टिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो?

२८ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


मुंबईतल्या एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वादंग निर्माण झालाय. यावरून शिवसेना-भाजप अशी राजकीय लढाईही पहायला मिळतेय. टिपूवर हिंदूविरोधी असल्याचा ठपका ठेवला गेलाय. पण त्याबद्दल इतिहासाचे दाखले नेमकं काय सांगतात तेही बघायला हवं. या सगळ्याचा आढावा घेणारी इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही फेसबूक पोस्ट.

टिपू सुलतानाबद्दल इतिहासातून जे दिसते ते असं :

१७८०ला पोल्लिलुरच्या युद्धात टिपूने इस्ट ईंडिया कंपनीच्या कर्नल बेलीचा निर्णायक पराभव करून युद्धात जवळपास २०० इंग्रज तर २८०० स्थानिक सैनिक ठार मारले. हा पराभव एवढा भीषण होता की बेलीला मदत करायला निघालेल्या सर मन्रोला आपला तोफखाना आहे तिथेच सोडून मद्रासला परत फिरावं लागलं. डिसेंबर १७८१ला त्याने ब्रिटिशांकडून कित्तूर जिंकून घेतलं.

१७८२ला कर्नल ब्रेथवेटचा तंजावरजवळ पराभव केला. टिपूने त्यांच्या सगळ्या तोफा ताब्यात घेतल्या आणि जिवंत सर्व सैनिक आणि अधिकाऱ्यांना कैद केलं. हा इंग्रजांचा भीषण पराभव मानला जातो. ६ डिसेंबर १७८२ ला त्याचे वडील हैदर अली वारले. टिपू म्हैसूरच्या गादीवर आरूढ झाला. यानंतर त्याने इंग्रजांना रोखण्यासाठी मराठे आणि मोगलांशी आघाडी बांधायचा प्रयत्न सुरु केला. १७८३ला इंग्रजांनी कोईम्बतूर जिंकून घेतलं तर टिपूने त्यांच्यापासून मंगलोर जिंकून घेतलं.

या दिर्घकाळ चाललेल्या युद्धात कोणाच्याही पदरी फारसं पडलं नसलं तरी मंगलोर तह झाल्याने टिपूची सरशी झाल्याचं मानलं गेलं. त्याचं महत्वही वाढलं. या तहाने इस्ट इंडिया कंपनीचं दिवाळं वाजेल या भितीने या कंपनीचे शेयर्स लंडनमधे कोसळले. या मंगलोर स्वारीनंतर टिपूने या भागातल्या सुमारे साठ हजार सिरियन ख्रिश्चनांना मुस्लिम बनवलं असं ब्रिटिश रेकार्ड सांगतं.

तंजावरच्या युद्धात टिपू आणि हैदर अलीने त्या प्रदेशात अनन्वित अत्याचार केले असं ब्रिटिश नोंदवतात. या दोघांनी तो प्रदेश दरिद्री करून सोडला. अर्थव्यवस्था कोसळली. कल्लान या जमातीच्या लोकांनीही याच काळात स्थितीचा फायदा घेत या भागात खूप लूट केली होती हे मात्र सहसा सांगितलं जात नाही.

हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

औद्योगिक क्रांतीचं धोरण

हैदर अलीने सुरू केलेली सार्वजनिक बांधकामं उदा. लालबाग टिपूने पूर्ण करत अनेक रस्ते, नव्या वसाहती आणि सार्वजनिक इमारतींचं बांधकाम हाती घेतलं. व्यापार वाढीसाठी प्रयत्न करत कर्नाटकाला एक औद्योगिक राज्य म्हणून उभं करायचे प्रयत्न सुरू केले. श्रीलंका, ओमान, फ्रांस ते इराणपर्यंत व्यापार पसरवला.

तो रॉकेट तंत्रज्ञानाचा जनक तर मानला जातोच पण अनेक यांत्रिक क्लृप्त्या असलेल्या वस्तू त्याने बनवून घेतल्या. त्यात ब्रिटिशावर आरूढ झालेलं यांत्रिक संगीत-वाद्यही आहे. व्यवस्थापन, शेतसारा पद्धतीत त्याने सुधारणा घडवल्या आणि म्हैसूर रेशीम उद्योग भरभराटीला आणला.

निजाम आणि मराठ्यांशी बेबनाव

मराठे आणि हैदर अलीत १७६७पासून संघर्ष होताच. मराठ्यांनी त्याचा पराभवही केला होता. हैदर अलीला ‘नबाब’ ही पदवी माधवराव पेशव्यानेच दिली होती. पण पुणे-म्हैसूरमधला करार उभयक्षी पाळला गेला नाही. टिपूने मराठ्यांचे दक्षिणेकडचे किल्ले ताब्यात घेतले. याचा परिणाम म्हणून त्याच्यावर मराठ्यांची स्वारी झाली आणि तुंगभद्रेपर्यंतचा भाग १७८६ला मराठ्यांच्या ताब्यात गेला.

मग पुन्हा करार होऊन मराठ्यांना त्यांच्यापूर्वी ताब्यात असलेला प्रदेश देवून खंडणीही देण्याचं टिपूने मान्य केलं. मोगल दरबार आणि निजामाशी त्याने आधी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण १७८८ला बादशहाला आंधळं केल्यामुळे तोच दुर्बळ झाला. मराठ्यांकडूनही त्याला धोका दिसू लागला. इंग्रज त्याच्याविरुद्ध नव्या आघाड्या उघडायच्या प्रयत्नांत होतेच. निजामाशी त्याचे संबंध कधी चांगले तर कधी वाईट असे तळ्यात-मळ्यात राहिले.

झमानशहा दुर्रानी या अफगानी शासकाला ब्रिटिश आणि मराठ्यांविरुद्ध मदत मागणारी पत्रं पाठवायला सुरवात केली. पण दुर्रानी स्वत:च पर्शियनांशी संघर्षात गुंतला असल्याने त्याला मदत केली नाही. इस्तंबूल इथं वकिलात स्थापन करुन ओटोमन सुलतानला त्याने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सैनिकी तुकड्या पाठवायची विनंती केली. पण रशियाविरुद्धच्या युद्धात खुद्द ओटोमन साम्राज्यालाच ब्रिटिशांची गरज असल्याने त्याला मदत झाली नाही.

हेही वाचा: पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

मलबारच्या स्वारीत अत्याचार

१७८९ला टिपूने मलबारवर स्वारी केली. पण त्रावणकोरने कडवा प्रतिकार केला. पुरांनीही टिपूला अडचणीत आणले. त्यात त्रावणकोरच्या राजाने इंग्रजांची मदत मागितल्याने इंग्रजांनी श्रीरंगपट्टनमवर स्वारी केली. टिपू श्रीरंगपट्टनमच्या दिशेने रवाना झाला. पण मलबारमधे मुळात टिपूला निर्णायक विजय मिळाल्याचं दिसत नाही.

तरीही त्याने या स्वारीच्या काळात त्याने मलबारी प्रजेवर अनन्वित अत्याचार केल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. नायर या लढवैय्या जमातीवर विशेष करुन जास्त अत्याचार झाले. किमान चार लाख हिंदूंना मुस्लिम बनवल्याची माहिती स्वत: टिपूच आपल्या १९ जानेवारी १७९०च्या पत्रात देतो.

तिसरे म्हैसूर विरुद्ध इंग्रज युद्ध

इथंच तिसऱ्या इंग्रज विरुद्ध म्हैसूर युद्धाची सुरवात झाली. लॉर्ड कार्नवालिसने निजाम आणि मराठ्यांसोबत टिपूविरुद्ध आघाडी उघडली. १७९०ला कोईम्बतूरपर्यंत आघाडीने ताबा मिळवत आणला. १७९१ला बंगलोरही ताब्यात गेलं. श्रीरंगपट्टनमच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. टिपूने या सर्व बाजूने घेरल्या गेलेल्या आघाड्यांपासून प्रतिकार करण्यासाठी दग्दभू धोरण स्विकारलं.

या धोरणामुळे कार्नवालिसने संत्रस्त होऊन बंगलोरचा ताबा सोडला. पण मराठ्यांचे हल्ले चालूच होते. याच काळात १७९१ला परशुराम भाऊने म्हैसूर लुटत शृंगेरी मठावरही हल्ला चढवला. मठाची संपत्ती लुटली आणि आदिशंकराचार्यांच्या मंदिरालाही क्षती पोचवली. टिपूची शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांना पाठवलेली कन्नड भाषेतली ३० पत्रं उपलब्ध आहेत. त्याने दिलेल्या देणग्यांचाही तपशील उपलब्ध आहे.

या युद्धात पराभव दिसू लागताच टिपूने तहाच्या वाटाघाटी सुरु केल्या. अर्धं राज्य सोडून देण्याच्या आणि तीन कोटी रुपयांच्या खंडणीच्या अटीवर हा तह झाला. खंडणी आहे तोवर आपले दोन मुलगे ओलीस म्हणून ठेवायलाही तो तयार झाला. पुढे त्याने दोन हप्त्यात ही रक्कम भरली आणि आपल्या मुलांना सोडवलं.

हेही वाचा: शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

मराठा-निजाम-इंग्रज युती

शेवटी टिपूने १७९४ पासून फ्रेंचांशी संधान बांधायला सुरवात केली. इंग्रज हे त्यांचेही शत्रू होते. त्यामुळे ही युती झाली तरच इंग्रजांशी लढता येईल असा त्याचा कयास असावा. नेपोलियन तेव्हा सम्राट बनला नव्हता. पण त्यानेही टिपूला १७९८ला पत्र पाठवलं. दोघांचा एकच शत्रू असल्याने आघाडी करायला मान्यता दिली. त्याने इंग्रजांशी लढण्यासाठी इजिप्त मोहिम संपल्यावर १५ हजारांचं सैन्य टिपूला मदत करायला पाठवायचं ठरवलं.

पण हे पत्र मस्कत इथं ब्रिटिश हेराच्या हाती लागलं. ते टिपूपर्यंत पोचलं नसलं तरी नेपोलियन आणि टिपूमधल्या संभाव्य मैत्रीचा धोका दिसल्याने ते जास्तच काळजीत पडले. त्यांनी टिपूविरुद्ध आजवरची सगळ्यात मोठी मोहीम हाती घेतली. १७९९ला आर्थर वेल्स्लीसोबत तीन इंग्रज सेनाधिकाऱ्यांचे २६०००, निजामाचे १६,००० आणि मराठ्यांचे ७-८००० सैन्य श्रीरंगपट्टनमवर चालून गेले. या युद्धात टिपूचा अंत झाला.

अय्यंगार हत्याकांडाचा आरोप

टिपूने ७०० अय्यंगारांना दिवाळीच्या दिवशी निर्दयतेने मारलं असं मानलं जातं. मांद्यन अय्यंगार आजही दिवाळी त्यामुळे साजरी करत नाहीत असं म्हणतात. खरं तर इतिहासात कुठंही ही घटना किंवा तारीख, वर्ष नोंदवलं गेलेलं नाही.

डॉ. एम. ए. जयश्री आणि डॉ. एम. ए. नरसिंहन यांनी अलीकडेच एक पेपर प्रसिद्ध करून या दंतकथेवर, ज्याला इतिहासात कुठंही स्थान मिळालेलं नाही त्यावर प्रकाश टाकला तेव्हा टिपूवरच्या या आरोपाने उचल खाल्ली. या पेपरमध्ये उभय संशोधकांनी म्हटलंय की, हे अय्यंगार म्हैसूरचे प्रधान तिरुमलैंगार यांचे नातेसंबंधी होते. ही घटना काल्पनिक नसून सत्य आहे.

हेही वाचा: डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

हत्याकांडामागची दंतकथा

म्हैसूरची राणी लक्ष्मीअम्मा हिने आपलं राज्य परत मिळवण्यासाठी हैदर अलीशी संघर्ष सुरु ठेवला. त्यासाठी १७६०ला तिने इंग्रजांशी संधान बांधायला सुरवात केली. त्यात वोडेयार राजांचा माजी प्रधान तिरुमलैंगार याचं नाव इतिहासात कुठंही येत नाही. हैदर अलीशी संघर्ष खंडेरावाने केला. त्याचा पराभव केल्यानंतरच हैदर अली शासक बनला. याने तिला मदत केली म्हणून हे अय्यंगारांचे हत्याकांड टिपूने केलं असं लेखकद्वय म्हणते.

इतिहासात कसलाही पुरावा नाही, हे प्रकरण दडवलं गेलं असाही आरोप आहे. आपण तरीही घटकाभर हे प्रकरण खरं मानू. टिपूचा जन्म १७५०चा. वरची घटना १७६० किंवा ६१ची. म्हणजे ही घटना घडली तेव्हा टिपू १०-११ वर्षांचा होता. हे हत्याकांड त्याने कसं केलं? शिवाय याच वर्षी हैदर अली स्वत:च्या अस्तित्वासाठी वोडियारांशी लढाया करत होता. वोडियारांचा सेनापती खंडेरावाचा पराभव केल्यानंतर हैदर अलीने म्हैसूरवर आपली सत्ता कायम केली.

सर्वच विरोधकांना, त्यात खंडेराव आणि राजघराण्यातले लोकही आले, कैदेत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं. अय्यंगार हत्याकांडाची घटना इतिहासात अथवा कोणत्याही साधनात नोंदली गेलेली नसून एका दंतकथेला काल्पनिक आवरण चढवत का पेश करावं यावर वाचकांनीच वरच्या सर्व घटनाक्रमावरुन विचार करायचा आहे आणि टिपूचं मूल्यमापन करायचं आहे.

सुधारणावाद जोपासणारा योद्धा

मराठी विश्वकोश टिपूचं मूल्यमापन करताना म्हणतो, ‘काही इंग्रज लेखकांच्या मते टिपू हा अत्यंत धर्मवेडा, क्रूर, लोभी, अविश्वासू आणि चंचल होता; पण टिपूचा एकूण कारभार, राज्यव्यवस्था आणि धडाडी पाहिली असता, हे आरोप सबळ पुराव्यांवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही. तथापि काही दुर्गुण आणि सेनापतींची फितूरी यांमुळे त्याच्या सुसंघटित सैन्याचा अखेर पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे.’ इंग्रजांनी त्यांचे जेही शत्रू होते त्यांना बदनाम करण्याची संधी सोडली नाही आणि त्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविक आहे.

शासकाचा धर्म, त्याचे शत्रू आणि राज्यविस्ताराची धोरणं पाहून तत्कालीन राजांचा विचार करावा लागतो. अन्यायाच्या आणि लुटालुटीच्या बाबतीत कोणी मागं नव्हतं. धर्मांतराचा इतिहास खूप जुना आहे. तसाच सौहार्दाचाही इतिहास आहेच. शुजाने पानिपत युद्धानंतर स्वत: खंडण्या भरुन असंख्य हिंदू सैनिक आणि सरदार कैद्यांना सोडवलं होतं. अशी सौहार्दाची असंख्य उदाहरणं देता येतील.

निजाम मुस्लिम असून हातात हात घालून टिपूवर चालून जातच होता, ते सत्तेपायी. टिपूने सरसकट हिंदूंवर अत्याचार केलेले नाहीत. तशा नोंदी उपलब्ध नाहीत. ब्रिटिशांशी त्याचा संघर्ष सत्तेत ते स्पर्धक झाल्याने होता. त्यामुळे तो स्वातंत्र्य लढा होता असं काही म्हणतात तेही चुकीचं आहे. तो एक चांगला, प्रशासनावर पकड असलेल्या, काही प्रमाणात सुधारणावाद जपणारा महत्वाकांक्षी योद्धा, राजा होता एवढंच!

हेही वाचा: 

पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं? 

राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

अफजलखानाचा कोथळा काढला यात दगलबाज शिवरायाचं काय चुकलं?