बुद्धांच्या मार्गाने जाणारे विवेकानंद आपल्याला माहीत आहेत का?

१२ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ३ मिनिटं


आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक.

आज स्वामी विवेकानंदांची जयंती. १२ जानेवारी १८६३ रोजी त्यांचा जन्म झाला आणि ४ जुलै १९०२ या दिवशी ते निधन पावले. त्यांना फक्त ३९ वर्षांचे आयुष्य लाभलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनावर प्रकाशित करण्यात आलेले ग्रंथ, त्यांच्याविषयी दिलेली भाषणं, व्याख्यानं इत्यादी माध्यमातून स्वामी विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित, वेदांचा पुरस्कर्ता, वेदान्ताचा भाष्यकार अशा विविध स्वरूपात सादर करण्यात आलं आणि तेच लोकांना खरं वाटत आलं. प्रत्यक्षात मात्र त्यांचं जीवन आणि कार्य खूपच वेगळं होतं.

त्यांचं खरं जीवनकार्य झाकून ठेवण्यात भारतातल्या प्रस्थापित धर्ममार्तंड आजपर्यंत यशस्वी झालेत. हिंदू धर्माचे अभिमानी लोक त्यांच्याबद्दल काहीही सांगतात. असं असलं तरी खरी गोष्ट ही आहे की, विवेकानंदांचं सबंध आयुष्य बुद्धमय झालं होतं. याची साक्ष त्यांनी लिहिलेले लेख आणि केलेली भाषणं देतात. त्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या नोंदी इथं देत आहे.

विवेकानंद म्हणतात –

‘भगवान बुद्ध माझं इष्टदैवत आहेत. माझे परमेश्वर आहेत. त्यांनी ईश्वरवादाचा उपदेश केला नाही. ते स्वत:च ईश्वर होते,’ असं विवेकानंद म्हणतात. आता इथं ईश्वर, परमेश्वर या शब्दांचा च्छल करण्याऐवजी विवेकानंदांच्या मनात बुद्धांचं स्थान किती अत्युच्च होतं, एवढंच लक्षात घ्यावं.

लोकांच्या दुःखासाठी केला सत्यशोध

बुद्धांच्या चरित्रात एक विशेष आकर्षणशक्ती आहे. मला त्यांचं चरित्र नेहमीच आवडत आलंय. अन्य कोणाच्याही चारित्र्यापेक्षा त्यांच्या चारित्र्याविषयी मला अधिक आदर आहे. त्यांचं ते धैर्य, त्यांचा तो निर्भयपणा आणि त्यांचं ते अमर्याद प्रेम! ते मानवाच्या कल्याणासाठी जन्मले होते. इतर लोक स्वत:साठी ईश्वराचा किंवा सत्याचा शोध करतील. पण त्यांनी मात्र लोक दु:खात आहेत, म्हणून सत्याचा शोध घेतला. लोकांना कसं सहाय्य करावं हीच काय ती त्यांना चिंता होती.

उपदेशसूर्याचा कवडसा

बुद्धदेवांनी देवदेवतांची पर्वा केली नाही. या पुरुषोत्तमाने मनुष्यजातीपक्षी सर्वोच्च ठरतील अशा ऊर्जस्वल आदर्शांचा प्रसार केला. जिथं जिथं म्हणून नीतिनियम आढळून येतील तिथं तिथं त्या महामानवाचा-बुद्धदेवांचा प्रभाव कार्य करत आहे. त्यांच्याच उपदेशसूर्याचा एक कवडसा चकाकत आहे, असे समजा. 

स्वतःच स्वतःची मदत करा

जगातल्या सर्व आचार्यांमधे बुद्धदेव हे एकटेच असे आहेत, की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर सर्व महापुरुषांनी आपणच ईश्वरावतार आहोत अशी घोषणा केली. आणि ते असेही सांगून गेले आहेत, की त्यांच्यावर जो विश्वास ठेवील तो स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्धदेवांकडे बघा. ते नेहमी म्हणत असत - कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी सहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ची मदत करा. स्वत:च्याच प्रयत्नांनी मुक्तिलाभाची कास धरा. 

हेही वाचा : विवेकानंदांच्या निधनाची बातमी छापून आली नव्हती

दुःख निवारणाचा मार्ग

आपल्या जीवनात दु:ख का आहे? कारण आपण स्वार्थी आहोत. आम्हाला स्वत:साठी निरनिराळ्या गोष्टींची इच्छा असते. म्हणूनच जीवनात दु:ख निर्माण होते. यातून सुटकेचा मार्ग कोणता? स्वार्थत्याग हा तो मार्ग आहे. ‘स्व’ हा अस्तित्त्वात नाही. हे दृश्यमान जग आणि आपण जे अनुभवतो, त्याचेच काय ते अस्तित्त्व आहे. जन्म आणि मृत्यू यांच्या फेर्यां च्या पार्श्वभागी आत्मा म्हणून काहीही नाही.

विचारांचा एक प्रवाह असतो. एक विचार क्रमाने दुसर्या. विचाराच्या मागोमाग येतो. प्रत्येक विचार अस्तित्त्वात येतो आणि दुसर्या च क्षणी त्याचं अस्तित्त्व नष्ट होतं, एवढंच. विचार करणारा आत्मा म्हणून कुणी नाही. शरीर हे सतत बदलत असते. तसेच मन किंवा जाणीवही बदलत असते.

म्हणून ‘स्व’ हा एक आभास आहे. या आभासमय ‘स्व’ ला धरून ठेवल्याने सर्व स्वार्थीपणा उत्पन्न होतो. ‘स्व’ म्हणून काही नाही, हे सत्य स्वीकारलं, जाणलं तर आपण सुखी होऊ आणि इतरांना सुखी करू. बुद्धांनी जे शिकविलं ते हेच.

नास्तिक माणसाचा देव

बुद्धदेवांच्या जीवनाचे अनुशीलन केल्यास हे स्पष्टपणे प्रतीत होतं की, एखाद्याचा ईश्वरावर मुळीच विश्वास नसला, कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाकडे त्याचा ओढा नसला, त्याने कोणत्याही संप्रदायाची कास धरलेली नसली किंवा तो कोणत्याही मंदिरात देवदर्शनार्थ जात नसला, फार काय पण तो जरी बाह्यत: नास्तिक वा जडवादी वाटत असला, तरीही तो ती चरम अवस्था प्राप्त करून घेण्यास समर्थ होऊ शकेल यात काहीच संदेह नाही. त्यांच्या अपूर्व हृदयाचा एक लक्षांशही मला लाभला असता, तर मी स्वत:ला धन्य मानले असते.

बुद्धांमुळे झाला विकास

बुद्धदेवाच्या हृदयाची श्रीमंती पहा. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे तर आहेच, पण एखाद्या सामान्य बकर्याहचा जीव वाचवण्यासाठीही आपले प्राण पणाला लावायची त्यांची तयारी असायची. अशी उदारता हवी. अशी दया हवी.

त्यामुळे जिवांचं केवढं कल्याण झालं ते ध्यानात घ्या. किती आश्रम बांधण्यात आले. किती शाळा-विद्यालये स्थापन करण्यात आली. किती सार्वजनिक दवाखाने, पशुशाळा अस्तित्त्वात आल्या. स्थापत्य, शिल्पादी विद्यांचा केवढा विकास झाला.

बुद्धदेवांच्या पूर्वी होते तरी काय या देशात? भुर्जपत्रावर लिहून ठेवलेली काही धर्मतत्त्वं आणि ती सारी फक्त निवडक मूठभर लोकांनाच काय ती माहीत असलेली! एका अर्थी तेच तर खर्यार वेदान्ताची स्फुरणमूर्ती होते!

हेही वाचा :  वाचा स्वामी विवेकानंदांचं जग जिंकणारं भाषण

कलेची गौरवस्मारके

पृथ्वीवरील सार्याद प्रमुख देशातील कलासौंदर्य पाहून मी आलो आहे, पण बौद्धकाळात भारत देशात कलेचा जसा विकास झाला तसा अन्यत्र कुठेही आढळून येत नाही. मोगल बादशहांच्या राजवटीतही कलेचा खूप विकास झाल्याचे दिसते. त्यांच्या कलेची गौरवस्मारके म्हणून आजही ताजमहाल, जुम्मा मशीद वगैरे कलाकृती विद्यमान आहेत.

खऱ्या ज्ञानाची पहिली लाट

मनुष्य ईश्वरावर प्रेम करत होता आणि आपल्या बांधवांना - माणसांना - विसरून गेला होता. जो मनुष्य ईश्वराच्या नावावर आपले प्राणही देऊ शकतो, तो ईश्वराच्याच नावावर आपल्या मानव बांधवाला ठारही मारू शकतो, अशी जगाची परिस्थिती होती.

लोक ईश्वराच्या गौरवासाठी त्याच्या पुत्राचा - मानवाचा बळी देतात, इतरांना लुटतात, हजारो प्राण्यांचा वध करतात, भूमी रक्ताने भिजवतात. हे सारे ते ईश्वराच्या गौरवासाठी करत असतात! बुद्धाच्या वेळी प्रथमच ते दुसर्याश ईश्वराकडे - मानवाकडे - वळले! प्रेम हे मनुष्यावर केले पाहिजे. सर्व मानवाविषयीची उत्कट प्रेमाची ही पहिली लाट होती! खर्यास ज्ञानाची ही पहिली लाट होती!

हिंदू नव्हे, विपर्यास केलेला बौद्ध धर्म

माझी अगदी पूर्ण खात्री झालेली आहे की, लोक ज्याला आजचा हिंदू धर्म म्हणतात तो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विपर्यास केला गेलेला बौद्ध धर्मच आहे. हिंदूंना हे स्पष्टपणे समजलं पाहिजे. तसं झालं म्हणजे फारशी खळखळ न करता तो टाकून देणं त्यांना सोपं जाईल. बुद्धांनी उपदेशिलेला पूर्वीचा जो बौद्ध धर्म होता त्याच्याबद्दल आणि स्वत: बुद्धाबद्दल मला अत्याधिक आदर आहे. 

हेही वाचा : विवेकानंदांचा सव्वाशे वर्षांपूर्वीचा तो ‘अनप्लॅन्ड’ प्रवास

संघर्षात बौद्धाचे बीज

राजांनी उपनिषदे शोधून काढली वा रचली तरी ती पुरोहितांच्या हातात होती. मात्र उपनिषदांचे असे फारच थोडे राज्य होते. त्यातून राजे आणि पुरोहित यांचा संघर्ष अटळ होता. या संघर्षात बौद्ध धर्माचे बीज आहे.

बौद्ध धर्माने सगळ्या जाती, सगळे पंथ निकालात काढले. त्याने राजा आणि पुरोहित यांनी निर्माण केलेल्या जनतेच्या शृंखला तोडून टाकल्या. अशा प्रकारे भारतात महान धार्मिक कल्पना अस्तित्त्वात आली. परंतु अद्यापि तिचा प्रचार आणि प्रसार व्हायचा आहे. हा प्रसार झाल्याशिवाय काहीही हित व्हायचे नाही.

आधुनिक काळाचा जनक

बौद्धांचे मत आधुनिक काळातील कित्येक विचारसंप्रदायांनी आणि पंथियांनी दत्तक घेतले आहे आणि सगळेजण ते आपणच स्वत: शोधून काढलेले अगदी नवीन मत होय असा दावा करीत असतात. 

जगातले सगळ्यात मोठे धार्मिक आंदोलन

बौद्ध धर्म हा ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा धर्म आहे. कारण जगाने पाहिलेले ते सर्वात मोठे धार्मिक आंदोलन होते. मानवी समाजावर आदळलेली प्रचंड अशी ती आध्यात्मिक लाट होती. अशी एकही सभ्यता म्हणजेच संस्कृती नाही, की जिला या ना त्या प्रकारे या लाटेचा परिणाम जाणवला नाही.

पाश्चिमात्यांसाठी संदेश

I have a message to the West, as Buddha had a message to the East. बुद्धाने जो संदेश पौर्वात्य देशात दिला तोच संदेश पाश्चिमात्य देशांना देण्यासाठी मी इथे अमेरिकेत आलो आहे.

हेही वाचा : 

ज्ञानाचे संपादक संत सोपानदेव

तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

ट्रम्प समर्थकांचा निषेध करणाऱ्या मोदींचे भक्त आपला पराभव स्वीकारतील?

भंडाऱ्याच्या आगीत होरपळलेल्या कोवळ्या जीवांचे सोयर-सुतक नक्की कोणाला?

(संदीप सारंग हरिती प्रकाशनाच्या ‘कोण होते स्वामी विवेकानंद?’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक आहेत.)