यश मिळवायला अपार कष्ट लागतात. पण मिळवलेलं यश टिकवायला त्याहीपेक्षा जास्त कष्ट लागतात. यश मिळाल्यावर पाय जमिनीवर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार नेमका हेच विसरला. त्याच्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून सुटेल. पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झालीय. ती भरून निघणं अवघड आहे.
ऑलिम्पिकमधे दोन पदकं जिंकणारा आणि विश्वविजेता कुस्तीगीर सुशील कुमार याच्या कारकिर्दीला गेल्या दोन-तीन वर्षात ओहोटी सुरू झाली होती. अगदी अलीकडे ऑलिम्पिक पूर्वीच्या निवड चाचणीतही तो पराभूत झाला होता. तरीही भारतीय कुस्ती क्षेत्रात आपलं वर्चस्व येनकेन प्रकारे राखण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला. हेच बूमरँग त्याच्या नशिबावर आदळलं.
आपल्या सहकारी खेळाडूलाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच तो सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अडकला गेला. सुशील कुमार याच्या या कृत्याबद्दल मला काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झुंज’ या मराठी सिनेमातलं एक गाणं आठवलं. कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू.
केवळ खेळाडूच नाही तर इतर अशी अनेक क्षेत्रं आहेत की नामवंत व्यक्ती समाजातला आपला नावलौकिक विसरून अतिशय घृणास्पद काम करायला धजावतात आणि परिणामी आपली आजपर्यंत कमावलेली कीर्ती धुळीला मिळवतात. सुशील कुमार याच्याविरुद्ध खून करणं, हत्येचं कारस्थान, अपहरण, गंभीर इजा करणं यासारखे अतिशय गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा : ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम
केवळ भारतीय नाही तर जागतिक स्तरावर नावलौकिक असलेला सुशील कुमार अडकल्यामुळे सर्वांनाच कमालीच्या आश्चर्याचा धक्का बसलाय. लाखो कुस्ती शौकिनांच्या हृदयातला हा मल्ल असं दुष्कृत्य करायला का प्रवृत्त झाला याचं सर्वांना आश्चर्य आणि दुःख वाटत आहे.
सुशील कुमार याने ऑलिम्पिक स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवलंय. तीन वेळा राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा विजेता, एकदा जागतिक अजिंक्यपद आशियाई क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन वेळा कांस्यपदक अशी भरघोस पदकं त्याने मिळवली आहेत. २००९ ला ‘राजीव गांधी खेल रत्न’ हा भारताच्या क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च सन्मानही त्याला मिळाला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत त्याला शारीरिक तंदुरुस्तीच्या समस्येनं ग्रासलंय. त्यातच त्याची कामगिरीही निराशाजनक होत चालली होती. असं असूनही ज्या छत्रसाल स्टेडियममधे त्याच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल सराव करतात, तिथं आपलं वर्चस्व राखण्याचा तो सतत प्रयत्न करायचा. छत्रसाल स्टेडियमचे सर्वेसर्वा आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल महाबली सतपाल यांचा तो जावई असल्यामुळेच त्याची तिथं दहशतच निर्माण झाली होती.
आपल्यापेक्षा कोणी शिरजोर होत असेल तर कोणताही खेळाडू डिवचला जाणारच. सुशीलची मक्तेदारी संपवणार्यांचा प्रयत्न करणार्यांचा गट तिथं निर्माण झाला होता. हत्या झाली तो सागर धनकड हा कुमार राष्ट्रीय विजेता मल्ल होता.
सोनू महल, भगत पहलवान, अमित खागड, रवींद्र भिंडा या सहकार्यांसोबत सागरने अलीकडेच सुशील कुमारला खुलं आव्हान दिलं होतं. त्यामुळे सुशील कुमार हा त्याच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न करत होता.
सुशील कुमारच्या मालकीच्या बिल्डिंगमधे सागर हा भाड्याने एका रूममधे राहत होता. सागर याने हे घर सोडावं यासाठी सुशील कुमार सतत मागणी करत होता. ही मागणी त्याने धुडकावून लावली होती. वर्चस्ववादाला त्यामुळे आणखीनच खतपाणी मिळालं.
हेही वाचा : फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा
सुशील कुमार याच्यावर जे आरोप ठेवण्यात आलेत त्याची दाहकता खूपच आहे. सागरला मारहाण करत त्याचा वीडियो बनवून तो कुस्ती क्षेत्रातल्या लोकांमधे पाठवून एकप्रकारे दहशत निर्माण करण्याचा सुशीलचा हेतू होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
सुशीलने सागर आणि त्याच्या सहकार्यांचं अपहरण केलं. छत्रसाल स्टेडियममधे आणून सागर आणि त्याच्या इतर सहकार्यांना हॉकी स्टिक, बेसबॉलची बॅट, काठ्या लाथाबुक्क्यांचा उपयोग करण्यात आला. त्यासाठी सुशीलने काही भाडोत्री गुंडांनाही पाचारण केल्याचं सिद्ध झालंय. घटनेनंतर स्टेडियमच्या बाहेरही हत्यारं, काही बंदुका आणि काडतुसं मिळाली आहेत आणि अपहरणासाठी ज्या गाड्या उपयोगात आणल्या त्या गाड्याही तिथं मिळाल्या आहेत.
सीसीटीवी फुटेज आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी मोबाईलनं जे चित्रीकरण केलंय त्यात सुशील कुमारचा प्रत्यक्ष सहभाग होता हे दिसून आलं आहे. आपला त्यात सहभाग नव्हता तर सुशील कुमारने अटकपूर्व जामीन मिळवायला पाहिजे होता आणि मीडियापुढेही त्याला निवेदन करता आलं असतं. पण तसं न करता तो अनेक दिवस फरार झाला होता.
यावरून त्याचा थोडासा का होईना सहभाग आहे हे स्पष्ट झालंय. आपल्याला सागर आणि त्याच्या सहकार्यांकडून जीवे मारण्याचा धमक्या आल्या होत्या, असं सुशील याने स्वतःचा बचाव करताना म्हटलंय. पण जर त्याला धमक्या मिळाल्या होत्या तर तो पोलिसांकडे का नाही गेला? हा प्रश्नही निर्माण होतो. त्याने मागणी केली असती तर त्याला पोलिस संरक्षण निश्चितच मिळालं असतं.
सुशील कुमार सागरच्या हत्येमधे अडकल्यानंतर आता छत्रसाल स्टेडियममधे सराव करणारे इतर मल्लही सुशीलच्या दहशतीसंदर्भात यापूर्वी घडलेल्या घटनांचे दाखले देऊ लागलेत. एवढे दिवस त्याच्या दहशतीमुळे कोणताही पैलवान एक शब्दही उच्चारत नसायचा. आता काही पैलवान मंडळी सुशील कुमारने दिलेल्या त्रासाबद्दल उघड उघड माहिती देऊ लागलेत.
२०१६ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या वेळी भारताचा मल्ल नरसिंग यादव हा उत्तेजक सेवनाच्या आरोपाखाली सापडला होता. राष्ट्रीय शिबिरात सराव करत असताना अन्नातून त्याला उत्तेजक पदार्थ दिला गेल्याचा संशय त्यावेळी निर्माण झाला होता. या कारस्थानामधेही सुशील किंवा त्याच्या पाठीराख्यांचा प्रत्यक्ष सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यावेळी ७४ किलो वजनी गटात नरसिंगने भारताला प्रवेशिका मिळवून दिली होती आणि ७४ किलो हा सुशील कुमारचाच वजनी गट आहे. सुशील कुमार सांगेल ती पूर्व दिशा अशीच त्यावेळी भारतीय कुस्ती क्षेत्रात परिस्थिती होती. त्यामुळे नरसिंग याच्यासारखा गुणवान मल्ल कुस्ती क्षेत्रातून कायमस्वरूपी बाहेर फेकला गेला.
हेही वाचा : बोरिवलीच्या आजीबाईच्या बटव्यात दडलंय काय?
गंभीर गुन्ह्यांमधे अडकलेला सुशील कुमार हा पहिलाच भारतीय खेळाडू नाही. २००७ च्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेत विजयी झेल घेणारा एस. श्रीशांत हा २०१३ च्या आयपीएल स्पर्धेत सामना निकाल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला. सात वर्ष त्याच्यावर क्रिकेट खेळायला मनाई करण्यात आली होती.
भारताच्या कनिष्ठ राष्ट्रीय मुष्टियुद्ध टीममधे असलेला दीपक पहल याच्यावर चार जणांच्या हत्येचा आरोप आहे. नवज्योतसिंग सिद्धू या क्रिकेटपटूविरुद्ध १९९१ मधे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला होता आणि त्यांना काही वर्ष तुरुंगातही जावं लागलं होतं.
भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दिन, अजय जडेजा आणि अष्टपैलू खेळाडू अजय शर्मा यांच्याविरुद्ध सामना निकाल निश्चित करण्यात आल्याचे आरोप सिद्ध झाले होते आणि त्यांच्यावर क्रिकेट खेळायला कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मल्ल खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी इथं १९५२ ला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कुस्तीमधलं पहिलं पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर २००८ च्या ऑलिम्पिकमधे कांस्य पदक तर २०१२ च्या ऑलिम्पिकमधे रौप्यपदक मिळवत सुशील कुमारने भारताची शान उंचावली होती.
भारतामधली कुस्ती आणि इतर खेळातल्या युवकांसाठी तो आदर्श खेळाडू मानला जात होता. इतकंच नाही तर परदेशातले खेळाडू आहे त्याला आपल्या आदर्श खेळाडूच्या स्थानी पाहत होते. खुनाच्या गंभीर आरोपांमधे नाव गुंतलं असल्यामुळे त्याच्या आणि भारताच्या कुस्ती क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे.
सुशील कुमार याचा केवळ क्रीडाक्षेत्र नाही तर राजकीय क्षेत्रातही दबदबा आहे. स्वतःभोवती असलेल्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून स्वतःची सुटका करून घेऊ शकेल किंवा स्वतःला कमी शिक्षा होईल याचाही तो प्रयत्न करू शकेल; पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झाली आहे ती भरून निघणं अवघड आहे.
हेही वाचा :
सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला