किचन बाईचं असलं तरी सत्ता चालते पुरुषाचीच!

२६ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आत्मनिर्भर, मुक्त, स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीची ‘ग्रेट इंडियन किचन’मधून सुटका झालेली नाही. हेच वास्तव दाखवणारा सिनेमा सोशल मीडियावर गाजतोय. या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्री आणि सार्वकालिक लाभार्थी पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हा महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!

स्त्रीच्या स्वातंत्र्याची सीमा सदैव पारतंत्र्याच्या कक्षेत बद्ध करून टाकणार्‍या स्मृतिवचनांनी आपला इतिहास व्याप्त आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण त्यांना कागदोपत्री निष्क्रिय केलं असलं, तरी मनीमानसी रुजलेली आणि परंपरेच्या नावाखाली आचरणात असणारी ‘स्मृती’ नष्ट करणं आपल्याला जमलेलं नाही. हे परंपरेचं जोखड स्त्रियांच्या मानेवर, मनावर आणि जीवनावर लादून स्वतः मात्र स्वातंत्र्याचा पुरेपूर आस्वाद घेणार्‍या पुरुषसत्तेची बीजं इथं पदोपदी दिसतात.

‘द ग्रेट इंडियन किचन’ हा अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेला मल्याळम सिनेमा भारतीय समाजव्यवस्थेचं वास्तव नव्याने अधोरेखित करतो. दिग्दर्शक जो बेबी याने पडद्यावर मांडलेली ही कथा सर्वसाधारणपणे प्रत्येक भारतीय कुटुंबाची आहे. अगदी आजची अर्थात एकविसाव्या शतकातल्या तिसर्‍या दशकामधली आहे.

रांधा, वाढा, उष्टी काढा

सुशिक्षित उपवर मुलामुलीचं अगदी व्यवस्थित ठरवून, दाखवून लग्न होतं. मुलगी नव्या घरात नांदायला येते. नवलाईचे चार दिवस संपता संपता घरातल्या स्वयंपाकघराशी बांधली जाते आणि तिच्या आयुष्याचं रहाटगाडगं त्या किचन नावाच्या परंपरागत कोल्हूशी जोडलं जातं ते कायमचं. तिथून तिची सुटका नाही. रांधा, वाढा, उष्टी-खरकटी काढा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तेच ते आणि तेच ते! 

अगदी अंथरुणात शिरल्यावर नवर्‍याची शरीरभूक भागवतानाही तिचं मन त्याच्याशी तादात्म्य पावतच नाही. त्यालाही त्याची गरज वाटत नाही. ‘ती’ म्हणजे आपल्या पोटाची आणि देहाची भूक शमवण्यासाठीची हक्काची भोगवस्तू आहे, तिचा पुरेपूर लाभ उठवत राहण्याचेच संस्कार त्याच्यावर आहेत. तो तेच करत राहतो.

परंपरेने तो तेच करत आलाय. वाईट काय, तर शिक्षक असलेला ‘तो’ शाळेत ‘कुटुंबव्यवस्था आणि तिची मूल्यं’ शिकवितो आणि प्रत्यक्ष आचरणात मात्र त्या मूल्यांना पदोपदी हरताळ फासतो.

हेही वाचा :  स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

बंडखोरीची कथा

किचन ताब्यात असलं, तरी तिथं काय नि कसं करायचं, याचं स्वातंत्र्य तरी कुठाय तिला? अगदी थेट आरडाओरडा करून नसलं, तरी तिला सासरा स्पष्ट शब्दांत सांगत राहतो, खोबरं मिक्सरमधे नको, पाट्यावर वाट. भात कुकरमधला नको, चुलीवरचाच हवा. कपडे वॉशिंग मशिनमधे नको, वरच धुवा, अधिक टिकतील! 

नोकरी करण्यास हरकत नाही. पण घराच्या प्रतिष्ठेचं काय? पोस्ट ग्रॅज्युएट सासू तिच्या सासर्‍याच्या सांगण्यावरून घरकाम करतेय. मग तुला काय अडचण? हे कमी म्हणून की काय, तिच्या ‘अपवित्र’ रजोकाळात घराचं पावित्र्य टिकवण्याची जबाबदारी तिनेच कसोशीने निभावली पाहिजे, ती वेगळीच! मग, तिची यातून सुटका नाहीच का? होणार तर कशी? तिच्या सुटकेसाठी बंडखोरी हाच एक मार्ग आहे का? या सार्‍याची कथा म्हणजे ‘द ग्रेट इंडियन किचन’.

स्त्रियांच्या बंडाचं निशाण

चातुर्वर्ण असणाऱ्या भारतीय समाजव्यवस्थेत चातुर्वर्णांत स्थान न मिळालेले अतिशूद्र जितके नीच, त्याहूनही खालचा दर्जा इथल्या कुटुंबव्यवस्थेतल्या स्त्रियांना प्रदान करण्यात आलाय. मग ती कुठल्याही धर्माची, जातीची अगर वर्णाची असो!

राजा राममोहन रॉय, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी प्रभृतींनी स्त्रियांच्या हक्कांसाठी बंडाचं निशाण उभारलं. हजारो वर्षांच्या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देऊन अन्यायग्रस्त, पीडित स्त्रियांना त्यांचे सामाजिक समतेचे, स्त्री-पुरुष समानतेचे हक्क प्रदान करण्यासाठी हयातभर प्रयत्न केले. स्त्रियांना त्यांचे शैक्षणिक, कौटुंबिक, सामाजिक हक्क यांची जाणीव करून देण्यापासून तिच्यात मुळातच असलेल्या आत्मनिर्भरतेच्या स्फुल्लिंगास फुंकर मारून चेतवण्याचं, प्रज्वलित करण्याचं काम या लोकांनी केलं.

स्त्रिया शिकल्या की त्या आपोआपच परंपरानिष्ठ जोखडातून मुक्त होतील. स्वतःची सुटका करून घेतील, स्वतःच्या कुटुंबाला त्यातून बाहेर काढतील. एका स्त्रीचं शिकणं हे संपूर्ण कुटुंबाच्या प्रबोधनपर्वाची सुरवात असते, असायला हवी. त्यातून आपोआपच समाजही प्रगल्भ बुद्धिवादी, विवेकनिष्ठ विचार परंपरेचा पाईक होईल, अशी अपेक्षा या प्रबोधकांच्या विचार आणि कार्यातून प्रकट झाली.

हेही वाचा : नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

हुकूमत चालते ती पुरुषाचीच

पण प्रत्यक्षात आजचं चित्र काय आहे? आज स्त्री आत्मनिर्भर आहे, मुक्त आहे, स्वतंत्र आहे, असं आपण म्हणतो. पण ‘ग्रेट इंडियन किचन’मधून मात्र तिची सुटका झाली नाही. हेच वास्तव हा सिनेमा आपल्याला दाखवतो. नव्हे, आपल्यासमोर आरसाच धरतो. किचन हे भारतीय स्त्रीच्या शोषणव्यवस्थेचं प्रतीक म्हणून इथं समोर येतं. आपल्या संवेदनशीलतेला आवाहन करत रहातं.

काही झालं तरी ‘चूल’ आणि ‘मूल’ या दोन गोष्टींपासून बाईची, बाईपणाची सुटका नाही. यातल्या मुलाची जबाबदारी निसर्गदत्त असली, तरी चूल आणि स्वयंपाकघर या व्यवस्थेने तिच्यावर सुरवातीला सोपवलेल्या आणि कालांतराने लादलेल्या बाबी आहेत. बाईने तिचं कार्यक्षेत्र अगर हक्काचं क्षेत्र म्हणून स्वयंपाकघरावर ताबा निर्माण केला, तरी त्यावर अप्रत्यक्ष हुकूमत चालते ती पुरुषाचीच!

आधुनिक काळात शिक्षणामुळे यात काही बदल व्हावा की नाही? अपवाद वगळता पुरुषाची काडीची मदत घरच्या स्त्रीला होत नाहीच, उलट वयनिरपेक्ष पुरुषाला काय हवंय, काय आवडतं, तेच बनवण्यास या ‘किचन’चं प्राधान्य असतं. स्त्रियाही पुरुषाचे हे सारे लाड गोंजारण्यास कारणीभूत ठरतात. त्याचे सारे दंभ, अहंकार फुलतात, ते याच किचनच्या मालकिणींच्या फुंकरीने.

बोलायचं नाही, फक्त सोसायचं

एखादीने त्याला डिवचलं, तर हे सारे अहंकार फणा काढून उभे राहतात आणि तिलाच दंश करण्यासाठी धावू लागतात. त्याच्या ‘टेबल मॅनर्स’बद्दल अगदी गमतीतही बोलून दाखवण्याचं स्वातंत्र्य तिला नाही. बाहेर हॉटेलमधे टेबल मॅनर्स सांभाळणारा नवरा घरात मात्र डायनिंग टेबलवर अस्ताव्यस्त खरकटं टाकतो, याबद्दल त्याला खेचण्याच्या मूडमधे असलेल्या बायकोला तिने माफी मागितल्यानंतरच त्याच्या बेडमधे प्रवेश मिळतो. त्यानंतर तिच्या ‘मॅनरिझम’ची खिल्ली उडवण्याची एकही संधी त्याच्याकडून दवडली जात नाही.

पुरुषत्व गाजवण्याचं हक्काचं स्थान असलेल्या बेडरूममधेही स्त्रीने तिच्या अपेक्षा बोलून दाखवणं आजही त्याला आवडत नाही. प्रणयक्रीडेविषयी तिनं काही बोलणं म्हणजे तर त्याच्या पुरुषत्वाला डिवचणंच जणू. संबंधावेळी त्रास होतो, म्हणून ‘फोरप्ले’ची मागणी करणार्‍या तिला ‘बरंच काही माहिताय गं तुला?’ असं कुत्सितपणाने विचारलं जातं.

तिने बोलायचं नाही काही, फक्त सोसायचं. जे तुम्ही करता, त्यात आनंद मानायचा. स्वतः नाही आनंद शोधायचा, अगर त्याची मागणी करायची! तसं केलं, तर तिच्या चारित्र्याचे वाभाडे काढण्याची सुरवात होते, त्याच क्षणापासून.

हेही वाचा : लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

जगन्मातेचा विटाळ

आजचा समाज शिकल्याचे, सुसंस्कृतपणाचे आरोपण स्वतःवर करून घेतो. पण स्त्रियांच्या अत्यंत नैसर्गिक अशा मासिक पाळीच्या अनुषंगाने त्याचे वर्तन रानटी, असंस्कृतपणाचेच आहे. या काळात तिला आवश्यक विश्रांती देणं ठीकच आहे, ते समजून घेता येईल एक वेळ. मात्र तिचा सर्वंकष विटाळ मानणं हे आजच्या काळाला कितपत शोभादायी?

यात वाईट गोष्ट काय, तर पुरुषांचा हा पावित्र्याचा आग्रह सांभाळण्यासाठी एका बाईला दुसरी बाईच भरीस पाडत आली आहे आजवर. एक बाईच दुसर्‍या बाईच्या विटाळ काळात मदतीस उभी राहते आणि तिचा विटाळ तिने डोळ्यांत तेल घालून कसा सांभाळला पाहिजे, याचे धडेही देत राहते.

एरवी तिच्या सहवासासाठी आसुसलेल्या पुरुषाला या काळात तिचा स्पर्शच काय, पण तिच्या वस्त्रांचेही दर्शन होता कामा नये. केवळ पुरुषालाच नव्हे, तर देवा-धर्मालाही या ‘जगन्माते’चा विटाळ होता कामा नये. तिची सावली कोणावरही पडता कामा नये, अगदी तुळशीसारख्या रोपावरही!

सुवाहक स्त्री आणि लाभार्थी पुरुष

भारतीय समाजव्यवस्थेचा प्रमुख घटक असणार्‍या कुटुंबव्यवस्थेमधे ही अशी पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता, दांभिकता ओतप्रोत भरलीय. या दांभिकतेचं दर्शन ‘द ग्रेट इंडियन किचन’ अतिशय कुशलतेनं घडवतो. यावर उपाय काय? तर बंडखोरी! यातली गृहिणी तेही करते. तिच्यापुरतं तिचं बंड यशस्वीही होतं. मात्र, ही पुरुषी सत्ता, दंभ सांभाळण्यासाठी दुसरी सज्ज होते. त्याचं राज्य सुरूच राहतं, त्याची सत्ता अबाधित राहते, शोषित पात्र केवळ बदलतं.

या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्रीच आहे. सार्वकालिक लाभार्थी मात्र पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हाच कुठे महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!

हेही वाचा : 

#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

मराठी टीवी सिरियलमधल्या मुली असं का वागतात?

महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया