एमजे अकबर : कोण होतास तू, काय झालास तू?

२१ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


एमजे अकबर हे पत्रकारितेतलं फार मोठं नाव. टाइम्समधल्या ट्रेनीपदापासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द केद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोचली. त्यांनी केलेली कृष्णकृत्यं #metoo मोहिमेमुळे प्रकाशात आली नसती, तर अकबरना भारतीय पत्रकारितेत अगदी ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळालं असतं. हिंदीतल्या एका ज्येष्ठ पत्रकाराच्या लेखाचा हा अनुवाद.

मिर्झा गालिबनं स्वतःविषयी बोलताना एक शेर लिहिला होता,

ये मसाइले तसव्वुफ़, ये तेरा बयान ग़ालिब

तुझे हम वली समझते, जो न बादाख्वार होता

`तू जर दारुडा नसतास, तर आम्ही तू सांगितलेल्या गोष्टी ऐकून तुला संतच समजलं असतं`, अशा आशयाचा गालिबचा हा शेर एमजे अकबर यांच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी फिट्ट बसतो. त्यांनी केलेली कृष्णकृत्यं '#metoo' मोहिमेमुळे प्रकाशात आली नसती, तर अकबरना भारतीय पत्रकारितेत अगदी ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळालं असतं. भारतीय इंग्रजी पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचंही नाव फ्रँक मोराईस, बीजी वर्गीस, मानिकोंडा चेलापथी राव, शाम लाल, अजित भट्टाचारजी, गिरिलाल जैन, दिलीप पाडगावकर, एस. मुळगावकर, अरुण शौरी, जोसेफ पोथन, कुलदीप नय्यर आणि विनोद मेहता या दिग्गज पत्रकारांसोबत, अगदी सुवर्णाक्षरांत लिहिलं गेलं असतं.

बाळाचे पाय `टेलिग्राफ`च्या पाळण्यात

एमजे अकबर यांनी १९७१ साली पत्रकारितेला सुरवात केली. बहुचर्चित 'द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’मधे ते 'टाइम्स ट्रेनी' या योजनेअंतर्गत 'ट्रेनी सबएडिटर' म्हणून रुजू झाले. 'होनहार बीरवान के होत चिकने पात' या हिंदी म्हणीप्रमाणे वाटचाल करत पुढच्या केवळ दोन वर्षांत, म्हणजे, १९७३ मधे ते 'न्यूज फ्रंटलाईन'चे संपादक बनले. पण त्यांच्या करिअरचा खरा आलेख उंचावला, तो १९७६ मधे.

ते ‘आनंद बाजार समूहा’च्या 'संडे' या राजकीय साप्ताहिकाचे संपादक बनले. तो आणीबाणीचा काळ होता. बड्या बड्या संपादकांनी हार मानली होती. संपादकांच्या आधी मालकांनीच सरकारच्या सेन्सॉर धोरणा समोर गुडघे टेकले होते. इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीला विरोध करण्याची कुणाचीच बिशाद नव्हती. जो काही लढा दिला तो 'इंडियन एक्स्प्रेस' आणि अविक सरकारांच्या 'आनंद बाजार' समूहानं.

सध्याच्या पत्रकारितेतसुद्धा या दोन्ही समूहांमधेच काहीतरी सत्व टिकून राहिल्याचं जाणवतं. एमजे अकबरांविरोधात बातम्या किंवा लेख छापण्याचं धाडस या दोन्ही समूहांसह हिंदीत केवळ ‘दैनिक भास्कर’नंच केल्याचं दिसतंय. त्यातही 'टेलिग्राफ' या घडीला कदाचित प्रायश्चित्त करत असेल. कारण एमजे अकबर नावाच्या इसमाचे 'पाळण्यातले पाय' इथंच दिसायला लागले होते. त्यांनी आणि त्यांच्यानंतर सूत्रं सांभाळणाऱ्यांनी 'संडे' आणि 'टेलिग्राफ' मधे महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणं हा जणू पत्रकारितेचा एक भाग असल्याचा शिरस्ता बनवला होता!

त्या काळात आणीबाणीविरोधी लिहिल्यामुळे कुलदीप नय्यर यांना तुरुंगात डांबलं गेलं. इंडियन एक्स्प्रेस समूहाचे मालक रामनाथ गोयंका यांच्यावर राजकीय दबाव टाकला जात होता. त्यांचा समूह विकत घेण्याचेसुद्धा प्रयत्न झाले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यावेळी 'संडे'च्या संपादकपदी असणाऱ्या एमजे अकबर यांनी निकराचा लढा दिला, 'संडे'ला जास्त धारदार बनवलं. सहकाऱ्यांनाही व्यवस्थेच्या विरोधात उभं राहायला शिकवलं.

मूळ बिहारचं असणारं एमजेंचं कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून कलकत्त्याजवळ चंदनपूरमधे राहत होतं. ते काही पिढ्यांपूर्वी ब्राह्मण होते. मात्र बंगालच्या नवाबांचा प्रभाव पडल्यानं त्यांनी इस्लाम स्वीकारला. याचमुळं त्यांचं घर शैक्षणिकदृष्ट्या जागरूक होतं कट्टरतेकडे झुकणारं नव्हतं. अशा निरोगी वैचारिक वातावरणात वाढलेल्या एमजेंना लेखन करणं आवडू लागलं, शिवाय समाजाविषयी एक नेहरूवादी दृष्टिकोन मिळाला. 'संडे'च्या यशानं एमजेंची पत्रकारिता उंचीवर पोचली. मात्र त्याचवेळी त्यांच्या आतल्या भोगलालसासुद्धा बेलगाम होऊ लागल्या.

यशाची हवा डोक्यात गेली

‘आनंद बाजार समूहा’नं त्यांच्या नेतृत्वाखाली १९८२ मधे `द टेलिग्राफ` नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. त्याने त्या काळच्या पारंपरिक पत्रकारितेची व्याख्याच बदलून टाकली. लेआउट, फॉण्ट, डिझाईन आणि भाषेपर्यंत सर्वच बाबतीत हे वृत्तपत्र कमालीचं युनिक होतं. लंडनच्या ‘टेलिग्राफ’सोबत स्पर्धा करतानाच कलकत्त्याच्या 'स्टेट्समन'ला उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा मनसुबा होता. ‘स्टेट्समन’च्या पुराण्या जमान्यातल्या इंग्रजीला शह देण्यासाठी त्यांनी नव्या काळातल्या इंग्रजीला आपलंसं केलं. सोबतच ‘स्टेट्समन’च्या ब्रिटीशकालीन मूल्यांच्या जागी त्यांनी नेहरूवादी विचारसरणीला स्थान दिलं.

‘टेलिग्राफ’नं बंगालसह इतर हिंदीभाषिक राज्यांच्या राजकारणावरही अगदी बारीक नजर ठेवली. त्यांच्यासमोर स्थानिक भाषांमधली वृत्तपत्रंही फिकी पडावी. कधी बिहारच्या नक्षलवादाच्या बातम्या, कधी पंजाबच्या आतंकवादाच्या आणि हरिजनांच्या बातम्या, कधी झारखंडच्या आदिवासींच्या बातम्या, कधी ईशान्येकडील फुटिरांच्या बातम्या तर कधी मीनाक्षीपूरमच्या धर्मपरीवर्तनामुळे झालेल्या विहिंपच्या आंदोलनाच्या बातम्या. या विविधतेमुळं ‘टेलिग्राफ‘ ऐंशीच्या दशकातल्या सामाजिक अस्वस्थतेचा जणू आरसा बनला.

या झळाळत्या यशाची हवा एमजे अकबरांच्या डोक्यात गेली. ‘आनंद बाजार’सारख्या समूहात राहून केलेले चमत्कार आणि दिल्लीच्या राजकीय परिघात वाढता दबदबा यामुळे अकबर पत्रकाराच्या जीवनाचं ब्रीद विसरले. ‘जे वाट्टेल ते मी करू शकतो' असा त्यांचा मनमानी स्वभाव बनत गेला. पत्रकाराला तत्वांच्या सीमारेषेत राहून काम करावं लागतं हे ते पार विसरून गेले.

इंडियाः द सीज विदिन, द शेड ऑफ स्वॉर्ड, नेहरूः द मेकिंग ऑफ इंडिया, कश्मीरः बिहाइंड द वेल, टिंडर बॉक्सः द पास्ट अँड फ्यूचर यांसारख्या महत्वाच्या पुस्तकांचा लेखक असणाऱ्या एमजेंना अलौकिक यश आणि प्रसिद्धी मिळाली; पण या सगळ्यात आपण सामाजिक, नैतिक मूल्यं कधी विसरली याचं भान त्यांना राहिलं नाही.

एमजेंनी पत्रकारितेचे शिखरपुरुष मानला गेलेल्या बाबुराव विष्णू पराडकर यांचा तरी आदर्श घ्यायला हवा होता. त्यांचं वैवाहिक आयुष्य अतिशय क्लेशदायक होतं. त्यांनी तीन लग्नं केली. पण त्यांच्या तिन्ही बायका एकामागे एक वारल्या. मात्र त्यांनी बाहेरख्यालीपणा करून स्वतःच्या चारित्र्यावर कसलाही डाग लागू दिला नाही. याच पद्धतीनं एमजेंनी स्वतःच्या धर्माचा सहारा घेत चार लग्न जरी केली असती तरी इस्लामनुसार औरंगजेब बनून नैतिक जीवन जगता आलं असतं. परंतु त्यांनी इंग्रजी पत्रकारितेच्या जगात राहून लोकशाही मानसिकतेला डावलत सरंजामी मानसिकता स्वीकारली.

शिल्लक राहिलं फक्त ग्लॅमर

अगदी ऑफीसबाहेरही त्यांनी पत्रकारितेला बाई, बाटली, पैसा आणि राजकारणातील स्थान मिळवण्याचं माध्यम बनवलं. त्यांच्याआत कुठंतरी एक धूर्त राजकारणीही जन्माला आला होता. ते फक्त राजीव गांधी आणि काँग्रेस पार्टीसोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करून थांबले नाहीत. त्यांनी इतर पत्रकारांप्रमाणे राज्यसभेत मागच्या दाराने प्रवेश करण्याऐवजी १९८९ मधे किशनगंज मधून लोकसभा लढवली आणि निवडूनही आले. मात्र तोवर ते ना पत्रकारितेसाठी आदर्श उरले होते, ना राजकारणासाठी. त्यांच्याजवळ शिल्लक होतं फक्त ग्लॅमर. आणि त्याचा वापर त्यांनी त्यांच्याहून बलवान असणाऱ्यांना खूश करण्यासाठी आणि कमजोरांवर दबाव आणत त्यांचं शोषण करण्यासाठी केला.

तो कॉंग्रेसच्या राजकीय पतनाचा काळ होता. या कॉंग्रेसी पतनानं पत्रकारितेलाही आपल्या विळख्यात घेतलं. नैतिकतेचं प्रतीक बनून समोर आलेल्या व्हीपी सिंह यांनी मंडल आयोगातून सामाजिक न्यायाचं आंदोलन उभं करण्याव्यतिरिक्त अशी कुठलीच नैतिक छाप सोडली नाही ज्यातून समाजसुधारणेला चालना मिळाली असती. खरं तर एमजेंची पत्रकारिता आणि कॉंग्रेस यांचं पतन सुरू असलेल्या त्या काळात अरुण शौरी आणि प्रभाष जोशी हे दोघंही रामनाथ गोयंका यांच्या छत्रछायेखाली आपापल्या सहकाऱ्यांसोबत सक्रीय होते. भारतीय समाजात लोकपालाची भूमिका निभावत होते.

‘जनसत्ता’मधे महिला पत्रकारांची संख्या जरा मर्यादितच असली तरी ‘इंडियन एक्स्प्रेस’मधे महिला पत्रकारांची मोठी फौजच कार्यरत होती. त्यातल्या अनेकींनी पुढं जाऊन पत्रकारितेत स्वत:चा ठसा उमटवला. नीरजा चौधरी, ऋतु सरीन, कूमी कपूर, पुष्पा गिरमाजी, जसजीत पुरेवाल आणि शेवंती नाइनन ही त्यातली काही नावं. त्यांनी अनेकानेक महत्वाच्या विषयांना वाचा फोडत तडाखेबंद बातम्या दिल्या. या सगळ्याजणी आज समाजात मानाचं स्थान मिळवून आहेत.

अरुण शौरी यांच्याबाबत बोलायचं तर पत्नी आणि मुलामुळे त्यांचं खासगी आयुष्य खूप कटकटींचं होतं. कदाचित त्याच क्लेशांमुळे त्यांची विचारप्रणाली मानवतावादी, लोकशाहीवादी राहू शकली असावी. म्हणूनच आज #metoo मोहीम एवढी जोर धरत असतानाही त्या समूहाच्या अरुण शौरी आणि त्यांचे सहकारी असलेल्या हिरण्यमय कालेकर, भारत भूषण वगैरेंवर असे काही आरोप होताना दिसत नाहीत. `इंडियन एक्स्प्रेस`चे सध्याचे मुख्य संपादक राजकमल झा तर खरोखर संतपरंपरेतली व्यक्ती वाटतात.

संपादकांचे आदर्श पायदळी तुडवले

'द टाइम्स ऑफ इंडिया'चे संपादक गिरीलाल जैन होते. नंतर दिलीप पाडगावकरांनी ते नेतृत्व सांभाळलं. त्यांची प्रतिमासुद्धा कधी अशी नव्हती. हिंदीमधे राजेंद्र माथुर आजही आदर्श पत्रकार मानले जातात. लोकांमधे प्रभाष जोशी आणि माथुर यांच्यात कोण अधिक चांगला म्हणत आजही भांडण होईस्तोवर चर्चा झडतात.

'हिंदुस्तान टाइम्स' मधले एच. के. दुवा, अजित भट्टाचारजी आणि 'द हिंदू'च्या के. एन. राम यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसोबत एक शालीन नातं जपलं. नव्वदच्या दशकात शेखर गुप्ता यांनी 'इंडिया टुडे' आणि 'द इंडियन एक्स्प्रेस'चं नेतृत्व केलं होतं. त्यांच्यासोबतही अनेक महिला पत्रकारांनी काम केलं, पण अशा तक्रारी किमान आजवर तरी ऐकण्यात नाहीत.

पत्रकारितेत महान बनत गेलेल्या एमजे अकबर यांना मात्र हे लक्षात राहिले नाही, की एखादा संपादक जास्तीतजास्त महिलांचं लैंगिक शोषण करतो, म्हणून तो महान समजला जात नाही. किंवा त्यानं बड्या लोकांसोबत दारू प्याली म्हणूनही तो श्रेष्ठ ठरत नसतो. तो महान तेव्हाच समजला जातो, जेव्हा तो काहीएक मूल्यं घेऊन ठाम उभा असतो. तो तेव्हाच महान समजला जातो जेव्हा त्यानं संविधानाचा, लोकशाही मुल्यांचा आदर केलेला असतो आणि नागरिकांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून लढा दिलेला असतो. सोबतच जर त्यानं आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला असेल, तिथे लोकशाही वातावरण निर्माण केलं असेल तेव्हा तो संपादक महान बनू शकेल.

अकबर विसरून गेले की देशातील पत्रकारितेचे पहिले शहीद मोहम्मद बाकर त्यांच्या अय्याशीसाठी ओळखले जात नाहीत. त्यांनी आपल्या लेखणीतून इंग्रजांचीसुद्धा गय केली नाही म्हणून त्यांना फाशी देऊन तोफेच्या तोंडी देण्यात आलं होतं. गणेश शंकर विद्यार्थी यांनी हिंदू मुस्लीम एकतेसाठी हौतात्म्य पत्करलं होतं. खुद्द महात्मा गांधींनाही हेवा वाटावा एवढं ते हौतात्म्य महान होतं.

एमजेंचा पत्रकारितेत प्रवेश झाला, त्या काळात महान संपादकांची एक पिढी कार्यरत होती. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आली तेव्हा याच सगळ्यांचा आदर्श घेऊन एमजेंनी व्यवस्थेविरोधात लढा दिला. त्यावेळी त्यांच्यासोबत होती स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील पत्रकारितेची मुल्यं भारतीय लोकशाही व्यवस्थेचा आशीर्वाद. मात्र पुढं जाऊन ते लोकशाहीच्या, मानवाधिकाराच्या मुल्यांची जपणूक करण्यात अयशस्वी ठरले. स्खलनशील राजकारण आणि भांडवलशाही बाजाराच्या वाढत्या प्रभावासह त्यांनी मूल्यांना तिलांजली दिली.

तळघरात कोंडलेल्या जुन्या कहाण्या वर

विशेषतः 'द एशियन एज' मधे असताना त्यांनी पत्रकारितेला स्वतःच्या भोगासाठीचं साधन बनवलं. भरती प्रक्रियेदरम्यान 'मॉडेल'प्रमाणं दिसणाऱ्या मुलींना नोकरी देत, त्यांना त्यांच्या योग्यतेहून वरची पदं देत उपकृत केलं जाई. मग या पदोन्नतीनं सुखावलेल्या मुली अकबरांचं मन रिझवण्याचे सर्व प्रयत्न करत. या खेळात सहमती, असहमतीच्या रेषा कित्येकदा धूसर झाल्या. ऐंशीच्या दशकात उभ्या राहिलेल्या महिला आंदोलनाची झळ एमजे अकबरांच्या या दुष्कृत्यांना अजिबात बसली नाही.

आजचं महिला आंदोलन भले ऐंशीच्या आंदोलनाइतकं मोठं नसेल. तरी आज महिला धर्म, राजकारण, माध्यम आणि मनोरंजन या सर्वच क्षेत्रांत मानाचं स्थान मिळावं म्हणून आवाज उंचावताहेत. 'तहलका'चे संपादक तरुण तेजपाल रंगेहात पकडले जातात आणि तळघरात कोंडलेल्या जुन्या कहाण्या खुल्या मंचावर येतात हा त्याचाच परिणाम. आता हे सगळं बहुतांश लोक अगदी मजा घेत वाचत, ऐकत आहेत. संवेदनशील पत्रकारांसाठी अशा घडामोडी नक्कीच वेदनादायक आहेत. माध्यमांच्या आतल्या वर्तुळात वादळ उठलंय. टेलिविजन मीडियामधलं वातावरण तर अधिकच गुदमरून टाकणारं आहे. या आतल्या घडामोडींच्या काही कथा सांगणारं रवींद्र त्रिपाठी आणि अजित अंजुमचं 'वक्त एक ब्रेक का' नावाचं पुस्तक मागं प्रकाशित झालं होतं.

खरंतर या सगळ्याला एक दुसरी बाजूसुद्धा आहे ज्यात स्त्रिया ब्लॅकमेलिंगसाठी या मोहिमेचा वापर करताहेत, सहमतीनं ठेवलेल्या एकदोन वेळच्या संबंधाचा आधार घेत कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करताहेत. ‘दैनिक भास्कर समूहा’चे संपादक कल्पेश याज्ञिक यांची आत्महत्या हे त्याचं ठळक उदाहरण. समाजानं सावध राहत अशा प्रवृत्ती वेळीच ओळखल्या पाहिजेत.

ताकदीचे कवी मुक्तिबोध यांनी लिहिलं होतं 'हाय हाय मैंने उन्हें नंगा देख लिया, मुझे इसकी सजा मिलेगी, जरूर मिलेगी.' आता हे पाहिलं पाहिजे, की पितृसत्तेला नागवं करणाऱ्या महिलांनाच सजा मिळते, की खऱ्या अपराध्यांना शिक्षा सुनावली जाते?