सुनील देशमुख : अमेरिकेतला महाराष्ट्राचा 'श्रीमंत' कार्यकर्ता

०६ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


पैसा कमावणारे अनेकजण असतात. ते कमावलेल्या प्रचंड पैशातून बंगले, सेकंड होम, सोनं, गाड्या, गुंतवणूक याकडे लक्ष देतात. पण अमेरिकेत राहून, उदंड पैसे कमावूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना, चळवळींना आर्थिक रसद पुरवत राहणारा कार्यकर्ता म्हणजे सुनील देशमुख. नुकतंच त्यांचं अमेरिकेत निधन झालं आणि 'कार्यकर्त्यांचं मोहोळ' खिन्न झालं.

गांधीजींनी महाराष्ट्राला 'कार्यकर्त्यांचं मोहोळ' असं म्हटलं आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात कुणीना कुणी तरी कार्यकर्ता असतो. माणसांमधे, समाजामधे उतरून स्वतःच्या खिशात हात घालून कार्यकर्तेपण जगणारे या मातीत अनेकजण आहेत. या कार्यकर्त्यांची 'लष्कराच्या भाकऱ्या भाजणं' अशी थट्टाही केली जाते. पण या लष्कराच्या भाकऱ्या आनंदानं भाजणारे तरीही कमी झाले नाहीत. अमेरिकेत गेला तरीही कार्यकर्तेपण संपलं नाही, असा एक कार्यकर्ता म्हणजे सुनील देशमुख.

सत्तरच्या दशकात अमेरिका जगभरातल्या तरुणांना साद देत होती. त्यावेळी सांगलीतून मुंबईत आलेले सुनील देशमुख अमेरिकेत गेले. तिथल्या वायदा बाजारात त्यांनी खूप पैसे कमावले. पण हे पैसे तिथल्या फाइव स्टार लाइफस्टाइलवर खर्च करण्याऐवजी, त्यांना महाराष्ट्रातल्या आदिवासी, शेतकरी, अंधश्रद्धाविरोधी चळवळी दिसत होत्या. त्यात काम करणारा गरीब कार्यकर्ता दिसत होता. त्यांनी ठरवलं आणि या चळवळींना आर्थिक पाठिंबा देणारं मोठं काम करायचं. त्यातूनच पुढे महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेचं काम जगाला कळू लागलं.

सेवा दल, युक्रांदचा प्रभाव

सुनील देशमुख हे मुळचे सांगलीचे. त्यांचे मामा सेवा दलाचे होते आणि आई सुधारकी विचारांची होती. साने गुरुजींच्या वाङ्मयाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या संस्कारात ते लहानाचे मोठे झाले. कुमार सप्तर्षी, अनिल अवचट आणि सांगलीचे क्रांती शहा यांचा त्यांच्या जगण्यावर प्रभाव होता. युक्रांदच्या विचारांनी ते भारावलेले होते. विद्यार्थीदशेत असताना मुंबईच्या स्टडीग्रुपमधे त्यांचा वावर होता.

मॅट्रिकला ते बोर्डात चौथे आले होते. त्यांनी मुंबई यूडीसीटी तर सध्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यांनी कॉलेजात असताना काही कविता लिहिल्या होत्या. सत्तरच्या दशकात ते अमेरिकेत गेले. त्यावेळी तिथं विएतनाम युद्धाचं वातावरण होतं. त्याला विरोध करणाऱ्या डाव्या विद्यार्थी चळवळी जोरात होत्या. ‘स्टुडन्ट फॉर डेमोक्रॅटिक सोसायटी’ ही चळवळ प्रामुख्याने होती.

जग बदलण्याचं स्वप्न सत्तरच्या दशकात जगभरच्या तरुणांच्या मनात होतं. तो त्यांच्यासाठी कायमच भारावलेला कालखंड राहिला. 'बीटल्स'चं संगीत हा त्यांचा आदर्श होता. त्यांच्या Imagine there is no countries सारख्या प्रेरकगीतातला आशय आम्हा जगभरच्या तरुणांना ‘आपला’ वाटत होता. त्यामुळे भारतातल्या मूल्यभानाला साजेसंच ते वातावरण होतं.

हेही वाचा: शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

वॉलस्ट्रीटवरचा पहिला मराठी कमोडिटी ट्रेडर

अमेरिकेमधे एम. एस. केमिकल इंजिनिअरिंग, एम. बी. ए. या पदव्यांबरोबरच जे. डी. ही कायद्याची पदवीही त्यांनी मिळवली. अमेरिकेत वकिली करण्याचा परवानाही त्यांनी प्राप्त केला. वॉलस्ट्रीटवर मोठ्या पगाराची, मोठ्या पदाची नोकरी स्वीकारली. आयुष्यभरची कमाई त्यांनी वॉलस्ट्रीटवर तेलाच्या वायदेबाजारात पाच वर्षांत गुंतवली. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवर पहिला मराठी कमोडिटी ट्रेडर म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता.

व्यावसायिक दृष्ट्या यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना त्यांनी अधिक पैसा मिळवण्याचा ध्यास न धरता वॉलस्ट्रीट सोडलं आणि समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काही तरी करायचं ठरवलं. त्यातून १९९४ मधे स्वतःच्या एक कोटीच्या निधीतून त्यांनी ही ‘साहित्य पुरस्कार योजना’ सुरू केली. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी आणखी एक कोटीची भर घालून सामाजिक कार्य करणाऱ्यांसाठी  ‘समाजकार्य पुरस्कार योजना’ जाहीर केली.

स्वतःच्या नावाचा आग्रह न धरता ती अमेरिकेच्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे कार्यान्वित केली. महाराष्ट्रात त्यांच्याबरोबर त्यावेळी केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या मृणालताई गोरे होत्या. लोकवाङ्मय गृहाचे प्रकाश विश्वासराव, सतीश काळसेकर ही मंडळी त्यांच्यासोबत होती. अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. दिगंबर पाध्ये आणि चंद्रकांत केळकर यांचाही या कार्यात सक्रिय सहभाग होता.

कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं

महाराष्ट्रातल्या इतर पुरस्कार योजनांपेक्षा पुरस्कारांची रक्कम खूपच जास्त होती. लेखकांच्या मान-सन्मानाला साजेशा शानदार समारंभ पहिल्या वर्षी झाला. काही अभ्यासवृत्तीही देण्यात आल्या. या पुरस्कारांसाठी अर्ज मागवायचे नाहीत, जाणकारांकडून शिफारशी मागवायच्या हे ठरलेलंच होतं. पुरस्कारांचे निकष, निवडीची पद्धत ही लोकशाही निकषांवर आधारित आणि निःपक्षपाती अशीच होती. गेले २८ वर्ष सुरू असलेले हे पुरस्कार आजही सुरू आहेत.

कार्यकर्ता हा कोणत्याही चळवळीचा प्राण असतो, त्याच्या पाठीशी समाजानं आणि विशेषतः समाजातील धनिकांनी ठामपणे उभं राहायला हवं, असं ते कायमच सांगत असत. साहित्याबरोबरच सामाजिक संस्था, महिलांचे प्रश्न, पर्यावरण अशा क्षेत्रातही ते सक्रिय होते. अनेक सामाजिक विषयावर लिखाण केलं आहे. 'प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आणि वर्तमान' या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिलं होतं.

अमेरिकेमधे पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्वांत जुन्या 'सियारा क्लब' या संस्थेचे ते सक्रिय सभासद होते. 'सियारा'तर्फे भारतामधे पर्यावरणाच्या संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थांना देण्यात येणाऱ्या एक लाख डॉलर्सचा पुरस्काराचे ते शिल्पकार आहेत.  या संस्थेच्या निधी संकलन समितीचे प्रमुख आहेत. महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दल त्यांना न्यूयॉर्कमधील 'टाइम स्क्वेअर' येथे हिलरी क्लिंटन यांच्यासमवेत 'फुल वीक सॅल्यूट'चा सन्मान देऊन गौरव करण्यात आला होता.

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठं काम

देव हा देव्हाऱ्यात नसतो, तर तो माणसांमधे असतो यावर सुनील देशमुख यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या आईकडून त्यांना हा वारसा मिळाला होता. गावातली वर्णव्यवस्था संपवण्यासाठी जेवणाच्या पंगती एकत्र व्हाव्यात यासाठी धडपडणारी आई त्यांनी लहानपणी पाहिली होती. त्यामुळे देवळातल्या देवापेक्षा माणसं जोडायला हवी, याचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं होतं.

मी निरिश्वरवादी आहे, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते भक्कम पाठीराखे होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या या कामाविषयी त्यांना विशेष आस्था होती. देशमुख यांनी नरेंद्र दाभोलकरांना अमेरिकेत बोलावून त्यांची अनेक भाषणं आयोजित केली होती. त्यांनी डॉ दाभोलकरांना दशकातला उत्कृष्ट कार्यकर्ता हा दहा लाख रुपयाचा पुरस्कार दिला होता.

दाभोलकरांनी हा पुरस्काराचा निधी महाराष्ट्र अंनिसला दिला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशनचा पहिला समाजकार्य गौरव पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देण्यात आला होता. तसंच सुनील देशमुख यांनी स्वखर्चाने 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र' हे मासिक महाराष्ट्रातल्या १२५०० शाळांमधे सुरू केलं होतं. या मासिकामुळे राज्यभर ही चळवळ पोचायला मोठी मदत झाली.

उद्योजकांना फाउंडेशनशी जोडण्याचा प्रयत्न

१९९६ मधे पुरस्काराचं केंद्र मुंबईतून पुण्यात हलवण्यात आलं. दहा वर्ष ‘साधना ट्रस्ट’च्या सहयोगाने आणि आता महिला सर्वांगिण उत्कर्ष समिती 'मासूम'च्या सहयोगाने या पुरस्कार योजनेची कार्यवाही होते. महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले गुणी साहित्यिक आणि कार्यकर्ते यांचा शोध घेऊन महाराष्ट्र फाउंडेशन त्यांच्यापर्यंत जातं. त्यांचा सन्मान करतं. आजवर एकूण ३५० ‘साहित्य पुरस्कार’ आणि ‘सामाजिक कार्यकर्ते’ पुरस्कार देण्यात आलेले आहेत.

सुनील देशमुखांनी अमेरिकेत पर्यावरणाच्या क्षेत्रातही अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल् गोर यांच्याबरोबर काम केलेलं आहे. अमेरिकेतले सर्वात वरचे दहा उद्योगपती घेतले तर त्यांनी आपली ९९ टक्के संपत्ती सामाजिक कार्याला दिलेली आहे. वॉरन बफे, बिल गेटस्, जॉर्ज सोरॉस अशांचा आदर्श देशमुखांनी आपल्यासमोर ठेवलेला होता.

त्यांचं उदाहरण देऊन ते म्हणायचे, 'सामाजिक बांधिलकीची ही जाणीव अमेरिकन उद्योगपतीत दिसते, पण भारतातल्या उद्योगपतींत का दिसत नाही?'  हीच त्यांची खंत होती. महाराष्ट्र फाउंडेशनच्या या पुरस्कार योजनेत उद्योगपतींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असं त्यांना वाटायचं. पण मराठी उद्योजकांनी त्याबद्दल कधी फारसा उत्साह दाखवला नाही.

हेही वाचा: 

मी बंडखोर कसा झालो सांगतायत राजा ढाले

चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंनी लोककलेला आधुनिक रुप दिलं

एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच

(साधना, अंनिस यांनी लिहिलेल्या माहितीला आधार मानून हा लेख लिहिला आहे)