राजकारणाच्या बेड्यांमधून सुटला तरच भारतात खेळ बहरेल

२३ जून २०२१

वाचन वेळ : ८ मिनिटं


‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर.

आंतरराष्ट्रीय खेळ आयोजित करणाऱ्या देशांना तयारीसाठी वेळ मिळावा, गरजेचं बांधकाम करता यावं, खेळाडूंना ट्रेनिंगसाठी वेळ मिळावा यासाठी खेळांच्या तारखा या एक दोन वर्ष आधी ठरलेल्या असतात हे सगळ्यांनाच माहितीय. तयारीला इतका वेळ असतानाही २०१० ला दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ खेळांमधून भारतानं वाईट उदाहरण उभं केलंय.

कॉमनवेल्थच्या स्पर्धांच्या आयोजनातून भारताने केलेल्या उधळपट्टीमुळे दुर्दैवी घटनांची मालिकाच तयार झाली. खेळाच्या समितीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. समितीतल्या काही लोकांना या आरोपाखाली पुढे अटकही झाली. शेवटी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आयओसीनं ऑक्टोबर २०१२ ला भारतीय ऑलिम्पिक समिती निलंबित केली.

हेही वाचा : लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

खेळ बहरायचा अजेंडा

भारतात खेळ बहरावा असं वाटत असेल तर काही महत्त्वाचे उपाय तातडीनं करण्याची गरज आहे. खासगी अजेंडे, नफेखोरी मधे न आणता एकच ध्येय गाठण्यासाठी सरकार, स्पोर्ट्स फ्रेडरेशन आणि समित्या यांच्यात एकमतानं करार व्हायला हवा. खेळाडूंना सरकारकडून पुरेसा निधी आणि सोयीसुविधा मिळतात. पण सरकारला त्या बदल्यात काय मिळतं? 

याशिवाय एक महत्त्वाचा प्रश्नही विचारला पाहिजे. आपल्या भविष्यातल्या योजना काय आहेत? त्या राबवण्यासाठी काय करायचं आहे? निधी प्रामाणिकपणे वाटला जातो का? या प्रश्नांवर चर्चा झाली आणि त्यातून काही ठोस उत्तरं मिळाल्यावरच निधी वाटप झालं पाहिजे.

आपला दर्जा वाढवण्यासाठी पुढाकार घेऊन करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण पहिले ही व्यवस्था बदलण्याची इच्छा मनात असायला हवी. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात खेळाडूंना जिंकण्यासाठी, पदकं आणि त्यासोबत कौतुक मिळवण्यासाठी तयार करणं हा आपला पहिला एकसुत्री अजेंडा असायला हवा. यासाठी हेतुपुरस्सर आणि निर्णायकपणे एक धोरणात्मक योजना राबवली गेली पाहिजे.

राजकारणाचा प्रभाव

एखाद्या खेळातलं प्राविण्य देशातल्या कोणत्या भागातल्या लोकांना जास्त आहे हे शोधणं आणि ते खेळाडू निवडणं हा यातला एक मार्ग होऊ शकेल. उदाहरणार्थ, हरयाणात कुस्ती, ईशान्य भारतात धनुर्विद्या, पंजाबमधे हॉकी. ध्येय केंद्रीत आणि प्राणामिक योजना राबवल्यावरच भारत क्रीडा विश्वात पहिल्या पट्टीचा खेळाडू म्हणून पुढे येईल. व्यवस्था बदलण्यासाठी आपल्यातल्या प्रत्येकालाच योगदान द्यावं लागेल.

क्रीडा क्षेत्रावर असणारा राजकारणाचा सर्वव्यापी प्रभाव संपायलाच हवा. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याने मला ऍथलेटिक फ्रेडरेशनच्या कार्यकारणीवर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या काही बैठकांना मी हजर होतो. पण माझी स्पष्ट मतं तिथं कुणालाही मान्य नाहीत हे मला लवकरच लक्षात आलं. वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या काही लोकांना माझं तिथं असणं खटकत होतं. कारण माझ्यासारखा माजी खेळाडू त्यांच्या प्रतिष्ठेला ग्रहण लावेल अशी भीती त्यांना होती. 

आयुष्यात कधीही कोणताही खेळ न खेळलेल्या लोकांना इतक्या महत्त्वाच्या पदांवर कसं बसवलं जातं याचं मला नेहमी आश्चर्य वाटत रहायचं. एखादा खेळाडू किंवा खेळातले लोकच क्रीडा समितीचे अध्यक्ष का असू शकत नाहीत? पण हितसंबंध गुंतलेले लोक हे कधीही होऊ देणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे, ही पदं निवडून दिली जातात आणि एखाद्या लबाड आणि सत्ताधारी राजकीय नेत्यापेक्षा जास्त मतं कोणताही खेळाडू पदरात पाडून घेऊ शकणार नाही.

हेही वाचा : स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

खेळातले क्रांतीकारक बदल

मार्गारेट आल्वा क्रीडा मंत्री होत्या तेव्हा कोणत्याही महत्त्वाच्या क्रीडा मंडळाला ५ वर्षांचाच कार्यकाळ असावा, असं मी त्यांना नेहमी सांगायचो. याने त्या मंडळाची काम करण्याची पद्धत बदलते. हेच मत मी पुढचे मंत्री अजय माकन यांच्यासमोरही मांडलं. पण संसदेत काही कृती केली तरच अशा योजना पुढे येऊ शकतात. 

या काळासोबत आपण पुढे सरकलो नाही तर जग झपाट्याने पुढे जाईल आणि आपण फार फार मागेच राहू या गोष्टीचं आपल्याला पूर्ण आकलन होतच नाहीय. गेल्या काही दशकात खेळातलं तंत्रज्ञानही खूप बदललंय. १९५० ला मी खेळ सुरू केला तेव्हा रनिंगसाठी बुटही नव्हते. १९५६ नंतरच पटियालातल्या रोशन स्पोर्ट्सने त्याचं उत्पादन करायला सुरवात केली. तेव्हा सर्वसामान्यांसाठी ते खुले झाले.

पळण्यासाठी बनवलेले सिंथेटिक ट्रॅक हाही असाच एक क्रांतीकारी बदल आहे. आमच्यावेळी अशक्य वाटणारे पराक्रम क्रीडा क्षेत्राने मिळवले आहेत असाच याचा अर्थ होतो. शूज, ट्रॅकसूट आणि इतर अत्याधुनिक साधनं सहज उपलब्ध असताना, तिचा इतका सहज फायदा होत असतानाही आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोचणं खेळाडूंना अवघड का जातं?

ड्रग्जच्या विळख्यात खेळाडू

जगभरात होणाऱ्या ड्रग्जच्या वापरामुळे तर मला अतिशय दुःख होतं. मी पळायचो तेव्हा मला एकाच प्रकारचं ड्रग माहीत होतं. तेही औषध म्हणून वैद्यकीय कारणासाठी वापरलं जाणारं. पण आज ड्रग्ज कॅन्सरसारखे पसरतायत. शाळेतल्या खेळांच्या स्पर्धांमधेही त्याचा वापर होतो. पंजाबमधल्या कोणत्याही शिक्षण संस्थेला भेट द्या. सुया आणि ड्रग्ज, शिव्या, गैरवर्तन हे तर अगदी उघड्यावर पहायला मिळतं. 

मेडिकलच्या दुकानात किंवा डिलरकडे ड्रग्ज सहज उपलब्ध होतात. सज्ञान व्यक्ती असो किंवा लहान मूल कोणते ड्रग घ्यायचे, कुठे घ्यायचे आणि किती याची खडानखडा माहिती त्याला असते. हेरॉईन, कोकेन किंवा फारशी शारीरिक मेहनत न करता अगदी हवा तो निकाल मिळवून देणारे बॅन केलेले सप्लिमेण्ट असो नव्याने पुढे येणाऱ्या सगळ्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर पदार्थ घ्यायला काहीच वाटत नाही.

त्यांचं काय चाललंय याची पूर्ण कल्पना अधिकाऱ्यांनाही असते तशीच ती आम्हाला काहीच माहीत नाही असं दाखवणाऱ्या कोच आणि डॉक्टरांनाही असते. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंनी ड्रगचा वापर करुन केलेल्या घोटाळ्यांचा जणू पूरच आला. २०१० च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेममधे गोल्ड मेडल जिंकलेल्या भारतीय महिला ४X४०० मीटर रीले टीममधल्या दोन महिला खेळाडूंनी बळ वाढवणाऱ्या स्टीरॉईड घेतली होती हे नंतर उघडकीस आलं.

अलिकडेच ऑलिम्पिकमधे ब्राँझ मिळवलेल्या विजेंदर सिंग यावर हिरॉईन आणि इतर बंदी घालतेले पदार्थांच्या सेवनाचे आरोप झाले. पण त्याची टेस्ट निगेटिव आली. वैयक्तिक नाचक्की, अपमान, आणि मेडल परत करून देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणं याशिवाय ड्रगचा प्रसार थांबवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. 

बेकायदेशीर ड्रगचा समूळ नायनाट करण्याबाबत सरकारी आणि क्रीडा क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना खरंच रस असेल तर त्यांनी तातडीनं कृती केली पाहिजे. ड्रग पुरवणाऱ्या सगळ्या सपलायर आणि स्रोतांवर कडक जरब बसवायला हवी. ड्रग घेणाऱ्या खेळाडूवर कायमची बंदी घातली पाहिजे आणि फसवणारे डॉक्टर आणि खेळाडूला ड्रगची ओळख करुन देणाऱ्या कोचना निलंबित करायला हवं. असे कडक उपायच अशा गंभीर आणि धोकादायक कृत्याला आळा घालू शकतील.

हेही वाचा : कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

खेळाडूंच्या निवृत्तीनंतर?

पद्मश्री सोडल्यास जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अमेरिकेत १९५९ ला मिळालेली हेल्मस वर्ल्ड ट्रॉफी आणि १९९७ ला इंदिरा प्रियदर्शिनी गांधी पुरस्कार हेच माझे पुरस्कार. असे पुरस्कार एखाद्या खेळाडूचं मनोबल वाढवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. ते प्रसिद्धी देतात आणि खेळाडूचं नाव अमर करतात. पण दुर्दैवाने त्यातले खूप कमी पुरस्कार आर्थिक बाजू सांभाळतात.

अर्जुन पुरस्कार देताना पूर्वी काही एक रक्कम दिली जायची. आता रेल्वेचा पास, विमान तिकीटावर सूट पेट्रोल गॅसवर सूट अशा गोष्टी दिल्या जातात. बहुतेक खेळाडू हे अत्यंत गरीब, अशिक्षित घरातून आलेले असतात. त्यांच्या पालकांकडे मुलांच्या गुणांना वाव देण्यासाठी पैसाही नसतो. पण इतर मुलांपेक्षा ही मुलं वेगळी ठरतात ते त्यांच्या भुकेमुळे आणि क्षमता विकसित करण्याच्या इच्छेमुळे. पण ते निवृत्त होतात तेव्हा काय? 

आरामात राहण्यासाठी वारसा हक्कानं चालत आलेला पैसा किंवा मालमत्ता त्यांच्याकडे नसते आणि त्यांच्या तोकड्या करिअरने त्यांना सुरक्षित भविष्याची हमीही दिलेली नसते. त्यांना कोणताही नफा किंवा आर्थिक स्वरुपातली मिळकत मिळत नाही. एकदा त्यांनी मैदान सोडलं की ते विसरले जातात. ध्यानचंद, त्रिलोक सिंग अशा अतिशय दारिद्र्यात मरण पावलेल्या अशा अर्जुन पुरस्कार आणि सुवर्ण पदकं मिळालेल्याही कितीतरी खेळाडूंच्या दुःखद कहाण्या आहेत.

निवृत्त झाल्यावर खेळाडूंना एखादी नोकरी, नियमित पेन्शन किंवा इतर फायदे मिळावेत यासाठी एखादी योजना सुरू करावी असा सल्ला मी कितीतरी वेळा सरकारला केलाय. खूप मोठ्या खेळाडूंपैकी काही जणांच्या क्रीडा समित्यांवर, राज्य सरकारवर नियुक्त्या होतात. अशानं नव्या तरुण खेळाडूंना क्रीडा हे करिअर म्हणून निवडण्याचं प्रोत्साहन मिळेल. 

हेही वाचा : मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

क्रिकेटचं आकर्षण

गेल्या काही दशकात क्रिकेटच्या सावलीनं भारतातले इतर सगळे खेळ झाकून गेलेत. हेही क्रीडा क्षेत्राचा ऱ्हास होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. कोणताही पेपर उघडा किंवा टीवी लावा, ओरडणाऱ्या हेडलाइनी आणि स्टार क्रिकेट खेळाडूंचे फोटो हेच माणसाचं लक्ष वेधून घेतात. क्रिकेटला मिळतं तितकं कवरेज इतर कोणत्याही खेळाला मिळत नाही. शिवाय, क्रिकेटच्या सतत मॅच सुरू असतात. टेस्ट मॅच, वन डे, आयपीएल आणि आणखी काय काय. वर्षभर सुरू असणाऱ्या या मॅच, इतर कार्यक्रम याकडे बघता दोन मॅचमधे थोडाच वेळ असतो. 

आकर्षक फोटो, चकचकीत लाइफस्टाइल आणि महत्त्वाचं म्हणजे, त्यातून मिळाणारे पैसे तरुण मुलांना खेळाकडे आकर्षित करतात. मूठभर मुलांनाच इतर खेळात रस असतो. इतर कोणत्याही खेळात खेळाडूनं रेकॉर्ड मोडला किंवा विजय मिळवला तरी त्यांच्यावर तेवढ्यापुरतं लक्ष दिलं जातं. उदाहरणार्थ, २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्समधे पदक मिळवलेले सायना नेहवाल, सुशील कुमार, मेरी कोम परत आले तेव्हा त्याचं जल्लोषात स्वागत केलं. पण नंतर पुन्हा क्रिकेटच केंद्रस्थानी आलं.

मिल्खा सिंग व्हायचंय?

मीडियानेही इतर खेळांना प्राधान्य द्यायचे सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजे, असं मला वाटतं. एखादं उत्पादन, सिनेमा, पुस्तक किंवा खेळाला प्राधान्य देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती पब्लिसिटी. त्यामुळेच क्रिकेट आज वर्चस्व असलेला खेळ झालाय. माझं पहिलं आत्मचरित्र पंजाबीमधे १९७० च्या दशकात प्रसिद्ध झालं होतं तेव्हा लहानमोठे शेकडो चाहते माझ्याकडे यायचे आणि मलाही मिल्खा सिंग व्हायचंय असं सांगायचे.

मग मी त्यांना कुठल्यातरी ट्रेनिंग प्रोग्राममधे घालायचो. पण तिथलं थकवणारं वेळापत्रक झेपलं नाही की चार किंवा पाच दिवसानंतर त्यांचं दांडी मारणं सुरू व्हायचं. ‘मिल्खा सिंग होणं म्हणजे तुम्हाला जोक वाटतो का? डाव्या हाताचा मळ वाटतो का?’ मी विचारायचो. ‘नाही. मिल्खा सिंग बनायला तुमच्याकडे धैर्य, विश्वास आणि ध्येय पाहिजे.’ माझ्यासाठी हे ध्येय म्हणजे पळण्यामधे सर्वश्रेष्ठ असणं. त्याशिवाय का मी इतक्या अविरतपणे सराव केला?

काही वर्षांपूर्वी मी माझी पदकं, ट्रॉफी आणि इतर खेळात मिळालेली बक्षीसं पटियालातल्या आयएनएस आणि दिल्लीतल्या नॅशनल स्टेडियमला दान दिली. १९६० च्या रोम ऑलिम्पिकमधे मी घातलेले स्पाइक शुज राहुल बोस यांच्या एनजीओला चॅरिटी लिलावासाठी दिले. भाग मिल्खा भाग हा माझ्या जीवनावर सिनेमा बनवणारा दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा याने ते शुज २४ लाख रुपयांना घेतले.

आयुष्यानं मी विचार केला होता त्यापेक्षा खूप काही दिलं. तरीही माझी एक इच्छा अजूनही आहे. रोममधल्या ऑलिम्पिकमधे माझ्या हातातून निसटलेलं पदक पुन्हा जिंकणारा एखादा भारतीय धावपटू मला पहायचा आहे.

हेही वाचा : 

'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं