आपण मोबाईल गेमचा वीडियो एअर स्ट्राईकचा म्हणून पाहिला

२७ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईकनंतर आतापर्यंत आपल्या मोबाईलवर हल्ल्याचे वीडियो येतच आहेत. टीवीवर न्यूज चॅनल पाहिलात तरी एअर स्ट्राईकचे वीडियो दाखवले जातच आहेत. पण यापैकी एकही वीडियो खरा नाही. एक तर वीडियो गेममधला आहे. आपण उल्लू बनवले जात असल्याचं अल्टन्यूज या वेबसाईटने दाखवून दिलंय.

व्हॉट्सअप किंवा फेसबूकवरून आपल्या मोबाईल पोचलेला प्रत्येक फोटो आणि वीडियो आपल्याला खराच वाटतो. आपण तो खरा मानून फॉरवर्ड करत राहतो. पण तो अनेकदा बनावटच असतो. एअर स्ट्राईकसारख्या प्रसंगी तर आपल्याला तथ्य तपासून घेण्याचा वेळही नसतो आणि विचारही. त्यामुळे आपण त्यांना सहज फशी पडतो.

आर्मा टू नावाच्या गेमच्या वीडियोने फसवलं

अल्ट न्यूज altnews.in या फॅक्टचेकिंग वेबसाईटने या फेक वीडियोंमागचं वास्तव शोधून काढलंय. त्यातला सर्वात इंटरेस्टिंग वीडियो आहे तो पूजा चौधरी यांनी शोधलेल्या बातमीतला. एक ब्लॅक अँड व्हाईट वीडियो आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलवर पोचला असेल. २६ तारखेच्या अगदी सकाळपासून हा वीडियो फिरतोय.

एबीपी न्यूजचे रिपोर्टर विकास भदौरिया यांनी मात्र हा वीडियो शेअर केलाय. त्यासोबत ते म्हणतात, कुछ ऐसा हुआ होगा. याचा अर्थ त्यांना माहीत आहे की हा एअर स्ट्राईकचा वीडियो नाही. पण तरीही त्यांचा हा वीडियो सगळीकडे हल्ल्याचा वीडियो म्हणून पसरलाय. त्यानंतर नरेंद्र मोदी फॅन्स फ्रॉम करूनाडू, योगी आदित्यनाथ फॅन्स आणि मोदी मिशन २०१९ या भाजपशी संबंधित फेसबूक पेजवरूनही वायरल झाला.

पाहताक्षणीच हा वीडियो गेममधला असल्याचं कळतं. त्यातली इंग्रजी कॉमेंट्री आणि ग्राफिक्स यामुळे ते कळतं. अल्ट न्यूजने त्याचा यूट्यूबवर शोध घेतल्यावर त्यांना कळलं की ही क्लिप आर्मा टू या वीडियो गेमची आहे. २०१५पासून यूट्यूबवर असणाऱ्या या क्लिपमधला बरोबर २० सेकंदांचा भाग काढून तो वायरल केलाय.

अडीच वर्षांपूर्वीच्या वीडियोमुळे गोंधळ

दुसरा आणखी एक वीडियो ट्विटरवरून अजय कुशवाहा @ajaykushwaha_ यांनी वायरल केलाय. त्यांना साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना फॉलो करतात. त्यात विमानांचे दिवे आणि त्यांनी सोडलेले बॉम्ब यांचा प्रकाश दिसतोय. विशेष म्हणजे खालिद पीके @khalid_pk नावाच्या एका यूजरने हाच वीडियो पाकिस्तानने भारतीय विमानांना दिलेलं प्रत्युत्तर म्हणून शेअर केलाय. अभिजीत अय्यर मित्रा @iyervvl या स्वतःला संरक्षण तज्ञ म्हणवणाऱ्या एकाने तर त्याचं विश्लेषणही केलंय.

पण या वीडियोचा शोध अल्ट न्यूजच्या प्रतीक सिन्हा यांनी घेतला. प्रचंड वायरल झालेल्या या वीडियोच्या खरेपणाविषयी @XULQIMOON याने शंका व्यक्त केली होती. त्यात हा पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनाचा वीडियो असल्याचं सूचवलं होतं. तो धागा पकडून शोधल्यावर हा २०१६च्या सप्टेंबरमधेच यूट्यूबवर अपलोड केल्याचं सापडलं. मोहम्मद झोहाब यांनी १४ पाकिस्तानी हवाई दलाच्या कार्यक्रमाचा हा मूळ वीडियो अपलोड केलाय. त्याचा आताच्या हल्ल्याशी काहीही संबंध नाही.

एक्स्क्ल्युजिवच्या नादात न्यूज चॅनलही फसले

तिसरा वीडियो हा न्यूज चॅनल्सचा शोध आहे. तो सर्वात आधी इंग्रजी चॅनल इंडिया टीवीने दाखवला. त्यानंतर सीएनएन आयबीएन, आज तक, टाइम्स नाऊ, न्यूज १८ यांनीही एक्स्ल्युजिव आणि आपल्याकडेच पहिल्यांदा असल्याचं सांगत दिवसभऱ दाखवला. त्यावर तज्ञांना सोबत घेऊन दावे प्रतिदावेही केले. पण त्यात काहीच तथ्य नव्हतं.

अर्जुन सिद्धार्थ यांनी अल्ट न्यूजसाठी घेतलेल्या शोधात याचा मूळ वीडियो सप्टेंबर २०१७लाच यूट्यूबवर अपलोड झालाय. त्यातला ३४व्या सेकंदानंतरचा भाग घेऊन ही नवी क्लिप तयार केलीय. ती २४ आणि २५ फेब्रुवारीला फॅन्स ऑफ इम्रान खान या पेजवरून आधी शेअर झाली. त्यात चोलिस्तान भागातल्या हवाई दलाच्या कवायती म्हणून सांगितलं होतं.

मात्र २६ तारखेला सकाळीच एक पाकिस्तानी ट्विटरवाला अस्रलन सिद्दीकी याने शेअर केला. पाकिस्ताना असं प्रत्युत्तर देतंय, असा दावा तो करत होता. त्यानंतर एका पाकिस्तानी पत्रकाराने त्याची पोस्ट शेअर केली. त्यापाठोपाठ भारतीय न्यूज चॅनल्सनेही ते कोणतीही शहानिशा न करता खरं मानलं. आणि कोणताही संबंध नसलेला वीडियो आपण सगळेच हवाई हल्ल्याचं चित्रिकरण म्हणून पाहत बसलो.