खुलेपणाने जगा, अधीर रहा आणि आशावादी असा, इतिहास तुमची नोंद घेईल

२४ जून २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरता आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते.

अमेरिकेतली शिक्षण पद्धती आपल्यापेक्षा वेगळी असते. जूनच्या आसपास पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या देशभरातल्या मुलांचा पदवीदानाचा समारंभ म्हणजेच ग्रॅज्युएशन सेरेमनी होते. मुलांना पदवीसोबतच मोठ्या, यशस्वी झालेल्या माणसांचा मोलाचा सल्ला ऐकायला मिळतो. यंदा कोरोना वायरसमुळे हा समारंभ रद्द करण्यात आला असला तरी मोठ्या माणसांची भाषणं मुलांसाठी उपलब्ध करून दिली जातायत.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही युट्यूबच्या माध्यमातून आपलं भाषण मुलांपर्यंत पोचवलंय. पिचाई यांचं हे भाषण फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्यापैकी प्रत्येकासाठी तितकंच उपयुक्त आहे. त्यांच्या या इंग्रजी भाषणाचा रेणुका कल्पना यांनी केलेला अनुवाद इथं देत आहोत.

 

सगळ्यांना हॅलो. आणि तुमच्यासोबतच तुमचे शिक्षक, पालक आणि हा दिवस बघायला तुम्हाला मदत करणाऱ्या सगळ्यांचं अभिनंदन!  

प्रेक्षक वर्ग समोर नसातना अशाप्रकारे घराच्या पडवीत उभं राहून पदवी समारंभाचं भाषण द्यावं लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण यामुळे आपले युट्यूबसाठी काम करणारे लोक काय अनुभवत असतील हे मला समजतंय. शिवाय, आपले माजी राष्ट्राध्यक्ष, फर्स्ट लेडी, लेडी गागा आणि क्वीन बे यांच्यासोबत मी एकाच व्यासपीठावर वर्च्युअली असेन असंही कधी वाटलं नव्हतं.

अशाप्रकारच्या पदवी समारंभाची तुमच्यापैकी कुणीही कल्पना केली असेल असं मला वाटत नाही. तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणून आनंद व्यक्त करायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला दुःख करावं लागतंय. तुमच्या भविष्याची घडी विस्कटल्याबद्दल, तुम्ही कमावलेली नोकरी हातातून गेल्याबद्दल आणि त्यानंतर मिळणाऱ्या अनुभवांना मुकल्याबद्दलचं हे दुःख आहे. अशा उदास वातावरणात आशेचा एकही किरण सापडणं अवघड असतं.

त्यामुळे हे मधलं सगळं गाळून मला तुम्हाला शेवटची एकच गोष्ट सांगायची आहे : विजय तुमचाच होणार आहे.

हा माझ्या भाषणाचा शेवट नाही. त्यामुळे आनंद मानू नका.

हेही वाचा : आपण ऑफिसमधे काम केल्यानंच आज वर्क फ्रॉम होम शक्यः सुंदर पिचाई

विजय तुमचाच होणार आहे हे मला पक्कं माहितीय. कारण तुमच्या आधी अनेकांनी तो मिळवलाय. शंभर वर्षांपूर्वी १९२०मधे मुलांनी अशाच एका जीवघेण्या साथरोगासोबत आपली पदवी पूर्ण केली. ५० वर्षांपूर्वी १९७० मधे विएतनाम युद्धाच्या मध्यात असताना मुलांनी पदवी मिळवली. तर जवळपास २० वर्षांपूर्वी २००१ च्या बॅचने तर ९/११ च्या हल्ल्याच्या काहीच दिवस आधी पदवी मिळवली होती.

अशी लक्षात ठेवण्याजोगी अनेक उदाहरणं आहेत. प्रत्येकवेळी नवीन आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला आणि प्रत्येकवेळी ते जिंकले. हा लांबलचक इतिहास आपल्याला आशा देतो.

त्यामुळे आशावादी रहा.

मला एकप्रकराचा ट्रेण्ड दिसतो : प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीला कमी लेखत असते. हे अगदी साहजिक आहे.

यामागचं कारण एकच असतं. एका पिढीचा विकास हा पुढच्या पिढीचा पाया बनतो हे त्यांना कळत नाही. पण सगळ्या प्रकारच्या शक्यता लक्षात येण्यासाठी नवीन लोकांच्या एका गटानं पुढे येणं गरजेचं असतं.

माझ्या लहानपणी तंत्रज्ञानाचा वापर फारसा केला जात नव्हता. मी १० वर्षांचा असताना आम्ही पहिल्यांदा फोन घेतला. मी पदवीसाठी अमेरिकेला येत नाही तोपर्यंत मला कधी कम्प्युटरही वापरायला मिळत नव्हता. आणि अनेक वर्षांनंतर आम्ही घरी टीवी आणला तेव्हा तर त्यावर एकच चॅनल लागायचं.

त्यामुळे आज तुमच्याशी लाखो चॅनल असणाऱ्या एका प्लॅटफॉर्मवरून बोलताना मला किती आश्चर्यकारक आदर वाटतोय त्याची तुम्ही कल्पना करू शकता.

याउलट तुम्ही अनेक आकाराच्या कम्प्युटरसोबत मोठे झालात. माझ्या आयुष्यातली गेली पाच वर्ष मी ज्यावर काम करण्यात घालवली ती कम्प्युटरला काहीही कुठेही विचारायची टेक्नॉलॉजी आता तुम्हाला नवखी वाटत नाही. यामुळे मला वाईट वाटत नाही. उलट, मला आशाच वाटतेय.

तंत्रज्ञानाबाबतीत काही गोष्टी तुम्हाला फार निराश करत असतील. त्या गोष्टी तुम्हाला अधीरही बनवत असतील. तुमची ही अधीरता गमवू नका. यानेच तंत्रज्ञानातली नवी क्रांती घडणार आहे. माझ्या पिढीनं कधी स्वप्नातंही पाहिल्या नसतील अशा गोष्टी साध्य करायला ही अधीरताच तुम्हाला मदत करणार आहे.

तसंच हवामान बदल किंवा शिक्षण व्यवस्था याबाबत माझ्या पिढीनं ठेवलेल्या दृष्टीकोनाबाबतही तुम्ही निराश असाल. स्वस्थ बसू नका. अधीर रहा. त्यानेच जगाला आवश्यक असणाऱ्या प्रगतीला गती मिळणार आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

तुम्ही आपापल्या मार्गाने जग सुंदर करणार आहेत. तुम्हाला ते आत्ता माहीत नसेल तरीही ते सुंदर होणारच. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची भूमिका नेहमी स्वागतार्ह असायला हवी. तरच तुम्हाला खरोखर काय आवडतं हे शोधता येईल.

मला आवडणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान होतं. माझ्या कुटुंबाला तंत्रज्ञानाचा आधार मिळाला तसं आमचं जगणं सुधारलं. त्यामुळेच मी पदवी शिक्षण पूर्ण केलं तेव्हा मला जास्तीत जास्त लोकांना तंत्रज्ञान वापरता यावं यासाठी काहीतरी करायचंय, हे मला माहीत होतं.

सेमी कंडक्टर तयार करून हे शक्य होईल, असं मला तेव्हा वाटत होतं. म्हणजे, त्यापेक्षा भारी काम काय असणार?

अमेरिकेत येऊन स्टॅण्डफोर्डमधे मला शिकता यावं यासाठी माझ्या बाबांनी त्यांच्या एका वर्षाच्या पगाराइतके पैसे फक्त विमानाच्या तिकीटावर खर्च केले. विमानात बसण्याची माझी ती पहिली वेळ होती. पण मी कॅलिफोर्नियात उतरलो तेव्हा माझ्या कल्पनेबाहेरच्या गोष्टी तिथं होत्या. घरी फोन करण्यासाठी मला एका मिनिटाला २ डॉलरपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत होते. एक ऑफिस घ्यायचं म्हटलं तरी भारतात माझ्या बाबांच्या महिन्याच्या पगाराइतका पैसा खर्च होत होता.

कॅलिफोर्नियाचे समुद्रकिनारे गरम असतात, असं मी ऐकून होतो. पण प्रत्यक्षात गेलो तेव्हा तिथलं पाणी अतिशय थंड होतं.

या सगळ्यात भर म्हणजे मला माझ्या कुटुंबाची, माझ्या मित्रांची आणि माझी आत्ताची बायको आणि तेव्हाची गर्लफ्रेंड या सगळ्यांची खूप आठवण यायची.

या काळातली माझाबाबतीतली सगळ्यात खास गोष्ट होती कप्म्युटर. आयुष्यांदा पहिल्यांदा मला पाहिजे तेव्हा मी कप्म्युटर हाताळू शकत होतो. मला वेडच लागलं होतं. इंटरनेटचं एक जाळं माझ्या भोवतालीही विणलं जात होतं.

मी स्टॅण्डफोर्डमधे आलो त्याच वर्षी मोझेक ब्राऊझर बाजारात आलं होतं. त्यामुळे वर्ल्ड वाईब वेब म्हणजेच डब्लूडब्लूडब्लू आणि इंटरनेटला एक वेगळी प्रसिद्धी मिळू लागली होती.

माझी पदवी पूर्ण झाली त्या उन्हाळ्याच्या दिवसात सर्जी ब्रिन हा पदवीचा विद्यार्थी लॅरी पेज या इंजिनिअरींग करणाऱ्या विद्यार्थ्याला भेटला होता.

या दोन माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या घटना घडल्या होत्या. पण मला तेव्हा त्याची कल्पना नव्हती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोचवण्याचा इंटरनेट हा एकमेव मार्ग असू शकतो हे कळायला मला वेळ लागला. पण हे मला कळालं तेव्हा लगेचच मी माझा कोर्स बदलला आणि गुगलमधे माझी स्वप्नं पूर्ण करायची असं ठरवलं.

हेही वाचा : विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे

त्या पहिल्या ब्राऊझरने माझ्या मनात आश्चर्य निर्माण केलं होतं. त्यापासून प्रेरित होऊन २००९ मधे मी आणखी एक ब्राऊझर काढलं. त्याचं नाव होतं क्रोम. शेजारच्या गावातला किंवा जगातल्या कुठल्याही भागातल्या एखाद्या विद्यार्थाला माहितीचं भव्य भांडार उपलब्ध असायला हवं. म्हणूनच लोकांना परवडतील अशा किमतीतले लॅपटॉप आणि फोन गुगलला तयार करता यावेत यासाठी प्रयत्न केले.

मी स्टॅण्डफोर्डमधेच राहिलो असतो, माझा कोर्स पूर्ण केला असता तर आत्तापर्यंत माझी पीएचडी पूर्ण झाली असती. माझ्या आईवडलांना माझा खूप अभिमान वाटला असता. पण तसं झालं असतं तर कदाचित तंत्रज्ञानाचे फायदे लोकांपर्यंत पोचवण्याची संधी मी गमावली असती. आणि आत्ता गुगलचा सीईओ म्हणून मी इथं उभं राहून तुमच्याशी बोलूही शकलो नसतो.

मी २७ वर्षांचा असताना पहिल्यांदा कॅलिफोर्नियामधे उतरलो तेव्हा माझ्यासोबत असं सगळं होईल याचा विचारही केला नव्हता. माझं नशीब माझ्यासोबत होतंच पण साधा विद्यार्थी ते गुगलचा सीईओ इथंपर्यंत मला कोणत्या गोष्टीनं आणलं असेल तर ती म्हणजे तंत्रज्ञानाबद्दल माझ्या मनात असणारी असीम आवड आणि सगळ्या गोष्टींकडे मोकळेपणाने बघण्याचा माझा दृष्टीकोन.

त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट मनापासून आवडते ती शोधायला पुरेसा वेळ घ्या. तुमच्या पालकांना तुम्ही काय व्हावं असं वाटतं याचा विचार करू नका. किंवा तुमचे मित्र काय करतायत तेच करण्याकडेही जाऊ नका. समाजाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत तेही सोडून द्या.

मला माहितीय तुम्हाला भरपूर सल्ले मिळत असणार आहेत. म्हणूनच मी माझ्या एकाच सल्लासोबत तुमचा निरोप घेतो : मोकळे रहा, अधीर रहा आणि आशावादी असा.

तुम्ही हे करू शकलात तर इतिहास तुम्हाला तुम्ही काय गमावलं यासाठी नाही तर तुम्ही काय बदललं यासाठी लक्षात ठेवेल. 

तुमच्याकडे सगळं काही बदलण्याची संधी असेल तर तुम्ही ती बदलाल याची मला खात्री वाटते.

हेही वाचा : 

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी