जगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे

१६ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आजकाल नोकरीतून रिटायरमेंट घेतल्यावर काय करायचं याचं प्लॅनिंग चाळीशीपासूनच सुरू होतं. सध्या आयुष्य वाढलंय, म्हातारपणातही लोक फिट अँड फाईन असतात. त्यामुळे जगभर रिटारमेंटचं वय वाढणार असल्याच्या बातम्या येतायत. भारतातही सरकारी नोकर रिटायरमेंटचं वय वाढवण्याची मागणी करताहेत.

जग सतत बदलत आहे. नवं तंत्रज्ञान, संशोधन यांच्यामुळे जगणं सोप्पं होतंय. इतक्या मशिन आल्यात की आपल्याला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. औषधं, मोडिकल ट्रीटमेंटमुळे जवळपास सगळ्याच आजारांवर उपचार होतात. त्यामुळे मृत्यूदरही घटलाय. आणि म्हाताऱ्या व्यक्ती अगदी रिटायरमेंटनंतरही काम करतात, फिरतात. म्हणजेच त्यांची तब्येत अगदी ठणठणीत असते. मग रिटायरमेंटचं वय वाढवलं पाहिजे का?

जगभर रिटायरमेंटच्या वयात वाढ

ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या ग्लोबल चेंज डेटा लॅब या संशोधन संस्थेच्या अवर वर्ल्ड इन डेटा या वेबसाईटवर जगातल्या डेथ रेटची संपूर्ण माहिती दिलीय. जगाचा एकूण डेथ रेट २०१०च्या तुलनेत २३ टक्क्यांनी कमी झालाय. यावरुनच जर्मनीतल्या जर्मन इंस्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक रिसर्च आणि अमेरिकेतल्या ब्युरो ऑफ लेबर स्टॅटेस्टिक्स यांनी संशोधन केलंय. त्यानुसार रिटायरमेंटचं वय ५ ते ७ वर्षांनी वाढवता येईल असा निष्कर्ष अहवालात दिला.

सध्या जगात ४९ हे कमीत कमी तर ७० हे जास्तीत जास्त रिटायरमेंटचं वय आहे. जास्तीत रिटायरमेंट वय असलेल्या देशामधे भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आइसलँड इत्यादींचा समावेश होतो. पण संशोधनातून आलेले निष्कर्ष विचारात घेता काही देशांमधे येत्या काळात रिटायरमेंटच्या वयोमर्यादेत बदल करण्यात येणार असल्याच्या बातम्या द न्यूयॉर्क टाईम्स, द गार्डियन या वृत्तपत्रात नुकत्याच आल्यात.

हेही वाचा: ऑनलाईन रिव्यू वाचून फिरायला चाललात, मग सांभाळून

सर्वात जास्त रिटायरमेंटचं वय असणारे देश

भारतात रिटायरमेंटच्या वयात फारसे बदल झालेले नाहीत. पण बऱ्याच देशांनी वेळोवेळी बदल करून वयोमर्यादा वाढवली. जगात रिटायरमेंटचं वय सर्वात जास्त असणाऱ्या देशांची माहिती पुढीलप्रमाणे-

१. संयुक्त अरब अमिरात: अरब देशांमधे सगळ्यात लवकर रिटायरमेंट मिळते. अगदी ४९व्या वर्षीच. पण इथे काम करणाऱ्या परदेशी लोकांना मात्र ६० व्या वर्षापर्यंत काम करावं लागतं. गरज किंवा इच्छा असल्यास इथल्या सरकारची परवानगी घेऊन ६५ व्या वर्षापर्यंत काम करता येतं.

२. चीन: जगात सर्वात जास्त लोकसंख्या याच देशात आहे. इथे महिलांचं रियाटरमेंटचं वय ५० आहे. तर पुरुषांचं ६०. मात्र चीनी सरकार दर वर्षी निवृत्तीच्या वयोमर्यादेत काही महिन्यांची वाढ करत असतं.

३. भारत: आपल्याकडे ६० हे रिटायरमेंटचं वय आहे. महाराष्ट्रात सध्या ५८ हे रिटायरमेंटचं वय आहे. सरकारकडून काही सरकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचं एक्सटेंशनही दिलं जातं. मात्र केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या रिटायरमेंटची वयोमर्यादा ६० वर्षांची करावी अशी राज्य कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

यावर अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने माजी अतिरिक्त मुख्य सचिव बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली २०१७ मधे एक समिती नेमली होती. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचं रिटायरमेंटचं वय ५८ वरुन ६० वर्ष करण्याचे शिफारस या समितीने केली, ही माहिती महाराष्ट्र टाईम्सने आपल्या बातमीत दिली आहे.

खाजगी कंपन्यांमधेदेखील रिटायरमेंटचं वय ६० आहे. पण तिथेही ५ किंवा त्यापेक्षा वर्षांचं एक्सटेंशन मिळतं. सुप्रीम कोर्टाच्या जजच्या रिटायरमेंटची वयोमर्यादा ६५ आहे.

हेही वाचा: सोन्याचांदीच्या किंमती वरखाली का होत आहेत?

४. जपान: कामचुकारी करण्यात सगळ्यात मागे असलेले आणि सगळ्यात जास्त काम करणारे लोक म्हणजे जपानी. अशी जपानी लोकांची ओळख असल्यामुळे ते सगळ्यात जास्त रिटायरमेंटचं वय असलेल्या देशांच्या यादीत येणारच.

सध्या ६२ वर्षं ७ महिने असं रिटायरमेंटचं वय आहे. यापूर्वी ५५ होतं. पण हळहळू वाढवत ते ६२ करण्यात आलं. आणि येत्या पाच वर्षात हे ६५ होणार असल्याचं डीडब्ल्यू अर्थात डॉएश वेल या जर्मन वृत्तसंस्थेच्या हिंदी वेबसाईटने आपल्या बातमीत लिहिलंय.

५. इंग्लंड: सध्या या देशातल्या महिलांच्या रिटायरमेंटचं वय ६० ते ६५ च्या दरम्यान ठेवलंय. तर पुरुषांचं वय ६५ आहे. येत्या वर्षभरात हे वय ६६ करण्यात येईल अशी शक्यता द गार्डियन या इंग्लंडमधल्या वर्तमानपत्राने आपल्या बातमीत वर्तवलीय. 

६. ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम: ऑस्ट्रेलिया देश एशिया पॅसिफिक भागात आहे. तर बेल्जियम पश्चिम युरोपात. इथे ६५ वर्ष आणि ५ महिन्यांची रिटारमेंटची वयोमर्यादा आहे. बेल्जियममधे दर दोन वर्षांनी वयोमर्यादेत सहा महिन्यांची वाढ करतात. २०२३मधे हे वय ६७ करण्यात येणार आहे.

७. जर्मनी, नेदरलँड, फिनलँड, फ्रान्स आणि स्पेन: या चार देशांमधे रिटायरमेंटचं वय ६५ ते ६६ आहे. पेंशन मात्र ६५ व्या वर्षापासून सुरू होते. 

८. अमेरिका: अमेरिकेत रिटायरमेंटचं वय ६६ आहे. जे येत्या काळात ६७ होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेतल्या द न्यूयॉर्क टाईम्स वर्तमानपत्राने आपल्या बातमीत लिहिलंय.

९. आईसलँड आणि नॉर्वे: युरोप खंडातल्या या दोन्ही देशांमधे ६७ हे रिटायरमेंटचं वय आहे. हे वय जास्त असण्यामागे इथला लोकांचं सरासरी वय हे ८२  ते ९० वर्षांदरम्यान आहे.

१०. लिबीया: आफ्रिका खंडाच्या उत्तरेला हा देश आहे. या देशात ७० हे रिटायरमेंटचं वय आहे. तर २०११पर्यंत हे वय ६५ वर्ष होतं. पण आता ६५व्या वर्षीसुद्धा इथल्या लोकांना आपल्या इच्छेनुसार रिटायरमेंट घेता येते. आणि पेंशनही सुरू होतं.

हेही वाचा: 

मुलामुलींना 'लिव इन रिलेशनशीप'मधे राहावंसं का वाटतं?

दर्जेदार नाट्य निर्मिती करणारी संस्थाः धि गोवा हिंदू असोसिएशन

अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात?

कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी धावणारे आपण गडचिरोलीकडे दुर्लक्ष का करतो?