कोरोना लसीचे १० दावेदार  कोणते?

११ जुलै २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


वेगवेगळ्या देशातल्या अनेक संस्था कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. यातलं एखादं दुसरं संशोधन यशस्वी होईल आणि साधारण २०२१ च्या सुरवातीपर्यंत आपल्या हातात लस पडेल. म्हणूनच कोरोना वायरसच्या लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहिती ठेवायला हवी.

कोरोना वायरसच्या विखळ्यात अडकलेले सगळे देश एकच वाक्य आपल्या कानावर पडण्याची वाट पाहतायत. ‘लस बनवून तयार आहे.’ मार्च २०२० पासून वेगवेगळ्या देशात लसीवर संशोधन चालू आहे. आताही अनेक लसींचं संशोधन सुरूय. त्यातल्या अनेक लसी बनवून तयार असल्या तरी त्यांची प्रत्यक्ष माणसावर चाचणी होणं बाकी आहे. काही संस्थांनी चाचणीची पहिली पायरी पूर्ण करून दुसऱ्या पायरीकडे वाटचाल केलीय.

या अनेक संशोधनांपैकी काही संशोधनं अयशस्वी होतील, काही मधेच थांबतील. तर काही संशोधनं यशस्वी होऊन कोरोना वायरसची लस निघेल. अशी लस काढण्यासाठी वेगवेगळ्या देशातल्या अनेक कंपन्या प्रयत्न करतायत. द न्यूयॉर्क टाईम्समधे दिलेल्या बातमीनुसार बहुतेक कंपन्यांचं संशोधन दुसऱ्या पायरीवर आलं आहे. कोरोना वायरस लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहीत करून घ्यायला हवं.

१) मॉडर्ना 

मॉडर्ना ही अमेरिकेतली प्रसिद्ध औषध कंपनी आहे. कोरोना वायरसची लस बनवण्यासाठी लागलेल्या शर्यतीत ही कंपनी सगळ्यात पुढे आहे. या कंपनीनं फेज १ मधली चाचणी वॉशिंग्टनमधे मार्च १६लाच संपवली. फक्त ६३ दिवसांत ही लस तयार करण्यात आली होती. आता जुलैमधे ही कंपनी लसीची फेज ३ मधली चाचणी घेणार आहे. त्यानंतर २०२१च्या सुरवातीला ही लस आपल्यासाठी उपलब्ध होईल.

हेही वाचा : कोरोनाला रोखणारी लस बनवण्याचं काम कुठंवर आलंय?

२) बायोएनटेक आणि पीफिझर

जर्मनमधल्या बायोएनटेक या कंपनीनं पीफिझर या न्यूयॉर्कमधल्या आणि फोस्युन फार्मा या चीनमधल्या कंपनीसोबत हातमिळवणी केलीय. या तीन कंपन्या मिळून बायोएनटेक या कंपनीकडून एमआरएनए प्रकारची लस तयार करतायत. कोरोना वायरसच्या शरीराचं प्रोटीन भाग काढून ही लस बनवली जातेय. या लसीचा प्रयोग करण्यात आलेल्या आमच्या सगळ्या स्वयंसेवकांना कोरोना वायरसविरोधातल्या अँटीबॉडी मिळाल्या असं या संस्थेनं  जुलै १ला जाहीर केलं होतं. त्यातल्या काहींना लसीमुळे झोप न येणं, हात दुखणं अशी इतर लक्षणं दिसली. ऑक्टोबर २०२० पासून कंपनी या लसीचं वितरण करू लागेल असं पीफिझरच्या सीईओंनी एका मुलाखतीत स्पष्ट केलंय. 

३) इम्पेरिअल कॉलेज

लंडनमधल्या इम्पेरिअल कॉलेजमधल्या संशोधकांनी सेल्फ ऍम्प्लिफाईड आरएनए प्रकराची लस विकसित करण्याचं काम सुरू केलंय. नुसत्या आरएनए लसीत फक्त वायरसच्या शरीरातलं प्रोटीन असतं. पण या लसीत गरज पडल्यास हे प्रोटीन वाढवण्याची शक्तीही असते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीला चालना मिळते. जून १५ ला त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या पातळीवरचं काम एकत्र सुरू केलं. लसीचं संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्याचं वितरण करण्यासाठी त्यांनी मॉर्निंगसाईड वेंचर्स या कंपनीशी हातमिळवणी केली आहे.

४) सानफोई

सानफोई या फ्रेंच औषध कंपनीनं अमेरिकेतल्या ट्रान्सलेट बायो या कंपनीसोबत लसीवर संशोधन करत असल्याचं जाहीर केलं आहे. सानफोई या संस्थेचे तज्ञ ही वॅक्सीन तयार करणार असून त्याचं उत्पादन आणि वितरणाची जबाबदारी ट्रान्सलेट बायोने उचचली आहे. जून २३ ला त्यांनी पहिल्या पायरीतली चाचणी सुरू करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कुछ वायरस अच्छे होते है!

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

५) आयसीआरएम

इंडियन काउन्सील ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीआमआर ही भारतीय सरकारी संस्थाही लसीवर संशोधन करतेय. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यासंस्थेसोबत वायरसच्या काट्यांच्या आवरणावर असलेल्या एका प्रोटीनपासून ही लस बनवली जातेय. या लसीने शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं सांगण्यात येतंय. भारत बायोटेक ही लस तयार करणारी अग्रेसर कंपनी आहे.

६) झायडस कॅडिला

अहमदाबादमधल्या झायडस कॅडिला या कंपनीनं नवी पद्धत वापरून लस तयार करण्याचा प्रयत्न केला असल्यानं जगभर याचा बोलबाला सुरूय. ही कंपनी डीएनए प्लास्मिड या प्रकारची लस बनवण्याचा प्रयत्न करतेय. हे संशोधन अतिशय प्राथमिक स्तरावर असलं तरी लस निर्माण करण्यासाठी लागणारी भारतातली सगळ्यात दर्जेदार यंत्रणा या कंपनीत उपलब्ध असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे लवकरच ही लस आपल्याला उपलब्ध होऊ शकते.

७) एनजेस

जपानमधल्या एनजेस या कंपनीनंही डीएनएवर आधारीत लसीच्या चाचण्या सुरू केल्याचं जाहीर केलंय. याचा पहिला प्राण्यांवर केलेला प्रयोग यशस्वी झाला होता. लस घेतल्यानंतर कोरोना वायरसच्या अँटीबॉडी प्राण्यांमधे विकसित झाल्याचं समोर आलं. आता काही मोजक्या माणसांवर या लसीचा प्रयोग होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर आणखी मोठ्या संख्येवर हा प्रयोग होईल. त्यानंतर टाकरा बायो या कंपनीशी हातमिळवणी करून लसीचं वितरण आणि उत्पादन केलं जाईल.

हेही वाचा : ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

८) जेनेझाईन ईन्कोर्पोरेडेट

दक्षिण कोरियामधली जेनेझाईन ईन्कोर्पोरेडेट ही कंपनी डीएनए लस शोधण्याच्या मागावर आहे. जीएक्स-१९ असं नाव या लसीला दिलं जाईल. कोरियच्या अन्न आणि औषध मंत्रालयाने मान्यता दिलेलं हे दक्षिण कोरियातलं पहिलं संशोधन असल्याचं या कंपनीचे सीईओ यंग चुल संग यांनी तिथल्या स्थानिक मीडियाला सांगितलं. सध्या लसीची फेज १ मधली चाचणी चालू आहे. दुसरी फेज सप्टेंबरनंतर चालू होईल.

९) इनोविओ

३० जूनला इनोविओ या अमेरिकन कंपनीनं त्यांच्या लसीच्या फेज १ मधल्या चाचणीचा डाटा जाहीर केला. त्यांच्या लसीमुळे कुणालाही साईड इफेक्ट्स जाणवले नाहीत. शिवाय, ३६ पैकी ३४ जणांच्या रोगप्रतिकारकशक्तीला या लसीमुळे चालना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. आता फेज २ आणि ३ मधल्या चाचण्या ते पार पाडणार असल्याचं सांगण्यात आलंय.

१०) मिलिटरी मेडिकल

चीनमधल्या ऍकेडमी ऑफ मिलिटरी मेडीकल, सुझहाऊ अबोजेन बायोसायन्सेस आणि वालवॅक्स बायटेक्नॉलॉजी या संस्थेतल्या संशोधकांनी एकत्र येऊन आरएनएवर आधारलेली लस बनवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एआरकोव असं या लसीचं नाव असेल. या लसीची माकडावर करण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली होती.

यासारख्या अनेक कंपन्या कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. साधारण डिसेंबरमधे किंवा २०२१ च्या सुरवातीला कोरोना वायरसविरोधातली लस आपल्या हातात पडेल असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जातोय.

हेही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!