तणसः विस्कटणारी गावं आणि एकाकी तरुणाईचा विलक्षण कोलाज

११ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


‘आगळ’, ‘धूळपावलं’ या कादंबरीमुळे आणि मराठी साहित्यातील साक्षेपी समीक्षेमुळे डॉ. महेंद्र कदम हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचं आहे. अलीकडे त्यांचा 'तू जाऊन तीन तपं झाली' हा कवितासंग्रहही आला. आणि अगदी दीडेक महिन्यांपूर्वी त्यांची समकालीन भवतालाला धाडसाने भिडणारी ‘तणस’ ही कादंबरी आलीय. या कादंबरीचा हा परिचय.

‘तणस’ ही कादंबरी दोन बैठकीत मी संपवली. या कादंबरीवर लगेच काय प्रतिक्रिया द्यावी, यासाठी शब्द  सुचत नव्हते. कादंबरीचा प्रभाव अजूनही मनावर  साचून राहिलाय. तणसमधल्या दिनकर देसाईसारखं अनेक तरुण काळाच्या धक्क्याने संभ्रमित झालेले आसपास दिसतात. आपला परिचयच मिटवू पाहणारा हा  जटील काळ कादंबरीचा विषय  होतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. साहित्य जगतात या कादंबरीने जाणकार वाचकांचं लक्ष वेधलंय. या कादंबरीमधून डॉ. कदम अस्वस्थ वर्तमानाची चिरफाड करत वाचकांना तळमळीनं नवं काही सांगू पाहतात.

कदमांनी अतिशय मेहनतीने भूतकाळ आणि वर्तमानाच्या गोफामधून अभावग्रस्त मानवी जगण्यातून निर्माण झालेल्या संभ्रमाला अधोरेखित केलंय. जातीपातीत, राजकारणात भंगणाऱ्या गावाने गावपण हरवत शहराला शरण जाणं, जागतिकीकरणानंतर मूल्यं, निष्ठा यांचा बळी देऊन  प्रतिष्ठा, भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या संवेदनशील तरुणांचं आतून पोकळ होत जाणं हे कथानक लेखकाने वेगवेगळ्या पात्रांच्या घडणीतून  मोठ्या कौशल्याने अधोरेखित केलंय. त्यामुळेच तणसमधल्या तरुणांची  हतबलता टोकदारपणे मनाला भिडते.

खरं तर कादंबरीत बदलता गतिमान काळच खरा हिरो आहे. दिनू, मनोज, उर्मिला, अमर, उत्तमराव या व्यक्तिरेखा काळाच्या  तालावर वावरतात. तरीही या वर्तमानात जगण्यात झालेला किचकिच गुंता सोडवायचा तो प्रयत्न करतोय. त्यासाठी समोरच्या जटिल वर्तमानाला स्वत: भिडावं लागतं, असा स्वर तणसमधे उमटताना जाणवतो.

तणसमधील शेवंताबा़ईच्या आईचं पात्र वाचताना उद्धव शेळके यांच्या ‘धग’मधल्या कौतिकची आठवण आली. दिनूच्या आईचं, बप्पाच्या सुनेचं, दिनूची बायको उर्मिलाचं सोसणंही कादंबरीत असंच ठळकपणे आलंय. शेवंताच्या आईबरोबरच कादंबरीत आलेली उर्मिला, बप्पाची सून या व्यक्तिरेखा कायमच लक्षात राहतील.

बप्पांची सून आपल्या सासऱ्याला दिलेला शब्द म्हणून नवऱ्याचा मार सहन करते. 'नवराय म्हणून मार खाते. हातच लावून दाखवा तुमी आता अंगाला,' असं म्हणत प्रसंगी संघर्ष करीत त्याच घरात राहाते. घर सांभाळते. बप्पा नावाची भन्नाट व्यक्तिरेखा  सामाजिक एकोपा राखणारी म्हणून कादंबरीत येते. पण अशी माणसं आता दुर्मिळ होत चाललीत.

उर्मिला नवऱ्यावर अंतर्बाह्य प्रेम करते. असं असूनही शेवटी ती घराबाहेर पडावी, हे पचायला जडच जातं. लेखकाने स्त्री व्यक्तिरेखा संघर्षशील दाखवल्यात. त्या मानानं दिनू, मनोज संघर्षाला भिडत नाहीत. विशेषत: उतरार्धात. कदाचित स्त्रीमधे संघर्षाला भिडण्याची नैसर्गिक शक्ती असते, हे लेखकाला सुचवायचं असेल.

मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पंतानं केवळ दिनूबरोबर विवाह केला म्हणून पोटच्या मुलीला वैऱ्यासारखं का वागवावं? आपल्या आजूबाजूला अशा घटनांनंतर काही काळ गेल्यावर आईवडील मुलांच्या चुका पोटातच घालतात. पण हा पंत लेखक बारकाव्यांनी रेखाटतो. अधिक हव्यासात मन:शांती हरवलेला पंत आपल्याला समाजात कुठंही दिसू शकतो.

हेही वाचाः पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?

दिनू देसाईच्या जगण्याला तर लेखकाने आरपार रंगवलंय. तो आपल्याला शरीर आणि अंतरंगातून तपासता येईल. मनोविश्लेषणात्मक अंगानंही एखादा समीक्षक त्याची चिकित्सा करु शकतो. दिनू टेकडीवर गेला की, आत्मचिंतनात डुंबतो. निसर्गाशी एकरुप होण्याचा प्रयत्न करतो.

एकदा तो स्वत:ला खोलीत कोंडून  घेतो. या प्रसंगात तो रुममधील धुळीत उमटलेली स्वत:ची पावलं पुसतो. हा प्रसंग वाचकाला आतून हलवून सोडतो. सुन्न करतो. उर्मिलासाठी, स्वत:ला शोधण्यासाठी त्याचं भ्रमभासापर्यंत जाणं कादंबरीत येतं. शेतीशी संपर्क तुटल्यानं हे असं जगणं वाट्याला आलं असेल का, हा दिनूला पडलेला प्रश्न  वाचकाला अस्वस्थ केल्याशिवाय राहात नाही.

उत्तमराव, अमर ही महत्वाकांक्षी बापलेकाची जोडी कादंबरीत पतसंस्था, शैक्षणिक संस्थांमधे घडणाऱ्या कावेबाज अर्थराजकारणाचा चेहरामोहरा उजागर करते. विशेषतः कादंबरीत आलेलं पतसंस्थांचं जग अचंबित करणारं आहे. या संस्थांच्या व्याजबट्ट्याच्या सुडचक्रात दिनूसारखे असंख्य तरुण बळी पडतात. अमर, दिनू यांच्यातल्या शीतसंघर्षाचेही बरेच अँगल आलेत. ते  नव्या वर्तमानाच्या अनदेख्या बाजू उजेडात आणतात. अमरसारखी बापाच्या जीवावर मोठं होणारी मुलं अनेकांचे संसार मोडायला कारणीभूत ठरतात.

कादंबरीत दलित समाजातल्या मनोजचं पात्र आहे. त्याच्या जीवनात घडलेल्या काही घटनांतून समाजातल्या जातवास्तवाचं चित्रण महेंद्र कदम यांनी धीटपणे कादंबरीत आणलंय. आपल्या समाजात जातपात ही मनामनात भिंती उभ्या करते, हे वास्तव आडपडदा न घालता तणसमधे येतं. हे मुळातून वाचण्यासारखं आहे.

प्रवासी जीपांमधून अवैध वाहतूक करणाऱ्यांची दुनिया गावोगावी दिसते. ही पोरं वाहनतळावर जीपा नंबरला लावून जीव मुठीत घेऊन गाड्या चालवतात. प्रवाशाची देवासारखी वाट बघतात. पोलिस, आरटीओ, अपघात याचा सामना करणारी ही दुनिया तणसमधे सविस्तर येते. या दुनियेतल्या भग्न कहाण्या पहिल्यांदाच तणसच्या माध्यमातून मराठी वाचकांसमोर आल्या असतील. कादंबरीत ही दुनिया फारच दमदारपणे आलीय.

कादंबरीची मांडणी लक्षवेधी आहे. लेखकाने अनेक प्रश्नांनी वेढलेलं नवं जग वाचकासमोर आणलंय. हे निश्चितच मराठी साहित्यासाठी मोलाचं आहे. वेगवान घटनांची गतिमान साखळी तणसमधे येते. प्रभावी निवेदन ही कादंबरीची ताकद असते. आणि तणसचं निवेदन अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. तणस वाचनीय आहे. अर्थवाही आहे. या निवेदनात अनेक प्रयोग लेखक करतो.,ते छानच.

काहीवेळा फॉन्ट बदललाय. या फॉटमधील मजकूराचे अनेक तरंग वाचकाच्या मनात उलगडत जातात. फॉन्टमधील निवेदनात गूढरम्यता आहे, चिंतन आहे. हे चिंतन लक्षणीय आहे.

कादंबरीत संवाद कमीच आहेत. गरजेपुरते आलेत. त्यात लेखकांने वाढ केली असती आणि निवेदनातील पाच दहा पानं कमी केली असती तर मूळ परिणामकारकता अधिक वाढली असती का, असं वाटतं. परंतु लेखक कादंबरीच्या संरचनेत, मांडणीत अनेक क्लृप्त्या वापरायला स्वतंत्र असतो. त्याबाबत आपण बोलू नये. लेखक समीक्षक असले तरी लेखकाची स्वतंत्र मुद्रा तणसवर आहेच! पण काही प्रसंगात समीक्षक वरचढ ठरतो.

गाव शहरातील वाहनतळ, पतसंस्थामधील जग तणसमधे व्यापक, सूक्ष्मपणे आलंय. त्याचं कौतुक वाटतं. इथे पोटामागे वावरणाऱ्या दिनू, मनोजसारख्या तरुणांचं हादरवून टाकणारं मनोविश्व चिंतनासोबत मनाचा वेध घेतं. कादंबरी वाचताना वाचक बेचैन होतो. विस्कटत चाललेलं गाव  आणि विस्तारत चाललेल्या परंतु एकाकी शहरांचा हा विलक्षण कोलाज वाचकाच्या मनाला भावणारा आहे. हा कोलाज अतिशय वेगळा ठरणार यात शंका नाही.

कादंबरीचं नाव: तणस 
लेखक: महेंद्र कदम
किंमतः ३०० रुपये | पानंः २२८
प्रकाशकः लोकवाङ्मय गृह
पाठराखण: डॉ. राजेंद्र दास
मुखपृष्ठ: सतीश भावसार

हेही वाचाः 

तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

गेल्या आठ दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?

चर्चा तर होणारचः गुप्तेंच्या भयकथांमागचं उचलेगिरीचं गूढ

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?

(लेखक हे कादंबरीकार आहेत. तसंच लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजानी इथे मास्टर दीनानाथ मंगेशकर कॉलेजमधे चित्रकलेचे शिक्षक आहेत. surendrapatil121@gmail.com)