आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. या सदाबहार चित्रपटाविषयी डॉ. सचिन लांडगे यांनी लिहिलेला वॉट्सअपवर फिरणारा हा रिव्यू इथं देत आहोत.
सिनेमात रेल्वेमधला एक सिन आहे. तो आतापर्यंतच्या अनेक काळजाला भिडणाऱ्या दृश्यांपैकी एक आहे. हा सिनेमा पाहताना या सिनच्या वेळी टचकन डोळ्यात पाणी येतंच येतं. कितीही वेळा सिनेमा पाहिला असेल तरीही!
जमिनीचे पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्याला भेटून त्याच्याकडे एक दिवस राहून परत येतानाची मोहनची पडद्यावरची स्तब्धता आपल्याला भिडते, आपल्यातही उतरते आणि पडदा व्यापून उरते, आपल्याला अंर्तमुख करून जाते.
मोहन भार्गव. खूप वर्षांपूर्वीच त्याने देश सोडलाय. अमेरिकेत स्थायिक होऊन तो खुश आहे. फक्त लहानपणीची आठवण म्हणून आपल्याला आजीचं प्रेम दिलेल्या कावेरी अम्माला सोबत नेण्यासाठी तो पुन्हा भारतात येतो. तो कारव्हॅन मधेच राहत असतो. फक्त फिल्टरचं पाणीच पीत असतो. अशा मोहन भार्गवला जसजसा भारत त्याला कळू लागतो तसतसा तो बदलत जातो.
जमिनीचे पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्यालाच जवळचे पैसे देऊन येतो. स्वतःजवळ फिल्टर वॉटर असताना देखील रेल्वेस्टेशन वरच्या त्या गरीब मुलाला मदत करण्याच्या हेतूने त्याच्याकडचं कुल्हडमधलं पाणी पितो. आजीला आणि गीताला मदत करण्याच्या वाटेत त्याला इथल्या खऱ्या समस्या कळू लागतात. एका समस्येतून दुसऱ्यात, दुसरीतून तिसऱ्यात असा तो गुंतत जातो.
संपूर्ण सिनेमात तो कुठंही आक्रस्ताळेपणा करत नाही. कुठंही अवजड संवाद बोलत नाही. कुठंही घसा ताणून भाषणबाजी करत नाही. त्याला जे त्याला उमगलंय ते स्पष्ट शब्दांत पण विनयशीलतेनं समोरच्यांना सांगायची हिम्मत दाखवतो. तो कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचार करत नाही. शाहरुखकडून असा अभिनय करून घेण्याचं काम आशुतोष गोवारीकरनं अप्रतिम केलंय, त्याबद्दल त्याला हॅट्स ऑफ!
हेही वाचा : जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा
रिलीजच्या दिवशीच मी हा सिनेमा पाहिला होता. सिनेमा आवडू लागतो, तसतशी त्याच्या शेवटाबद्दल काळजी वाटू लागते. अतिरंजित किंवा अवास्तववादी शेवट करून एवढ्या चांगल्या सिनेमाचं मातेरं करू नये असं तीव्रतेनं वाटू लागतं. शेवटी, नासा सोडून आलेला नायक खेड्यात शिक्षक झालेला किंवा सरपंच झालेला दाखविण्यापेक्षा त्याला ईस्रो जॉईन केलेलं दाखवून आशुतोषनं खरा सिक्सर मारला.
मी पोस्टग्रॅज्युएशन झाल्यावर बाबा आमटेंना भेटायला आनंदवनला गेलो होतो. विकास आमटेंना म्हटलं, 'मी अनॅस्थेटिस्ट आहे आणि मला इथं वर्षभरतरी राहून सेवा द्यायचिये' ते म्हणाले, 'इथं फुलटाईम भूलतज्ञाची गरज नाही. जेव्हा ऑपरेशन्स असतात तेंव्हा नागपूरवरून भुलतज्ञ येतात. आणि दुसरी गोष्ट, तू भुलतज्ञ असताना तुझ्याकडून कुष्ठरोगाचे किंवा थंडीतापाचे पेशंट तपासून घेणं हे तुझ्या योग्यतेचं अवमूल्यन केल्यासारखं होईल. त्यापेक्षा तू अशा ठिकाणी जा, जिथं तुझी गरज आहे. आणि तिथं अडल्यानडल्यांना सेवा दे. ती पण समाजसेवाच आहे, त्यासाठी तू इथंच राहावं असं काही नाही." मी अंतर्मुख झालो.
समाजसेवा किंवा देशसेवा म्हणजे तरी काय असतं? आपण आपलं काम आपल्यातलं बेस्ट देऊन नेटानं करत राहणं, हीच खरी देशसेवा असते. त्यासाठी तुम्ही उच्चशिक्षण घेतलेलं असलं तरी तुम्ही झाडू हातात घेऊन गल्ल्या झाडल्या पाहिजेत असं नाही, किंवा चार गरिब मुलं गोळा करून शिकवलं तरंच तुमची कळकळ खरी आहे अन्यथा नाही, असं नव्हे.
ज्या कामात, ज्या गोष्टीत तुम्ही निपुण आहात ते काम कळकळीने आणि प्रामाणिकपणे करत राहणे ही एक देशसेवाच आहे.. आणि 'इतिहासातल्या फुशारक्या मारत जगण्यापेक्षा कसलाही भेदभाव न करता आपल्या सगळ्या देशबांधवांप्रती प्रेम किंवा किमान सौजन्य बाळगणं' हेच देशप्रेम आहे. त्यासाठी दरवर्षी बेगडी रावण जाळण्यापेक्षा 'मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं' इतका नितांतसुंदर संदेश हा सिनेमा देतो.
हेही वाचा : भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या
‘केवळ तुम्ही तिथे जन्मलात म्हणून तुमचा देश इतर सगळ्या देशांपेक्षा जास्त श्रेष्ट आहे याची तुम्हाला खात्री असणं म्हणजेच देशभक्ती,’ हे जॉर्ज बर्नोड शॉचं वाक्य आहे. त्याचं अमूर्त रूप सिनेमाच्या पडद्यावर सतत अदृश्यपणे वावरताना दिसतं.
गरिबी, अशिक्षितता, उच्चनीचता, जातीयवाद आणि अडमुठेपणा याचं जळजळीत दर्शन झालेला मोहन भार्गव जेव्हा सगळ्या लोकांसमोर म्हणतो, ‘मला नाही वाटत आपला देश जगातला सगळ्यात महान देश आहे.’ तेव्हा क्षणभर स्तब्ध व्हायला होतं. हा देशभक्तीपर सिनेमा असूनदेखील नायकाच्या तोंडी असे डायलॉग देणं हे मोठं आव्हान होतं. आणि आशुतोषनं ते पेललं. खरं करून दाखवलं.
खेड्यातला संथपणा, त्यांच्या आयुष्यातलं मानसिक साचलेपण, कथानकातले अर्थपूर्ण संवाद, हुशार आणि साधी गीता, अवीट गाणी, जावेद अख्तरचे लिरिक्स, ए आर रेहमानचं म्युझिक, आशुतोषचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!!
राम ही तो करुणा में है, शांति में राम हैं
राम ही है एकता में, प्रगति में राम हैं
राम बस भक्त और ही शत्रु के भी चिंतन में हैं
देख त्यज के पाप रावण, राम तेरे मन में है
राम मेरे मन में है, राम तेरे मन में है
राम तो घर घर में है, राम हर आँगन में है
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हॉ
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है
हेही वाचा :
ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?
ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो