काश्मीर फाईल्स: एक मुक्त चिंतन

१७ मार्च २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


विवेक अग्नीहोत्री यांचा 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा काश्मिरी पंडितांना १९९०ला भोगाव्या लागलेल्या अत्याचाराचं, हिंसेचं वर्णन करणारा आहे. पण अत्याचारग्रस्त पंडितांसाठी आपण काय करू शकतो, हा विषय सिनेमापेक्षाही महत्वाचा आहे. या सिनेमावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.

कोणताही सिनेमा ही एक कलाकृती असते की, मनोरंजनाचं माध्यम असतं की, प्रचाराचं आयुध, प्रबोधनाचं साधन हा विचार प्रत्येक दर्शकांवर अवलंबून आहे. मी सिनेमा समीक्षक नाही एक दर्शक आहे आणि सामाजिक विषयावर चिंतन करणारा अभ्यासक असल्यामुळे मी सिनेमाला समाज प्रबोधनाचं माध्यम मानतो.

भारतीय समाज भारतीय राज्यघटनेने बांधलेला आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतल्या उद्दिष्टांना भारतीय समाजात वृद्धिंगत करणारं समाज प्रबोधन मला प्रत्येक कलाकृती, साहित्य, कविता किंवा नाटक या कलांमधून अपेक्षित आहे. असं असलं तरीही प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही त्याच घटनेनं दिलंय. 

इतिहासात घडून गेलेल्या घटनेवर, प्रसंगावर किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनचरित्रावर आधारीत सिनेमा हा पूर्णपणे वास्तव नसला तरीही पडद्यावर वास्तव मांडण्याचा केलेला प्रयत्न असतो. पण त्यात काही प्रसंग वास्तवाच्या विपरीत असतील तर त्यावर लिहीणं गरजेचं ठरतं.

काश्मीर फाईल्सचा प्रवास

काश्मीर फाईल्स हा सिनेमा काश्मिरी पंडितांना १९९०ला काश्मीर मधल्या धर्मांध मुस्लिमांकडून भोगाव्या लागलेल्या अत्याचाराचं, हिंसेचं वर्णन करणारा आहे. सिनेमाच्या सुरवातीलाच लहान मुलं क्रिकेट खेळत असताना भारत पाकीस्तान मॅचची कॉमेंट्री रेडिओवर ऐकायला मिळते आणि सचिन तेंडुलकरचं कौतुक केल्याबद्दल धर्मांध काश्मिरी मुस्लिम त्या लहान मुलांना मारहाण करतात आणि इथूनच सुरू होतो या सिनेमाचा प्रवास.

धर्मांध मुस्लिमांचा जमाव मग हिंदू पंडितांना इस्लाम स्विकारा नाहीतर इथून निघून जा, नाहीतर मरणाला तयार रहा, अशा घोषणा देत निरपराध हिंदू पंडीतांना ठार मारतात. इथपासून शेवटच्या वीस मिनिटांपर्यंत एक कथानक आणि त्यानंतर काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार, हत्या, हिंसा आणि त्यांना घरदार सोडून हुसकावून लावण्याचं अत्यंत भयावह असं चित्रण, प्रेक्षकांच्या मनात एकाच वेळी त्या अन्यायग्रस्त लोकांसाठी सहानूभूती आणि अत्याचारी लोकांबद्दल प्रचंड घृणा, तिरस्कार निर्माण करतो. 

काश्मिरी पंडितांवर प्रचंड हिंसा झाली, हे वास्तव कोणीही भावनाशील आणि मानवी जीवनाचं मूल्य मानणारा सुजाण व्यक्ती नाकारू शकत नाही. त्यांना परागंदा व्हावं लागलं, त्यांच्यावर अन्याय झाला हे सत्य आहे. यासाठी या सिनेमाने भारतातल्या सर्वच सरकारांवर टीका केली आहे हे खरंच पण तरीही सिनेमा संपल्यावर सोबत मनात काय घेऊन जायचं हा संदेशही खूप स्पष्टपणे दिला आहे.

हेही वाचा : #बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

सिनेमानं दिलेला संदेश

आज काश्मीर फाईल्स हा सिनेमा प्रदर्शित झाला असून आज अत्याचारग्रस्त पंडितांसाठी आपण काय करू शकतो, हा विषय सिनेमापेक्षाही महत्वाचा आहे, याची समज हा सिनेमा पाहून खरंतर यायला हवी. पण असं होताना दिसून येत नाही. हा सिनेमा काश्मिरी पंडितांच्या हितासाठी, जीवहानीची भरपाई होऊ शकत नाही पण त्यांना त्यांचं वर्तमान आणि भविष्य कसं सुखकारक होईल याबद्दल कोणताही दिलासा देत नाही. सिनेमाने भारत सरकारला या सिनेमातून काय संदेश दिलाय, हे ही समजून येत नाही. कारण विस्थापित काश्मिरी पंडीतांना न्याय मिळवून देणं ही सिने निर्मात्याची किंवा सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकाची अजिबात जबाबदारी नाही.  

भारत सरकारने काश्मिरचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आणि भारतात सुरू असलेली विकासाची गंगा काश्मिरी लोकांपर्यत पोचवून काश्मिरी जनतेचं जीवन 'सुजलाम सुफलाम' करण्यासाठी, घटनेतलं ३७० कलम रद्द करणं गरजेचं होतं, असं निवेदन संसदेत दिलं. त्यामुळे आता ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मिरी जनता आणि काश्मिरी पंडितांवरचा अन्याय बऱ्यापैकी दुर झाला असेल, असंच मानणं योग्य आहे. पण अद्यापही काश्मिरींना न्याय मिळाला नसेल तर त्यांना न्याय मिळण्यासाठी भारत सरकारनं प्रत्येक प्रयत्न करून काश्मिरी जनतेचं, काश्मिरी पंडितांचं भवितव्य हा प्राधान्याने करायला हवा.

सिनेमात मानवी जीवनाचं मूल्य

काश्मिर फाईल्स या सिनेमाचं सर्वात महत्वाचं यश काय असेल तर, या सिनेमातून अनेक प्रेक्षकांना मानवी जीवनाचं महत्व जाणण्याचा दिलेला संदेश! या सिनेमाच्या निमित्ताने हिंसेला सतत प्रतिष्ठा देणारे, जो आपल्या धर्माचा किंवा जातीचा नाही, त्याचा सूड, बदला घ्यायला हवा म्हणणारे, अनेकजण कमालीचे कनवाळू, भावनाशील आणि मानवी मृत्यू पाहून हळवे झालेत.

ही गोष्ट महत्वाची आहे कारण, 'हा सिनेमा पाहण्याची हिंमत होत नाही कारण मी हा सिनेमा पाहताना अश्रू रोखू शकणार नाही, मी खूप सदगदीत झालोय. खूप भावूक झालोय, असे अनेक लोक  म्हणत आहेत' ही एक खूप चांगली गोष्ट आहे. 

एरवी कोणतीही धार्मिक दंगल किंवा हिंसा पाहिली की, उत्तेजित होणारे अनेक लोक, हिंसा, मानवी मृत्यू पाहून सदगदित होणं हा त्यांच्यातला चांगला बदल आहे. कारण शेतकरी आंदोलनात शेतकरी मेले तेव्हा,  'बरं झालं मेले' असं निष्ठूरपणे व्यक्त होणाऱ्या लोकात या सिनेमाच्या माध्यमातून विवेक अग्निहोत्री यांनी घडवलेला बदल मानवी मूल्य वाढवणारा आहे. या सिनेमाने मानवी जीवनाचं मूल्य या लोकांना पटवून देण्याचं खूप अवघड आणि खूप महत्वाचं काम केलंय, हे मनमोकळेपणाने मान्य करायला हवं! 

काश्मिरी पंडीतांना न्याय मिळावा आणि त्यांना पुन्हा त्यांच्या गावी सुरक्षित पोचवावं या मताचा मी ही समर्थक आहे. म्हणूनच यासाठी काय काय योजना सध्या सरकारने हाती घेतल्या आहेत? हा विचार या सिनेमाच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोचावा. कारण हा विषय निव्वळ सिनेमाचा नाही तर भारतीय राज्यघटनेतल्या जात, लिंग, धर्मस्थळ, भाषा, वंश आणि जन्मस्थळ यावर भेदभाव न करता भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देण्यासबंधीचा आहे.

हेही वाचा : हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

वास्तव घटना, व्यक्ती कुठेत?

काश्मिरी पंडितांच्या हिताकडे, भारतातल्या सर्व सरकारांनी दुर्लक्ष केलं, असा आरोप जेव्हा विवेक अग्निहोत्री या सिनेमात करतात तो खरा नाही. नेहरू सरकारपासून आजच्या मोदी सरकारपर्यंत भारत सरकारने काश्मिरी पंडीतांसाठी काम केलंय. 

आजवरच्या भारत सरकारपैकी काश्मिरी पंडितांकडे दुर्लक्ष केलं असेल तर ते केवळ वी.पी.सिंग यांच्या सरकारने, जे सरकार भाजपा आणि डावे पक्ष यांच्या पाठिंब्यावर निर्माण झालं होतं.

या सरकारचे सूत्रधार होते वी.पी.सिंग, मुफ्ती महंमद सईद, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि काश्मिरचे राज्यपाल जगमोहन! विशेष म्हणजे या सिनेमात अनेक वास्तव घटना आणि व्यक्ती यांचा समावेश पडद्यावर या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे कलाकारच दिसत नाहीत.

तत्कालीन सरकारनं काय केलं?

सिंग सरकारने १९ जानेवारी १९९०ला काश्मिरमधलं राज्य सरकार बरखास्त करून जगमोहन यांना राज्यपालपदी नियुक्त केलं. या निर्णयाच्या विरोधात जन-आंदोलन होऊन पुढे सरकारी नोकरदारही या निर्णयाच्या विरोधात २५ फेब्रुवारीला रस्त्यावर उतरले. याच दरम्यान काश्मिरी पंडितांवर अन्याय ,अत्याचार हिंसा सुरू झाली.

जेकेएलएफ या फुटीर संघटनेने बंदुका घेऊन काश्मिरी पंडितांना ठार मारायला सुरूवात केली. जे सिनेमातत खूप प्रभावीपणे आणि वास्तवतेनं दाखवलंय. यावेळी काश्मिरी पंडितांवर खूप अत्याचार झाले, याला कारणीभूत होत्या फुटीर संघटना धर्मांध काश्मिरी मुस्लीम आणि पाकिस्तान बाहेरून पाठींबा.

हा अत्याचार आणि हिंसा जगासमोर भारताला मांडून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याची संधी असतानाही तत्त्कालीन भारत सरकारने काय केलं तर, २७ फेब्रुवारी १९९०ला युनोच्या प्रतिनिधींना काश्मिरमधे जायला प्रतिबंध केला. त्यानंतर सैन्याला पाचारण करायला भारत सरकारला १४ एप्रिल उजाडावा लागला.

हेही वाचा : ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

भाजपही सत्तेत होती

विवेक अग्नीहोत्रींनी काश्मिरी पंडितांवरचा हा घोर अन्याय जगासमोर पहिल्यांदा मांडला आणि पूर्वी हे कोणी मांडू शकलं नाही किंवा हे मांडायचा दबाव होता, हा प्रचार पूर्ण खोटा आहे. कारण तत्कालीन केंद्र सरकारने युनो आणि अम्नेस्टी इंटरनॅशनल या जागतिक संस्थांना काश्मिरमधे प्रवेश दिला असता तर काश्मिरी पंडितांवरचा अन्याय, हिंसा, पाकिस्तानवादी काश्मिरी मुस्लिमांनी केलेलं क्रौर्य केवळ भारतीय नाही तर जगभरातल्या जनतेला फार पूर्वीच समजलं असतं. कदाचित सिनेमाची गरज निर्माण झाली नसती! 

काश्मिरी पंडितांवर हा घनघोर अन्याय होत असताना आणि काश्मिरी पंडितांना आपलं घरदार, शेतजमिनी सोडून जावं लागत असताना, केंद्रातल्या वी.पी. सिंग सरकारात भाजपा हा सत्ताधारी पक्ष काय करत होता? त्यांनी यावेळीही केंद्र सरकारला समर्थन कायम ठेवलं होतं. ते समर्थन काश्मिरी पंडितांवरच्या अन्यायाच्या वेळी अजिबात काढलं नाही तर ते काढलं  केवळ ओबीसींना आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाच्या निर्मितीवरून हे विशेष!

प्रेक्षकाला कोणती शिदोरी द्यायची?

काश्मिर फाईल्स हा सिनेमा, त्यातल्या हिंसेमुळे फक्त प्रौंढासाठी आहे, १८ वर्षाखालची लहान मुलंमुली पाहू शकत नाहीत. पण आता ओटीटी असो किंवा इतर साधनांमुळे तो लहान मुलंही पाहू शकतात ही गोष्ट भारतीय सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या नियमांना धरून नाही. त्यामुळे कायदेशीर बंधनं पाळणाऱ्या पालकांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण अपरिपक्व मनोवस्थेत हिंसा आणि क्रौर्य पाहून त्यांच्या मनावर विपरीत परीणाम होऊ शकेल, अशी भावना केंद्रीय सेन्सॉर बोर्डाची असू शकते. 

पाकीस्तानी सैन्याची प्रचंड सुडभावना, द्वेष, हिंसा, क्रौर्य आणि त्या विरोधात आपल्या भारतीयांचं शौर्य अशा सत्य घटनांवर आधारित अनेक युद्ध सिनेमा मी पाहिलेत. एवढी हिंसा आणि रक्तपात असूनही हे सिनेमे अगदी अगदी लहान मुलानांही दाखवण्याची हिंमत प्रत्येक भारतीय नाही तर जगातल्या कोणत्याही देशातला कोणताही नागरिक करू शकतो. अशा सिनेमात मी समावेश करेन क्षत्रिय, बॉर्डर, एलओसी या जे.पी.दत्ता यांच्या सिनेमांचा! 

सिनेमात वास्तव घटनातल्या हिंसा, रक्तपात, मानवी हत्या दाखवतानाही प्रेक्षकाला थिएटरमधून जाताना कोणती शिदोरी द्यायची हे सिनेदिग्दर्शकाला समजलं पाहिजे. वी.शांताराम यांचा 'दो आँखे बारा हाथ' असो, राज कपूरचा 'जीस देश में…' असो किंवा कमल हसनचा 'हे राम' असो, या सिनेमात हिंसा आहे, अन्याय आहे पण एक मानवी संदेशही आहे. 

बॉर्डर या युद्धपटाचा शेवट, एका अप्रतिम गाण्यावर आहे 'मेरे दुश्मन, मेरे भाई, मेरे हमसाये' या गाण्यातला संदेश सर्व जगातल्या मानव जातीसाठी आहे. असाच संदेश देऊन या सिनेमाने काश्मिरी पंडितांना आर्थिक, सामाजिक, राजकीय उन्नतीसाठी उपयुक्त ठरावा आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतला सर्वसमावेशक भारतीय समाज घडवण्याचा संदेश विवेक अग्नीहोत्री यांनी त्यांच्या या पुढच्या सिनेमातून करावा.

हेही वाचा : 

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा