याकाळी घडलेल्या या गोष्टींकडे डोळेझाक करून आपल्याला सांस्कृतिक मूल्यांचं पुनर्निमाण करता येणार नाही.

प्रतिक्रांतीचं कुटील कारस्थान

पुष्यमित्राने जी प्रतिक्रांती घडवली, ती तथागत बुद्ध आणि सम्राट अशोक यांनी केलेल्या महान क्रांतीला उलथवून टाकण्यासाठी. बुद्धांनी जी अनेक क्रांतीकारक कार्य केली, त्यामधे शूद्रांना इतरांच्या बरोबरीने अधिकार देणं हे एक अगदी युगप्रवर्तक कार्य होते. त्यांच्या या कार्यामुळे वर्णव्यवस्थेतल्या विषमतेला सुरुंग लागला. असंख्य सामान्य व्यक्ती प्रतिष्ठेच्या सर्वोच्च स्थानावर पोचल्या. याचा परिणाम अर्थातच ब्राह्मणी व्यवस्थेचं वर्चस्व क्षीण होण्यात झाला.

स्वाभाविकच या व्यवस्थेचे समर्थक अतिशय बेचैन झाले आणि बुद्धांनी दाखवलेली वाट कायमची बंद पाडण्याच्या ईर्षेने पेटले. तीच स्थिती बुद्धांनी स्त्रियांच्याबाबतीत उचललेल्या पावलांची होती. मनुस्मृतीने ज्या अनेक गोष्टी केल्या. त्यामधे बुद्धांच्या या दोन कार्यांना छेद देण्याचा प्रयत्न होता.

एकीकडून शुद्रांना पूर्णपणे दडपून टाकायचे आणि ब्राह्मणप्रधान व्यवस्था निर्माण करायची, हा ब्राह्मणी डावपेचाचा महत्वाचा भाग होता दुसरीकडे स्त्रियांचं जीवन अतिशय निः सत्व बनवून समाजव्यवस्था सर्वार्थाने पुरुषप्रधान बनवणं हा प्रतिक्रांतीमधला महत्वाचा घटक होता. शंबूकाची हत्या आणि सीतेचा त्याग या घटना प्रतिक्रांतीच्या कुटील कारस्थानातून रामायणात घुसडण्यात आल्या हे उघड आहे.

हेही वाचा: प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

रामाच्या नावावर खोट्या कथा

वैदिक ब्राह्मणांना समग्र संस्कृती ब्राह्मणप्रधान आणि पुरुषप्रधान बनवायची होती. पण या गोष्टी ते स्वतःच्या नावाने साध्य करू शकत नव्हते. वामन आणि परशूराम या ब्राह्मण अवतारांचा त्यांनी खूप गौरव करून पाहिला. पण बहुजन समाजाने त्या अवतारांचा मनापासून स्वीकार केला नाही. याउलट राम आणि कृष्ण या व्यक्ती बहुजनांमधे अतिशय लोकप्रिय होत्या. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन आपल्याला हवी असलेली मूल्यं लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी त्यांनी एक प्रकारे या दोघांना वेठीला धरलं.

एकीकडून आपण त्यांच्याविषयी आदर दाखवत आहोत असं म्हणायचं. दुसरीकडे ते महापुरुष सातत्याने ब्राह्मणांना शरण जाणारे आहेत. त्यांचे हितसंबंध जपणारे आहेत असं दाखवत रहायचं. रामासारखे महान लोकच ब्राह्मणांची प्रत्येक गोष्ट मानत असतील तर आपणही ती मानली पाहिजे असे संस्कार लोकांच्या मनावर करण्यासाठी ही युक्ती वापरण्यात आली.

शुद्रांना ज्ञानाचा अधिकार नाही असं शास्त्रकारांचं मत होते. पण ते समाजावर बिंबवण्यासाठी तपश्चर्या करणार्‍या शूद्र शंबूकाची हत्या रामाच्या नावावर रचण्यात आली. परक्याच्या घरात राहिल्यानंतर जिने आपल्या चारित्र्याला डाग लागू दिलेला नाही, अशा स्त्रीलाही आपल्या घरात पुन्हा घेता कामा नये हा नियम प्रतिक्रांती करणार्‍या लोकांना समाजात रुजवायचा होता. पण त्यासाठी रामासारख्या लोकप्रिय व्यक्तीच्या माध्यमातून समाजापुढे जाणं आवश्यक होतं. म्हणून रामाच्या नावावर सीतात्यागाची घटना घुसडण्यात आली.

हितसंबंधासाठी रामाचं चारित्र्यहनन

आता प्रश्न असा निर्माण होतो की या दुष्कृत्यांमागचे गुन्हेगार कोण? उत्तर स्पष्ट आहे. ज्यांना शुद्रांचं आणि स्त्रियांचं स्वातंत्र्य मान्य नव्हतं, त्यांनी आपले संकुचित विचार संपूर्ण समाजवर लादण्यासाठी रामाच्या नावाचा वापर करून घेतला.

आपल्याला हवी असलेली मूल्यं आपल्या नावाने सांगितली असता समाजात खोलवर रुजण्याची शक्यता नाही. पण समाजात अत्यंत लोकप्रिय असलेल्या रामाच्या नावाने ती मूल्यं जगापुढे मांडली तर लोक रामाविषयीच्या आदरापोटी ती मूल्यं नक्कीच स्वीकारतील हे ओळखून या कथा रामायणात घुसडण्यात आल्या.

या दोन कथांची प्रमुख वैशिष्ट्यं आपण ध्यानात घेतली पाहिजेत. या कृत्यांमधे जी निर्दयता, जो अन्याय दिसून येतो त्याची जबाबदारी रामाच्या मस्तकावर गेली आणि रामाच्या नावावर कथा रचणारे मात्र नामानिराळे राहिले. खरं तर त्यांनी आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी केलेलं रामाचं चारित्र्यहननच होय.

भारताच्या इतिहासाचं लेखन हितसंबंधी लोकांनी एकतर्फी केलं आहे. आणि म्हणून त्याचं पुनर्लेखन केलं पाहिजे असं आपण पुन्हा पुन्हा म्हणत असतो. हाच न्याय रामचरित्राला का लावायचा नाही. काही लोकांनी रामाचं चरित्र आरपार बदलून टाकलंय. आपल्या स्वार्थी उदिष्टांसाठी त्याच्या चरित्रावर वर्चस्ववादाची पुटं चढवली आहेत हे जर फलश्रुतीवरून स्पष्ट होत असेल तर त्याच्या चरित्राचं पुनर्लेखन का करायचं नाही?

हेही वाचा:

मुंह मे राम, बगल में वोट

गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?

जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड