बॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात

१९ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असा पीजे आपण खूपदा ऐकलाय. सध्या मोबाईलला आपण सावलीसारखं जवळ ठेवतो. त्यातले अॅप जणू आपले मित्रच झालेत. सध्या टिक टॉक मित्र आपल्यापासून दुरावलाय. पण तो आधीपासूनच आपल्या मोबाईलवर सेव असेल तर तो आपल्या सोबतच असेल.

सध्या सगळीकडे एकच चिंता आहे की आता कसं होणार? एक प्रकारचं नैराश्य आलंय आणि सुखासीन आयुष्याला ब्रेक लागावा तशी अवस्था विशेषत: तरुणाईची झालीय. ही चिंता निवडणूक निकालांची नसून सरकारने जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या टिक टॉक अॅपवर बंदी घातल्यानं झालीय. रोजचा विरंगुळा, करमणूक, सुप्त कलागुणदाखवण्याची संधीच हिरावून घेण्यात आलीय.

जिकडेतिकडे एकच चर्चा. टिक टॉक बंद झालं आता काय करायचं? आता कसं होणार? हरहुन्नरी नवोदित कलावंतापुढे तर अंधारीच आली. टिक टॉकवर बंदी असली तरी ते दुसऱ्या पद्धतीने आपल्याला वापरता येणार आहे.काय होतं हे टिक टॉक आणि कशी आली बंदी तसंच पर्याय काय याचा घेतलेला हा आढावा.

टिक टॉकचं क्रांतिकारी आगमन

स्मार्ट फोन आल्यानंतर माणसाचं जीवन एका क्लिकवर ज्ञान आणि मनोरंजनाने व्यापून गेलं. जगभराचा खजिनाचा आपल्या हातात आला. प्रत्येक गोष्टींचं अॅप आले आणि माणसांचा आयुष्य समृद्ध होत गेलं. यातच टिक टॉक नावाचं अफलातून अॅप आलं. बघता बघता या अॅपने जगभरात धुमाकूळ घातला. अनेक तरुण आपल्या नकला, आवाज, म्युझिक हे कलागुण या टिक टॉकवर सादर करू लागले. त्यांच्यातली कला सगळ्यांना दाखवू लागले.

डमस्मॅशनंतर आणि डमस्मॅशपेक्षा शॉर्ट वीडियो आणि एडिटिंगमधलं सर्वाधिक लोकप्रिय झालेलं अॅप म्हणजे टिक टॉक. याची सुरवात मुळात चीनमधून झाली. यिमिंग झांग या चीनी तरुणाने २०१२ मधे बाईट डान्स टेक्नॉलॉजी ही आयटी कंपनी सुरू केली. त्यानंतर २०१६मधे डॉयिन नावाचं अॅप लाँच केलं. त्याला चीनमधे चांगला प्रतिसाद मिळाला. याच अॅपचं पुढचं रूप म्हणजे टिक टॉक.

हेही वाचा: विकीमातेने जन्म दिलेले अवकाळी विचारवंत जग बिघडवत आहे

तुम्हाला माहितीय पहिला स्मार्टफोन १९९४ला बनलेला. तेव्हाच अप्लिकेशनही आलं. आपण आता पाहतो तसे अॅप आणि अॅप स्टोअर मात्र २००८पासून सुरु झालं. आता तर या अॅप स्टोअरमधे कितीतरी लाख अॅप आहेत.

टिक टॉक बनवणाऱ्या कंपनीबद्दल

जगभरात २०१७मधे टिक टॉकअॅप लाँच केलं. बाईट डान्स या कंपनीचे वेगवेगळ्या देशातल्या कंपन्यांबरोबर वेंचर आहेत. त्यांचे अनेक अॅप जगभरात सध्या सुरू आहेत. त्यात विगो वीडियो, जिगुआ वीडियो, म्युझिकली, टॉटिओ, टॉप बझ, बझ वीडियो, हेलो आणि न्यूज रिपब्लिक यासारखे अॅप सुरू आहेत.

हे अॅप मुळात शॉर्ट वीडिओ बनवून तो एडिट करण्यासाठी आहे. तसंच तो वीडियो पब्लिश करून सगळ्यांपर्यंत पोचवता येतो. यात नकलांचं, विडंबनांचं, लिप सिंकिंग, मॉर्फिंगचे वीडियो जास्त लोकप्रिय होत होते. तसंच यात आपल्या मित्रमंडळींना सध्या काय सुरू आहे, हे लाईवसांगण्यासाठीसुद्धावापर केला जात होता.

यात शॉर्ट वीडियो, म्युझिक वीडियो, रिअॅक्शन, लाईव मुवमेंट, फोटो, सेल्फी वीडियो असे कोणत्याही प्रकारचे १५ ते ३० सेकंदाचे वीडियो काढून ते फिल्टर, कलर, म्युझिक, बॅकराऊंड स्कोअर तसंच मॉर्फिंग, सिंकींगच्या मदतीने स्पेशल इफेक्ट देऊन एडिट करता येत होतं. आपलं अकाऊंट आणि पोस्ट पब्लिक किंवा प्रायवेट ठेवता येतं. त्यामुळे आपली माहिती कोणापर्यंत पोचावी हे ठरवता येतं होतं. यात कोणात्याही आक्षेपार्ह वीडियोची तक्रार टिक टॉककडे करण्याचीही सोय होती.

हेही वाचा: सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?

भारतात टिक टॉकचे युजर्स किती आहेत?

भारतात २०१८मधे टिक टॉकची लोकप्रियता खूप वाढली. त्यावेळी या अॅपमधे जगातल्या ७५ भाषांचा समावेश केला. अमेरिका आणि युरोपियन देशांमधेही त्याची लोकप्रियता वाढती होती. त्यावेळी डिजिटल माध्यम तज्ञांनी फेसबुक, युट्युब आणि इन्स्टाग्रॅमनंतर टिक टॉकच्या नावावर सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं अॅप हा विक्रम नोंदवला जाईल, अशीशक्यता वर्तवण्यात येऊ लागली.

जगभरात या अॅपचे ५० कोटी युजर आहे. भारतात १ कोटी मोबाईलमधे टिक टॉकआहे. मात्र २० लाख युजर एक्टीव असल्याची माहिती टिक टॉकने डिसेंबर २०१८ला प्रसिद्ध केली. सध्या मार्च २०१९पर्यंत टिक टॉकचे भारतीय युजर्सची संख्या ३ कोटींवर गेल्याची माहिती स्टॅटेस्टिका या जपानी मार्केट रिसर्चर कंपनीने आपल्या रिपोर्टमधे म्हटलंय.

बंदी मागचं कारण काय?

तामिळनाडुच्या मद्रास हायकोर्टाने ३ एप्रिलला टिक टॉक वर बंदीघालण्याचे निर्देश दिले. कोर्टाने म्हटलं, ‘हे अॅप पॉर्नोग्राफीला प्रोत्साहीत करतं. लैंगिकतेच्या आहारी गेलेले यूजर्स या वीडियोसाठी लहान मुलांचा वापर करण्याची शक्यता आहे.’

म्हणूनच आयटी मिनिस्ट्रीने गुगल आणि अॅपल या दोन्ही कंपन्यांना पत्र पाठवलं. त्यामुळे गुगलने त्याच्या प्ले स्टोअरवरुन टिक टॉकचं डाऊनलोडिंग बंद केलं. तसंच गुगुलने यावर प्रतिक्रिया दिली की आम्ही फक्त कायद्याचं पालन करतोय. मात्र अॅपलने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, असं एनडीटीवीच्या बातमीत म्हटलंय.

हेही वाचा: डिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम

या काही घटना आहेत, ज्यामुळे टिक टॉकवर बंदीचा निर्णय घेण्यात आला असं सांगण्यात येतं.

१. तमिळनाडूमधल्या विद्यार्थांनी स्कूटरवर फिरताना वीडियोशूट करत असताना अपघात झाला.त्यात दोन मुलं जखमी झाली आणि एकाचा मृत्यू झाला.

२. दिल्लीतल्या एका तरुणाने टिक टॉकचा वीडियोशूट करण्यासाठी गावठी पिस्तुलाशी खेळ करत होता. त्यावेळी अचानक पिस्तुलातून गोळी निघाली आणि वीडियोशूट करणाऱ्या त्याच्या मित्राचा खून झाला. हा वीडियो टिक टॉकवरही अपलोड झालाय.

३. तमिळनाडूच्या मालपुरा इथे काही तरुणांमधे वादावादी झाली. याचा वीडियो टिक टॉकवर अपलोड झाला. त्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांना वाटलं की ही दोन पक्षातली मारामारी आहे. त्यामुळे तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांत मारामारी होऊन ८जण जखमी झाले.

४. एक तरुण पंजाबमधे शेतात कापणी काम करत असतानाच विडीयो शूट करत होता. तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरखाली आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

५. चेन्नईमधला एक तरुण स्वत:चा गळा दाबण्याची अॅक्टिंग करत होता. पण टिक टॉकसाठी वीडियो बनवत असताना त्याने खरोखरच स्वत:चा गळा दाबून घेतला. हा वीडियो टिक टॉकवर शेअर झालाय.

या चार महिन्यांत घडलेल्या घटनांमुळे सोशल मीडियावर चर्चा होत होती. म्हणूनच अनेकांनी अॅपच्या बंदीला पाठिंबा दिला, असं सोशल मीडिया कंटेंट अनॅलिटीकल मॅनेजर सपना सूद यांनी सांगितलं.

टिक टॉकला कोर्टाने दिली तारीख

बंदी आल्यानंतर टिक टॉकने लगेचच सुप्रीम कोर्टात धाव घेतली. टिक टॉकने म्हटलं, की हा अभिव्यक्ती स्वातांत्र्यावर घाला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने पुन्हा ही केस हायकोर्टाकडे सोपवली. त्यांनी मंगळवारी टिक टॉक कंपनीचं निवेदन फेटाळून लावलं आणि बंदीचा निर्णय कायम ठेवला. मात्र बाईट डान्स कंपनीने पुन्हा एकदा हायकोर्टात निवेदन केलंय. आता त्यांना कोर्टाकडून २४ एप्रिलची तारीख देण्यात आलीय.

बाईट डान्स टेक्नॉलॉजी कंपनीने भारतात साधारण ७५.४१ कोटींची गुंतवणूक केलीय. देशातले २५० कर्मचारी त्यांच्याकडे काम करताहेत. म्युझिकलीसोबत टिक टॉक एकत्र येऊन भारतात नवीन अॅप लाँच करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता टिक टॉकचंच अस्तित्व धोक्यात आलंय, असं डिजिटल मीडिया बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट आलोक त्रिवेदी यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं. हे सर्व मुद्दे कोर्ट लक्षात घेऊन निर्णय घेईल असं वाटतं.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

टिक टॉक बंद झाल्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया

निकिता कदम, सोशल मीडिया मॅनेजरः टिक टॉक अॅपवर टाईमपास होतहोता. वेळ मिळाला की वीडियो बघा. खरंतर यावर शॉर्ट वीडियो असल्यामुळे बघायला मजा येत होती. टिक टॉक बंद झाल्याने काही फरक पडणार नाही.इतर अॅप, सोशल मीडिया आहेच ना टाईमपास करायला.

सुमेध जाधव, इंटिरियर डिझायनरः मी तर यावर स्वच्छतेचा संदेश देणारे, वेगवेगळ्या निसर्गातल्या गोष्टींचे वीडियो टाकत होतो. अॅप बॅन केल्यानं काही फरक पडणार नाही. ज्यांना जे करायचंय, ते केल्याशिवाय काही थांबणार नाही. अपराधी अपराधाचं नवं नवं माध्यम शोधत असतात. त्यामुळे अॅप बंद करणं हा काही उपाय नाही.

मिहीर जोशी, लेखकः टिक टॉकमुळे लोकांचा जीव गेला, अशा बातम्या आल्या. तरीही सेल्फीमुळे अनेक अपघात घडल्याचंआपल्याला माहिती आहे. त्यामुळे लोकांनी एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं थांबवलं पाहिजे आणि आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे.

सोनाली मेस्त्री, सोशल मीडिया कंटेंट मॅनेजरः टिक टॉकचा गैरवापर होतहोता. त्यावर मॉब लिचिंग, प्राण्यांना त्रास देणारे, भांडण, मारामारी, मंत्र्यांची खिल्ली उडवणारे आणि पॉर्नोग्राफिक वीडियो होते. पण हे सगळं तर सगळ्याच माध्यमांवर होत असतं. आपण ठरवावं काय बघायचं आणि काय नाही. ते त्यासाठी टिक टॉक बंद करण्याची काय गरज आहे?

प्रशांत माळी, सायबर तज्ज्ञ: सोशल मीडियातल्या अनेक गोष्टींमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, मानसिक आजार बळावलेत. असं असताना सोशल मीडियासाठी एक रेग्युलेटरी आणली पाहिजे. एखादी गोष्ट भारताच्या ऑनलाईन बाजारात येण्यापूर्वी त्याची पडताळणी करणं, तसंच त्याच्या वापरासंबंधी काही नियम बनवणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तरं आधीच काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा: झुक्या लेका, ब्लॉक करण्यासाठी पण तुला कांबळेच भेटला?

टाईमपास करायचाय, मग टिक टॉक आहे ना

सध्या गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसमधून टिक टॉक डाऊनलोड होणार नाही. पणतुम्हाला टिक टॉक वापऱण्याची इच्छा झाली तर काय कराल?

हे अॅप आधीच डाऊनलोड केलेलं आहे त्यांच्यासाठीअॅप अजून  झालेलं नाही, सध्या युजर्स हे अॅप वापरू शकतात. तसंच हे अॅप शेअर इट किंवा तत्सम अॅप शेअरिंग अॅपच्या मदतीने इतरांना देऊ शकतात. तसंच वीडियो डाऊनलोडर फॉर टिक टॉक असंही अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, असं डिजिटल मीडिया मॅनेजर आदित्य पाटीलने सांगितलं. त्यामुळे टिक टॉक पूर्णपणे बंद झालेलं नाही. तर यावर फक्त लगाम घालण्यात आलाय.