हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे

१४ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत.

‘प्रेम कुणावरही करावं, 
कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीच्या सारांश 
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष 
आणि 
भविष्यातील त्याच्या अभ्युदयाची आशा, 
एकमेव!’

सध्याच्या प्रचंड द्वेषाने भरलेल्या आजूबाजूच्या वातावरणात काही व्यवस्था, काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक माणसांच्या मनात द्वेष पेरून मनं दुषित करण्याचा प्रयत्न करतायत. तिथं प्रेमाचा हा दिवस साजरा करणं म्हणजे कुसुमाग्रज म्हणतात तसं, ‘प्रेमच आहे आपल्या भविष्यातल्या अभ्युदयाची एकमेव आशा’ यावर विश्वास ठेवून अभ्युदायाच्या दिशेने उचलेलं एक पाऊल.

कारण सगळ्या द्वेषावर, माणसांतल्या संघर्षावर प्रेम हा एकच जालीम उपाय आहे हे आपल्याला माहीतीय. म्हणून या अशा अंधाराने गडद भरलेल्या पडद्यावर रंगीत प्रेम साजरं करणं हीच आपण सगळ्यांनी अंधाराशी केलेली बगावत आहे.

सगळं नकारात्मक आहे का?

या सगळ्या अंधारात एक सोनेरी आशा म्हणजे तरुण आणि तरुण पिढीचं सृजन. पण मग या सगळ्या कोलाहलात आजची तरुण पिढी प्रेमाबद्दल कसा विचार करते? आमच्या प्रेम करण्याच्या धारणा बदलल्या आहेत का? की गरजा आणि त्या पूर्ण करण्याच्या पद्धती बदलल्या? अजूनही आम्हाला प्रेम आमच्याही अभ्युदयाची एकमेव आशा वाटते का? हो नक्कीच वाटते!

सोशल मिडीयावर, तरुण मुलांच्या कट्ट्यांवर घडणाऱ्या गोष्टींमधून कदाचित आजची मुलं प्रेमाचं काहीतरी भयंकर विद्रुपीकारण करतायत असं वाटू शकतं किंबहुना अनेकांना वाटतंच! पण खरंच हे सगळं इतकं नकारात्मक आहे का? तर नाही! 

प्रेम आणि सेक्स वेगवेगळं

आताची तरुण मुलं प्रेम करतात, भरभरून करतात. जीव ओवाळून टाकावा इतकं प्रेम करतात पण आपण इतिहासाने आणि संस्कृतीने ठरवून दिलेल्या प्रेमाच्या मेन स्ट्रीम साच्यात ते बसत नाही. आयुष्यात प्रेम एकदाच होतं आणि एकच साथीदार हा आयुष्यभराचा साथीदार असतो या मोनोगामीकडून आमची पिढी आता प्रेमाच्या अनेक छटा अनुभवण्याकडे वळतेय.

प्रेम आयुष्यात अनेक वेळा, अनेक माणसांवर आणि अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी होऊ शकतं आणि तसं होणं हा कुठला गुन्हा नाही तर ते प्रेमाइतकंच नैसर्गिक आहे हे मान्य करून प्रेमाला साच्यात अडकवू पाहणं आम्ही सोडतोय. आम्ही मोनोगामीचं बोट सोडून पॉलिअॅमरी नात्यांच्याच्या वाटेवर जाण्यात गैर काय? असाही प्रश्न विचारतोय. 

प्रेम आणि शारीरिक संबंध या दोन अतिशय गुंतागुंतीच्या गोष्टींना पुन्हा एकत्र करून आणखी गुंता करत बसण्यापेक्षा तो सोपा करत आम्ही या दोन गोष्टी वेगळ्याही करू पाहतोय. प्रेम आणि सेक्स एकत्र असू शकतं. पण असावंच असा अट्टाहास आता आमच्या पिढीला नको वाटतोय.

हेही वाचा : प्रेमाच्या नावाखाली कागदी फुलांना पाणी घालणं सुरूय

प्रेमात त्यागही आहेच

या दोन्ही गरजांकडे वेगवेगळं पाहून त्या स्वतंत्र पूर्ण करण्यालाही आपण मुख्य प्रवाहात स्वीकारत नाहीत. आणि म्हणूनच आमच्या पिढीचं प्रेम हे फक्त शारीर आहे. ज्यात शारीर आकर्षणापलीकडे काही नाही अशी आवई बऱ्याचदा उठते.

पण शारीर नात्याला आम्ही जितकं महत्व देतो तितकीच महत्वाची मनामनांची नाती तयार करून ती जपण्यासाठीसुद्धा आम्ही हवं ते करतो. फक्त शारीर म्हणून किंवा ‘तू मुझे नही मिली फिर भी तेरी ख़ुशी में ही मेरी ख़ुशी है’ असं म्हणून त्यागाची भव्यदिव्य प्रतिमा उभं करणारं प्रेमसुद्धा आम्ही करत नाही. 

नातं सक्तीचं नाही तर निवडीचं

या दोन्ही काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही आमच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे पण उगाच अट्टाहास नाही, नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाही तर निवडीची आहेत.  

आणि मग याच नात्यांकडे बघण्याच्या प्रक्टिकल नजरेतून पुढे आलेली एक सिस्टीम म्हणजे फ्रेंड्स विथ बेनीफिटस. म्हणजे फायद्यासह मित्र! प्रेमाच्या नात्यात गुंतूनच सेक्स मिळू शकतो हे समीकरण जरा बाजूला ठेवून सेक्सकडे फक्त शारीरिक गरज म्हणून बघत मित्र किंवा मैत्रिणीच ही गरज का पूर्ण नाही करू शकत? 

ज्यात कुठल्या भावनिक नात्याची जबाबदारी नाही, ज्यात एकमेकांना कुणीच उत्तरदायी नाही, जे नातं बांधून ठेवत नाही. अतिशय परीपक्वतेने या दोन गरजांना वेगवेगळं ठेवणारं हे फ्रेंड्स विथ बेनिफिट्स किंवा वन नाईट स्टँड अशी काही मॉडेल आजकाल खूप प्रचलित आहे. 

हेही वाचा : क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा

ऑनलाईन डेटिंगची गरज

‘स्वर्गात साता जन्माच्या गाठी बांधल्या जातात’ वर विश्वास ठेऊन उगाच एखाद्या एखाद्या अवास्तव स्वर्गाच्या भरवशावर राहण्यापेक्षा आजची तरुण पिढी स्वतःचा स्वर्ग स्वतःच तयार करते. साता जन्माच्या असतात की नाही माहीत नाही पण जोड्या जुळवण्यासाठी ऑनलाईन डेटिंग अॅपचा सध्या बक्कळ पेव आहे.

टिंडर, हॅपन, हिंजे, बम्बल, ओकेक्युपिड या आणि अशा कित्येक आपापल्या आवडीनिवडी नुसार ऑनलाईन भेटण्याच्या जागा आम्ही सगळे वापरतो. मग हे सुरक्षित असतं का? फेक प्रोफाईल्सचं काय? अशा भीतीच्या निसरड्या जागा आहेतच. पण त्या जागा आपल्या प्रचलित विवाहसंस्थेत नाही असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. म्हणून आजच्या काळाचा पर्याय म्हणून ऑनलाईन डेटिंग ही फॅशन उरली नाही. तर गरजच झालीय.

प्रेमाची सर्वसमावेशकता

कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी फक्त विरुद्धलिंगी नात्यांना आणि प्रेमाला सामाजिक मान्यता देणाऱ्या आपल्या समाजात आताची तरुण मुलं या व्यवस्थेने ठरवून दिलेल्या साच्यात झापडं लावून बसलेली नाहीत. स्वतः चिकित्सक विचार करून स्वतःची लैंगिक ओळख आणि लैंगिक निवड यात प्रयोग करतायत. स्वतःला ओळखून मग त्यानुसार आपली नाती अशी स्वरचित प्रतिमा पुढे आणतायत. 

एलजीबीटीक्यू++ कुठेतरी परदेशात घडतं, ते आपल्या संस्कृतीचा भाग नाही या समाजाच्या भोवऱ्यातून बाहेर येऊन आता थोडं डोळे उघडून आपल्या आजूबाजूला काय सुरुय हे बघावं लागेल आणि स्वीकारावं लागेल, नाहीतर हे आंतरपिढीय अंतर असंच कोसो लांब वाढत जाणार, फाकत जाणार.

हेही वाचा : आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

समानतेचा भक्कम पाया

प्रेम म्हणजे त्याग आणि प्रेम म्हणजे स्वत्व विसरणं हे सुद्धा बॉलीवूड सिनेमांनी आपल्या डोक्यावर पक्कं बिंबवलंय. त्याग न करता प्रेम म्हणजे एक सृजनात्मक तडजोड का होऊ शकत नाही? त्याच त्याच टिपिकल प्रेमाच्या साच्यांमधे तीच पुरुषसत्ता खचून भरलेली असते. त्यामुळे त्यागाच्या नावाखाली गौरवलं गेलं असलं तरी शोषण होतं ते बाईचंच.

पण आता नवीन प्रेमाच्या व्याख्या यालाही आव्हान देत आहेत. समानता हा नात्याचा भक्कम पाया असेल हीच एक भक्कम अट नात्याच्या मुळाशी असते. त्याच ठरलेल्या जेंडर रोलमधे ओढून ताणून न बसता त्याला पाडून पुन्हा नव्याने रचण्याचे प्रयत्न अशा काही नात्यांमधे होतायत. ते अनेक अनेक आयामांनी पसरत गेले नाहीत तर प्रेमाला ऑक्सिजन मिळणार नाही. 

क्रांती घडवणारं प्रेम

रोमँटिक कथा कादंबऱ्यामधून, सिनेमांमधून दिसलेलं चंद्र ताऱ्यांच्या, हीर रांझाच्या पलीकडचंही प्रेम असू शकतं. प्रेम माणसात बदल घडवतं यावर कुठला प्रश्नच नाही. पण जर वाल्याचा वाल्मिकी घडवण्याची सक्ती प्रेमात असेल तर ते प्रेम मोठ्या पातळीवरच्या सामाजिक, राजकीय क्रांतीमधेसुद्धा रचनात्मक सहभाग घेऊ शकतं. प्रेम क्रांती घडवून आणू शकतं. हे सिद्ध केल्याची अनेक उदाहरणंही आपल्याकडे आहेत.

मग आताच्या पिढीचं प्रेम जे मुख्य प्रवाहातल्या अनेक प्रचलित सामाजिक मान्यतांना भेद देऊन नवीन वाटा तयार करू पाहतंय अशा प्रेमात नक्कीच क्रांती घडवण्याची ताकद आहे. जात, धर्म, वर्ग, लैंगिकता, लिंग अशा आणि आणखी अनेक साच्यांना प्रश्न विचारणारं प्रेम नवनिर्मितीची ताकद घेऊन येतं आणि त्या ताकदीवर आपण विश्वास ठेवायला हवा.

हेही वाचा : 

लव ऍट फर्स्ट साईट सिनेमातच बरं!

प्रेमाची नाती तोडतंय सोशल मीडिया

प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का

प्रेमातल्या समर्पणाची भावना नव्या पिढीनं जपायला हवी

(काजल नाशिक इथं राहत असून सध्या अभिव्यक्ती मीडिया या संस्थेत काम करते.)