झाशीची राणी आता हॉलिवूडही गाजवणार

२८ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


राणी लक्ष्मीबाई यांच्यावर सॉर्ड अँड सेप्टर नावाचा सिनेमा येतोय. खूपसाऱ्या हिरोईन्सना वाटतं की आपण झाशीच्या राणीचा रोल करावा. देविका भिसे या हिरोईनला ही संधी मिळालीय. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, असं स्वतः देविकाने आपल्या फेसबुकवरून जाहीर केलंय.

प्रत्येक महिलेलाच नाही तर पुरुषालाही प्रेरणा देणारी महिला कोण, असं विचारल्यावर आपल्या मनात काही नावं येतील. आणि त्यात एक नाव असेल ते म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्यांचा इतिहास वाचताना, ऐकताना, पडद्यावर बघताना राणीतला जोश आपल्यातही येतो. आणि आपण कधी त्या लढ्यात सामील होतो कळतही नाही. आता झाशीची राणी पुन्हा एकदा सिनेमातून आपल्या भेटीला येतेय. पण आतापर्यंत बॉलिवू़डमधून भेटणारी लक्ष्मीबाई यावेळी आपल्याला हॉलिवूडमधे भेटणार आहे.

१९५३ मधे आला पहिला सिनेमा

मणिकर्णिका अर्थात लक्ष्मीबाई. भारतातले भलेभले राजे महाराजे इंग्रजांच्या विरोधात उभं राहावं की नाही असा विचार करत होते. तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी सगळ्यांना एकत्र करत १८५७चा लढा लढला. हा लढा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल, पहिला स्वातंत्र्यलढा असा या सगळ्या संघर्षाचं वर्णन इतिहास नोंद झालंय.

झाशीच्या राणीचा इतिहास म्हणजे तिचं बालपण, लग्न, तिच्यातला आक्रमकपणा, लढाऊवृत्ती, इंग्रजांविरुद्ध पुकारलेला बंड इत्यादी गोष्टी आपल्याला खूप आकर्षित करतात. म्हणूनच आजवर या राणीवर बऱ्याच कलाकृती बनल्या. १९५३ला झोहराब मोदी यांनी झाँसी की रानी हा सिनेमा बनवला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी जानेवारी २०१९ला मणिकर्णिका सिनेमा आला. या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. पण लोकांनी थिएटरमधे राणीचा जयघोषही केला.

हेही वाचा: नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार

झाशीच्या राणीवर २५ पुस्तकं

आपण सहज झाशीच्या राणीवरची पुस्तकं गुगलवर सर्च केली. तर आपल्याला इंग्रजी, मराठीतली कमीत कमी २५ तरी नावाजलेली पुस्तकं सापडतात. ही पुस्तकं अॅमेझॉन, गुगल बुक्स, गुडरीड आणि बुकगंगावरही उपलब्ध आहेत. गंमत म्हणजे या भारतीय राणीवर अनेक परदेशी लेखकांनीसुद्धा लिहिलंय. या पुस्तकांमधे फक्त तिची कहाणी नाही, तर सामाजिक, राजकीय आणि महिला या अंगाने लिहिलं गेलंय.

या राणीवर सिनेमा आणि पुस्तकच नाही तर टीवी सिरियलसुद्धा बनल्यात. सध्या कलर्स चॅनलवर एक सिरियल सुरू आहे. झाँसी की रानी असं या सिरियलचं नाव आहे. याआधी २००९ ते २०१३ या काळात झी टीवीवर झाशीच्या राणीवर सिरियल येऊन गेली. ही सिरियल प्रचंड गाजली. अजूनही अनेकदा ही सिरियल रिटेलिकास्ट केली जाते.

सिनेमाचे अपडेट्स फेसबुकवर

आपल्या ग्रेट राणीवर हॉलिवूड चित्रपट बनलाय. सॉर्ड अँड सेप्टर असं या सिनेमाचं नाव आहे. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे यात काही शंकाच नाही. भारतीय वंशाची हॉलिवूड अभिनेत्री देविका भिसे काम करतेय. या सिनेमाची डायरेक्टर, प्रोड्युसर आणि रायटर स्वाती भिसे आहेत. सिनेमाच्या लिखाणात देविकानेही सहकार्य केलंय. स्वाती भिसे या भरतनाट्यम डान्सर, कोरिओग्राफर आणि प्रोड्युसर आहेत.

हा सिनेमा येत्या वर्षभरात रिलिज होईल, असं देविकाने तिच्या फेसबुक पोस्टवरून सांगितलंय. तसंच सिनेमाच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरही सांगण्यात आलंय. सध्या वेगवेगळ्या देशांमधे रिलिजिंगचे हक्क मिळवण्याचं कामही सुरू आहे. या सगळ्यांबद्दल फेसबुकवर सातत्याने अपडेट्स दिले जाताहेत.

हेही वाचा: सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!

हॉलिवूडमधे भारतीय कलाकार

देविकाने इन्स्टाग्राम आणि फेसबुक स्टोरीत लढाईच्या प्रशिक्षणाचे विडियो टाकलेत. ते विडियो बघितल्यावर सिनेमा बघायला काय मज्जा येईल, असं सहज वाटतं. देविकाने टीवी सिरियल, नाटक असं बरंच काही केलंय. तिने ‘द अॅक्सिडेंटल हसबंड’, ‘द मॅन ही न्यू इनफिनिटी’, ‘मोजेक’ आणि ‘द रेस्ट ऑफ अस’ इत्यादी सिनेमांमधे काम केलंय.

राणीवरच्या सिनेमात आपले भारतीय कलाकारही दिसणार आहेत. अजिंक्य देव यांनी तात्या टोपे यांची भूमिका केलीय. मिलिंद गुणाजी यांनी गंगाधर राव यांची भूमिका साकारलीय. मोरोपंत म्हणजे राणीच्या वडलांच्या भूमिकेत यतीन कारेकर आपल्याला दिसतील. गुलाम गौस खान यांची भूमिका आरिफ झकारीया यांनी केली. असे सगळे भारतीय कलाकार हॉलिवूड गाजवण्याच्या तयारीत आहेत.

सिनेमात काय बघायला मिळेल?

२०१८मधे सॉर्ड अँड सेप्टर या सिनेमाच्या संपूर्ण टीमने मुंबईत सिनेमाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. खरंतर हा सिनेमा मणिकर्णिकाच्या आधी रिलिज होईल, अशा बातम्या आल्या होत्या. पण नंतरच्या काळात या सिनेमाची चर्चाच थांबली. आता देविका भिसेने हा सिनेमा लवकरच येत असल्याचं फेसबुकवरुन जाहीर केलंय. त्यामुळे हा सिनेमा नव्याने चर्चेत आलाय.

२०१८च्या मुंबईतल्या पत्रकार परिषदेत स्वाती भिसे यांनी मीडियाला मुलाखती दिल्या. त्यात त्या म्हणाल्या, यात परदेशी कंपन्या स्वत:च्या फायद्यासाठी कसं वागतात, कॉरपोरेशनमधे कसं फसवतात हे दाखवण्यात आलंय. तसंच एक २४ वर्षांची मुलगी वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत या सत्तेचा कसा सामना करते. आणि आपण म्हणतो की झाशीच्या राणीने काय दिलं, खूप लढी मर्दानीच्या पुढे काय. पुढे असं की ईस्ट इंडिया कंपनी बंद पडली. म्हणजे नेमकं काय ते सिनेमातून कळेल.

हेही वाचा: 

राज ठाकरेंच्या ईडी नोटीसमागे घोटाळा आहे की राजकारण?

अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट

सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?